You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ शिंदे गटाच्या बंडाचा खर्च तरी किती?
- Author, मानसी देशपांडे
- Role, बीबीसी मराठीसाठी
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय रण पेटलंय. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा मुंबई ते गुवाहाटी व्हाया सुरत या प्रवासाची आणखी एका कारणामुळे चर्चा होतेय. ते कारण म्हणजे प्रवासासाठी चार्टर्ड फ्लाईट म्हणजे खाजगी विमानांचा वापर आणि सुरत, गुवाहाटीत 5 स्टार हॉटेलात निवास.
आपल्याकडे सध्या 40 पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदेंकडून केला गेला आहे. यामध्ये शिवसेना आमदारांसोबतच अपक्ष आमदारांचाही समावेश आहे. इतके आमदार आणि त्यांचे सहकारी या सगळ्यांचा प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च नेमका किती होतोय यावरून बरीच चर्चा होतेय.
20 जूनला राज्यात विधानपरिषदेची निवडणुक पार पडली आणि त्या दिवशी रात्रीपासून एकनाथ शिंदे त्यांच्या काही समर्थक आमदारांसोबत 'नॉट रिचेबल' झाले. हळूहळू घटनाक्रम उलगडू लागला. ते सुरत मधल्या ली मेरिडियन या पंचतारांकित हॉटेलात असल्याचं पुढे आलं.
त्यानंतर 22 जूनला पहाटे 2.15 वाजता एकनाथ शिंदे आणि 30 पेक्षा जास्त आमदार सूरत एअरपोर्टवर पोहोचले. तिथून ते गुवाहाटीकडे रवाना झाले. माध्यमांमधल्या रिपोर्टनुसार या सगळ्यांनी सुरत ते गुवाहाटी हा प्रवास चार्टर्ड फ्लाईटने केला.
सुरतवरून नॉनस्टॉप गुवाहाटीपर्यंतच्या विमान प्रवासासाठी साधारणपणे 3 तास 40 मिनिटं इतका वेळ लागतो. कुठेही ब्रेक न घेता असा प्रवास करणं हे चार्टर्ड फ्लाईटनेच शक्य आहे.
विमानाचं तिकीट बुकींग करणाऱ्या बऱ्याचशा वेबसाईट चेक केल्या तर असं पुढे येतं की, सुरत ते गुवाहाटीपर्यंतचे नॉन स्टॉप प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानांची संख्या कमी आहे.
बहूतांश विमानांचा नवी दिल्ली, कोलकाता किंवा जयपूरच्या विमानतळावर एक स्टॉप आहे. यामुळे विमानाचा स्टॉप कुठे आहे यावरुन प्रवासाचा कालावधी हा साडेपाच तास ते 19 तास यादरम्यान कितीही असू शकतो.
एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसोबत गुवाहाटीत पोहोचल्यानंतर, महाराष्टातून शिंदे गटाकडे जाणाऱ्या आमदरांचा सिलसिला सुरुच आहे. 22 जूनला संध्याकाळी आमदार चंद्रकांत पाटील, योगेश कदम, मंजुळा गावित आणि गुलाबराव पाटील चार्टर्ड फ्लाईटने सुरतवरून गुवाहाटीत पोहोचले. त्यानंतर 23 जूनला सुद्धा काही सेनेचे आमदार गुवाहाटीत दाखल झाले.
चार्टर्ड फ्लाईट म्हणजे काय?
चार्टर फ्लाईट म्हणजे विमानाचं असं उड्डाण जे एखाद्या एअरलाईन्सच्या आधी जाहीर केलेल्या नियोजनमाध्ये नसतं. त्यामुळे अ ठिकाणाहून ब ठिकाणी कुठेही न थांबता, पुर्वनियोजन नसताना जायचं असेल तर चार्टर्ड फ्लाईट वापरता येऊ शकते. बरेच वेळा पुर्वनियोजित दौऱ्यामध्येही सुखकर प्रवास होण्यासाठी हा पर्याय वापरला जातो.
