शिवाजी पार्कची स्मशानभूमी होते आहे का?

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी

शिवाजी पार्कची स्मशानभूमी करू नये, असं मत वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं आहे.

आधी बाळासाहेब ठाकरे आणि आता लता मंगेशकर. दहा वर्षांच्या अंतरानं मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात या दोघांवर अंत्यसंस्कार झाले. इथेच आता लता मंगेशकर यांचं स्मारक उभं करण्याची मागणीही होऊ लागली आहे.

त्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रकाश आंबेडकरांनी आपला विरोध दर्शवला. ते म्हणाले, "शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच राहिलं पाहिजे. त्याला स्मशानभूमी बनवलं जाऊ नये या मताचा मी आहे. बाजूला एक स्मशानभूमी आहेच."

"हे एक खेळाचं मैदान आहे, अनेकजण त्या मैदानावर घडले आहे. व्यक्तींचं स्मारक करायचं असेल तर वेगळ्या अनेक जागा आहेत. पण मुलांच्या खेळाच्या जागेवर अतिक्रमण करावं असं मला वाटत नाही."

मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनीसुद्धा अशीच भूमिका घेतली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलंय,

"छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादरवासीयांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणा पासून वाचवलं आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका ही विनंती."

पण दोन अंत्यविधी झाल्यानं, हे मैदान खरंच स्मशानभूमी बनत आहे का? मुंबईत सार्वजनिक अंत्यविधीसाठी दुसरी जागा नाही का? अंत्यसंस्कारासाठीचे नियम काय सांगतात? शिवाजी पार्कच्या रहिवाशांना याविषयी काय वाटतं?

मुंबईत अंत्यसंस्काराविषयीचे नियम काय सांगतात?

मुंबई महानगर पालिका कायदा कलम 435 ते 441 मध्ये अंत्यसंस्कारासाठीच्या जागांविषयीचे नियम मांडण्यात आले आहेत. 1888 सालचा हा मूळ कायदा असून त्यात नंतर सुधारणा करण्यात आल्या आहेत.

या कलमांनुसार नोंदणीकृत जागेव्यतिरिक्त म्हणजे स्मशान, कब्रस्तान अशा जागा वगळता इतर जागी अंत्यसंस्कार अथवा दफन करता येत नाही.

मात्र काही विशिष्ठ परिस्थितीत राज्य सरकारनं आदेश काढल्यावर महापालिका आयुक्त एखाद्या जागी अंत्यसंस्कारासाठी परवानगी देऊ शकतात.

एरवी मैदानांचा, क्रीडांगणांचा वापर कसा करायचा, याचेही अनेक नियम आहेत. पण सरकार अपवादात्मक परिस्थितीत मैदानावर अंत्यसंस्कारासाठी तात्पुरती परवानगी देऊ शकतं.

बाळासाहेब ठाकरे आणि लता मंगेशकरांवर अंत्यसंस्कार करताना शिवाजी पार्कच्या वापरासाठी अशीच परवानगी घेण्यात आली होती.

शिवाजी पार्कवरच का झाले अंत्यसंस्कार?

खेळाचं मैदान घोषित झालेल्या या मैदानात राजकीय सभांसाठीही कोर्ट परवानगी देत नाही. मग अंत्यसंस्कारासाठी परवानगी कशी मिळाली?

2012 साली बाळासाहेब ठाकरेंवर अंत्यसंस्कार झाले, तेव्हाही महापालिका आयुक्त सिताराम कुंटे यांनी कायद्‌यात तात्पुरता बदल करत शिवाजी पार्कवर अग्निसंस्कारांसाठी परवानगी दिली.

भरमैदानात स्मारक होऊ नये, म्हणून तेव्हाच्या काँग्रेस सरकराने रातोरात अंत्यदर्शनासाठी उभारलेलं बांधकाम हलवलं होतं.

त्यानंतर क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं पार्थिवही काही काळासाठी या मैदानात आणण्यात आलं होतं.

आता लतादीदींच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री येणार होते. तसंच इथे मोठी गर्दी जमा होऊ शकते, त्यामुळेच महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांनी एकत्र चर्चा करून दादरच्या भागोजी कीर स्मशानभूमीऐवजी शिवाजी पार्क मैदानातच अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला.

तिथल्या एका मर्यादित जागेत 6 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंतच अंत्यसंस्कारासाठी परवानगी देण्यात आली. मैदानाच्या चारही बाजूंनी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आणि बाहेरच्या रस्त्यांवरून ट्रॅफिक वळवण्यात आलं.

अर्थात नियमांतला हा बदल केवळ एक अपवाद असल्याचंही महापालिकेनं एका सर्क्युलरमध्ये स्पष्ट केलं आहे.

पण भाजपने लगेच मागणी केली की पार्कातच लतादीदींचं स्मारक उभं रहावं. तर शिवसेनेने स्मारकाचा बॉल केंद्राच्या कोर्टात टाकला.

