व्हिपविरोधात मतदान केल्यामुळे 39 आमदारांविरोधात शिवसेनेची याचिका

फोटो स्रोत, Facebook/Rahul Narvekar
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार आमदार राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत, तर महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांचा पराभव झाला आहे.
राहुल नार्वेकरांना 164 मतं, तर राजन साळवींना 107 मतं मिळाली. हिंतेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनं भाजप-शिंदे गटाला मत दिलं.
समाजवादी पक्ष आणि एमआयएमचे आमदार तटस्थ राहिले.
39 आमदारांविरोधात शिवसेनेची विधानसभा अध्यक्षांकडे याचिका
व्हिपविरोधात मतदान केल्याने निलंबनाची मागणी केल्याचं शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी सांगितलं. "सर्वाधिक जागा पटकावणाऱ्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित केलं जातं. असं झाल्याचं तुम्हाला दिसलं का? पक्षाबाहेरील व्यक्तीला मुख्यमंत्री करू असं ठरलं होतं का? माननीय मुख्यमंत्र्यांसंदर्भात तुम्ही काय म्हणून मतदान केलं. शिवसेना कायदेशीर पद्धतीने लढाई लढत आहे", असं सावंत म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "सुरुवातीला 12 आणि नंतर 16 लोकांना नोटीस देण्यात आली. सदस्यत्व रद्द करणं, पात्रता रद्द करावी यासाठी याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने 11 तारखेची तारीख दिली आहे. ज्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाची नोटीस आहे त्यांनी शपथ घेतली आहे. हे कसं संवैधानिक आहे? आज अध्यक्षपदाची निवडणूक घेतली. राजन साळवींना मतदान करावं असा आदेश प्रतोदांनी दिला. मतमोजणी झाली. 39 सदस्यांनी व्हिपविरोधात मतदान केलं. म्हणूनच नवीन अध्यक्षांकडे यासंदर्भात याचिका दाखल केली आहे".
अध्यक्षांची निवड ही राज्यपालांची मेहरबानी-भास्कर जाधव
"विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची नियुक्ती ही राज्यपाल साहेबांची मेहरबानी आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वारंवार विनंती करूनही अध्यक्षांची निवड करण्याकरता परवानगी दिली नाही. पण दोनच दिवसांपूर्वी अस्तित्वात आलेल्या सरकारला तात्काळ अध्यक्षांची निवड करायची परवानगी दिली. त्यामुळे आज राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड होऊ शकली ही राज्यपाल महोदयांची मेहेरबानी आहे", असं शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
ते पुढे म्हणाले, "शिवसेनेचे सभागृहात 55 आमदार आहेत. त्यांचे प्रतोद सुनील प्रभू आहेत. सुनील प्रभूंनी व्हिप जारी केला होता. राजन साळवी यांना मतदान करण्याचा व्हिप जारी केला होता. शिवसेनेच्या प्रतोदांनी जारी केलेल्या व्हिपविरोधात 39 आमदारांनी मतदान केलं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी नवनियुक्त अध्यक्षांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली आहे. शिवसेनेच्या 39 आमदारांनी व्हिपविरोधात मतदान केलं आहे. शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी यासंदर्भात या आमदारांची यादीही सादर केली आहे. अध्यक्षांनी ही गोष्ट मान्य केली. हे रेकॉर्डवर आहे", असं त्यांनी सांगितलं.
या विजयामुळे फडणवीस-शिंदे सरकारनं एकप्रकारे आपलं बहुमत सिद्ध केलं असून, महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.
राहुल नार्वेकर यांचा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडला आणि गिरीश महाजनांनी अनुमोदन दिलं. तर राजन साळवींचा प्रस्ताव चेतन तुपेंनी मांडला, तर संग्राम थोपटेंनी अनुमोदन दिलं.
