एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारसाठी राणे-केसरकर वाद डोकेदुखी ठरेल का?

दीपक केसरकर निलेश राणे

एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजप यांची युती झाली आणि नवे सरकार अस्तित्वात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खांद्याला खांदा लावून काम करतानाचे, पूरस्थिती पाहणी करतानाचे व्हीडिओ आपण सर्वांनी पाहिले आहेत.

दोन्ही नेते एकत्रितपणे काम करत आहेत, केमिस्ट्री उत्तम आहे असा एक संदेश देखील जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम प्रवक्ते करताना दिसत आहेत.

पण हे सर्व सुरू असतानाच दीपक केसरकर आणि राणे कुटुंबीय या वादाने डोके वर काढले आहे.

या वादामुळे शिंदे गट-भाजप सरकारमध्ये वितुष्ट निर्माण होईल का, हा वाद या सरकारची डोकेदुखी ठरेल का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

काय आहे नेमका वाद?

शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे टाळावे, असं दीपक केसरकर यांनी म्हटले होते.

दिल्लीत पत्रकारांशी बोलताना दिपक केसरकर म्हणाले, "आमची हीच मागणी होती की उद्धव ठाकरे साहेबांबद्दल कुणीही अपशब्द काढू नये, अशीच आमची मागणी होती. त्यानुसार आमचे नेते देवेंद्र फडणवीस हे किरीट सोमय्यांशी बोलले आहेत. मात्र राणेंची मुलं लहान आहेत. त्यांना समजवण्याचं काम फडणवीस साहेब शंभर टक्के करतील," असं केसरकर म्हणाले.

ते पुढे असंही म्हणाले की, "वडीलधाऱ्यांचा मान राखणं ही आमची संस्कृती. त्यांची तशी संस्कृती नसावी. त्यांची लायकी काय हे कोकणातील जनतेने सात वर्षांपूर्वी दाखवून दिलंय. ते अजूनही विसरलेले नसतील तर पुन्हा एकदा कोकणची जनता दाखवून देईल."

"राणेंची मुलं लहान आहेत," असं केसरकरांनी म्हटल्यानंतर निलेश राणेंनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. यासंदर्भात एक व्हीडिओ त्यांनी ट्वीट केला आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा," असं म्हणताना निलेश राणे या व्हीडिओत दिसत आहेत.

"दीपक केसरकर, आपण अलायन्समध्ये आहोत विसरू नका. अलायन्स टिकवण्याची जबाबदारी जेवढी आमची आहे तेवढीच तुमची आहे. तुम्ही शिंदे साहेबांच्या गटाचे प्रवक्ते असू शकता आमच्या नाही. तुमची अवस्था मतदारसंघात काय केलीये हे आम्हाला माहितीये. राणेंच्या याच दोन मुलांनी तुमच्याकडून पंचायत समित्या, जिल्हा परिषदा हिसकावून घेतल्या. तुमची मतदारसंघातील अवस्था आम्हाला माहीत आहे," असं निलेश राणे म्हणाले.

राणे विरुद्ध केसरकर संघर्षाची पार्श्वभूमी

तळकोकणातील केसरकर विरुद्ध राणे हा सत्तासंघर्षात नवीन नाही. या वादाला तोंड फुटलं साल 2009 मध्ये.

वरिष्ठ पत्रकार दिनेश केळुसकर सांगतात, "केसरकरांना आमदारकीचं तिकीट माझ्यामुळे मिळाल्याचा दावा राणेंनी केला. तेव्हापासून हा वाद सुरू झाला. 2014च्या लोकसभा निवडणुकीत हा वाद विकोपाला गेला. केसरकर शिवसेनेत आले होते. त्यांनी राणेंच्या दहशतवादाचा मुद्दा उचलून धरला."

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे

"राणे आणि मुलांचा दहशतवाद सिंधुदुर्गाच्या प्रगतीला धोका असल्याचा प्रचार त्यांनी केला. याचा फटका निलेश राणेंना बसला आणि ते पराभूत झाले. 2014 विधानसभा निवडणुकीत नारायण राणे पराभूत झाले. राणेंच्या विरोधातही केसरकरांनी मोठं कॅम्पेन केलं होतं. त्यानंतर राणेंच्या कार्यकर्त्यांनी केसरकरांच्या घरावर मोर्चा काढला होता," असं केळुसकर सांगतात.

दुसरीकडे शिवसेनेला राणेंविरोधात विरोधक हवा असल्याने उद्धव ठाकरेंनी केसरकरांना बळ दिलं. 2014ला केसरकर गृहराज्यमंत्री आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री झाले. त्यानंतर केसरकर राणेंविरोधात अधिक आक्रमक झाले. तेव्हापासून राणे-केसरकर यांचं राजकीय हाडवैर आहे.

राणे कायम उद्धव ठाकरेंविरोधात आरोप करतात. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतरही हे आरोप थांबलेले नाहीत. त्यामुळे पुन्हा राणे-केसरकर शाब्दिक युद्ध सुरू झालंय.

राणे-केसरकर वादामुळे नव्या सरकारमध्ये अडचणी निर्माण होतील का?

"या वादामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वादाची ठिणगी पडू शकते," असं केळुसकर यांना वाटतं.

राणे-केसरकर वादामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वादाची ठिणगी पडू शकते. राणेंनी उद्धव ठाकरे आणि केसरकर यांच्यावर आरोप केलेत किंवा केसरकरांनी सातत्याने राणेंवर हल्लाबोल केला तर या सरकारमध्ये वाद होऊ शकतो.

शिंदे गटातील आमदारांना उद्धव ठाकरेंवर टीका मान्य नाही. किरीट सोमय्यांनी ठाकरेंवर टीका केल्यानंतर आमदार नाराज होते. राणेंच्या टीकेनंतरही ही नाराजी लपून राहणार नाही.

राजकीय जाणकारांना वाटतं की शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ही तूतू-मैमै वादाचं कारण ठरू शकते. त्यामुळे हे सरकार टिकवायचं असेल तर देवेंद्र फडणवीसांना यात मध्यस्थी करून तोडगा काढावा लागेल.

निलेश राणे

फोटो स्रोत, Nilesh Rane/BBC

राणे-केसरकर वादामुळे नव्या सरकारमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता कमी असल्याचं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांना वाटतं.

देसाई यांच्या मते, "राणे कुटुंबीय आणि केसरकर यांच्यातील वाद हा केवळ मतदारसंघापुरताच मर्यादित आहे. त्या पलीकडे या वादाला फारसं महत्त्व देण्याची आता आवश्यकता नाही.

ते पुढे सांगतात, "आपण आक्रमक आहोत अशी प्रतिमा राणेंना आपल्या मतदारसंघात जपावी लागते तर आपण त्यांना आव्हान देऊ शकतो ही केसरकरांची आवश्यकता आहे. त्यामुळे या गोष्टी पाहायला मिळू शकतात. जर राणेंच्या मुलांना वरिष्ठांकडून समजवण्यात आलं तर ते त्यांची राजकीय गरज पाहून वागतील."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)