You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अंतर्वस्त्र काढायला लावण्याच्या प्रकारावर काय म्हणालं महिला आयोग?
नीट परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीला अंतर्वस्त्रं काढायला लावण्याच्या धक्कादायक प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली आहे. हा प्रकार लाजिरवाणा आणि अपमानास्पद असल्याचं महिला आयोगाने म्हटलं आहे.
या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश राष्ट्रीय महिला आयोगाच्या चेअरपर्सन रेखा शर्मा यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला दिले आहेत.
असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी असंही त्यांनी म्हटलं आहे.
याप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी असं पत्र त्यांनी केरळच्या डीजीपींना लिहिलं आहे. भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमं दोषींवर लागू करण्यात यावीत असंही त्यांनी म्हटलं आहे.
दोषींना शासन व्हावं यासाठी काय कार्यवाही करण्यात आली याबाबत तीन दिवसात आयोगाला माहिती द्यावी असे आदेशही त्यांनी जारी केले आहेत.
काय आहे हे प्रकरण?
केरळमध्ये रविवारी झालेल्या नीट परीक्षेदरम्यान एका केंद्रावर परीक्षार्थी मुलींना अंतर्वस्त्रं काढायला लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
कोल्लम इथल्या एका कॉलेजात नीट परीक्षेसाठी आलेल्या मुलींना अंतर्वस्त्रं काढा असं सांगण्यात आलं. अंतर्वस्त्रं काढल्यानंतरच परीक्षा देता येईल असं त्यांना सांगण्यात आलं.
एका मुलीच्या पित्याने कोल्लम ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानंतर या प्रकाराबाबत कळलं. परीक्षा केंद्रावर झालेल्या या धक्कादायक प्रकाराने मुलीची अवस्था बिकट झाली.
मुलीचे वडील गोपाकुमार सुरानद यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "मुलीने सांगितलं की तिने जो अभ्यास केला होता ते सगळं विसरायला झालं. तिने या प्रकारानंतर कशीबशी परीक्षा दिली."
तक्रारीत गोपाकुमार यांनी म्हटलं आहे की, "माझ्या मुलीला परीक्षा केंद्रावर अंतर्वस्त्रं काढण्यास सांगण्यात आलं आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जो ड्रेसकोड निश्चित केला आहे त्यात याचा उल्लेख नव्हता. माझ्या मुलीने तसं करायला नकार दिला तर तुला परीक्षा देता येणार नाही असं सांगण्यात आलं."
"माझ्या मुलीने सांगितलं की एक अख्खी खोली अंतर्वस्त्रांनी भरली होती. त्यापैकी अनेक मुली रडत होत्या. नीट एक महत्त्वाची प्रवेशप्रक्रिया आहे. अशा परीक्षेसाठी आलेल्या मुलींना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. अनेक मुली आपल्या ब्रेसियरचे हुक उघडून बंद करत होत्या," असं गोपाकुमार यांनी सांगितलं.
माणुसकीचा अपमान
मुलीचे काका अजित कुमार यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, "माझ्या पुतणीला सुरुवातीला अंतर्वस्त्रं उतरवण्यास सांगण्यात आलं. ती रडू लागली. मग तिला एका खोलीत नेण्यात आलं. तिथे अनेक मुलंमुली होते. त्यावेळी अंतर्वस्त्र काढ असं का सांगितलं"?
कोल्लम ग्रामीणचे पोलीस सुपिरिडेंट कार्यालयातील एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "आम्ही मुलीची तक्रार दाखल करून घेतली आहे. आम्ही त्यावर कारवाई करू. काही वेळात एफआयआर नोंदली जाईल."
याच परीक्षा केंद्रात अशा अनुभवाला सामोरं जावं लागलेल्या मुलींचे आईवडील तक्रार दाखल करून घेण्यासाठी पोलीस स्थानक गाठत आहेत.
केरळच्या सामाजिक न्यायमंत्री आर. बिंदू यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं की, "या घटनेसंदर्भात राज्य सरकार तसंच नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांना लिहिणार आहे. कारण हा माणुसकीचा अपमान आहे."
अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो. अशा निंदनीय घटना पुन्हा घडायला नकोत.
असं पहिल्यांदा झालेलं नाही
नीट परीक्षेदरम्यान कपड्यांसंदर्भात वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2017 मध्ये केरळमध्येच कन्नूर जिल्ह्यात अशा स्वरूपाची घटना घडली होती. त्यावेळी काळ्या रंगाची ट्राऊजर परिधान केल्याने एका मुलीला परीक्षेला बसू देण्यात आलं नाही.
त्यावेळी त्या मुलीला आईसह वेगळ्या रंगाची ट्राऊजर शोधण्यासाठी बरीच पायपीट करावी लागली. रविवार असल्याने अनेक दुकानं बंद होती. ती मुलगी परीक्षेसाठी केंद्रावर आली तेव्हा मेटल डिटेक्टर बीप बीप आवाज करू लागलं.
त्या मुलीच्या ब्रेसियरच्या मेटल हुकमुळे तो आवाज येत होता. त्या मुलीला ब्रेसियर काढल्यानंतरच परीक्षा देता आली.
त्याच्या पुढच्या वर्षी केरळमध्येच पल्लकड जिल्ह्यात एका मुलीला अशाच एका धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं. त्या मुलीला परीक्षा केंद्रावर ब्रेसियर काढण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर परीक्षा नियंत्रक सातत्याने तिच्याकडे पाहत होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)