यामध्ये तुम्ही संपूर्ण विमान स्वतःसाठी भाड्याने घेऊ शकता. विमान निघण्याची वेळ आणि इच्छित ठिकाणी पोहोचण्याची वेळ सुद्धा ठरवू शकता. ऊड्डाण्णांसाठी परवानगी मात्र घ्यावी लागते.
प्रवासीसंख्येनुसार तितक्या खुर्च्या असणारं विमान चार्टर्ड फ्लाईटसाठी भाड्याने मिळू शकतं. काही गर्भश्रीमंत लोकांकडे स्वतःच्या मालकीची विमानं असतात. अशी विमानंही चार्टर्ड फ्लाईटसाठी वापरली जाऊ शकतात. पण यासाठी भरपूर पैसे मोजण्याचीही तयारी हवी.
सुरत ते गुवाहाटी चार्टर्ड फ्लाईटचा खर्च किती?
अशा खास विमानाने प्रवासखर्चात अनेक मुद्दे असतात. दोन ठिकाणांमधलं अंतर, प्रवासी संख्या, हवामान, विमानाचा आकार, चार्टर्ड फ्लाईटसाठी विमान कोणत्या शहरातून येतंय या सगळ्या गोष्टींच्या आधारावर तासाप्रमाणे चार्टर्ड फ्लाईटचे दर आकारले जातात. या क्षेत्रात काम करणाऱ्या काही लोकांनी दिलेल्या माहीतीनुसार हे दर तासाला 1 लाख ते 7 लाख या दरम्यान कितीही असू शकतात.
यावरुन बीबीसी मराठीने सुरत ते गुवाहाटी दरम्यानच्या चार्टड फ्लाईटच्या खर्चाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. 'जेट सेट गो' या चार्टर्ड फ्लाईट उपलब्ध करुन देणाऱ्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहीतीनुसार 30 पेक्षा जास्त प्रवाशांसाठी हा खर्च 50 ते 55 लाखांच्या दरम्यान असू शकतो. तर 8 प्रवाशांसाठी हा खर्च कोणतं विमान आहे यावरुन 18 लाख ते 40 लाखांच्या दरम्यानही असू शकतो.
जर सुरतमध्ये जर विमान उपलब्ध नसेल आणि ते दुसऱ्या शहरातून सुरतपर्यंत आणावं लागलं तर त्यावरही ही खर्चाची रक्कम अवलंबून असते.
विमान बुकिंग संदर्भातल्या क्षेत्रात काम करणाऱ्या एका तज्ज्ञाने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसी मराठीला माहीती दिली की, चार्टर्ड फ्लाईटचं भाडं आकारण्यासाठी कोणती एक ठराविक पद्धत नाही. ती परिस्थीतीनुसार बदलत जाते.
"समजा ओळखीतल्या कुण्या व्यक्तीचं विमान असेल तर रेटमध्ये फरक पडेल. एव्हिएशन डिपार्टमेंटकडून परवानगी घेऊन हे ऊड्डाणं होतात. या फ्लाईटमध्ये क्रू असतो तो खाजगीरित्या हायर केलेले असतात. काही एअरलाइन्सही चार्टर्ड फ्लाईट उपलब्ध करुन देतात. पण जेव्हा अशा राजकिय अस्थिरतेच्या परिस्थितीमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोकप्रतिनीधींना नेलं जातं तेव्हा खर्च वगैरे काही प्राधान्य असतं असं मला वाटत नाही. तेव्हा लवकरात लवकर मूव्हमेंट हेच ध्येय असतं. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये हा व्यवहार नेमका कसा होतो हे सांगणं कठीण आहे," असं या तज्ज्ञांनी सांगितलं.
