अजित पवार : 'अडीच वर्षांत मी कधीच उद्धवजींसमोरचा माईक खेचून घेतला नाही'

अजित पवार

फोटो स्रोत, Twitter

आज सकाळी विविध वेबसाइट्स आणि वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. अडीच वर्षांत मी कधीच उद्धवजींसमोरचा माईक खेचून घेतला नाही- अजित पवार

अडीच वर्षांत मी कधीच उद्धवजींसमोरचा माईक खेचून स्वत:कडे घेतला नाही. ही तर सुरुवात आहे. आत्तापासून ओढाओढी असेल तर महाराष्ट्राने हे पाहावं, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी लगावला आहे.

सत्तास्थापनेच्या पहिल्या दिवसानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी एकनाथ शिंदेना प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर देताना एकनाथ शिंदे जरासे गांगरले. त्यावेळी त्यांचं उत्तर पूर्ण होण्याआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडून माईक हिसकावून घेतला आणि हसत उत्तर दिलं. त्या पत्रकार परिषदेत नेमकं काय झालं होतं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हीडिओ पाहा.

याच प्रसंगाचा संदर्भ देत अजित पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. त्याला निमित्त ठरलं ते गुरुवारी झालेली शिंदे-फडणवीस यांची पत्रकार परिषद. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खासदर धनंजय महाडीक यांचं नाव विसरल्यावर फडणवीस यांनी त्यांना कागदावर लिहून त्याची आठवण करून दिली.

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अजूनही झालेला नाही. त्याबद्दल बोलताना अजित पवारांनी म्हटलं, "शिंदे आणि फडणवीस हे दोन जण महाराष्ट्राचे मालक झाले आहेत. सगळा भार या दोघांच्याच खांद्यावर आहे. सरकारकडे 165 आमदारांचं पाठबळ आहे. पण घोडं कुठे पेंड खात आहे? मंत्रिमंडळाचा विस्तार करायला सरकार का घाबरतंय?"

सरकारनं पेट्रोल, डिझेलवरील करात 50 टक्क्यांनी कपात करावी, अशी तेव्हा विरोधात असलेल्यांची मागणी होती. आता हीच मंडळी सत्तेत आहेत. मात्र त्यांनी इंधनावरील कर 50 टक्क्यांनी कमी केलेला नाही, असं म्हणत अजित पवारांनी शिंदे सरकारच्या पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याच्या निर्णयावर टीका केली.

महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

2. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील थेट जनतेतून निवडा- अमोल मिटकरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (14 जुलै) पत्रकार परिषद घेत नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडला जाणार असल्याची घोषणा केली.

थेट लोकांमधून नगराध्यक्ष आणि सरपंच निवडावा, असं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना जर वाटत असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील जनतेतून निवडला गेला पाहिजे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या निर्णयावर टीका केली आहे.

अमोल मिटकरी

फोटो स्रोत, TWITTER

आमदार पळवून नेऊन मंत्र्यांची निवड करणंही अयोग्य आहे. त्यामुळे आता नगराध्य, सरपंच यांची थेट लोकांमधून निवड करण्याचा निर्णय अंमलात आणताना कृषी मंत्री तसंच वेगवेगळ्या खात्यांचे मंत्रीही थेट जनतेतून निवडून आणा, असा टोलाही मिटकरी यांनी लगावला आहे.

टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

3. केसरकर उद्या बोरीस जॉन्सनच्या राजीनाम्यावरही बोलतील- निलेश राणे

"उद्धव ठाकरे हे आम्हाला आजही आदरणीय आहेत. त्यांच्याविषयी कुणी काहीही बोललं तर ते आम्हाला चालणार नाही. भाजपच्या नेत्यांना आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनाही आम्ही सांगितलं आहे की, उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणी काहीही बोललं तर ते खपवून घेतलं जणार नाही," असं विधान काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलं होतं.

त्यांचा रोख हा राणे कुटुंबीय तसंच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडे होता.

