कर्नाटक : हिजाब घालून'अल्लाहु अकबर' म्हणणारी विद्यार्थिनी कोण आहे?

कर्नाटकात हिजाब परिधान करण्यावरून सुरू झालेल्या वादासंदर्भात मंगळवारी एका व्हायरल व्हीडिओमुळं आणखी वातावरण तापलं आहे. त्यावरून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

या व्हीडिओमध्ये मांड्या जिल्ह्याच्या एका प्रि-युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये हिजाब परिधान केलेली एक विद्यार्थिनी तिची बाईक पार्क करून क्लासकडे जायला निघते आणि गर्दीतीले तरुण तिचा पाठलाग करू लागतात, असं दृश्य दिसत आहे.

भगवे शेले गळ्यात असलेले आणि मोठ्याने घोषणा करणारे, जय श्री राम म्हणणारे विद्यार्थी विद्यार्थिनीच्या दिशेनं जायला लागतात आणि त्यानंतर तीही पलटून दोन्ही हात वर करून अल्लाहु अकबर अशा घोषणा देऊ लागते.

कोण आहे ही विद्यार्थिनी

मीडिया रिपोर्टनुसार मोठ्याने घोषणा देणाऱ्या गर्दीला ठामपणे विरोध करणाऱ्या या विद्यार्थिनीचं नाव मुस्कान आहे. ती म्हैसूर-बेंगळुरू हायवेवर असलेल्या पीईएस कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्समध्ये बी. कॉमच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे.

मुस्काननं नंतर काही माध्यमांशी याबाबत चर्चा केली आणि संपूर्ण घटनेबाबत तिची बाजू नेमकेपणानं मांडली.

मुस्कान म्हणाली की, तिच्यासारख्या इतर पाच विद्यार्थिनींबरोबरही अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या.

"मी असाइनमेंट जमा करायला गेले होते. मी कॉलेजमध्ये प्रवेश करण्याआधी काही विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्यामुळं त्रास दिला होता. त्यामुळं त्या रडत होत्या.

मी याठिकाणी शिकायला येते. माझं महाविद्यालय मला असे कपडे परिधान करण्याची परवानगी देतं. त्या जमावात केवळ 10 टक्के विद्यार्थी माझ्या कॉलेजमधले होते. बाकी सर्व बाहेरचे होते. ज्या पद्धतीनं ते वर्तन करत होते त्यामुळं त्यांनी मला त्रास दिला आणि मी त्याला प्रत्युत्तर दिलं," असं घटनेबाबत बोलताना मुस्काननं इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं.

कॉलेजमधील प्रिन्सिपल आणि इतर कर्मचाऱ्यांशिवाय हिंदू विद्यार्थ्यांचाही त्यांना पाठिंबा होता, असंही मुस्कानचं म्हणणं आहे.

"कॉलेज प्रशासन आणि प्रिन्सिपल यांनी कधीही बुर्का परिधान करण्यापासून रोखलं नाही. काही बाहेरचे लोक आमच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्हाला रोकणारे हे कोण आहेत. आम्ही त्यांचं म्हणणं का ऐकायला हवं," असं मुस्कान विचारते.

"मी कॉलेजमध्ये गेले तेव्हा ते मला आत जाऊ देत नव्हते, कारण मी हिजाब परिधान केला होता," असं मुस्काननं एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं.

मी कशीबशी आत आले. त्यानंतरते जय श्री राम च्या घोषणा देऊ लागले तर मीही अल्लाहु अकबर असं ओरडायला सुरुवात केली.

"मला असुरक्षित वाटत नाहीये. सकाळपासून आतापर्यंत पोलीस आणि प्रत्येकाने येऊन ते आमच्या सोबत असल्याचं सांगितलं आहे. शिक्षणाला आमचं प्राधान्य आहे. कापडाच्या एका तुकड्यासाठी ते आमच्या शिक्षणात मोडता घालत आहेत," असं तिने NDTV शी बोलताना सांगितलं.

व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर याबाबत एकापाठोपाठ प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी हिजाब वादावरून ट्वीट केलं. "बिकिनी असो, पदर असो किंवा जीन्स अथवा हिजाब महिलांना त्यांच्या आवडीचे कपडे परिधान करण्याचा अधिकार आहे. हा अधिकार संविधानानं महिलांना दिला आहे. त्यामुळं महिलांना त्रास देणं बंद करा," असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं.

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते संजू वर्मा यांनी अल्लाहु अकबरच्या घोषणा देणारी विद्यार्थिनी कट्टरतावादी आणि दिशाभूल झालेली असल्याचं म्हटलं आहे.

