अजित पवार-देवेंद्र फडणवीसांमध्ये दोस्ती ते दुरावा, पहाटेचा शपथविधी ते शिंदे सरकार

फोटो स्रोत, ANI
- Author, नीलेश धोत्रे
- Role, बीबीसी मराठी
"विनंती आहे, शब्द मागे घेऊ नका, हे नॅचरल फ्लोमध्ये चालू दे. जे नैसर्गिक आहे, ते आपण केलं पाहिजे. त्यात अडथळा करू नका. तुमच्या शेजाऱ्यांचा परिणाम होऊ देऊ नका..." जयंत पाटील यांचं हे वक्तव्य आहे.
4 जुलै 2022 रोजी शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उस्फूर्त भाषण करत होते. बोलता बोलता त्यांच्या तोंडून एक असंसदीय शब्द आला आणि त्यांनी लगेचच अध्यक्षांची माफी मागत 'तो' शब्द कामकाजातून काढून टाकण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले होते.
शिंदे बोलत असतानाच जयंत पाटील आपल्या जागेवर उभे राहिले आणि त्यांनी ही टिप्पणी केली. त्यावेळी अजित पवार त्यांच्या शेजारीच बसले होते. अर्थात त्यांच्या या टिप्ण्णीला किनार आहे ती 23 नोव्हेंबर 2019 अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पहाटेच्या सरकारच्या प्रयोगाची...
पण इथं हा मुद्दा सांगण्याचा तात्पर्य हे की, गेल्या पावणेतीन वर्षांत राज्यानं तीन सरकारं, तीन मुख्यमंत्री आणि तीन उपमुख्यमंत्री पाहिलेत. महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे तेवढ्या वेगाने घडामोडी घडल्या आहेत.
पण पहाटेच्या शपथविधीचं भूत ना देवेंद्र फडणवीस पिच्छा सोडायला तयार आहे ना अजित पवारांचा...
अर्थात तो शपथविधी पाहाटे नाही तर सकाळी 8 वाजता झाला होता म्हणून या शपथविधीला पाहाटेचा शपथविधी म्हणू नका, असं खुद्द अजित पवारांनीच एका पत्रकार परिषदेत पत्रकरांना खडसावलं होतं.

फोटो स्रोत, ANI
पण असं असलं तरी आजतागायत अजित पवार यांनी 23 नोव्हेंबर 2019 च्या सकाळी घडलेल्या त्या प्रकाराबाबत त्यांचं मौन काही सोडलेलं नाही. त्यांची झाकली मूठ सव्वा लाखांची अजून कायम आहे. त्या उलट देवेंद्र फडणवीसांनी मात्र मौन सोडून त्यांची भूमिका स्पष्ट केलीय.
आता तुम्ही म्हणाल आम्हाला हे सगळं माहिती आहे. याची पुन्हा उजळणी का? तर त्याचं कारण आहे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या आजच्या वाढदिवसाचं आणि या दोन्ही नेत्यांमधल्या नात्याचं. 'दिल दोस्ती दुनियादारी'पासून सुरू झालेलं त्यांचं राजकीय रिलेशनशिप गेल्या अडीच वर्षांत 'का रे दुरावा'पर्यंत आलं आहे का?
दोन्ही नेत्यांमधलं 2020 पर्यंत नातं कसं होतं, हे मी याआधीच लिहिलं आहे. ते तुम्ही इथं सविस्तर वाचू शकता... त्यामुळे आता आपण त्यापुढची चर्चा करणार आहोत.
देवेंद्र फडणवीसांबरोबरच्या सत्तेचा प्रयोग 80 तासांत फसला आणि अजित पवार स्वगृही येऊन उद्धव ठाकरे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. तर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले. पण पुढच्या अडीच वर्षांतच ठाकरे सरकार कोसळलं आणि फडणवीसांनी एकनाथ शिंदेंबरोबर सत्तेचा नवा प्रयोग केला.
पण या मधल्या पावणेतीन वर्षांत बऱ्याच घडामोडी घडून गेल्या.
सुरुवातीला महाआघाडी सरकारच्या पहिल्या वर्षात अजित पवार भाजपावर टीका करताना दिसून आले नाहीत. तर भाजप महाविकास आघाडीवर टीका करत होती, पण अजित पवारांवर मात्र टाळत होती.

