ग्रीष्मा वेकारिया हत्याकांड : ‘त्याने डोळ्यादेखत माझ्या मुलीचा गळा चिरला’

गुजरातच्या सुरतमधील ग्रीष्मा वेकारिया हत्याकांडात दोषी ठरविण्यात आलेल्या फेनिल गोयानीला न्यायालयानं मृत्यूदंड सुनावला आहे. 12 फेब्रुवारी 2022 ला फेनिल गोयानीनं ग्रीष्माच्या कुटुंबियांसमोरच तिची हत्या केली होती. या हत्याकांडानं संपूर्ण गुजरातला हादरवून सोडलं होतं.
फेनिलला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात येऊ नये, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला होता. मात्र न्यायमूर्ती विमल व्यास यांनी तो फेटाळून लावला.
ग्रीष्मा प्रकरणी पोलिसांनी एका आठवड्याच्या आत आरोपपत्र दाखल केलं होतं. ग्रीष्माच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार फेनिल तिला एक वर्षापासून त्रास देत होता. त्यानंतर फेनिल आणि ग्रीष्माच्या कुटुंबियांमध्ये याबद्दल चर्चा होऊन तडजोडही करण्यात आली होती.
ग्रीष्माच्या हत्येनंतर बीबीसीने तिच्या कुटुंबियांची बाजू जाणून घेतली होती. त्यावेळी त्यांनी काय म्हटलं होतं? याप्रकरणात नेमकं काय घडलं होतं?

ग्रीष्मा वेकारियाच्या कुटुंबानं राज्यातील महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून गुजरात सरकारला प्रश्न विचारत होता.
बीबीसी गुजरातीसोबत बोलताना वेकारिया कुटुंबातील सदस्यांनी म्हटलं होतं की, त्यांच्या मुलीची भरदिवसा हत्या करण्यात आली. या परिस्थितीत सरकार मुलींच्या सुरक्षिततेबाबत दावा कसं काय करू शकतं?
प्रेमाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर फेनिल गोयानी या तरुणानं ग्रीष्माचा कुटुंबातील सदस्यांसमोर गळा कापला, असं सांगितलं गेलं.
ग्रीष्माची काकू राधिका यांनी सांगितलं, "अशाच घटना घडत राहिल्या तर आमच्या मुली शिकणार कशा? सरकारनं 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चे बॅनर लावले आहेत. पण, अशा घटना घडत असतील तर ते बॅनर्स हटवले पाहिजेत. त्यासंबंधीच्या घोषणा बंद केल्या पाहिजेत. 'बेटी बचाओ'च्या बॅनरवर असं लिहायलं पाहिजे की, मुलीला वाचवायचं असेल तर तिला घरातच ठेवा."
फेनिलला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी ग्रीष्माच्या काकूची मागणी होती.
त्या पुढे म्हणतात, "ग्रीष्मासोबत जे झालं ते देशातल्या कोणत्याच मुलीसोबत होता कामा नये. आमच्या मुली सुरक्षित कशा राहतील? राज्य सरकार पुरेशी सुरक्षा तैनात करेल, तेव्हाच त्या सुरक्षित राहतील."

ग्रीष्माची आई विलास वेकारिया यांनी बीबीसीला सांगितलं की, "माझी मुलगी निर्दोष होती. तिची काहीच चूक नसताना तिला मारून टाकण्यात आलं. मला फक्त न्याय हवा. त्याने माझ्या डोळ्यासमोर मुलीचा गळा कापला. भळाभळा रक्त वाहायला लागलं होतं. मी हे सगळं माझ्या डोळ्यादेखत पाहत होते."
'ग्रीष्माला वर्षभरापासून देत होता त्रास'
पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, फेनिल गेल्या वर्षभरापासून ग्रीष्माला त्रास देत होता. तक्रारीत म्हटलंय की, "गेल्या वर्षभरापासून आरोपी मुलीला त्रास देत होता, तिचा पाठलाग करत होता. यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये सामंजस्यही झालं होतं."
हृदयाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर सामान्य नागरिक पोलिस व्यवस्था आणि लोकांच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
आरोपी फेनिलवर कार चोरी करण्याबाबतही गुन्हा दाखल होता. पोलिस त्या प्रकरणाचीही चौकशी करत आहे. फेनिलला पोलिसांनी अटक केली आहे.
सुरतच्या कमरेज भागातल्या खोलवाड लक्ष्मीधन सोसायटीत राहणारी ग्रीष्मा वेकारिया अमरोलीच्या जेजे शाह कॉलेजमध्ये बीकॉमचं शिक्षण घेत होती.
त्या दिवशी नेमकं घडलं?
सौराष्ट्र मधील गारियाधरच्या मोटी वावडी गावातील फेनिल सुरतच्या कापूदरा भागातील सागर सोसायटीत राहतो.
पोलिस तक्रारीत हेसुद्धा म्हटलंय की, "ग्रीष्माचे कुटुंबीय या प्रकरणाला फेनिलच्या कुटुंबीयाकडे घेऊन गेले होते. ग्रीष्माच्या वडिलांच्या मित्रासोबत तिचे मामा फेनिलच्या कुटुंबीयांना भेटले होते. ग्रीष्माला त्रास न देण्याची विनंती त्यानी फेनिलला केली होती. फेनिलनेही आपण ग्रीष्माचा पाठलाग करणार नाही, असं आश्वासन दिलं होतं."

