एकनाथ शिंदे : 'एकही आमदार पराभूत झाला तर मी राजकारण सोडून देईन' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवरील 5 मोठ्या बातम्यांचा आढावा.
1.एकही आमदार पडणार नाही, पराभूत झाला तर मी राजकारण सोडून देईन- मुख्यमंत्री
"एकही आमदार पडणार नाही. त्याची जबाबदारी मी घेतली आहे. यातील एकही माणूस पराभूत झाला तर मी राजकारण सोडून निघून जाईन", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत सांगितलं आहे.
शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. सत्तेतून पायउतार व्हावे लागल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बंडखोरांमधील एकही आमदार निवडून येणार नाही, असा दावा शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
"मी जी भूमिका घेतली, ती लोकांनी स्वीकारली आहे. त्यावेळी आम्हाला विचारण्यात आलं, की हे कशासाठी सुरु आहे. आमचा यामध्ये स्वार्थ नाही, हे आम्ही त्यांना सांगितलं. माझ्यासोबत सात मंत्री आले. विरोधी पक्षातून सत्तेकडे जाण्याचा ओघ असतो. मात्र इथे उलटं झालं. सत्तेतील माणसं बाहेर पडली. एक-दोन नव्हे तर पन्नास लोक बाहेर पडले," असे शिवसेनेतील बंडखोरीबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले.
आम्ही घेतलेली भूमिका सामान्यांना न्याय देणारी आहे. आमची भूमिका सर्वसामान्य लोकांना पटणारी आहे असंही त्यांनी सांगितलं
2. कृषी विद्यापीठांचा काय फायदा? गडकरींचा सवाल
अमेरिकेत एका एकरात 30 क्विंटल सोयाबीन होतं आणि आपल्या देशात 4 क्विंटलच्या वर नाही. मग कृषी विद्यापीठांचा काय फायदा? असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
नागपुरात शुक्रवारी डॉ. सी.डी. मायी कृषी तज्ज्ञ पुरस्कार सोहळ्यात नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार सहभागी झाले होते. त्यावेळी गडकरी बोलत होते. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK/NITIN GADKARI
गडकरी म्हणाले की, "धानाची शेती परवडत नाही तरी शेतकरी ती सोडायला तयार नाहीत, बदल करायला तयार नाहीत. कापसाला भाव बांगलादेशमुळे मिळतोय. यावर्षी आपला कापूस बांगलादेशात वर्ध्यातील पोर्टवरुन पाठवायचा आहे.
"अनेकांनी शिक्षण क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केलं. पण शेतीवर कुणी लक्ष द्यायला तयार नाहीत. 50 टक्क्यांवर सिंचन झालं तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. मी राज्यात सिंचन मंत्री असताना अनेक सिंचन प्रकल्पाचं काम केलं, त्यासाठी पैसे दिले. नदी जोड प्रकल्पावर तुम्ही काम करा, मी सर्वतोपरी मदत करेल".
3.औरंगाबादचं संभाजीनगर होणार- फडणवीसांचं स्पष्टीकरण
औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे होणारच, नामांतराला स्थगिती दिली जाणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्थगिती दिली होती.
या निर्णयानंतर विरोधकांकडून शिंदे सरकारवर टीका केली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर औरंगजेब तुमचा अचानक नातेवाईक कसा झाला? असा खोचक सवाल केला होता. 'लोकमत'ने याबाबत बातमी दिली आहे.

"ही नावं द्यायची आहेत. आमचा अजेंडा हाच आहे. त्यामुळे ज्या सरकारकडे बहुमत आहे, त्याच सरकारचं मंत्रीमंडळ त्याला मान्यता देईल. म्हणून मुख्यमंत्र्यांनी ही नावं आमच्या अस्मितेची आहेत, महत्त्वाची आहेत. त्यामुळे अवैध बैठकीत ती देण्यता येऊ नयेत. बहुमत असलेल्या सरकारसमोर ती ठेवण्यात यावीत. आमच्या पुढच्या मंत्रीमंडळ बैठकीत ती समोर ठेवण्यात येतील", असं फडणवीस यांनी सांगितलं.
4. अन्नधान्य, डाळींवर जीएसटी लावण्याच्या निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांचा बंद
जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी (GST) लावण्याच्या निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी आज देशव्यापी बंदची हाक दिली आहे. पॅकिंग केलेल्या अनब्रँडेड अन्नधान्य, डाळी आदी पदार्थांवर 18 जुलैपासून जीएसटी लागू करण्यात येणार आहे. व्यापारी संघटनांनी त्याचा निषेध केलाय. त्यासाठी आज एक दिवसाचा देशव्यापी बंद पाळण्यात येणार आहे.
जीएसटी लागू होताच अन्नधान्य, दुग्धजन्य पदार्थ महागणार आहेत. धान्य आणि डाळी 8 ते 10 टक्क्यांनी वाढतील असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. महागाईचा हा भार ग्राहकांवरच पडणार आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
28-29 जून रोजी झालेल्या GST कौन्सिलच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी 18 जुलैपासून होणार असून त्यामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जीएसटी कौन्सिलने सामान्य माणसांद्वारे वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंवरील कर दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अनेक वस्तूंसाठी उपलब्ध जीएसटी सूट काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही वस्तू अशा आहे ज्यांवर जीएसटीचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे निर्णय 18 जुलैपासून लागू होणार आहेत.
5. केतकी माटेगावकरच्या भावाची आत्महत्या
सिने अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकरच्या चुलत भावाने आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे. अक्षय अमोल माटेगावकर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. नोकरी न मिळण्याच्या भीतीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याचे अक्षयने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत त्याने नमूद केलं आहे. 'सकाळ'ने याबाबत बातमी दिली आहे.
अक्षय सिम्बॉयसिस महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या चौथ्या वर्षात शिकत होता. त्याने एका आयटी कंपनीत इंटर्नशिप केली होती. त्यानंतर काही कंपन्यांमध्ये नोकरीसाठी त्याने अर्जही केले होते. मात्र त्याला नोकरी मिळत नव्हती. या भीतीमुळे त्याने आत्महत्या केली असा उल्लेख त्याने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.
अक्षयची आई मीनल माटेगावकर या मुंबईत प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. वडील अमोल माटेगावकर हे नामांकित कंपनीत काम करतात. या घटनेनंतर माटेगावकर कुंटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








