जुनमोनी राभाः होणाऱ्या नवऱ्याला तुरुंगात डांबणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

जुनमोनी राभा, आसाम पोलीस, प्रेम,

फोटो स्रोत, FACEBOOK/JUNMONI RABHA

फोटो कॅप्शन, सब-इंस्पेक्टर जुनमोनी राभा
    • Author, दिलीप कुमार शर्मा
    • Role, गुवाहाटीमधून बीबीसी हिंदीसाठी

गेल्यावर्षी आपल्या होणाऱ्या नवऱ्याला तुरुंगात डांबणाऱ्या आणि नंतर स्वत:च तुरुंगात जाणाऱ्या आसामच्या वादग्रस्त महिला पोलीस उपनिरीक्षक जुनमोनी राभा यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार हा अपघात 16 मे ला जखलाबंधा क्षेत्रातील कलियाबोर मधील सरुभगिया गावात राष्ट्रीय राजमार्ग 37वर झाला.

जुनमोनी स्वत:च कार चालवत होत्या. त्या दरम्यान समोरून येणाऱ्या कंटेनरबरोबर त्यांच्या कारची धडक झाली. त्यात जुनमौनी यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती देताना जाखलाबंधा पोलीस ठाण्याचे प्रभारी पवन कलिता म्हणाले, "या अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलिसांची एक टीम घटनास्थळावर पोहोचली आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात घेऊन गेली. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं."

उत्तर प्रदेशातून येणाऱ्या हा कंटेनर पोलिसांनी जप्त केला आहे. ड्रायव्हरने मात्र घटनास्थळावरून लगेच पळ काढला आहे.

नौगांव जिल्ह्यातल्या मोरिकोलोंग पोलीस चौकीच्या प्रभारी म्हणून काम करणाऱ्या जुनमोनी यांना कट रचल्याबद्दल आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यांच्या होणाऱ्या नवऱ्याला त्याआधी अटक करण्यात आली होती.

अनेक महिने त्या निलंबित होत्या. जेलमधून सुटल्यावर त्यांचं निलंबन मागे घेण्यात आलं आणि त्यांचा सेवेत पुन्हा समावेश करण्यात आला.

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये त्यांचा भाजपा आमदाराशी वाद झाला होता. दोघांमध्ये झालेल्या एका वादाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तिच्या कुटुंबियांनी हा सगळा कट असल्याचा आरोप केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची बातमी आम्ही त्यावेळी छापली होती. ती पुर्नप्रकाशित करत आहोत.

Presentational grey line

आसाम पोलिसात काम करणाऱ्या एका महिला सब इन्स्पेक्टरने फसवणुकीच्या आरोपांसाठी आपल्याच प्रियकराला तुरुंगात टाकलं आहे.

नौगाव पोलीस स्थानकात सब इन्स्पेक्टर असणाऱ्या जुनमोनी राभा यांनी ओएनजीसी कंपनीत जनसंपर्क अधिकारी आहे, असं भासवणाऱ्या प्रियकर राणा पोगागविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

नौगाव पोलिसांनी राणाला दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवलं आहे.

काही महिन्यांपूर्वी जुनमोनी यांनी सत्ताधारी भाजप पक्षाच्या नेत्याला फोनवर खणखणीत प्रत्युत्तर दिलं होतं. या उत्तराची मीडियात खूप चर्चा झाली होती.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जुनमोनी आणि राणा यांचा साखरपुडा झाला. यंदा नोव्हेंबरमध्ये या दोघांचं लग्न होणार होतं. नौगाव पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, जुनमोनी यांना साखरपुड्यानंतर लगेचच राणा अफरातफर करणारा तोतया व्यक्ती असल्याचं समजलं होतं.

तक्रार काय आहे?

तक्रारीनुसार आरोपी राणा याने जुनमोनी यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीदरम्यान स्वत: ओएनजीसी कंपनीत जनसंपर्क अधिकारी असल्याचं सांगितलं होतं.

जुनमोनी राभा, आसाम पोलीस, प्रेम,

फोटो स्रोत, FACEBOOK/JUNMONI RABHA

फोटो कॅप्शन, जुनमोनी

साखरपुड्यानंतर जुनमोनी यांनी अशा काही गोष्टी आढळल्या ज्यामुळे त्यांचा प्रियकरावरचा विश्वास उडाला.

यासंदर्भात जुनमोनी यांनी तपास सुरू केला तेव्हा हा माणूस अनेक अफरातफरीच्या प्रकरणांमध्ये आरोपी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. राणाने नोकरी देण्याचं आमिष दाखवून अनेकांना गंडा घातल्याचंही स्पष्ट झालं.

दोघांची भेट कशी झाली?

गेल्या वर्षी जानेवारीत या दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. जुनमोनी तेव्हा माजुली इथल्या पोलीस स्थानकात कार्यरत होत्या. राणा माजुलीलाच राहणारा आहे.

ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं. घरच्यांच्या पाठिंब्याने आणि आशीर्वादाने दोघांचा साखरपुडा झाला.

साखरपुडा आणि अफरातफरीसंदर्भात जुनमोनी यांनी सांगितलं की, माजुलीत काम करताना आमची ओळख झाली. जानेवारी 2021 मध्ये आमची पहिली भेट झाली. आमच्या ओळखीच्या पोलीस अधिकाऱ्यानेच ओळख करून दिली होती. राणाची पोलीस अधिकाऱ्यांशी ओळख आणि उठबस होती. कदाचित तेही त्या प्रकरणात सामील असतील.