केसरकर-राणे

केसरकरांच्या या विधानानंतर निलेश राणे यांनी त्यांना प्रत्युत्तर देताना म्हटलं, की "आपण आज एका युतीमध्ये आहोत. जेवढी गरज आम्हाला तुमची आहे, तेवढीच तुम्हाला आमची आहे. केसरकर शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. त्यामुळे भाजपाच्या लोकांविषयी बोलण्याचा अधिकार त्यांना नाही. हल्ली आम्ही त्यांची दखलही घेत नाहीत."

"आता ते स्वत:ला विश्वप्रवक्ते समजायला लागले आहेत. उद्या तुम्ही त्यांना ब्रिटनच्या बोरीस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्याबद्दल विचारलं, तर त्यावरही ते बोलतील. त्यांनी असं करायला नको होते, मी त्यांना समजावलं होतं वगैरे सांगतील. ते त्या भूमिकेत गेलेत," असा टोलाही त्यांनी लगावल्याचं लोकसत्तानं आपल्या बातमीत म्हटलं.

राणे आणि केसरकर यांच्यातील वाद हा शिंदे सरकार आणि फडणवीस यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार का, हे समजून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

4. दोन मुलंच जन्माला घालण्याच्या कोणत्याही कायद्याचे समर्थन करणार नाही - ओवैसी

देशात वाढत्या लोकसंख्येवरून वाद सुरू आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करण्याची मागणी एक विभाग करीत आहे. दरम्यान, 'दोनच मुले जन्माला घालण्याची मर्यादा ठरवणाऱ्या कोणत्याही कायद्याचं समर्थन करणार नाही', असे एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.

"आपण चीनसारखी चूक करायला नको. यातून देशाला फायदा होणार नाही. लोकसंख्या वाढीसाठी मुस्लिमांना जबाबदार धरू नका," असंही ओवैसी म्हणालेत.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

'कोणत्याही एका वर्गाची लोकसंख्या वाढल्याने अराजकता निर्माण होईल. यामुळे लोकसंख्येचा असमतोल व्हायला नको', असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते. याला प्रत्युत्तर देताना ओवैसींनी म्हटलं की, लोकसंख्या नियंत्रणासाठी कायद्याची गरज नाही. गर्भनिरोधकांचा सर्वाधिक वापर करणारे मुस्लिम आहेत,' असं त्यांचे आरोग्यमंत्रीच सांगतात.

उत्तर प्रदेशमध्ये कोणत्याही कायद्याशिवाय प्रजनन दरात घट दिसून येते. भारताचा प्रजनन दर सातत्याने कमी होत आहे. 2030 पर्यंत स्थिरता दिसेल. चीनची चूक आपण इथे पुन्हा करू नये, असंही असदुद्दीन ओवैसींनी म्हटलं आहे.

सकाळनं ही बातमी दिली आहे.

5. भारतात आढळला मंकीपॉक्स विषाणूचा पहिला रुग्ण

काही दिवसांपासून जगभरात मंकीपॉक्स विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. भारतातही आता मंकीपॉक्सचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळला आहे.

केरळच्या कोल्लममध्ये देशातला पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला आहे. केरळच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी ही माहिती दिली आहे.

टीवीएम मेडिकल कॉलेजच्या एक रुग्णामध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आली. त्यानंतर चाचण्या केल्या असता हा आजार मंकीपॉक्स झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर या रुग्णाच्या आई-वडिलांना तिरुअनंतपुरम येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं आहे.

देशात पहिला रुग्ण आढळला तरी घाबरून जाण्याचे कारण नाही, असं केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी म्हटलंय.

केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी म्हटलं, की परदेशातून भारतात परतलेल्या एका व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणं दिसून आली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णाला ताप आणि संपूर्ण शरीरावर पुरळ आले आहेत. त्यानंतर रुग्णाचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठवले.

ज्या व्यक्तीमध्ये लक्षणे दिसली तो यूएईमधील मंकीपॉक्सची लागण झालेल्या एका रुग्णाच्या संपर्कात आला असल्याचं एबीपी माझाच्या बातमीत म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)