'शिवाजी पार्कचं स्मशान बनवू नका'

1920 साली लोकमान्य टिळकांचं निधन झालं तेव्हा आणि 1956 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं तेव्हा मोठा जनसमुदाय मुंबईत लोटला होता. टिळकांवर गिरगाव चौपाटी इथे तर बाबासाहेबांवर दादर चौपाटी इथे अंत्यसंस्कार झाले होते. पण आता शिवाजी पार्कवर अंत्यविधी होण्याचा प्रघात पडू नये, असं अनेक मुंबईकरांना वाटतं.

शिवाजी पार्कात आता अंत्यसंस्कार आणि स्मृतिस्थळांची रांग लागेल, अशी भीती स्थानिकांना वाटतेय. त्याच परिसरात राहणारे ज्येष्ठ पत्रकार निखिल फेसबुकवर ते लिहितात, "शिवाजी पार्क ही स्मशानभूमी नाही. 1986 साली स्मिता पाटील यांचं निधन झाल तेव्हा त्यांचं पार्थीव अत्यंदर्शनासाठी इथेच ठेवण्यात आलं होतं. पण अंत्यविधी शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीत झाला होता... लतादीदी आणि बाळासाहेबांचंही अंत्यदर्शन मैदानात करून अंत्यविधी स्मशानात करणं अशक्य होतं का?"

ते असंही लिहितात की "लता मंगेशकर यांचं स्मारक मुंबईत झालं पाहिजे, पण शिवाजी पार्क मैदानावर अतिक्रमण करून नाही. शिवाजी पार्क परिसरात जन्माला आलेल्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना नागरिकांची ही भावना कळेल अशी आशा आहे... खरं तर लता मंगेशकर यांची 5 हजाराहून अधिक गाणी हेच त्यांचं खरं स्मारक आहे. पण भव्य पुतळे उभारायची हौस असलेल्या या देशात हे फारशा लोकांना पटणार नाही."

शिवाजी पार्क परिसरातल्या रहिवासी आणि कलाइतिहासाच्या प्राध्यापक डॉ. मंजिरी ठाकूर सांगतात.

"राजकीय मतं काहीही असली, तरी बाळासाहेब ठाकरे किंवा लता मंगेशकर अशा माणसांशी लोकांचं जवळचं नातं होतं. त्यामुळे अशा काही लोकांसाठी असा अपवाद केला असेल, पण असा पायंडा पडू नये असं वाटतं."

स्मारकं आणि वादापेक्षा हे मैदान जपण्यावर भर दिला पाहिजे असं त्या नमूद करतात.

"शिवाजी पार्कची अतिक्रमणं रोखण्यासाठी, इथली स्वच्छता राखण्यासाठी इथल्या लोकांनी अनेक प्रयत्न केले आहेत. पण हा परिसर आता बदलतो आहे. आधी पार्कच्या भोवती इमारती होत्या. आता इमारतींच्या मध्ये मैदान आहे असं वाटतं."

शिवाजी पार्क का आहे महत्त्वाचं?

दादर पश्चिम, म्हणजे मुंबईच्या मध्यवर्ती भागातलं हे मैदान म्हणजे या शहराचं हृदयच आहे, असं म्हणायला हरकत नाही. 27 एकरांचं हे मैदान मुंबईच्या मुख्य शहर भागातलं सर्वांत मोठं मैदान आहे.

ही जागा 1925 साली तेव्हाच्या महापालिकेनं जनतेसाठी खुली केली. तेव्हा या मैदानाचं नाव होतं, माहीम पार्क. मग 1927 साली, या मैदानाचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून शिवाजी पार्क असं नामकरण झालं.

तर गेल्या वर्षीच छत्रपती शिवाजी महाराज पार्क असा अधिकृत नामविस्तार झाला. पण सामान्य लोकांना शिवाजी पार्क नावानंच हे मैदान अधिक ओळखीचं आहे.

मुंबईच नाही, तर महाराष्ट्राच्या इतिहासातल्या अनेक महत्त्वाच्या क्षणांचं शिवाजी पार्क मैदान साक्षीदार आहे. मग ते भारताच्या स्वातंत्र्यासाठीचा लढा असो, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन असो, राजकीय पक्षांच्या सभा असोत. शिवसेनेचा जन्म या मैदानातच झाला.

दरवर्षी 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांचे अनुयायी इथेच जमा होतात.

मुंबईला क्रिकेटची पंढरी बनवण्यात या मैदानाचंही मोठं योगदान आहे. सचिन तेंडुलकरनं याच मैदानात क्रिकेटचे धडे गिरवले होते.

विजय मांजरेकर, एकनाथ सोलकर, सुनील गावसकर, संदीप पाटील ते अलीकडे अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ... क्रिकेटचं जग गाजवणारे मुंबईचे अनेक खेळाडू कधी ना कधी या मैदानात खेळलेत. क्रिकेटच नाही, तर मलखांब, टेनिस, फुटबॉलचा सरावही इथे चालतो.

त्यामुळेच शिवाजी पार्क हे केवळ मैदान नाही, तर ती एक भावना आहे, असंही अनेकांना वाटतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता