एकनाथ शिंदे बंड : संजय राऊतांमुळे ठाकरे सरकार कोसळलं का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याआधी एक दिवस उद्धव ठाकरेंनी समेटाचा शेवटचा प्रयत्न करुन पाहिला. बंडखोर आमदारांना एक भावनिक साद घातली. आता परत या असं म्हणाले. पण एकनाथ शिंदेंनी थोडक्या अवधीतच त्याला उत्तर देऊन अशी काहीही शक्यता उरली नसल्याचं सांगितलं.
शिंदेंनी ट्वीट केलं: "एका बाजूला आपल्या पुत्राने आणि प्रवक्त्यानं वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील आणि मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी 'मविआ' सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय?"
रोख स्पष्ट होता. तो आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांकडे होता. त्यातही अधिक राऊतांकडे, कारण ज्या शब्दांचा उल्लेख शिंदेंनी त्यांच्या ट्वीटमध्ये केला, त्यातले बहुतेक राऊतांनीच उच्चारले होते. शिंदे दुखावले गेले हे तर स्वाभाविक होतं.
केवळ शिंदेच नाही, तर सगळेच बंडखोर आमदार. गुलाबराव पाटील हे एकेकाळी पानटपरी चालवायचे असं राऊतांनी जाहीर म्हटल्यावर बंडखोर आमदारांसमोर बोलतांना 'आता हा पानटपरीवाला चुना कसा लावतात हेही राऊतांना दाखवेल' असं म्हणाले होते. राऊतांच्या शब्दांनी जखम केल्यावरच ते असं म्हणाले हे कोणीही सांगेल.
संजय राऊत यांनी ट्वीट करून म्हटलं होतं की कब तक रहोगे 'गोहातीमें, कभी तो आओगे चौपाटी मे'. एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यावर म्हणाले होते की चौपाटीची भाषा केल्यामुळेच पक्ष संपुष्टात येण्याची वेळ आली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
या बंडखोर आमदारांचे प्रवक्ते बनलेल्या दीपक केसरकरांच्या प्रत्येक पत्रकार परिषदेत, मुलाखतीत बहुतांश रोख संजय राऊतांकडेच असायचा. राऊत बोलायचं थांबले तर बऱ्याच गोष्टी सुरळीत होते असंही ते म्हणाले. आमदार त्यांच्यावर रागावलेत असंही वारंवार सांगत राहिले. राऊत जेव्हा म्हणाले की या आमदारांनी पाठीत खंजीर खुपसला, केसरकरांनी त्यांना सुनावलं.
"आता जी युती होत आहे ती महाराष्ट्राच्या जनेतेने निवडून दिलं त्यांची होत आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी पाठीत खंजीर खुपसल्याची भाषा करू नये. पाठीत कुणी खंजीर खुपसला असेल तर तो संजय राऊत यांच्यासारख्या लोकांनी खुपसला. त्यांनी चुकीचा सल्ला दिला. संजय राऊत स्वतः शिवसेनेत आहेत, मात्र निम्म काम राष्ट्रवादीचं करत असतात. त्यावेळी ते जनतेच्या पाठीत खंजीर खुपसत असतात," केसरकर म्हणाले.

