देवेंद्र फडणवीस : 'हाच फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही'

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईतील नेस्को सेंटमरध्ये भाजपची आज (15 मे) सभा सुरू झाली आहे. भोजपुरी भाषेत उपस्थितांची चौकशी करत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी भाषणाला सुरुवात केली.
मुंबईतील बीकेसी मैदानात झालेल्या सभेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस काय बोलणार, याविषयी उत्सुकता आहे.
फडणवीसांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
- मुख्यमंत्र्यांच्या सभेतील भाषणाला उत्तर देण्याचा हा कार्यक्रम असं प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे. कालची मास्टर सभा नव्हे तर लाफ्टर सभा
- नरसिंहांची जयंती होती. तेजस्वी ऐकायला मिळेल अशी आशा होती. पण लाफ्टर शो शेवटपर्यंत संपलाच नाही. त्याच त्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या. नवीन काहीही मिळालं नाही.
- शंभर सभांची बाप सभा आमचे मित्र म्हणाले. शंभर कोण असतात-कौरव. काल कौरवांची सभा झाली. आज पांडवांची सभा आहे.
- यशवंत जाधवांची संपत्ती अमर्याद वाढली की नाही? कामगारांना अनवाणी गावी परतावं लागलं ना? एकही भाषण विकासासंदर्भात नाही. दाऊदचे मित्र आजही मंत्रिमंडळात आहेत.
- नवनीत राणा यांना माहिती नाही की मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळांना दोनच ओळी माहिती आहेत.
- 24 महिन्यात 53 कोटी संपत्ती जमा झाली. यातूनच मातोश्रींना घड्याळ दिलं.
- औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवणे हा राजशिष्टाचार झाला आहे.
- ज्या संभाजी महाराजांना वेदना देऊन मारलं. शेर शिव का छावा था. जान भी चली जाए, ना स्वराज दूँगा, ना स्वाभिमान दूँगा
- औरंगजेबासमोर माथा टेकणारा ओवेसीला तुम्ही पाहत राहता. संपूर्ण हिंदुस्तानवर आता हिंदुत्वाचा झेंडा फडकवणार. जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचे, त्यांनी तलवारी म्यान केल्या आहेत. आम्ही तलवार म्यान केलेल्या नाहीत.
- हे हिंदूभाषी मुंबईकर आहेत. त्यांना मराठी येतं. एक मुंबईकर असे आहेत जे मुंबईकर आहेत त्यांना काही सांगायचं आहे.
- रामजन्मभूमी आंदोलनात अयोध्येत तुमचा एकही नेता नव्हता म्हणालो तेव्हा तुम्हाला मिरची लागली. मैं अयोध्या जा रहा था, बाबरी गिरा रहा था, तुमको मिरची लगी तो क्या करूँ
- लाठी-गोली खाएंगे, मंदिर वही बनांयेगे. तुम्ही सहलीला गेले होतात. तेव्हा तर सोडाच. त्याच्या एक वर्ष आधी ज्यावेळी पहिली कारसेवा झाली. कोठारी बंधूंना मारलं तरी ढाच्यावर झेंडा फडकला. तेव्हा देवेंद्र तिथे होता. बदायूच्या तुरुंगात होतो.
- आम्ही वाटत पाहत राहिलो कोणी शिवसेनेचं येईल. कोणी शिवसेनेचं आलं नाही. 19व्या वर्षी काश्मीरमध्ये हिंदूंवर अत्याचार झाला. त्यावेळी काश्मीरात अतिरेक्यांचं मुकाबला करण्यासाठी, मनोधैर्य वाढवण्यासाठी गेलो होतो.
- गोळ्या चालताना पाहिल्या, संघर्ष पाहिला. फाईव्हस्टार राजकारण केलं नाही.
- जेव्हा आवश्यकता असेल तर पुन्हा कारसेवा करू.
- मुख्यमंत्र्यांचा माझ्यावर विश्वास आहे. माझं वजन 102 आहे. बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझं वजन 128 किलो आहे. सामान्य माणसाचा एफएसआय 1 असेल तर माझा एफएसआय 1.5 आहे. बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझा एफएसआय 2.5 आहे. तुम्ही माझं राजकीय वजन कमी करू शकाल.
- हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही.
- बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे. त्याच मैद्याचं पोत्याच्या पायावर नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झालात. वाघाचे फोटो काढून वाघ होता येत नाही.
- कुठल्या संघर्षाला तुम्ही होतात. दोन वर्ष कोरोनाचा संघर्ष चालला आहे. मैदानात कोण होतं? मुख्यमंत्री होते पण फेसबुक लाईव्ह होते. आम्ही अलाईव्ह होतो.