कुलाब्यातील बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन करून एकनाथ शिंदे समर्थक विधानभवनात दाखल झाले.
यावेळी भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "भाजप-शिवसेनेचं सरकार स्थापन झालेलं आहे. सर्व आमदारांनी सहकार्य केले. देशाने याची नोंद घेतली आहे की, 8 मंत्री सत्ता सोडून बाहेर पडले. अनेकजण विरोधातून सत्तेत जातात. बाळासाहेब आणि दिघेंचा मी सैनिक आहे. अनेकजण सांगत होते आमच्या संपर्कात 16-17 लोक आहेत. मी म्हटलं मी त्यांना सन्मानाने परत पाठवेन. आमदार संपर्कात असल्याचा दावा करणारे एकही नाही सांगू शकले नाहीत."
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी शिंदे गटातील 39 आमदारांनी शिवसेनेच्या प्रतोदांचा (सुनील प्रभू) व्हिप फेटाळल्याचं विधिमंडळाच्या कामकाजात नमूद केलं आहे.
तर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनीही नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र देत 16 आमदारांनी (ठाकरे गट) व्हिप न पाळता मतदान केल्याचं कळवलं आहे.
तर यानंतर शिवसेनेचे नेते सुनील प्रभू म्हणाले, "या सदनात आमचा व्हिप झुगारून 39 आमदारांनी विरोधात मतदान केलं. यामुळे लोकशाहीची पायमल्ली झाली हे महाराष्ट्राची 13 कोटी जनता विसरणार नाही आणि इतिहासात याची नोंद घेतली जाईल."
नैतिकतेच्या परीक्षेत हे आमदार नापास
"व्हिप मोडलेला आहे. हाऊसमध्ये रेकॉर्डवर आणलेलं आहे. एकाही पळलेल्या आमदाराने आमच्या डोळ्यात डोळ्यात घालून पाहिलं नाही. मतदारसंघात काय सांगणार? बसमध्ये किती दिवस राहणार? असा सवाल आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.
ते पुढे म्हणाले, "नैतिकतेच्या परीक्षेत हे सर्व आमदार नापास झाले आहेत. एकाही आमदाराला डोळ्यात डोळे घालून बघता आलं नाही. जेव्हा ते मतदारसंघात जातील तेव्हा नैतिकता कशी सिध्द करतील. आमच्या व्हीपची लढाई कोर्टात सुरू राहणार... काहींच्या राक्षसी महत्वाकांक्षा होत्या त्यामुळे हे सर्व त्यांनी घडवून आणलं. त्यांनी चार्टर्ड प्लेन, हॉटेल हा उल्लेख केला. याचा खर्च कुठून झाला हे त्यांनी सांगावं".
व्हीपविरोधात मतदान
"शिवसेना पक्षाच्यावतीने जो व्हीप दिला गेला त्याविरोधात 39 आमदारांनी मतदान केलं. हे आम्ही लेखापत्राद्वारे नोंदवलं आहे. सस्पेंशन करायला हवी ती सुनावणी 11 तारखेला होणार. शिवसेनेचा व्हीप जुगारला म्हणून आणि अपात्रतेची केस आहे. न्याय आमच्याबाजूने होईल असा विश्वास आहे. व्हीप पाळला नाही हे रेकॉर्डवर आहे", असं शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी सांगितलं.
अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड ही राज्यपालांची मेहरबानी- भास्कर जाधव
एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात सांगितलं असतं तर... - अजित पवार
यावेळी अजित पवार म्हणाले, "रामराजे नाईक-निंबाळकरांचे ते जावई आहेत. त्यामुळे आमचेही ते जावईच आहे. आतापर्यंत आम्ही जावई हट्ट पुरवला. पण यापुढे जावई म्हणून तुम्हाला आमचा हट्ट पुरवायचा आहे."
"आमच्यासमोर भाजपच्या बाजूने बसलेल्या सदस्यांपैकी भाजपचे मूळ लोकं सोडून आमच्याकडून तिकडे गेलेले सदस्य आहेत. त्यामुळे भाजपच्या मूळ लोकांना बाजूला सारून आमच्याकडून गेलेल्या लोकांना पहील्या रांगेत बसवलं आहे. भाजपच्या लोकांचं वाईट वाटतं," असं अजित पवार म्हणाले.
"एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात सांगितलं असलं की उद्धवजींना सांगा, मला मुख्यमंत्री करा. तर काय अडचणच आली नसती. काय आदित्य अडचण आली नसती ना? चंद्रकांत पाटील तुम्ही बाकं वाजवू नका तुम्हाला मंत्री पद मिळतंय की नाही माहीत नाही. कोणाला किती मंत्री पदं मिळणार आता बघा," असंही अजित पवार म्हणाले.