"अल्लाहु अकबरच्या घोषणा देणाऱ्या त्या कट्टर मुलीनं काहीही धाडसाचं काम केलेलं नाही. बहुतांश इस्लामिक देशांनीही हिजाबवर निर्बंध लावले आहेत. जे लोक #HijabisOurRight ट्रेंड करत आहेत, त्यांना 18 व्या शतकातील मानसिकतेत राहायचीच आवड असेल तर त्यांनी मदरशामध्ये जावं," असं ट्वीट संजू वर्मा यांनी केलं.

"कर्नाटकात बीबी मुस्कान नावाच्या धाडसी भगिणीबरोबर जे काही घडलं आहे, त्यानं भाजपच्या सुशासनाची पोलखोल केली आहे. भाजप सरकारनं गुंडांना संरक्षण दिलं आहे. त्यांचा हिंसाचारासाठी वापर केला जातो. लोकांच्या सर्व मुद्द्यांवर अपयशी ठरलेलं भाजप सरकार, अशा मुद्द्यांना हवा देत आहे," असं भीम आर्मीचे प्रमुख आणि दलित नेते चंद्रशेखर आझाद यांनी ट्वीटमध्ये म्हटलं.

पाकिस्तानातूनही उमटत आहेत प्रतिक्रिया

व्हीडिओमध्ये अल्लाहु अकबर म्हणणाऱ्या या विद्यार्थिनीला पाकिस्तानातूनही मोठा पाठिंबा मिळत आहे.

पाकिस्तानमधील सत्ताधारी पीटीआय पक्षानं हा व्हीडिओ ट्विट केला आहे. "धाडसाचं प्रतिक! अल्लाहु अकबर. मोदी राज्यात भारतात फक्त गोंधळ माजला आहे. जिन्नांचा निर्णय योग्य होता,"असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तर इम्रान खान सरकारमधील मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनीही यावर प्रतिक्रिया दिलीय.

"मोदींच्या भारतात जे घडत आहे ते भयावह आहे. अस्थिर नेतृत्वात भारतीय समाजाचं वेगानं अधःपतन होत आहे. दुसऱ्या कपड्यांप्रमाणेच हिजाब परिधान करणं ही वैयक्तिक आवड आहे. तो पर्याय प्रत्येक नागरिकाकडं असायला हवा," असं त्यांनी म्हटलंय.

"ज्या पद्धतीनं तिनं अल्लाहु अकबर म्हटलं, त्यावरून ती वाघीण आहे हे स्पष्ट होतं. ज्या पद्धतीनं भारतात भारतीय मुस्लीम आणि मुस्लीम तरुणींबरोबर वर्तन केलं जातं, त्यावरून जिन्ना योग्य होते, हे सिद्ध होतं," असं पाकिस्तानी पत्रकार यासीफ हे व्हायरल व्हीडिओ शेअर करत म्हणालेत.

भारतात राहत असलेल्या बांगलादेशच्या प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी कर्नाटकातील कॉलेजमध्ये हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनीच्या व्हायरल व्हीडिओची तुलना इस्लामिक स्टेटशी केली आहे.

"अल्लाहु अकबर च्या आवाजानं मला आयएसआयएसच्या शीर कापण्याच्या व्हीडिओची आठवण येते," असं त्यांनी म्हटलं.

हिजाब विवाद : संपूर्ण प्रकरण काय आहे?

काही दिवसांपूर्वी उडुपीच्या एका प्रि-युनिव्हर्सिटी गव्हर्नमेंट कॉलेजमधील काही विद्यार्थिनींनी हिजाब काढण्यास करण्यास नकार दिला तेव्हा हे प्रकरण चर्चेत आलं होतं.

दुसऱ्या वर्षाच्या या विद्यार्थिनींनी हिजाब काढून क्लासमध्ये बसण्यास नकार दिला होता. या विद्यार्थिनीनंचं म्हणणं ऐकलं नाही, तेव्हा हे प्रकरण आणखी पुढं गेलं. या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींनी हिजाब परिधान केल्याच्या विरोधात काही तरुणांनी भगवी शॉल गळ्यात परिधान केल्याचं पाहायला मिळालं होतं.

त्यानंतर भगवी शॉल परिधान करून त्यांनी मोर्चाप्रमाणं एका खासगी महाविद्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. प्रकरण अधिक तापत गेलं आणि राजकीय पक्षांनीही यात उडी घेतली.

हिजाब परिधान करण्यापासून रोखल्यानंतर या तरुणींना उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हिजाब परिधान करणं हा त्यांना संविधानानं दिलेला अधिकार आहे. त्यामुळं अशाप्रकारे अडवणूक करता कामा नये, असं त्यांचं म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)