- वाघ भोळाच असतो. धूर्त कोण असतो? तुम्हीच सांगा. त्यांनी पातळी सोडली. मी तसं करणार नाही.
- बाळासाहेब वाघ होते. पण आता देशात एकच वाघ आहे. त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी.
- सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांना मारण्याचं काम केलं ते नरेंद्र मोदी.
- लाथ गाढव मारतं. पैलवान ठोकर मारतो. मोदींचा भारत आहे. काश्मीरमध्ये एका हिंदूची हत्या केली तर तीन दहशतवाद्यांना मारलं. तुम्ही सवाल करायच्या आत दहशतवाद्यांना मारण्याची ताकद ठेवणारा मोदींची भारत आहे. शर्जील तुमच्याकडे आला. तुम्ही काहीच करू शकला नाहीत. शर्जीलचा श देखील आला नाही.
- एकतर्फी कसलं प्रेम. आमची संपत्ती घेऊन दुसऱ्याशी लग्न केलं. आमच्या नावावर मतं मागितली. आमची संपत्ती घेऊन गेले. ऑफिशियल डायव्होर्स करायचा, तेही नाही.
- कालचं मुख्यमंत्र्यांचं भाषण हे सोनिया गांधींना समर्पित आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल काँग्रेसची जी भाषा असते तीच भाषा मुख्यमंत्री बोलले. हिंदुत्व हिंदुत्व करतोय पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिव्या दिल्या असं मुख्यमंत्र्यांना सोनियाजींना सांगायचं होतं.
- परमपूज्य हेडगेवार यांचं नाव स्वातंत्र्यसेनानींच्या यादीत नाव होतं. आणीबाणी लागली तेव्हा तुम्ही इंदिराजींच्या बाजूने होता.
- काल जनसंघाबद्दल बोलले. महाराष्ट्र शासनाने छापलेल्या गॅझेटियरमध्ये लिहिलं आहे- त्यात जनसंघाचं नाव आहे. संयुक्त महाराष्ट्र समिती आणि जनसंघाच्या तिकिटावर उत्तमराव पाटील निवडून आले. मुंबई तुमच्या भ्रष्टाचारापासून वेगळी करायची आहे. महाराष्ट्राला भूषण वाटेल अशी मुंबई तयार करायची आहे.
- संभाजीनगर मी म्हणतो तर झालं ना असं म्हणाले. ओ खैरे, व्हा आता बहिरे. मॅडम चिंता करू नका, आमचा पाठिंबा काढू नका. आम्ही औरंगाबादच ठेवतो.
- तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही. अनौरस बाप कुठून पैदा झाला माहिती नाही. मुंबई, महाराष्ट्र आणि भारताचा बाप छत्रपती शिवाजी महाराज.
- पंतप्रधानांची बैठक आयपीएलसारखी ऐकली म्हणाले. तुमच्या आजूबाजूला चीअरगर्ल होत्या का? तुम्ही महाराष्ट्र आयपीएलसारखंच चालवताय.
- नांदेडच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. 135 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यांच्याकडे कोण पाहणार. तुमचं मनोरंजन चाललंय, सामान्य माणसाची होरपळ होतेय. मुंबईमध्ये आम्ही काय काय केलं याची माहिती आशिष शेलारांनी दिली. सीलिंक, ट्रान्सहार्बर प्रकल्प, नवी मुंबईचा प्रकल्प. मुंबईसाठी अनेक गोष्टी केल्या.
- राजा राजवाड्यातून बाहेर पडला तर सामान्य माणूस कसा जगतोय ते कळेल. राजा आहे पण ऋषी आहे. ते गरिबांचं दु:ख जाणतात. महर्षी नरेंद्र मोदी.
- सकाळचा शपथविधी केला. तो यशस्वी झाला नाही याचा आनंद. माझ्या मंत्रिमंडळात अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यासारखे मंत्री नसते. दाऊदच्या साथीदाराला मंत्रिमंडळात ठेवायच्या ऐवजी त्या मंत्रिमंडळाला ठोकर मारली असती. वर्क फ्रॉम जेल चाललंय.
- सामनात सत्य छापून येतं असं म्हणाले. 2014 पूर्वी सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्याबद्दल जे लिहायचंत ते सत्य होतं का ते एकदा सांगा. शेतकऱ्यांना आश्वासनं दिली त्यांचं काय झालं?
- लंकेचं दहन होईल, माझ्यासोबत वानरसेना आहे.
- मुंबई महापालिकेत भगवा फडकेल, पण तो भाजपचा असेल.