फोटो स्रोत, Twitter/CMO Maharashtra
बंडखोर आमदारांच्या प्रवासादरम्यान कुठलाही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी मुंबईत पोलिसांचा विमानतळापासून ते हॉटेलपर्यंत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यापूर्वीचे विधानसभा अध्यक्ष :

फोटो स्रोत, Twitter/@MahaGovtMic
शिवसेनेचं विधानभवनातील ऑफिस सील
शिवसेनेचं विधानभवनातील ऑफिस सील करण्यात आलं आहे. शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षानं केलेल्या विनंतीनंतरच हे ऑफिस सील करण्यात आलंय. एएनआयनं हे वृत्त दिले आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
शिंदे गटाचा पक्षादेश - 'नार्वेकरांना मतदान करा'
आजपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू होणार असून पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून भाजप आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

या निवडणुकीत नार्वेकरांना मत देण्याचा पक्षादेश शिवसेनेच्या शिंदे गटानं जारी केलाय. मत देण्यासाठी शिवसेना पक्षा (शिंदे गट) ने आपले सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांना व्हीप बजावला आहे.
"हा व्हीप पक्षाच्या उर्वरित 16 आमदाराना देखील लागू असेल. व्हीपची प्रत ह्या सन्माननीय आमदार महोदयांना देखील पाठवण्यात आलेली आहे," असंही शिंदे गटानं म्हटलंय.
आज-उद्या विधानसभेचं विशेष अधिवेशन
महाराष्ट्रात नवीन सरकार अस्तित्वात आल्यांनतर राज्य विधानसभेचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन 3 आणि 4 जुलैला बोलावण्यात आलं आहे.
या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षपदाची निवडणूक रविवारी 3 जुलैला होणार असल्याचं विधान मंडळ सचिवालयानं कळवलं आहे.

फोटो स्रोत, Twitter/Devendra Fadanavis
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर फेब्रुवारी 2021 पासून विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त आहे.
महाविकास आघाडीचे राजन साळवी उमेदवार
विधानसभा अध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीच्यावतीने आज शिवसेना आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Facebook/Rajan Salvi
महाविकास आघाडीच्या घटकपक्षांची बैठक आज मुंबईत झाली. त्यात राजापूर मतदार संघातले शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. त्यामुळे आज महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी साळवी यांचा अर्ज दाखल करण्यात आला.
महाविकास आघाडीमध्ये विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेस पक्षाकडे होते. पण सध्याच्या सत्तासंघर्षात ते शिवसेनेला देण्यात आले आहे.
भाजपकडून राहुल नार्वेकर उमेदवार
भाजपकडून राहुल नार्वेकर यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केले आहे. राहुल नार्वेकर हे कुलाब्याचे आमदार आहेत.

फोटो स्रोत, Facebook/Rahul Narvekar
नार्वेकर हे देखील एक काळी शिवसेनेत होते. 2014 मध्ये त्यांना शिवसेनेने लोकसभेला उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी मावळ मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. यानंतर ते भाजपात गेले होते.
शिवसेनेकडून व्हिप जारी
सुनील प्रभू यांनी 3 लाईन व्हिप जारी केला आहे. शिवसेनेच्या 55 आमदारांना व्हीप लागू असेल. राजन साळवी यांना मतदान करण्याचे व्हिप जारी केलं आहे. जे करणार नाहीत त्यांच्याविरोधात पक्षाविरोधात भूमिका घेतली म्हणून कारवाई केली जाईल, असं शिवसेनेने म्हटलं आहे.
3 लाईन व्हिप गंभीर मानला जातो. हा व्हिप जारी केल्यास थेट अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते.
महाविकास आघाडीकडून राज्यपालांवर टीका
महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपालाकडून विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर त्याही वेळी टीका करण्यात आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले कि, "आमची सत्ता असताना विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्या असे राज्यपाल यांना सांगत होतो मात्र त्यांनी ती निवडणूक लावली नाही आता दुसरे सरकार सत्तेत आल्यावर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लावली आहे यावरुन काय चाललंय हे जनतेला दिसत आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









