अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या कार्यालयावर देखील आयकर विभागाचा छापा

फोटो स्रोत, Twitter
अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरी आज आयकर विभागाने छापे मारले. त्यात त्यांच्या बहिणींच्या घरावर छापे मारल्याचं वृत्त होतं पण याबरोबरच त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर देखील आयकवर विभागाने छापा मारला होता अशी माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाने छापे मारले आहेत. साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरीही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
बहिणींच्या घरी छापे मारल्यानंतर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती.
"आयकर खात्याने कुठे छापे मारावेत हा त्यांचा अधिकार आहे. माझ्याशी संबंधित सर्व कंपन्यांचा कर वेळच्यावेळी योग्य पद्धतीने भरलेला आहे. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्याबाबत मला काही बोलायाचं नाही. पण माझ्या तीनही बहिणींशी संबंधित कंपन्यांवरसुद्धा छापे मारण्यात आले आहेत. माझे कुटुंबिय म्हणून फक्त छापे मारणं हे खालच्या पातळीचं राजकारण आहे. अनेक सरकारं येतात जातात. पण जनता सर्वस्व आहे," असं अजित पवार यांनी याबाबत म्हटलंय.
"माझ्या बहिणींचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. कंपन्यांशीही त्यांचा काही संबंध नाही, केवळ त्या माझ्या बहिणी आहेत, रक्ताचं नातं आहे म्हणून धाड टाकली हे दुःख देणारं आहे," असंही अजित पवार म्हणाले आहेत.
दौंड शुगर, आंबलीक शुगर, जरंडेश्वर साखर कारखाना, पुष्पद नतेश्वर शुगर या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची छापेमारी सुरू असल्याचं वृत्त येतंय.
'भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा धसका का घेतला आहे?'
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिलीय. लखीमपूर घटनेवरुन जनतेचं लक्ष वळवण्यासाठी साखर कारखान्यांवर धाडी टाकल्या जात आहेत असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
"केवळ सनसनाटी निर्माण करणं हाच या धाडीमागचा हेतू आहे. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याचा संताप काढण्यासाठी त्यांनी साखर कारखान्यांवर धाडी टाकल्या."असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
ते पुढे म्हणाले, "भाजपचे नेते आमच्या नेत्याचं नाव घेतात. त्यानंतर ईडी,आयकर विभाग यांच्या धाडी होतात. आम्हाला बदनाम करण्याचे भाजपचे षडयंत्र आहे. यात शंका नाही. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा धसका का घेतला आहे?" असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आज (7 ऑक्टोबर) सकाळी सात वाजल्यापासून आयकर विभागाने छापे मारण्यास सुरुवात केली. यासंदर्भात स्थानिक पोलिसांना कोणतीही सूचना देण्यात आलेली नव्हती.
सीआरपीएफच्या जवानांची मदत घेत छापे मारल्याचंही समोर आलं आहे.
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याची मालमत्ता ईडीनं जप्त केल्याचीही बातमी समोर आली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या अडचणी वाढतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
अजित पवार यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले होते. ते म्हणाले, जरंडेश्वर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेशी माझा संबंध नाही. मुंबई हाय कोर्टाच्या सूचनेनुसार कारखान्याची विक्री झाली आहे. ईडीच्या कारवाईला संचालक मंडळ कोर्टात आव्हान देईल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








