योगी आदित्यनाथ मुंबईत उत्तर प्रदेशच्या नागरिकांसाठी कार्यालय का सुरू करत आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
योगी आदित्यनाथ सरकार मुंबईत राहणाऱ्या उत्तर प्रदेशच्या नागरिकांच्या मदतीसाठी कार्यालय सुरू करणार आहे. या माध्यमातून तरुणांना नोकऱ्या, लोकांच्या समस्या आणि गुंतवणूक यावर भर दिला जाणार आहे.
उत्तर प्रदेश सरकारच्या जनसंपर्क कार्यालयाने ट्विटरवर ही माहिती दिलीय. पण योगी सरकारच्या या निर्णयावर शिवसेना चांगलीच भडकलीय.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीय आठवले का? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केलाय, तर मनसेनं 'यात अडचण काय?' अशी मवाळ भूमिका घेतलीय.
मुंबई महापालिका निवडणूक भाजप आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. मुंबईत उत्तर भारतीय मतदारांचा टक्का मोठा आहे. त्यामुळे यूपी सरकारचं कार्यालय मुंबई महापालिकेसाठी भाजपची खेळी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यूपीच्या नागरिकांसाठी योगी सरकार सुरू करणार कार्यालय
योगी आदित्यनाथ सरकारच्या जनसंपर्क कार्यालयाने मंगळवारी (10 मे) याबाबत ट्विटरवर माहिती दिलीय.
"योगी सरकारने एक नवीन योजना सुरू केलीय. उत्तर प्रदेशच्या प्रवासी नागरिकांच्या मदतीसाठी मुंबईत कार्यालय सुरू करण्यात येणार आहे."
उत्तर प्रदेशातील प्रर्यटनाला चालना देण्यासाठी, पर्यटन संस्कृतीची ओळख आणि खासगी क्षेत्रांमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी गुंतवणूक पर्यायांची माहिती देण्यासाठी हे कार्यालय काम करणार आहे.
'जागरण' या वृत्तपत्राने योगी सरकारच्या मुंबईतील कार्यालयाबाबत सविस्तर माहिती दिलीय. योगी सरकारच्या जनसंपर्क कार्यालयाने ही बातमी रिट्विट करत याला दुजोरा दिलाय.
या कार्यालयाचा मुख्य उद्देश दीर्घकाळापासून मुंबईत नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांना संपर्क केला जाईल. या नागरिकांना उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन दिलं जाईल.
योगी सरकारने हे कार्यालय कधी सुरू करण्यात येईल, याबाबत मात्र माहिती दिलेली नाही.
शिवसेना आणि मनसेची भूमिका काय?
योगी आदित्यनाथ सरकारचा मुंबईत कार्यालय सुरू करण्याच्या निर्णयावर शिवसेना चांगलीच भडकलीय.
"मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीयांची आठवण झाली का?" असा प्रश्न शिवसेना आमदार आणि प्रवक्त्या मनिषा कायंदेंनी उपस्थित केलाय.

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना लॅाकडाऊन काळात मुंबईतील हजारो यूपी, बिहारी नागरिक मुंबई सोडून चालत उत्तर प्रदेशकडे निघाले होते. शिवसेनेने याबाबतही प्रश्न उपस्थित केला.
मनिषा कायंदे पुढे म्हणाल्या, "कोव्हिड काळात स्थलांतरित उत्तर भारतीय मजुरांना योगींनी सीमेवर रोखून प्रवेश नाकारला होता, तेव्हा ठाकरे सरकारने या मजुरांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था केली होती."
तर "योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत लता मंगेशकर यांच्या नावाचा चौक बांधला आहे. हा आमच्या मुंबई-महाराष्ट्राचा सन्मान नाही का?" असा सवाल करत भाजपने शिवसेनेवर पलटवार केलाय.
भाजप आमदार आशिष शेलार म्हणतात, "लता मंगेशकर यांच्या नावाच्या चौकासाठी जागा मंजूर करा असं सांगणारं भाजप सरकार आहे. भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाला केंद्राने मदत केली. महाराष्ट्र सरकार मात्र झोपून होतं. शिवसेनेचा मराठी मुद्दा गेला आणि हिंदुत्वाशी त्यांचा काहीच संबंध राहिलेला नाही."
2008 मध्ये राज ठाकरेंच्या मनसेने उत्तर भारतीयांविरोधात मोठं आंदोलन केलं होतं. रेल्वे परीक्षेसाठी मुंबईत येणाऱ्या मुलांना मारहाण मनसेकडून करण्यात आली होती. पक्ष स्थापनेपासून राज ठाकरेंनी मराठी विरूद्ध उत्तर भारतीय या मुद्यावर मुंबईत राजकारण केलं.
यूपी सरकारच्या कार्यालयाबाबत विचारल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, "यूपी सरकारने मुंबईत कार्यालय उघडलं, तर अडचण काय आहे? मनसेचंही अयोध्येत कार्यालय सुरू झालंय."
आता राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्वाचा स्वीकार केलाय. राज ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत. त्यामुळे साहजिकच उत्तर भारतीयांबाबत मनसेची भाषा बदलू लागलीय.
ही मुंबई महापलिकेसाठी भाजपची खेळी?
एका अंदाजानुसार, मुंबई शहरात 40 लाखांच्या जवळपास उत्तर भारतीय मतदार आहेत. मुंबई महापालिकेतील 227 वॅार्डपैकी 100 वॅार्डात उत्तर भारतीय मतदार निवडणूक निकालात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
मग यूपी सरकारचं मुंबईत कार्यालय भाजपची राजकीय खेळी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
या प्रश्नावर वरिष्ठ राजकीय विश्लेषक संदीप प्रधान म्हणातात, "निश्चितच ही भाजपची राजकीय खेळी आहे. भाजपला या खेळीचा मुंबईत महापालिका निवडणुकीत नक्कीच फायदा होईल."
"उत्तर भारतीय लोंढ्यांमुळे मुंबईवर ताण पडतो, असं शिवसेना आणि मनसेकडून वारंवार बोललं गेलं. मुंबईत कार्यालय सुरू करून भाजप हे दाखवण्याचा प्रयत्न करतंय की, यूपी सरकारने आपल्या नागरिकांना वाऱ्यावर सोडलेलं नाही."
उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेना आणि भाजप कोणतीही कसर सोडत नाहीत. भाजपने उत्तर भारतीयांसाठी चौपाल सभा सुरू केल्यात. तर शिवसेनाही उत्तर भारतीय मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी कायम प्रयत्न करत असते.
द हिंदू वृत्तपत्राचे राजकीय पत्रकार आलोक देशपांडे सांगतात, "भाजपच्या या खेळीचा शिवसेनेसा फायदा होण्याची शक्यता आहे. भाजप यूपीच्या नागरिकांची काळजी घेतं, असा मेसेज शिवसेनेने कोअर मराठी मतदारांमध्ये नेला. तर शिवसेनेला याचा फायदा होईल."
ते पुढे सांगतात, "योगींनी वर्षभर आधी मुंबईत कार्यलय उघडलं असतं, तर याचा फायदा भाजपला झाला असता. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे कार्यालय सुरू करत असल्यामुळे हवा तसा फायदा होणार नाही. हे फक्त निवडणुकीपुरतं आहे हे मतदारांना निश्चित कळणार."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