फोटो स्रोत, Instagram
व्हॅलेंटाईन डेच्या दोन दिवस आधी शनिवारच्या संध्याकाळी (12 फेब्रुवारी) फेनिल ग्रीष्माच्या सोसायटीत पोहोचला. ग्रीष्मानं त्याला पाहिल्यानंतर याविषयी आपल्या वडिल्यांच्या मोठ्या भावाला सुभाष वेकारिया यांना सांगितलं. सुभाष यांनी फेनिलला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, फेनिलनं त्यांच्यावर चाकूनं हल्ला केला.
ग्रीष्माचा 17 वर्षांचा भाऊ आणि तक्रारदार ध्रुवनेही फेनिलला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण फेनिलने त्याच्याही हात आणि डोक्यावर चाकूनं वार केला.
तक्रारीनुसार, "ग्रीष्मानं आपले काका आणि भावाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. फेनिलने तिच्या गळ्यावर चाकू ठेवला. ग्रीष्माचे आई-वडील आणि कुटुंबातले लोक विनवण्या करत होते. पण, त्याने ग्रीष्माचा गळा चिरला."
या घटनेनंतर सुरतचे आयजी राजकुमार पांडियन यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, "जर तुमच्या मुलीची कुणी छेड काढत असेल किंवा तिला त्रास देत असेल तर सामाजिक प्रतिष्ठेची चिंता न करता पोलिसांमध्ये तक्रार दाखल करा. जेणेकरून अशा घटना घडणार नाही."
आरोपीनं केला आत्महत्येचा प्रयत्न?
या घटनेनंतर फेनिल तिथे काही वेळ थांबून राहिला आणि ग्रीष्माला कुणी वाचवायचा प्रयत्न करू नये हे त्यानं सुनिश्चित केलं, असं प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं.

फोटो स्रोत, Instagram/_fenil_01
काही बातम्यांमध्ये असंही सांगण्यात आलंय की, ग्रीष्माचा मृत्यू झाला हे लक्षात आल्यानंतर फेनिलने चाकूनं स्वत:चा जीव घेण्याचा प्रयत्न केला.
सुरतचे पोलीस उप-अधीक्षक बीके वानार यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं, "आरोपीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नाही. खरं तर ग्रीष्माला कुणी वाचवू नये म्हणून तो घटनास्थळी थांबून राहिला. ग्रीष्मा जमिनीवर कोसळली होती आणि वेदनेनं तडफडत होती. त्याने ती मरेल हे सुनिश्चित केलं. कुणालाही तिच्या जवळ येऊ दिलं नाही. तसंच तिला दवाखान्यातही नेऊ दिलं नाही."
बीके वानार सांगतात, "आरोपी तिथं दोन-तीन मिनिटं थांबून होता. ग्रीष्मा तडफडत होती आणि तो तंबाखू-सुपारी चघळत होता. तसंच त्यानं चाकूनं इतरांना जखमी करण्याचा प्रयत्न केला. तिथं लोकांची संख्या वाढायला लागली तेव्हा त्यांना भीती दाखवण्यासाठी त्यानं स्वत:वर चाकूनं वार केला."
वानार यांच्या मते, आरोपी आणि ग्रीष्मा या दोघांचंही वय 20 ते 21 दरम्यान आहे.
फेनिलचे वडील पंकज गोयानी यांनी मीडियाला सांगितलं, "फेनिल कुटुंबासाठी डोकेदुखी झाला होता. तो कुणाचच ऐकत नव्हता. ग्रीष्माचे कुटुंबीय तक्रार घेऊन आले, तेव्हा मी त्याला खडसावलं होतं. ग्रीष्माला त्रास देणार नाही, असं त्यावेळी तो म्हणाला होता. पण, तो काही सुधारला नाही. न्यायालयानं त्याला फाशीची शिक्षा दिली, तरी आम्हाला काही दु:ख वाटणार नाही."
आपल्या मुलाच्या स्थितीविषयी जाणून घेण्यासाठी दवाखान्यापर्यंतही न गेल्याचं फेनिलचे आई-वडील सांगतात.
ग्रीष्माचे वडील नंदलाल आफ्रिकेहून परतल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रीष्माच्या नातेवाईकांसह शेजारी-पाजारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
कॉलेज सोडलं
स्थानिक पत्रकार वंदन भडानी त्याच कॉलेजच्या माजी विद्यार्थी आहेत, जिथं फेनिल शिकत होता. त्यांच्या मते, फेनिलला जून 2020मध्ये कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं होतं. कारण त्याची हजेरी 10 टक्क्यांहून कमी होती.

