अजित पवार-देवेंद्र फडणवीस, एकेकाळचे मित्र आता एकमेकांपासून दूर झालेत का?

- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
अजित पवार यांच्या नातेवाईंकांच्या घरी आणि कार्यालयांवर आज आयकर विभागाच्या धाडी पडल्या आणि राज्यातलं राजकारण तापलं.
"माझ्या बहिणींचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. कंपन्यांशीही त्यांचा काही संबंध नाही, केवळ त्या माझ्या बहिणी आहेत, रक्ताचं नातं आहे म्हणून धाड टाकली हे दुःख देणारं आहे," असंही अजित पवार म्हणाले.
तर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावरही आयकवर विभागाने छापा मारल्याचं समोर आलं आहे.
काही दिवसांपूर्वी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या विक्रीवेळेस झालेल्या व्यवहाराबद्दल संशय आला म्हणून अंमलबजावणी संचालनालय (ED) ने तपास सुरू केला तेव्हाही त्यात अजित पवारांच्या नावाचा उल्लेख केला होता.
'महाविकास आघाडी'च्या नेत्यांची आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींची अनेक कथित आर्थिक गैरव्यवहारांमध्ये विविध केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी चालू आहे.
प्रत्यक्ष स्वत:ची चौकशी झाली नसली तरी, त्या नेत्यांमध्ये आता अजित पवारांचंही नाव आहे.
या कोणत्याही तपासाला वा चौकशीला त्यांनी आक्षेप घेतला नसला तरी विरोधी पक्षातल्या विविध नेत्यांप्रमाणे अजित पवारही आता भाजपाच्या टारगेटवर आहेत का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे.
केंद्रात सत्तेत असलेली भाजपा तपास यंत्रणांच्या सहाय्यानं राजकीय विरोधकांना टार्गेट करते आहे असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेससह देशातले अनेक विरोधी पक्ष करत आहेत.
या कारवाया राजकीय हेतूनं प्रेरित आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. जर ते खरं असेल तर, या अर्थानं प्रश्न हा विचारला जातो आहे की काहीच काळापूर्वी भाजपाचे सरकार स्थापनेतले मित्र असणारे अजित पवार यांच्याशी भाजपाच्या त्या मैत्रीचं आता राजकीय वैरात रूपांतर झालं आहे का?
हा प्रश्न विचारला जाण्याचं कारण हेही आहे की, 1 जुलैला साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जमीन आणि इमारत ईडीकडून जप्त करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत कथित 25 हजार कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला होता.
2010 मध्ये या कारखान्याच्या खरेदी-विक्री व्यवहारात नियमांचं पालन झालं नसल्याचा ईडीचा दावा आहे आणि त्यावेळी अजित पवार हे राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. वास्तविक 'ईडी'नं दोन वर्षांपूर्वीच या प्रकरणात लक्ष घातलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
पण जुलैच्या कारवाईच्या एकच दिवस अगोदर, 30 जून 2021 ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहून राज्यातली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळल्याचं सांगितलं.
या पत्रात त्यांनी सचिन वाझे प्रकरण आणि इतर संदर्भ देऊन अनिल देशमुख, अनिल परब यांच्यासह अजित पवार यांचंही नाव घेतलं.
चौकशीची मागणीसुद्धा केली होती. चंद्रकांत पाटील यांची मागणी आणि लगेचच कारवाई, असं पाहून तेव्हाही भाजप आता अजित पवारांच्या मागे लागणार असं चित्रं तयार झालं होतं.
आता आजच्या आयकर खात्यानं पवार यांच्या तीन बहिणींसहित नजीकच्या व्यक्तींवर धाड टाकल्यानं आता हे संबंध राजकीय वैरामध्ये परावर्तित झालेत का असा प्रश्न विचारला जातो आहे.
अगोदरचे मित्र, आता शत्रू
ज्या राजकीय वैराबद्दल बोललं जातं आहे त्यामागे अगोदर सरकारस्थापनेपर्यंत पोहोचलेली मैत्री आहे का? 2019 नंतरच्या सत्तानाट्यात अजित पवारांची भाजपासोबतची जवळीक सर्वांच्या समोर आली. वास्तविक त्याअगोदरही त्याची चर्चा कायम होत होती.
