सुधीर मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना टोला, 'देव करो अन् तुम्हाला निवडणूक चिन्ह खंजीरच मिळो'

फोटो स्रोत, facebook
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा
1. 'देव करो अन् तुम्हाला निवडणूक चिन्ह खंजीरच मिळो,' सुधीर मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना टोला
"देव करो आणि उद्धव ठाकरे यांना निवडणूक चिन्ह खंजीरच मिळो," अशा शब्दांत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात एक व्हीडिओ ट्वीट करून त्यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी मुनगंटीवार म्हणाले, "असंख्य सूड घेण्याचे प्रकार पाहिले. एक मोठा नेता सरकारी वकिलांसोबत मॅच फिक्सिंग करून षडयंत्र करत होता. भाजपच्या नेत्यांना अटक कशी करता येईल, यासाठी कपोलकल्पित कथा सुरू केल्या."
"आजही तुम्हाला तुमची चूक मान्य नाही. तुम्ही येता-जाता खंजीर शब्दाचा उपयोग करता. देव करो आणि पुढचं निवडणूक चिन्ह तुम्हाला खंजीरच मिळो," असं मुनगंटीवार म्हणाले. ही बातमी लोकमतने दिली.
2. अजित पवार आठ जिल्ह्यांच्या दौऱ्यावर
विरोधी पक्षनेते अजित पवार हे राज्यातील अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांमध्ये पाहणी करण्यासाठी पवार यांचा चार दिवसांचा दौरा उद्यापासून सुरु होणार आहे.

फोटो स्रोत, TWITTER
अजित पवार पुढील चार दिवसात आठ जिल्ह्यामंध्ये जाऊन पाहणी करणार आहेत.
राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. राज्यातील पूरस्थिती लक्षात घेता राज्य सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांना मदत करावी, असं आवाहन देखील अजित पवार यांनी केलं होतं. यानंतर त्यांच्या दौऱ्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार आपल्या दौऱ्यात गडचिरोली, चंद्रपुर, वर्धा, यवतमाळ हिंगोली, नांदेड, बीड, औरंगाबाद या जिल्ह्यांना भेट देतील. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
3. मलिकांचे दाऊद गँग सदस्य, हसीना पारकर यांच्याशी संगनमत, ED चा हायकोर्टात दावा
मनी-लाँडरिंग प्रकरणात अटकेत असलेलेल राष्ट्रवादी काँग्रेस आमदार नवाब मलिक यांच्या जामीन अर्जाला ईडीने विरोध केला आहे. मलिक यांचा गँगस्टर दाऊद इब्राहिम प्रकरणात सक्रिय सहभाग असल्याचा दावा ED ने केला.

फोटो स्रोत, Alamy
कुर्ल्यातील एका मालमत्तेच्या खरेदी प्रकरणात मलिक यांनी दाऊदचे हस्तक हसीना पारकर आणि इतरांमार्फत सहभाग घेतला होता. तसंच मूळ मालकाला धमकावून मालमत्तेचा व्यवहार केला होता, असा आरोप ED ने ठेवला आहे.
मलिक सध्या रुग्णालयात दाखल आहेत. पण सध्या त्यांची प्रकृती ठीक असून त्यांना पुन्हा कारागृहात हलवण्यात यावं, अशी मागणी ED च्या वतीने करण्यात आली. ही बातमी ई-सकाळने दिली.
4. सोनिया गांधींची सहा तास चौकशी, आजही बोलावण्याची शक्यता
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज दुसऱ्यांदा अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) चौकशी करण्यात आली.

फोटो स्रोत, Ani
नॅशनल हेराल्ड प्रकरणात त्यांची ईडीकडून चौकशीची ही दुसरी वेळ आहे. सोनिया गांधी यांची पहिल्यांदा 21 जुलैला दोन तास ईडीने चौकशी केली. त्यावेळी त्यांना 28 प्रश्न विचारण्यात आले होते. याच प्रकरणात राहुल गांधी यांची ईडीने 50 तास चौकशी केली होती.
दरम्यान, सोनिया गांधी यांच्या ED चौकशीचा निषेध म्हणून देशभरात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. नवी दिल्लीत राहुल गांधी यांनी पक्षाच्या खासदारांसह विजय चौकाजवळ धरणे आंदोलन केलं. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. ही बातमी एबीपी माझाने दिली.
5. मासिक पाळीमुळे विद्यार्थिनीला वृक्षारोपणापासून रोखलं
मासिक पाळी आली म्हणून विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यापासून रोखल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील देवगाव आश्रम शाळेत हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
'मासिक पाळी आलेल्या मुलींनी झाड लावलं तर ते झाड जळतं', असं म्हणत शिक्षकांनी विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यापासून रोखल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी पीडित मुलीने आदिवासी विकास विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
याबद्दल मुलींनी शिक्षकांना प्रतिप्रश्नही विचारला मात्र, शिक्षकांनी दमदाटी करत गप्प बसण्यास सांगितलं, असा आरोपही विद्यार्थिनीकडून करण्यात आला आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली.
या प्रकरणात शिक्षकांची प्रतिक्रिया काय आहे, याविषयी अधिक माहिती मिळू शकली नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








