You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, 'आम्ही गद्दारी नाही तर क्रांती केलीय'
"काही लोक आम्हाला गद्दार, बंडखोर म्हणतात. पण आम्ही क्रांती केलीय. आमच्या क्रांतीची दखल राज्यानेच नाही तर देशानं आणि जगभरातल्या 33 देशांनी घेतलीय," असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे.
धनगर समाजाच्या मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदेंनी हे वक्तव्य केलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या भाषणाच्या आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन केलं.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे समर्थक आमदारांना टोला लगावला होता. त्यांनी कपाळावर गद्दारचा शिक्का मारून घेतला, असं ते म्हणाले होते.
धनगर समाजाला न्याय देऊ - एकनाथ शिंदे
दरम्यान, एकनाथ शिंदे म्हणाले धनगर समाजाच्या मेळाव्यात बोलताना म्हणाले, "तुमच्या ज्या काही हक्काच्या मागण्या आहे, त्याला मी नक्की हात घालणार आहे. न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. मी तीनवेळा दिल्लीला गेलो. वकिल, सॉलिसिटर जनरल यांना भेटलो. सगळी कामं बाजूला ठेवली."
"न्यायालयात पुरावे लागतात, माहिती लागते. डेटा लागतो. हे सगळं तिकडे मांडलं पाहिजे. आम्ही सगळं केलं. ओबीसी आरक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. मध्यप्रदेशहून चांगलं सादरीकरण केलं. त्यामुळे ओबीसी समाजाला न्याय मिळाला."
"धनगर समाजाच्या मागण्या आहेत. एक एक काम आपण मार्गी लावू. एक एक सुविधा देऊ. धनगर समाजासाठी जे काही करायला पाहिजे ते नक्की केलं जाईल, एवढी खात्री बाळगा," असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
"धनगर समाजातील बांधवांवरचे गु्न्हे कसे मागे घेता येईल, त्यासाठी गृहविभागाशी बोलून घेतो. आरक्षणासाठी धनगर समाजातील 3 जणांनी आत्महत्या केलीय. त्यांना आता 10 लाख रुपये मदत देऊ," असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.
त्यांनी कपाळावर गद्दारचा शिक्का मारून घेतला - उद्धव ठाकरे
मुंबईत शिवसेनेच्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांना टोला लगावला.
त्यांनी कपाळावर गद्दारचा शिक्का मारून घेतला, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
"अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला, पण आजचा जो प्रयत्न आहे तो शिवसेना संपवण्याचा आहे. आता गद्दार फुटले आहेत. त्यांना कुठल्या ना कुठल्या पक्षात जाण्याशिवाय पर्याय नाही.
"पण हे लक्षात ठेवा की, तुमच्या कितीही पीढ्या उतरल्या तरी त्यांना मातीत गाडून ठाकरे आणि शिवसेना हे नातं कायम राहणार आहे, ते आम्ही कायम ठेवणार आहोत. तुम्ही ते नातं संपवू शकत नाही," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मी पुढच्या महिन्यापासून महाराष्ट्र दौरा करणार आहे, असंही ठाकरे म्हणालेत.
"महाराष्ट्र, मुंबई आणि तुमचं भविष्य दरोडेखोरांच्या हाती द्यायचं आहे की नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याचं मला शपथपत्रं पाहिजेत. त्यानंतर सदस्य नोंदणी करायची आहे. या दोन गोष्टी मला तुमच्याकडून हव्यात," असंही ठाकरे म्हणाले.
"माझ्या वाढदिवशी मला फुलांचे गुच्छ नकोत. मला सदस्यांच्या अर्जांचे आणि शपथपत्रांचे घट्टे हवेत," असं उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.
भाजप राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करते, पण शिवसेना हिंदुत्वासाठी राजकारण करते, हा आमच्या आणि त्यांच्या हिंदुत्वातील फरक आहे, असं ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे -
- ज्या शिवसेनेनं ज्या दगडांना शेंदूर फासला ते आता शिवसेना गिळायला निघाले आहेत.
- त्यांचे कर्ते करविते जे आहेत, महाशक्ती म्हणजे कळसूत्री बाहुल्यांचे संचालक. त्यांना शिवसेना संपवायची आहे. मुंबईवरील भगवा हटवायचा आहे.
- ज्या ज्या वेळी संकटं आली, त्या त्या वेळी शिवसेना संकटांना पुरुन उरली आहे.
- शिवसेनेतून फुटून गेलेले दरोडेखोर आहेत. त्यांच्या हातात महाराष्ट्राचं भविष्य देणार आहात का?
- त्यांच्याकडे निष्ठांवत शिल्लक राहिलेले नाहीत. पण आपल्याकडे आहेत. हेच माझं वैभव आहे.
- गणपती बाप्पा येत आहेत. महाराष्ट्रावर आलेलं हे संकट मोडून तोडून शिवसेनेचा भगवा पुन्हा नव्या तेजानं फडकू दे.
- नुसती शिवसेना नव्हे तर मराठी माणसाला आणि हिंदुत्वाला संपवण्याची त्यांची चाल आहे.
- वर्षा सोडून मातोश्रीवर आलो, तेव्हा माझी शक्ती मला परत मिळाली. तिला मी वंदन करतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)