लता मंगेशकर यांचं निधन, काही तासांपूर्वीच भेटल्या होत्या आशा भोसले

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं 6 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी निधन झालं. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 93 वर्षांच्या होत्या.

8 जानेवारी 2022 पासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोना आणि न्यूमोनिया यातून त्या बऱ्या झाल्या होत्या.

मात्र, नंतर त्यांची प्रकृती खालावली आणि अनेक अवयव निकामी झाले. अखेर 6 फेब्रुवारीला सकाळी 8.12 वाजता त्यांचं निधन झालं.

गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लतादीदींच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली होती.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी 5 फेब्रुवारी रोजी दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन, लतादीदींच्या कुटुंबीयांसोबत जवळपास तासभर चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही रुग्णालयात जाऊन लतादीदींच्या तब्येतीची विचारपूस केली होती. ठाकरे कुटुंब आणि मंगेशकर कुटुंबाचे कौटुंबिक नातं मानलं जातं.

काही तासांपूर्वीच भेटल्या होत्या आशा भोसले

आपल्या मोठ्या बहिणीची तब्येत खालावलेली बघताच काल (5 फेब्रुवारी) आशा भोसले यांनी रुग्णालयात धाव घेतली होती. यानंतर पत्रकारांशी बोलताना लतीदीदींची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

आशा भोसले म्हणाल्या होत्या, "लतादीदींसाठी सगळेच प्रार्थना करत आहेत. आम्हीही प्रार्थना करत आहोत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलं आहे."

आशा भोसले आणि लता मंगेशकर यांचा सांगीतिक प्रवास काही वर्षांच्या फरकानं सुरू झाला. हिंदीसह अनेक भाषांमध्ये दोघींनी हजारो लोकप्रिय गाणी गायली.

लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या पाच भावंडांमध्ये लता मंगेशकर सर्वात मोठ्या होत्या. आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्यातील संबंधांबाबत नेहमीच चर्चा होत राही. आशा भोसले या लता दीदींना आईच्या स्थानी मानत असत.

केवळ आशा भोसलेच नव्हे, तर इतर भावंडांनीही आपल्या बहिणीच्या म्हणजे लता मंगेशकरांच्या पावलावर पाऊल ठेवत संगीत आणि गायन क्षेत्रात नावलौकिक मिळवला.

लता मंगेशकर अनंतात विलीन

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर अनंतात विलीन झाल्या आहेत. त्यांचे भाऊ पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना मुखाग्नी दिला.

मुंबईतल्या शिवाजी पार्कवर बंदुकीच्या फैरींची सलामी देत लतादीदींना अखेरचा निरोप देण्यात आला.

लतादीदींचं आज सकाळी निधन झालं. त्या 93 वर्षांच्या होत्या. 8 जानेवारीपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शिवाजी पार्कवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्कवर आले. यावेळी त्यांनी लतादीदींच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं.

लतादीदींच्या अंत्यविधीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्ती शिवाजी पार्कवर उपस्थित राहिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मनसे प्रमुख राज ठाकरे, अभिनेता शाहरूख खान, आमिर खान, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, गीतकार जावेद अख्तर आणि इतरही अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी लतादीदींचं अंत्यदर्शन घेतलं.

नितीन गडकरींनी 'या' शब्दात केली लतादीदींच्या निधनाची घोषणा

लतादीदींच्या निधनाची सर्वप्रथम माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

नितीन गडकरी हे आज सकाळी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात आले आणि रुग्णालय प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर रुग्णालयाबाहेर येऊन लतादीदींच्या निधनाची माहिती दिली.

नितीन गडकरींनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, "लता मंगेशकर यांच्या जाण्याने देशाची हानी झाली आहे. पिढ्यान् पिढ्या त्यांची गाणी लोक ऐकतील. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही प्रार्थना करतो. त्यांचं जाणं धक्का आहे. त्याला सहन करण्याची आपल्याला शक्ती मिळो."

हेमा ते लता

मध्य प्रदेशातल्या इंदूर शहरात 28 सप्टेंबर 1929 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचं जन्मनाव हेमा होतं. मात्र,वडिलांच्या एका नाटकात लतादीदींनी लतिका नावाचं पात्र साकारलं.

तेव्हापासून सगळेच त्यांना लता म्हणून हाक मारायचे आणि अशाप्रकारे 'लता' हे नाव त्यांना मिळालं.

त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर स्वतः उत्तम गायक, नाट्य-कलावंत आणि संगीत नाटकांचे निर्माते होते. लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या पाच भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या.

त्यांच्या भावंडांनीही आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत संगीत आणि गायन क्षेत्रात नावलौकिक मिळवला.

लतादीदी त्यांच्या प्रवासाविषयी सांगताना एकदा म्हणाल्या होत्या, "मीच स्वतःला घडवलं आहे. लढायचं कसं हे मी शिकले. मला कधीच कुणाची भीती वाटली नाही. मात्र, मला जे मिळालं ते मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)