फोटो स्रोत, Twitter/@OfficeOfDevendra
'सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम, अरे छट हा तर निघाला आणखी एक टोमणे बॉम्ब' अशा शब्दांत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेचं वर्णन केलं होतं.
'जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा' असंही फडणवीस यांनी लिहिलं होतं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, "1 तारखेला झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मुंबईला स्वतंत्र करणार. मुंबई तोडण्याचा यांचा डाव सुरू आहे. तुमच्या 1760 पिढ्या आल्या तरी मुंबई तुटणार नाही. मुंबईचा लचका तोडण्याचा मनसुबा आहे. मनातलं ओठावर आलं."
मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांच्या बाबरी पतनावेळी तिथे होतो या वक्तव्याचाही समाचार घेतला. "बाबरीवेळी होतो असं फडणवीस म्हणाले. तुमचं काय वय होतं. ती काय शाळेची सहल होती. चला चला जाऊया बाबरी पाडायला. तुम्ही तिथे खरंच गेला असता तर तुमच्या वजनाने बाबरी पडली असती", असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला.
महाराष्ट्रदिनी झालेल्या सभेत फडणवीस काय म्हणाले होते?
"मुंबईची निवडणूक महत्त्वाची आहे. कारण आपल्याला मुंबईकरांकरता संघर्ष करायचा आहे. ही मुंबई मुंबईकरांची आहे. मुंबईकरांना पुन्हा ती परत करायची आहे. मुंबईला लुटण्याचं काम यांच्या माध्यमातून होतं आहे. आता लढाई मुंबईच्या स्वातंत्र्याची. मुंबईच्या स्वातंत्र्याची म्हटल्यावर यांचे पोपट म्हणतील बघा- आम्ही म्हणत होतो, मुंबईला हे तोडणार. महाराष्ट्रापासून वेगळं करणार. कुणाच्या बापात हिंमत नाही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची. ही मुंबई महाराष्ट्राची आहे आणि आजन्म महाराष्ट्राची राहील".

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे म्हणाले, "मा.बाळासाहेब ठाकरेंवर विश्वास ठेऊन आम्ही ही मुंबई शिवसेनेच्या हाती दिली होती. त्याकाळी आम्हाला वाटायचं की इथे भगव्याचं राज्य आहे. पण बंधुभगिंनीनो आता ती शिवसेना राहिलेली नाही आणि ते राज्यही राहिलेलं नाही. आता मुंबईला लुटण्याचं काम यांच्या माध्यमातून होतं आहे. भावनिक गोष्टी बोलून तुम्ही मुंबईतल्या मराठी माणसाला लुबाडलं आहे. आता यापुढे हे चालणार नाही.
ज्याप्रकारे मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्राची लढाई लढली गेली. आता तसंच मुंबईला माफियांच्या हातातून, लुटणार करणाऱ्यांच्या हातातून याठिकाणी काढायचं आहे. मुंबईकरांना, खऱ्या मराठी माणसाला खरं हिंदुत्व सांगणाऱ्या या जनाजनाला ही मुंबई सोपवायची आहे. तुम्हाला एवढंच आवाहन करतो महाराष्ट्रदिनी सज्ज व्हा. लढण्यासाठी तयार व्हा".
"तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही, आता तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. तुमच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार आहे. तुमचे मंत्री तुरुंगात गेले. त्यामुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे", असं फडणवीस म्हणाले.
"बाबरी पाडली तेव्हा मी तिथे होतो. मशिदीवरील भोंगे काढायची यांची हिंमत नाही आणि म्हणतात बाबरी आम्ही पाडली. बाबरी ही मशीद नव्हती परंतु परकीय आक्रमणाचा तो ढाचा होता, तो पाडला त्यावेळी मी स्वत: तिथे होतो.
बाबरी पाडली त्याबद्दल ज्या 32 जणांना आरोपी केले होते त्यात महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकाही नेत्याची समावेश नव्हता. ते सर्व भाजपेचे नेते होते. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला त्यांच्याच मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे सत्तेत बसले आहेत", असा टोला फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
"राज्यात आता हनुमान चालिसा म्हटलं की राजद्रोहाचा गुन्हा होतो. मग तुम्ही कोणाच्या बाजूचे- रामाच्या की रावणाच्या? असा सवाल फडणवीसांनी केला.
"शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. वीज जोडण्या तोडल्या जात आहेत. भारनियम आहे. कोरोना काळात सरकारने बिल्डर, बारमालक यांना मदत केली. परंतु सामान्य माणसाला वाऱ्यावर सोडलं. हिंमत असेल तर त्यांनी भ्रष्टाचारावर तुटून पडावं. अंगावर आलात तर शिंगावर घेऊ", असं फडणवीस म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