जेव्हा भाजपाचं सरकार 2014 मध्ये आलं तेव्हा अजित पवारांवर झालेल्या कथित सिंचन घोटाळ्याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशी सुरू होती.

फोटो स्रोत, ANI
नवं सरकार आल्यावर छगन भुजबळांवर, इतर काही नेत्यांवर तपास यंत्रणांची कारवाई झाली. पण अजित पवारांबाबतच्या प्रकरणांवर केवळ चौकशी होत राहिली. राज्य सहकारी बैंकेचंही प्रकरण होतं.
भाजपाचे नेते 'या दिवाळीपर्यंत ते तुरुंगात असतील' अशा प्रकारची धमकीवजा वक्तव्यं करत राहिले, पण प्रत्यक्षात काहीच झाले नाही. विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेसकडे होतं, पण सभागृहातले विरोधी पक्षातले आक्रमक नेते म्हणूनही अजित पवार शांत राहिले. त्यामुळे तेव्हाही त्यांच्या मैत्रीची चर्चा कायम होत राहिली.
पण 2019 मध्ये शिवसेनेनं काडीमोड घेण्याचा निर्णय घेतल्यावर जे राजकीय नाट्य घडून अजित पवार भाजपाचा कंपूत गेले, तिथं समीकरणं बदलली.
अजित पवार आणि भाजपाची मैत्री सत्तेपर्यंत पोहोचली. पण ती तिथं टिकू शकली नाही. अजित पवारांमागे 'राष्ट्रवादी'चे आमदार येतील हा कयास चुकला आणि भाजपाचा प्रयत्न विफल झाला. पण अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीकडे गेले आणि नव्या सरकारमध्येही उपमुख्यमंत्री बनले.
पण तरीही पुढच्या बराच काळ भाजपा आणि त्यांच्यामध्ये सख्य होतं अशी चर्चा होत राहिली. भाजपनं विरोधी पक्ष म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सभागृहात आणि बाहेरही जसं शिवसेनेला केलं तसं टारगेट केलं नाही.
अजित पवारही आक्रमक न होताच शांत राहिले. या काळात शिवसेना, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या.
पण सरकारच्या जवळपास सर्वच भूमिका वर्षभरातनंतर एकदम बदलल्या. अजित पवारांची विरोधकांबद्दलची आक्रमकता दिसू लागली आणि भाजपाही त्यांच्यावर टीका करु लागला. हे सभागृहातही पहायला मिळालं आणि बाहेरही.
अजित पवारांसोबत सरकार स्थापन केलं ही चूक होती हे देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवलं. गेल्या काही महिन्यांत अजित पवार विरुद्ध चंद्रकांत पाटील असे खटके उडू लागले.

फोटो स्रोत, Getty Images
'ठाकरे सरकार झोपेत असतानाचं पडेल' असं एकदा चंद्रकांत पाटील म्हणाले, त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले होते, "सरकार जाणार हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागेपणी की झोपेत केलं होतं? हे तपासावं लागेल. हे सरकार आल्यापासून त्यांना बोचणी लागली आहे."
याला लगेच चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देत, अजित पवारांना पहाटेच्या शपथविधीची आठवण करून दिली होती.
ते म्हणाले, "या नेत्यांना आपण काल काय केलं याची आठवण नाही. ज्याचं सरकार त्याच्याबरोबर आम्ही जाणार हे यांचं तत्त्व... अजितदादा सांभाळून बोला. आम्ही फाटके आहोत. आम्ही बोलायला लागलो तर खूप महागात पडेल."
या दोघांची एकमेकांविरुद्धची भाषा अधिक आक्रमक होत गेली. मग अजित पवारांचं नाव घेऊन चंद्रकांत पाटील यांनी अमित शाहांना पत्र लिहिलं.
ते लिहिल्यावर पाटील म्हणाले होते, "हे फक्त पत्र आहे. यापुढची प्रक्रिया आम्ही करणार आहोत. जे अनिल देशमुख यांचं झालं, तेच अजित पवार आणि अनिल परबांचं होईल. त्यामुळे जास्त जोरात बोलू नका."
