You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
केतकी माटेगावकरची भावाला श्रद्धांजली वाहताना भावूक पोस्ट
अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हिने तिच्या दिवंगत भावासाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.
केतकी माटेगावकरच्या चुलत भावाने दोन आठवड्यांपूर्वी पुण्यातील सुसगावमध्ये आत्महत्या केली होती.
केतकीच्या चुलत भावाचं नाव अक्षय अमोल माटेगावकर होतं. तो 21 वर्षांचा होता.
आपल्या चुलत भावाच्या मृत्यूनंतर केतकीनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
केतकीने आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?
"माझा अक्षू, माझा छोटासा गोड अक्षू, तुझ्यासारखा अत्यंत सुस्वभावी, मल्टी टॅलेंटेड, प्रचंड हुशार, मेहनती आणि गोड भाऊ मिळाला.
आता काय लिहू? लिहू की नको लिहू? 21 वर्षांच्या आठवणी काही शब्दांत कशा लिहू? हाच विचार करतेय. गेले काही दिवस मी तुझ्याबरोबरच्या सगळ्या आठवणी जागवण्यातच जातो. मला त्या धूसर व्हायला नको आहेत. किती आणि केवढ्या आठवणी..
अभ्यास झाला की सगळं बाजूला ठेवून रियाजाला बसून त्यात हरवून जाणार अक्षू, गझल, ठुमरी ऐकत बसणारा, कधी हरिहरन, तरी कधी पिंक फ्लॉईड ऐकणारा. कधी शास्त्रीय संगीत तर कधी फुटबॉलविषयी सांगणारा. घरी आल्यावर तू, अमोल काका बसलो की जॅमिंग करणारा अक्षू मला सोडून गेला.
तुझी मॅच्युरिटी आमि बुद्धिमत्ता अफाट होती तरी एक गोष्ट तुझी केतकी ताई म्हणून..
आयुष्यात कुठलीही गोष्ट, ध्येय, स्वप्नं, विचार आपल्या स्वत:पेक्षा मोठे नसतात. ते होऊ द्यायचे नसतात. आपण आहोत म्हणून त्यांचं अस्तित्व असतं.
तू आम्हाला सोडून गेलास पण आयुष्यभर एक गोष्ट तू आमच्या सोबत आहे याची जाणीव करून देत राहील ते म्हणजे तुझं गाणं. तुझं अप्रतिम गाणं. तू घरी आला की हसून मिठी मारणं, कधीही तुझ्या मांडीवर डोकं ठेवलं आणि पिक्चर किंवा मॅच चालू असेल तरी तुझं प्रेमाने हात फिरवणं मिस करतेय मी. असं वाटतं की आता घरी आले की अमोल काका हार्मोनियम घेईल, तू तानपुरा लावशील आणि आपण गायला बसू. सगळं पूर्ववत. रोज सकाळी उठले की क्षणभर असं वाटून जातं आणि मग लगेच वास्तवाची जाणीव होते.
तुझ्या गाण्याचा प्रवास मी अगदी जवळून पाहिला.
मी माझ्या उमलत्या कलावंताची मोठी बहीण असल्याचा मला कायमच अभिमान राहील.
मी हे वाक्य तुझ्या साठी लिहेन असं वाटलं नव्हतं पण तू जिथे कुठे असशील तिथे तू गात असशीलच अशी मला कल्पना करते की, तू गात असशील, आनंदी असशील.
तू आमच्याबरोबर कायमच असशील."
केतकी माटेगावकर आणि तिची आई सुवर्णा माटेगावकर प्रसिद्ध गायिका आहेत. केतकीने टाईमपास चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)