यामध्ये दर हे विमानाच्या संपूर्ण कॅपॅसिटीनुसारच आकारले जातात. जर 10 लोक बसू शकणाऱ्या विमानात 4 लोक गेले तर त्यानुसार दरांमध्ये काही फरक पडत नाही असंही तज्ज्ञांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार राहत असलेल्या हॉटेलांचा खर्च किती?
एकनाथ शिंदे गट आधी सुरतच्या ली मेरिडयन या हॉटेलमध्ये मुक्कामी होते. यावेळेस शिंदेसोबत 30 पेक्षा जास्त आमदार होते आणि त्यांचे इतर काही सहकारी असण्याची शक्यता आहे. हॉटेल बूकींग एग्रीगेटर वेबसाईट्स वर या हॉटेलाचे दर बघितले असता ते तुम्ही कोणत्या प्रकारची रुम घेता यावर अवलंबून असल्याचं दिसतं.
डिलक्स रुमसाठी हे दर प्रती दिवस 1600 रुपयांपासून सुरु होतात. सुपर डिलक्स साठी हे दर 1800 पासून सुरु होतात. या हॉटेलात एक्झिक्यूटीव्ह रुम, प्रिमियम रुम आणि स्विट रुमही उपलब्ध आहेत. यांचे दर जास्त असण्याची शक्यता आहे. ली मेरिडीयन मध्ये एकनाथ शिंदे गटासाठी नेमक्या किती आणि कोणत्या रुम्स बूक करण्यात आल्या होत्या याची माहिती उपलब्ध नाही.
शिंदे गट गुवाहाटीच्या ज्या रॅडिसन ब्लू या 5 स्टार हॉटेलमध्ये थांबला आहे तिथे एका रुमचे प्रतिदिवस दर हे 5300 पासून सुरू होतात. सध्या शिंदेकडे 40 पेक्षा जास्त आमदार आहेत असा त्यांचा दावा आहे.
या हॉटेलात शिंदेगटासाठी नेमक्या किती खोल्या बूक करण्यात आल्या आहेत याची अधिकृत माहीती जरी समोर आली नसली तरी 196 खोल्या असलेल्या या हाटेलात आमदारांसाठी तब्बल 70 खोल्या आठवडा भरासाठी बूक केल्या असल्याच्या बातम्या काही वृत्तवाहीन्यांनी दिल्या आहेत.
त्यामुळे हॉटेलाची सगळ्यात कमी किंमतीच्या खोल्या जरी गृहीत धरल्या तरिही 7 दिवसांचा खर्च हा 25 लाखांवर जातो. यामध्ये खाण्याचा आणि इतर खर्च येत नाही.
एकनाथ शिंदे गटाच्या प्रवासाची आणि राहण्याची व्यवस्था कोण करतंय?
शिंदे गटाला मदत कोन करतंय यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरी भाजपचं नाव घेतलं नसलं तरिही राष्ट्रीवादीचे प्रमुख शरद पवार यांनी मात्र सुचक वक्तव्य करत भाजपकडे बोट दाखवलंय.
गुरुवार मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना पवार म्हणाले की, "सुरतमध्ये आणि आसाममध्ये व्यवस्था करणारे लोक अजित पवारांच्या परिचयाचे नसतील पण माझ्या परिचयाचे आहेत. ऊदाहरणार्थ, सुरतला भाजपचे राज्याचे अध्यक्ष सी. आर. पाटील मराठी गृहस्थ आहेत. संसदेत आम्हाला भेटतात. यांचा सहभाग असेल तर याचा अर्थ काय समजायचा? दुसरी गोष्ट अशी की सगळी व्यवस्था करण्यात तिथलं राज्य सरकार फार एक्टीव्ह आहे. तिथलं राज्य आज भाजपच्या हातात आहे. वस्तूस्थिती स्पष्ट होते. त्यामुळे नाव घेण्याची गरज नाही. इथे कुणी दिसत नाही पण तिथे जे दिसतंय त्यावरुन सगळं स्पष्ट होतं."
तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजकिय घडामोडींमध्ये भाजपाचा कोणताही सहभाग नसल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)