You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शाहरुख खान लता मंगेशकरांच्या पार्थिवावर थुंकला की फुंकला? नेमकं सत्य काय?
लता मंगेशकर यांच्या पार्थिवासमोर प्रार्थना केल्यावर शाहरुख खान थुंकला अशी चर्चा आणि त्याला उत्तर देणारी 'तो थुंकला नाही, फुंकला' स्पष्टीकरणं यांनी गेल्या काही तासांमध्ये सोशल मीडिया भरून गेला आहे.
लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देताना शाहरुख खानने केलेल्या एका कृतीवरून ही सगळी चर्चा सुरू आहे.
नेमका हा वाद काय आहे? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या शाहरुख खानच्या त्या फोटोमागचं सत्य काय आहे?
ट्विटरवर अरुण यादव, जे भाजपचे हरयाणा राज्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी आहेत. त्यांनी शाहरुख खानचा दुवा मागतानाचा व्हीडिओ ट्वीट करत विचारलं की, शाहरुख खान थुंकला आहे का?
अरुण यादव यांच्यामुळेच या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली की नाही हे नेमकं सांगता येणार नाही, पण त्यांच्या ट्वीटचा दाखला देत दोन्ही बाजूंनी भरपूर चर्चा झाली. शाहरुख खान थुंकला असा दावा करणाऱ्यांमध्ये अरुण यादव यांच्यासारखे व्हेरिफाईड ट्विटर अकाउंट असलेले लोक आहेत तसेच सामान्य ट्विटर युझरही आहेत.
ट्विटरवरच हार्दिक नावाच्या या व्यक्तीनेही हा व्हीडिओ ट्वीट करत तोच प्रश्न विचारला.
सुप्रीम कोर्टात गोवा राज्याचे सरकारी वकील आणि भाजपचे उत्तर प्रदेश प्रवक्ते प्रशांत उमराव यांनीही हा ट्वीट रिट्विट करत शाहरुख थुंकत असल्याचा दावा केला.
पण हे दावे आणि त्याबरोबरीने शाहरुख खानवर टीका समोर येत असताना शाहरुख थुंकत नसून फुंकर मारत आहे. मुस्लिम धर्मांत दुवा मागितल्यानंतर फुंकण्याची पद्धत आहे असं स्पष्टीकरण देणारेही अनेक पोस्ट्स समोर आले.
चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी म्हटलं की शाहरुखवर थुंकण्याचा आरोप करत टीका करणाऱ्या लोकांना लाज वाटायला हवी. त्यांच्या पुढच्या प्रवासात त्यांचं रक्षण व्हावं आणि त्यांना आशीर्वाद मिळावेत यासाठी शाहरुख लता मंगेशकर यांच्या पार्थिवासमोर दुवा मागून फुंकर मारत आहे. असल्या सांप्रदायिक घाणीला देशात जागा नाही.
उद्योगपती झफर सरेशवाला, जे अनेकदा त्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या जवळीकीसाठीही ओळखले जातात, त्यांनीही शाहरुखचा फोटो ट्वीट करत त्याचं समर्थन केलं. शाहरुख आणि पूजा हे एकाच वेळी दुवा आणि प्रार्थना करताना दिसणं हे भारताला एकत्र आणणारं अत्यंत सुंदर दृश्य आहे असं त्यांनी म्हटलं. दुवा मागणं हे इस्लाममधील अत्यंत पवित्र कार्य असल्याचंही ते म्हणतात.
शाहरुखने नेमकं काय केलं?
लता मंगेशकर यांचं पार्थिव त्यांचा बंगला प्रभूकुंज इथून शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कारासाठी आणलं गेलं. अंत्यसंस्कारांपूर्वी ते काही काळ दर्शनासाठी ठेवलं गेलं होतं.
शाहरुख खान आपली मॅनेजर पूजा ददलानी हिच्यासह शिवाजी पार्कमध्ये उपस्थित होता. दीदींना श्रद्धांजली तसंच फुलं, हार वाहण्यासाठी लोक रांगेत येत होते आणि चौथऱ्यावर चढून पार्थिवाजवळ येऊन आपली श्रद्धांजली वाहत होते.