असा तो इशाराच होता. त्यानंतर 'ईडी' जरंडेश्वर कारखान्याच्या प्रकरणात साता-याला पोहोचली आणि आज अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे छापे पडले.
या सगळ्या घटना पाहता आणि घटनाक्रम पाहता प्रश्न विचारला जातो आहे की अगोदर सत्तेसाठी जी मैत्री झाली, ती आता राजकीय वैर बनली आहे का?
अजित पवारांचं भावनिक वक्तव्य, पण सहानुभूती मिळेल?
आज आयकर विभागाच्या धाडींबद्दलचं वृत्त येतात अजित पवार माध्यमांशी बोलले आणि ते खरं असल्याचं मान्य केलं.
कोणतंही राजकीय टीकेचं विधान त्यांनी केलं नाही, पण केवळ आपल्याशी संबंध आहे म्हणून बहिणींवर धाडी टाकल्या हे लक्षात ठेवा असं आवाहन त्यांनी लोकांनाच केलं.
रक्ताच्या नात्याचा उल्लेख करुन असं राजकारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असंही ते म्हणाले. अजित पवारांच्या एक प्रकारे भावनिक आवाहानामुळे त्यांना सहानुभूती मिळेल का?
"माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्याबाबत मला काही बोलायाचं नाही. पण माझ्या तीनही बहिणींशी संबंधित कंपन्यांवरसुद्धा छापे मारण्यात आले आहेत.
माझे कुटुंबीय म्हणून फक्त छापे मारणं हे खालच्या पातळीचं राजकारण आहे. अनेक सरकारं येतात जातात. पण जनता सर्वस्व आहे," असं म्हणत अजित पवार पुढं हेही म्हणाले की, "माझ्या बहिणींचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. कंपन्यांशीही त्यांचा काही संबंध नाही, केवळ त्या माझ्या बहिणी आहेत, रक्ताचं नातं आहे म्हणून धाड टाकली हे दुःख देणारं आहे,"
'हे 100 टक्के राजकीय वैर'
ज्येष्ठ राजकीय पत्रकार संजय जोग यांच्या मते अजित पवार आणि भाजपात जे चाललेलं आहे ते राजकीय वैरच आहे.
"पहाटेच्या शपथविधीनंतर जे काही झालं त्यातून अजित पवार सगळं विसरुन बाहेर आले, पण भाजपा अद्याप ते विसरलेली नाही. सरकार निसटल्याच्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत.
"त्यामुळे भाजपात एक गट आहे जो सतत खदखदत असतो. पण सध्याच्या परिस्थितीत सरकार पडेल असं दिसत नाही तेव्हा एक रणनीति आहे ती म्हणजे सतत धारेवर धरणं. चौकशी मागे लावणं. आता नेमकं हेच चाललेलं आहे," जोग म्हणतात.
"अजित पवारांना लक्ष्य केलं जातं आहे हे तर स्पष्ट आहे, पण यातून आणखीही एक समजतं की आता परतीचे सगळे मार्ग बंद झाले आहेत. म्हणजे कोणी भाजपाकडे जाईल असं होणार नाही असं दिसल्यामुळेच कारवाया सुरू झाल्या. आता राष्ट्रवादी किंवा शिवसेना याला कसं तोंड देतात यावर पुढचं राजकारण अवलंबून असेल," जोग पुढे म्हणतात.
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्या मते अजित पवारांच्यावरच्या अशा कारवाईतून हा संदेश द्यायचा आहे असं दिसतं की, "भाजपाच्या विरोधात जर तुम्ही गेलात तर काय होतं ते पाहा. नवीन सरकार आल्यावर वर्षभर ते अजित पवारांविरुद्ध काहीही बोलले नाहीत.
"कदाचित परत येतील अशी आशा असावी. पण आता तसं होत नसल्यानं हा संदेश असावा. पण सोबतच मला हेही वाटतं की जे बाहेरुन भाजपात आले आहेत आणि आता सरकारमध्ये नाहीत म्हणून अस्वस्थ आहेत, त्यांनाही हे उदाहरण आहे," असं देशपांडे यांना वाटतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