फोटो स्रोत, Instagram
वंदना यांनी सांगितलं, "मी त्याच कॉलेजात शिकत होतो आणि फेनिलच्या प्रकरणाविषयीही ऐकलं आहे. फेनिल आणि त्याच्या मित्रांविरोधात छेडछाड करण्याच्या तक्रारीही होत्या. फेनिलला कॉलेजातून काढलं आहे, हे त्याच्या मित्रांनाही माहिती नव्हतं. तो वर्गात प्रवेश करू शकत नव्हता. पण, कॅम्पसमध्ये मात्र हिंडत राहायचा."
पोलीस उप-अधीक्षक वानार सांगतात, "फेनिलनं कॉलेजमध्ये एक वर्षं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यानं शिक्षण सोडलं. तो एका ब्यूटिक सेंटरमध्ये काम करत होता. पण, गेल्या 15 ते 17 दिवसांपासून त्याच्याकडे कोणतंही काम नव्हतं. प्रथमदर्शनी हे प्रकरण एकतर्फी प्रेमातून घडल्याचं दिसतं."
याआधाही फेनिलवर काही गुन्हे दाखल झाले होते का, असं विचारल्यावर वानार सांगतात, "पोलिस रेकॉर्डनुसार त्याने एक कार चोरी केली होती. त्या गुन्ह्यात त्याच्यासोबत चार-पाच जण सहभागी होते. त्या चोरीचा उद्देश काय होता, हे सविस्तर चौकशीनंतर माहिती होईल."
वंदन भडानी यांनी सांगितलं, "फेनिल 12 फेब्रुवारीला काही मित्रांसह ग्रीष्माच्या सोसायटीत पोहोचला. पण, ते लोक सोसायटीच्या बाहेरच थांबले आणि नंतर तिथून पळून गेले. असं असलं तरी पोलिसांनी मात्र या गोष्टीला दुजोरा दिलेला नाहीये."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
वंदन यांनी पुढे सांगितलं, "तो कॉलेजात गेला होता आणि त्याचं ग्रीष्मासोबत भांडण झालं होतं. तो भडक माथ्याचा होता. त्याला दोन-तीनदा समज देण्यात आली होती. फेनिलच्या वडिलांनीही तो त्रास देणार नाही, असं आश्वस्त केलं होतं.दोन-तीन महिने सगळं शांत होतं. पण, त्यानंतर त्यानं ग्रीष्मासोबत भांडण केलं होतं. ग्रीष्मानं आपल्या वडिलांना हे सांगितलं नव्हतं. पण घरातल्या इतर जणांना तिनं याविषयी कल्पना दिली होती."
सोशल मीडियावर फेक न्यूज
ग्रीष्माच्या हत्येची बातमी सोशल मीडियावर पसरली. या हत्येचा व्हीडिओ सोशल मीडियावर फेक न्यूजसोबत शेयर करण्यात आला होता. बीबीसी गुजरातीनं सोशल मीडियावर करण्यात येत असेलल्या दाव्यांचा फॅक्ट चेक केला होता.
त्यात असं लक्षात आलं की, ग्रीष्माच्या हत्येचा व्हीडिओ सोशल मीडियावर चुकीच्या दाव्यांसहित शेअर केला जात आहे. त्याला 'लव्ह जिहाद' आणि 'धर्मांतरा'सोबत जोडलं जात आहे.
फेनिल हा एक मुस्लीम तरुण आहे आणि ग्रीष्मानं इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यानं त्याने तिची हत्या केली, असंही म्हटलं गेलं आहे. फेसबुकवर देव कटोच नावाच्या युझरनं हा दावा केला होता. असाच खोटा दावा ट्विटरवर हिंदू राष्ट्र प्रशासनिक समिती आणि साई सुमन यांनी केला आहे.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