शाहरुख आणि पूजा वरती चढल्यानंतर शाहरुखने पुष्पचक्र वाहिलं. शाहरुखने त्यानंतर दुवा पढायला सुरुवात केली, त्यावेळी त्याचा मास्क त्याच्या चेहऱ्यावर होता. दुवा पढून झाल्यानंतर त्याने मास्क खाली केला आणि तो पुढे वाकला. त्यावेळी त्याने फुंकर मारली. यानंतर शाहरुख आणि पूजा दोघांनी लतादीदींच्या पार्थिवाला प्रदक्षिणा घातली.
प्रदक्षिणा पूर्ण करून शाहरुखने आधी हात जोडून आणि मग वाकून पार्थिवाला नमस्कार केला आणि मग ते खाली उतरले.
शाहरुखने मास्क काढून जे केलं ते काय होतं आणि ते का केलं असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलाय.
याबद्दल सांगताना मुस्लिम सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी म्हणतात, "ही पारंपारिक पद्धत आहे. शाहरुख खानने त्याच्या धर्माच्या पद्धतीने दुवा केली आहे. या दुवामध्ये अल्लाकडे प्रार्थना केली जाते की, चांगल्या माणसाला जन्नत हासिल (स्वर्गप्राप्ती) व्हावी. मरणोत्तर त्यांचं जीवन चांगलं असावं अशी ती प्रार्थना असते. तीच भावना शाहरुखने व्यक्त केली आहे. फुंकर मारणं म्हणजे आतला आवाज पोहचवणं, त्याच्याशी एकरुप होणं हा भाव त्याच्यात आहे."
तांबोळी पुढे म्हणतात, "अनेक कट्टरतावादी मुस्लिम बिगर मुस्लिमांसाठी अशी दुवा मागणं इस्लाम विरोधी मानतात. उदारमतवादी मुस्लिमांना याबाबत काही वाटत नाही. शाहरुखने जे काही केलं ते मानवतावादी दृष्टिकोनातून केलं आहे. यातून गैर अर्थ काढणं बरोबर नाही. शाहरुखच्या दुवा मागण्याला थुकणं म्हणणं हा मुस्लिम समाजाला बदनाम करण्याच्या षड्यंत्राचा भाग आहे. निर्मळ भावनेने केलेल्या दुवाला धार्मिक चष्म्यातून पाहून त्यातून धर्मद्वेष पसरवणं ही संकुचित मानसिकता आहे."
अल्ट न्यूज या फॅक्ट चेकिंग वेबसाईटचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांनी या विषयावर लिहताना मुस्लिमांवर यापूर्वी अशाप्रकारचे आरोप कधी केले गेले होते याबद्दलचे काही दाखले दिले आहेत. त्यात मार्च 2020 मध्ये तबलिगी जमातबद्दल अपप्रचार करताना लोकांनी ते थुंकतात असं म्हटल्याचंही झुबेर म्हणतात.
शाहरुखबरोबर असलेली महिला कोण होती?
शाहरुखचा दुवा मागतानाच्या फोटोवरून अजून एक गैरसमज किंवा संभ्रम पाहायला मिळाला. त्याच्याबरोबर असलेली महिला ही त्याची पत्नी गौरी खान असल्याचा अनेकांचा समज झालेला दिसतो.
शाहरुख खान हा मुस्लिम आणि त्याची पत्नी गौरी ही हिंदू आहे. शाहरुख दुवा करताना आणि त्याच्याशेजारची महिला प्रार्थना करताना दिसत असल्याने अनेकांनी भिन्न धर्माचे हे पती-पत्नी धार्मिक सलोख्याचं प्रतीक असल्याचं म्हणताना दिसले. त्यांनी स्वतःच नंतर ही चूक दुरूस्तही केली. पण इतर अनेक लोक ही महिला गौरी खान असल्याचं म्हणताना दिसले. पण शाहरुख बरोबर पत्नी गौरी नसून शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी होती.
शिवाजी पार्कमध्ये लता मंगेशकर यांच्यावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले. यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी दिल्लीहून आले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अभिनेते आमिर खान, रणबीर कपूर, गायक शंकर महादेवन, यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी लतादीदींचं शिवाजी पार्कमध्ये अंत्यदर्शन घेतलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)