पोलिसांशी ओळख असेल तर भविष्यात कामी ठरू शकतं असं राणाला वाटलं असेल. त्याच्या मनात असंच काहीतरी असावं.

जुनमोनी राभा, आसाम पोलीस, प्रेम,

फोटो स्रोत, FACEBOOK/JUNMONI RABHA

फोटो कॅप्शन, जुनमोनी प्रियकर राणाबरोबर (जॅकेटमध्ये)

बोलणंचालणं वाढलं. त्याने लग्नाचं विचारलं. मी तयार होते पण तू घरच्यांशी बोल असं सांगितलं. त्यानंतर आम्हा दोघांच्या घरचे भेटले आणि लग्न पक्कं झालं. काही दिवसातच आमचा साखरपुडाही झाला. तेवढ्यातच माझी बदली नौगावला झाली. इथे काम करताना राणाच्या कामाविषयी मला शंका वाटू लागली. आणखी खोलात जाऊन तपास केला तेव्हा त्याच्याबाबतच्या धक्कादायक गोष्टी समोर आल्या.

जुनमोनी यांनी कोणाचंही नाव न घेता राणाचं बिंग फोडणाऱ्या तीन लोकांचे आभार मानले. या तिघांनी राणाबाबतचे सगळे पुरावे जुनमोनी यांच्यापर्यंत पोहोचवले.

जुनमोनी राभा, आसाम पोलीस, प्रेम,

फोटो स्रोत, FACEBOOK/JUNMONI RABHA

फोटो कॅप्शन, राणा

जुनमोनी पुढे सांगतात, राणाने ओएनजीसीचा जनसंपर्क अधिकारी असल्याचं सांगितलं होतं. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अंतर्गत ग्रामीण विकासाचं काम बघत आहेत. मीसुद्धा कॉटन कॉलेजातून जनसंपर्क आणि पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आहे. जनसंपर्क अधिकारपदी असलेल्या व्यक्तीमुळे मीही प्रभावित झाले होते. हा व्यक्ती ठगवणारा असू शकतो याचा थोडाही अंदाज मला आला नाही.

राणाच्या प्रतापांविषयी सांगताना जुनमोनी सांगतात, राणाने ज्या व्यक्तीला 25 लाखांना फसवलं होतं त्याने त्याच्याबद्दलची सगळी माहिती सांगितली. मी राणाला सातत्याने याबद्दल विचारलं तेव्हा सगळं बाहेर आलं. माझ्यासाठी हा प्रचंड मोठा विश्वासघात होता. यासाठी त्याला शिक्षा व्हायलाच हवी. प्रेमात वेडी होणारी मी मुलगी नाही. मी लगेच एफआयआर दाखल केला.

नौगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राणाकडे ओएनजीसीची अनेक कागदपत्रं सापडली आहेत. राणाने नेहमी स्वत:बरोबर सुरक्षा अधिकारी आणि वाहनचालक बाळगला होता जेणेकरून समोरच्या माणसांवर छाप पडावी.

भाजप नेत्याला दिलं प्रत्युत्तर

काही महिन्यांपूर्वी जुनमोनी माजुली इथे सेवेत असताना बिहपुरिया मतदारसंघाचे भाजपचे खासदार अमिय कुमार भुयां यांच्याशी झालेलं त्यांचं फोनवरचं बोलणं सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं.

जुनमोनी राभा, आसाम पोलीस, प्रेम,

फोटो स्रोत, FACEBOOK/JUNMONI RABHA

फोटो कॅप्शन, जुनमोनी

पोलिसांनी एक बोट जप्त केली. आदिवासींच्या मागे लागू नका, असं खासदारांनी जुनमोनी यांना सांगितलं.

जुनमोनी यांनी खासदारांच्या पदाचं दडपण न घेता त्यांनाच विचारलं की, तुम्ही लोकनियुक्त प्रतिनिधी आहात. पोलिसांनी कायदे-नियम तोडावेत, असं तुम्ही कसं म्हणू शकता असं जुनमोनी यांनी खासदारांना विचारलं.

ब्रह्मपुत्रा नदीत झालेल्या एका अपघातानंतर एकच इंजिन असलेल्या मशीन बोटींच्या वाहतुकीवर प्रतिबंध लावण्यात आला होता. याअंतर्गतच बोटीवर कारवाई करण्यात आली.

जुनमोनी यांनी भावनांना शरण न जाता प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला. या धाडसी कृत्यासाठी जुनमोनी यांना सोशल मीडियावर पाठिंबा मिळतो आहे.

या घटनेने त्या दु:खी झाल्या नाहीत का? या प्रश्नावर जुनमोनी सांगतात, मी अनेक तास हाच विचार करत राहिले की मी केलं ते चूक की बरोबर. चुकीचं काम करणाऱ्याला शिक्षा तर व्हायलाच हवी. मग तो माणूस घरातला किंवा जवळचा का असेना. त्यामुळे मला अजिबात वाईट वगैरे वाटत नाहीये. मला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याप्रकरणात नेहमीच पाठिंबा मिळाला आहे. मी नेहमीच जबाबदारीला सर्वोच्च प्राधान्य मानत ती निभावली आहे. त्यामुळे चुकीचं काम करणाऱ्याला माणसाला शिक्षा होईपर्यंत मी काम करत राहणार.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)