फोटो स्रोत, BBC/ SharadBadhe
अजित पवारही राजकीय कमीच बोलायचे, सरकारी भाषेत उत्तर अधिक द्यायचे. अधिवेशनातही आणि बाहेरही. ते काही काळ कोशात असल्याचंही दिसून आलं. त्याचे राजकीय अर्थही काढले गेले.
पण वर्षभरानंतर परिस्थिती बदलली. अजित पवार आक्रमक झाले. सरकारची, प्रशासनाची सगळी सूत्र त्यांनी ताब्यात घेतली असं चित्र तयार झालं. प्रशासनाचे सगळे कोपरे चोख माहित असल्यानं उद्धव ठाकरेंची भिस्तही अजित पवारांवर अधिक वाढली.
मग भाजपवरही नेहमीच्या शैलीत टीका करु लागले. मग भाजप विरुद्ध अजित पवार असा कलगीतुरा महाराष्ट्रात रंगला. त्यातही जोरदार रंगलं ते चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांचं वाक् युद्ध.
मंगळवेढ्याच्या पोटनिवडणुकीत तर अजित पवार आणि भाजपानं एकमेकांवर तोंडसुख घेतलं. किरीट सोमय्यांनी आरोप केल्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तरादाखल मोठी पत्रकार परिषद घेतली, भाजपाच्या हेतूवर आरोप केले.
त्याच दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी मुलाखती देऊन अजित पवार यांच्यासोबतच्या शपथविधीमुळे आपल्या प्रतिमेला तडा गेल्याचं म्हटलं.
पण तोपर्यंत भाजप विरुद्ध अजित पवार असाच सामना रंगत होता. मार्च 2021 मध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मात्र थेट अजित पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना रंगलेला दिसला.
दोन्ही नेते विधानसभेत एकमेकांसमोर उभे ठाकले ते मराठवाडा आणि विदर्भाच्या वैधानिक विकास महामंडळांच्या मुद्द्यावरून. "ऐकून घ्या, तुमचं ऐकलंय. माझं ऐकून घ्या," असं थेट अजित पावरांनी फडणवीसांना सुनावलं.
याच अधिवेशनाच्या शेवटच्या भाषणात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा काढत देवेंद्र फडणवीसांना चिमटा काढला.
"तुमचा सकाळचा कार्यक्रम यशस्वी झाला असता तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक बसले असते ना सत्तेत तुमच्या मांडीला मांडी लावून...." उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य ऐकताच फडणवीसांची नजर ठाकरेंवरून थोडी बाजूला सरकत अजित पवारांकडे गेली. पण, अजित पवार मात्र समोरच्या फाईलमध्ये पाहत होते.

फोटो स्रोत, Getty Images
मधल्या काळाच अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर साखर जप्ती आली. त्यांच्या बहिणींच्या घरी आयकर खात्याचे छापे पडले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत कथित 25 हजार कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला.
या सर्व घडामोडींनंतर मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली.
शिंदे-फडणवीस सरकारचं बहुमत सिद्ध झाल्यानंतर विधानसभेत भाषण करताना अजित पवारांनी सत्तेच्या बाकांवर बसलेल्या भाजपच्या नेत्यांचा यथोचित अपमान केला. विधानसभा अध्यक्षांचेही वाभाडे काढले.
शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्याच्या फडणवीसांच्या घोषणेचा मुद्दा उपस्थित करत अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या भळभळत्या जखमेवर मीठ लावण्याचाच प्रयत्न केला.
त्याचनंतर अजित पवारांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाली आणि त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाषण करताना देवेंद्र फडणवीसांनी 2004 मध्ये अजितदादांच्या हुकलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या विषयाला हात घालून जुन्या जखमेची खपली काढली.
'धरणाच्या पाण्या'चा किस्सा अजित पवार स्वतः त्यांच्या भाषणात स्वतःच कसा सांगतात याचा दाखला देत "त्यांची माझी मैत्री आहे आणि आम्ही 72 तासांचे सहकारीसुद्धा आहोत," असंसुद्धा फडणवीस म्हणाले.

