द्रौपदी मूर्मूंसाठीचं शिंदे-फडणवीसांचं 'मिशन 200' का फसलं?

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

राष्ट्रपती निवडणुकीत महाराष्ट्रातून 200 आमदारांच्या मतांचा कोटा पूर्ण करण्यात शिंदे सरकार अपयशी ठरलं आहे. एनडीएच्या द्रौपदी मूर्मू यांना महाराष्ट्रातून आमदारांची 181 मतं मिळाली तर यशवंत सिन्हा यांना 98 मतं मिळाली आहेत.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती निवडणूकीत आमचं मतांचं 'मिशन 200' असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. पण आता हा दावा फोल ठरल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

विरोधी पक्षाची मतं फुटल्याचा शिंदे गटाचा दावा

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षाची मतं फुटल्याचा दावा केला आहे. त्यांना मिशन 200 चा दावा फोल ठरल्याबद्दल विचारणा केली असता ते म्हणाले, "द्रौपदी मूर्मू या आदिवासी महिलेला राष्ट्रपती करण्याचा क्रांतिकारी निर्णय मोदींजींनी घेतला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो.

आमच्या विरोधी उमेदवाराला फक्त 98 मतं पडली. आमची 164 मतं होती. तरीही आमच्या उमेदवाराला 181 मतं मिळाली म्हणजे विरोधी मतं फुटली. ती 200 पर्यंत फुटतील असं वाटत होतं. पण ती कमी फुटली. पण आम्हाला जास्त मिळाली ते आमचं यश आहे असं आम्ही मानतो. "

मतांचं गणित काय होतं?

भाजप आणि शिंदे गटाकडे एकूण 164 आमदारांच्या मतांचा आकडा होता. त्याचबरोबर शिवसेनेच्या 15 आमदारांनी द्रौपदी मूर्मू यांना पाठींबा दिला होता. त्यामुळे काही अपक्ष आणि छोटे पक्ष मिळून 180 - 185 आमदारांची मतं द्रौपदी मूर्मू यांना मिळणार हे स्पष्ट होतं.

राष्ट्रपती निवडणूकीत कोणत्याही पक्षाचा व्हीप लागू होत नसल्यामुळे मतं फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण 200 मतांचं मिशन म्हणजे जवळपास 15-20 मतं कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची फुटणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण प्रत्यक्षात मूर्मू यांना 181 मतं मिळाली आणि यशवंत सिन्हा यांना 98 मतं मिळाली.

याबाबत बोलताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "सुरुवातीला मी आमच्या भगिनी द्रौपदी मूर्मू यांचं मी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो. शिंदे - फडणवीसांनी जो दावा केला होता तो फोल ठरला आहे. त्यांना 200 मतं अपेक्षित होती. पण 181 मतं मिळाली. याचा अर्थ एनडीएचीच मतं फुटली आहेत. कॉंग्रेस राष्ट्रवादीचं कोणतही मतं फुटलेलं नाही."

द्रौपदी मूर्मू

फोटो स्रोत, Getty Images

मिशन 200 का शक्य झालं नाही?

बहुमत चाचणीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केलं होतं. त्यात बोलताना, "आगामी विधानसभा निवडणुकीत 200 जागा निवडून आणू. माझ्यासोबत असलेल्या 50 पैकी एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नाही. तसे जर झाले नाही तर मी शेती करायला निघून जाईन," असं शिंदे म्हणाले होते.

"देवेंद्र फडणवीस आणि आमचा अजेंडा सेम आहे. आमचे 50 आणि त्यांचे 115 असे एकूण 165 आमदार झाले आहोत. पुढील निवडणुकीत ते 200 करू," असा शिंदे यांचा दावा आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी पहिल्याच भाषणात केलेला हा दावा आणि याच बहुमत चाचणीवेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनुउपस्थित राहीलेले आमदार यामुळे काही आमदारांवर संशय घेण्यात आला.

त्यानंतर राष्ट्रपती निवडणूकीत शिंदे-फडणवीसांनी 'मिशन 200' नारा दिल्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या काही आमदारांकडे संशंयाच्या नजरेने पाहीलं जात होतं.

दोन्ही पक्षांकडून राष्ट्रपती निवडणुकीत नाचक्की होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली होती. पण ही मतं भविष्यात फुटणार नाहीत याचा निष्कर्ष या एका निवडणूकीनंतर काढता येणार नाही, हेही तितकंच शक्य आहे.

शिवाय शिंदे-फडणवीस इतर व्यापांमध्ये सध्या जास्त व्यग्र असल्याचं दिसून येतंय. कोर्टातली लढाई, दोघांचंच मंत्रिमंडळ, दिल्लीचे दौरे, पूरपरिस्थिती आणि शिवसेनेच्या फुटीच्या नाट्यात दोन्हा नेत्यांच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकडे दुर्लक्ष झालंय का? की मुर्मंची निवड सहज शक्य होती म्हणून दुर्लक्ष झालंय? याचं उत्तर सध्या तरी शिंदे-फडणवीसच देऊ शकतात...

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)