अयोध्येत शिवसेनेचा मनसेला टोला; असली आ रहा है, नकली से सावधान #5मोठ्या बातम्या

राज ठाकरे

फोटो स्रोत, SHARAD BADHE/BBC

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1.असली आ रहा है, नकली से सावधान; शिवसेनेचा मनसेला टोला

अयोध्येत शिवसेना आणि मनसे यांच्यात होर्डिंग जुगलबंदी पाहायला मिळते आहे. असली आ रहा है, नकली से सावधान असे पोस्टर्स शिवसेनेतर्फे लावण्यात आले आहेत.

आदित्य ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहेत. पोस्टरवर डाव्या बाजूला राम यांची प्रतिमा आहे तर उजव्या बाजूला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. मे महिन्याच्या शेवटी आदित्य अयोध्येचा दौरा करणार आहेत.

'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.

5 जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. कोण असली कोण नकली हे सारा देश पाहत असल्याचं मनसे दादर विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली आहे. त्यामुळे शिवसेनेचं हिंदुत्व नकली आहे. असली कोण, नकली कोण शिवसेना ठरवेल. उगाच आम्हाला डिवचू नका असा इशारा मनसेनं दिला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने शिवसेना आणि मनसे संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार हे आज अयोध्येत असणार आहेत.

2.'माझ्या अयोध्या दौऱ्याबद्दल बोलाल तर... '-राज ठाकरे

"माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत कोणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये, ज्यांना जबाबदारी दिली आहे त्यांनीही जबाबदारीने बोलावे असा सज्जड दम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. पक्षाच्या प्रवक्त्यांनी बोलावे, इतर कुणीही शहाणपणा करु नये", असंही ते म्हणाले. राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना हा संदेश दिला आहे.

राज ठाकरे

फोटो स्रोत, Twitter

"जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे", असा दमही राज ठाकरेंनी दिला आहे.

'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. 5 जून रोजी राज ठाकरे आपल्या पक्षाच्या नेत्यांसह अयोध्येला जाणार आहेत. पुण्यात 17 एप्रिल रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली होती.

काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे.

3.सोसाटयाचा वारा, मोठया लाटांमुळे हर्णेत बुडाली नौका

रायगड जिल्हयात हरिहरेश्वर येथे खोल समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी गेलेली अन्नपूर्णा समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भर समुद्रात ही बोट बंद पडल्यानंतर ही बोट दुसऱ्या बोटीच्या मदतीने हर्णे येथे आणत असताना अगदी थोडे अंतर शिल्लक असताना हर्णे बंदराजवळ बुडाल्याची घटना घडली आहे.

'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

भर समुद्रात अन्नपूर्णा नौका बंद पडली. यानंतर तत्काळ जवळच असलेल्या बोटीशी संपर्क करण्यात आला. त्यानंतर 'अल हम्द' IND-MH-4-MM-4 150 ही नौका विलंब न लावता मदतीला धावली. या मदतीमुळे चांगा भोईणकर, नंदकुमार चांगा भोईणकर हे सुखरूप बचावले आहेत. या बोटीने बंद पडलेल्या अन्नपूर्ण या बोटीला खेचून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण हर्णे बंदराजवळ असलेल्या बत्तीसमोर बोट आली व प्रचंड सोसाट्याचा वारा आणि प्रचंड लाटा यांमुळे बोटीचा मुख्य भाग निखळला. हर्णे बंदरात बत्तीजवळ येता येता या बोटीचे अक्षरशः दोन तुकडे झाले.

या दुर्घटनेत बोटीचे तब्बल चार लाख साठ हजार रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. ही दोन सिलेंडरची बोट होती. हा सगळा प्रकार शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला. केळशी उटंबर येथील चांगा भोईनकर यांच्या मालिकीची ही बोट आहे.

4.देशद्रोह कायद्याचा पुनर्विचार करण्याची गरज नाही-केंद्र सरकार

देशद्रोह कायद्याच्या वैधतेला आव्हान देण्याच्या प्रकरणात केंद्र सरकारने या कायद्याचा बचाव केला आहे. यावर फेरविचार करण्याची गरज नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. केदारनाथ सिंह विरुद्ध बिहार राज्य या प्रकरणी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेला निर्णय पूर्णपणे योग्य कायदा असल्याचे केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.

'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.

केंद्र सरकारने म्हटले आहे की, देशद्रोह कायद्याच्या गैरवापराच्या घटना मागील निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी पुरेसे नाही. घटनापीठाच्या बंधनकारक निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी कोणत्याही तरतुदीचा गैरवापर करणे कधीही समर्थनीय ठरणार नाही. संवैधानिक खंडपीठाने समानतेचा हक्क आणि जगण्याचा अधिकार यांसारख्या मूलभूत अधिकारांच्या संदर्भात कलम 124A च्या सर्व पैलूंचे आधीच परीक्षण केले आहे. याचिकाकर्त्यांनी आधीच्या निर्णयांचा पुनर्विचार का करावा याचे कोणतेही कारण दाखवले नाही.

5.खदानीत बुडून डोंबिवलीत पाच जणांचा मृत्यू

डोंबिवली जवळील 27 गावातील भोपर देसलेपाडा येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा आज(शनिवार) संध्याकाळी खदानीत बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. या घटनेने या भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. गावातील पाणी टंचाईचे हे बळी असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

मीराबाई सुरेश गायकवाड (55), अपेक्षा गौरव गायकवाड (28), मोक्ष मनीष गायकवाड (22), सिध्देश कैलास गायकवाड (12) आणि मयुरेश मनीष गायकवाड (8) ही मुले आई आणि आजी बरोबर संदप गावातील खदानीत कपडे धुण्यासाठी गेली होती.

खदानीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने एका पाठोपाठ मुले खदानीत खोल पाण्यात बुडू लागली. मुले बचावासाठी धावा करू लागताच, खदानीच्या काठावरील आजी, आईने पाण्यात उड्या मारल्या. मुलांना वाचविताना त्यांना पोहता येत नसल्याने त्याही बुडाल्या आणि एका पाठोपाठ एकाच घरातील पाचही जण बुडाले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)