फोटो स्रोत, Twitter
राजकारणात अजित पवारांची प्रेमाची दादागिरी चालते, अशी स्तुतिसुमने फडणवीसांनी उधळली. पण नव्या सत्तेच्या स्थापनेनंतर शिंदे-फडणवीसांनी उद्धव ठाकरे सरकारच्या काळात घेतलेले काही निर्णय बदलले. त्यात बारामती नगर पालिकेला नगरविकास खात्यानं दिलेल्या 270 कोटी रुपयांचा निर्णयसुद्धा मागे घेण्यात आला. जो अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. सध्या बारामती नगरपालिका निवडणुकांना सामोरी जात आहे.
हे सगळं घडत असताना भरपत्रकार परिषेदत फडणवीसांनी शिंदेचा माईक उचलल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आणि अजित पवारांनी संधी साधत फडणवीसांवर तोंडसुख घेतलं. "आम्ही सरकारमध्ये असताना उद्धव ठाकरे यांच्या पुढ्यातील माईक घेतला नव्हता," असा टोला अजित पवारांनी हाणला.
तर थेट नगराध्यक्ष निवडीच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयावर टीका करताना "दोघांच्या मंत्रिमंडळाला निर्णय फिरवण्याची खूप घाई झालेली दिसते" अशी टीकाही अजितदादा यांनी केली.
पण तरी प्रश्न हा उरतोच की भरविधानसभेत आमची मैत्री आहे असं फडणवीस मान्य करत असताना प्रत्यक्षात मात्र दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा का दिसून येत आहे?
हाच प्रश्न मी न्यू इंडियन एक्स्प्रेसचे सहाय्यक संपादक सुधीर सूर्यवंशी यांना विचारला.
त्यांच्या मते, "देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोन्ही नेते वेगवेगळ्या विचारधारेचे आहेत. तरी त्यांनी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. पण तो फसल्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाला बट्टा लागला. सरकार वाचलं नाही तरी अजित पवार यांना मात्र त्याचा फायदा झाला. त्या 80 तासांत अजित पवार सिंचन घोटाळ्यात क्लिन चिट घेऊन बाहेर पडले. त्यामुळे भाजपच्या उडचणीत वाढच झाली. शिवाय त्यामुळे भाजपला अडिच वर्ष सत्ते पासून दूर राहावं लागलं होतं तेसुद्धा विसरून चावलणार नाही."
राज्यात 2019 मध्ये घडलेल्या सत्ता स्थापनेच्या नाट्यावर सुधीर सूर्यवंशी यांनी चेकमेट नावाचं पुस्तक लिहीलं आहे. फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सध्या दुरावा दिसत असला तरी त्यांच्यामध्ये एक राजकीय अंडरस्टँडिंग असल्याचं निरिक्षणसुद्धा ते नोंदवतात. त्याचा फायदा येत्या काळात दोन्ही नेते करून घेऊ शकतात असंसुद्धा त्यांना वाटतंय.

फोटो स्रोत, Twitter
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते तर अजित पवारांच्या विरोधाला मोठी धार आली असती. पण, आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे अजित पवारांनी शिंदे सरकारला धारेवर धरल्यावर फडणवीसांकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळेल असं वाटत नाही. दोन्ही नेत्यांमध्ये पॉलिटिकल अंडस्टँडिंग आहे. त्याचा फायदा दोन्ही नेते शिंदेंना हैराण करण्यासाठी करून घेऊ शकतील," असं सूर्यवंशी बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात.
तर मागचं सगळं विसरून दोन्ही नेते पुढे जात असल्याचं दिसतंय, असं राजकीय विश्लेषक आणि न्यूज 18च्या मुंबई ब्युरो हेड विनया देशपांडे यांना वाटतं.
"आता फडणवीस आणि अजित पवार ज्या पदांवर आहेत त्या नुसार आणि त्या भूमिकेतूनच हे दोन्ही नेते वागत आहेत. त्यांची राजकीय भूमिका निभावत आहेत. झालं गेलं ते विसरून पुढे जाण्याचा त्यांचा प्रयत्न यातून दिसून येत आहे. दोन्ही नेत्यांच्या राजकीय गरजा आता वेगवेगळ्या आहेत. त्यानुसारच हे दोघे वागत आहेत," असं विनया यांना वाटतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