फोटो स्रोत, Facebook/Eknath Shinde
राऊत विरुद्ध बंडखोर आमदार हे प्रकरण एवढं वाढत गेलं की ज्या राऊतांना 'महाविकास आघाडीच्या शिल्पकारांपैकी एक' म्हटलं गेलं त्यांना आता 'महाविकास आघाडी'चे व्हिलन असं समाजमाध्यमांवर म्हटलं गेलं. 'राऊत एवढं का बोलताहेत' अशी चर्चाही सुरू झाली. समाजमाध्यमांवर झाली, सेनेच्या शाखांबाहेर झाली, राजकारणाच्या प्रत्येक, टिव्हीपासून ते पारापर्यंत, चर्चांमध्ये झाली. 'सामना'च्या अग्रलेखातूनही ते कोरडे ओढत राहिले.
शेवटी 'मी बोललेलं आवडत नसेल तर मी थांबतो बोलायचं' असं म्हणून त्यांनी जरा नरमाईची भूमिका घेतली, पण ठाकरे सरकारचा शेवट तोपर्यंत जवळ आला होता. थोड्याच काळात तो प्रत्यक्षात आला. पक्षासाठीच्या पोटतिडकीतून राऊत बोलत होते हे तर कळण्यासारखं होतं, पण त्यांच्या वक्तव्यांनी सेनेला या कठीण स्थितीत फायदा होण्याऐवजी तोटाच झाला का?
'यांना तर वडा-सांबर खाता येत नव्हतं'
शिंदेंचं बंड झालं आणि नेहमीप्रमाणे माध्यमांत पक्षाची बाजू मांडण्याची जबाबदारी संजय राऊतांनी घेतली. त्यांच्या आक्रमक पद्धतीनं त्यांनी बंडखोर आमदारांवर टीका करायला सुरुवात केली. सुरुवातीला भाषा परत आणण्याची होती. लवकरच ती धमक्यांवजा डेडलाईन्सची झाली आणि त्यानंतर वेळ जसा अधिक जात राहिला तसतशी ती अधिक तीक्ष्ण बनत गेली.
संजय राऊतांनी केवळ माध्यमांमध्ये बोलण्यापर्यंत मर्यादित न राहता ते मेळावेही घेऊ लागले. त्या मेळाव्यांमध्ये या बंडखोर आमदारांवर जहाल टीका करण्यात आली. कधी ती टीका वैयक्तिकही होती. दहिसरला जो मेळावा झाला तो राऊतांच्या वक्तव्यांमुळे गाजला. याच मेळाव्यात ते हे आमदार म्हणजे 'मनं मेलेली शरीरं' आहेत असं म्हणाले होते ज्यावरुन त्यांच्यावर टीका झाली. इथंच ते गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे यांच्याबद्दल वैयक्तिकही बोलले.
"संदिपान भुमरे यांना पहिलं तिकीट मिळालं तेव्हा ते पैठणच्या साखर कारखान्यात वॅाचमन होते. मोरेश्वर सावेंचं तिकीट कापून बाळासाहेबांनी साधा शिवसैनिक म्हणून त्यांना तिकीट देण्यात आल होतं. तेव्हा त्यांना हॅाटेलमध्ये वडा-सांबर सुद्धा खाता येत नव्हतं. ते जमिनीवर बसून खायचे. मात्र, ते आज कॅबिनेट मंत्री आहेत," असं राऊत म्हणाले या मेळाव्यात म्हणाले होते.

फोटो स्रोत, Facebook
इथंच त्यांनी आमदारांच्या वडिलांचा उद्धार करत आमदारकीचा राजीनामा द्या असं म्हटलं ते आमदारांना लागलं. "ज्या शिवसेनेने पहिली सत्ता ठाण्यात मिळवली. त्या ठाण्याच्या नेत्याने सूड उगवला आहे. एकनाथ शिंदे म्हणजे ठाणे नाही. या मराठी माणसाच्या मनगटात हिंदुत्व आणि रक्तात शिवसेना आहे. ज्याने बाळासाहेबांशी गद्दारी केली. तो संपला. हिम्मत असेल तर राजीनामा द्या. निवडणुकीला समोर उभे राहा. मी चॅलेंज करतो", असं राऊत आक्रमक बाण्यात म्हणाले.
'शिल्पकार' की 'व्हिलन'?
संजय राऊतांच्या या आणि अशा वक्तव्यांमुळे परिस्थिती अधिक चिघळत गेली आणि दुरुस्ती न होण्यापर्यंत पोहोचली असंही बोललं जाऊ लागलं. बंडखोर आमदारही त्यांच्याबद्दल असं वारंवार बोलत राहिलेच, पण लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्येही असं बोललं जाऊ लागलं. ज्या वेळेस उद्धव ठाकरे या आमदारांना परत आणण्यासाठी भावनिक आवाहन करत होते, पदावरुन उतरण्यास तयार होते, तेव्हा राऊत हे लागेल असं बोलून आमदारांना दुखावत का होते, असा प्रश्न अनेकांचा होता.
"शिवसेनेनेत यापूर्वी जी बंडं झाली त्यावेळीही बंड करणार्या काही नेत्यांनी संजय राऊत यांना दोष दिलेला आहे. नारायण राणेंनी बंड केलं तेव्हा संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. तर राज ठाकरे यांच्या बंडानंतर राज समर्थकांनी राऊतांच्या गाडीची तोडफोड केली होती," राजकीय पत्रकार दीपक भातुसे आठवण करुन देतात.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत जावं किंवा न जावं याबद्दल शिवसैनिकांमध्ये 2019 पासून दोन गट होते. पण उद्धव यांनी निर्णय घेतला होता. पण संजय राऊत या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आता कॉंग्रेस - राष्ट्रवादीवर टीका करत जेव्हा सेनेतले आमदार बाहेर पडले तेव्हा टीकेचा रोख राऊतांकडे वळला.

फोटो स्रोत, Mayuresh Konnur
"यावेळी एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय राऊत शिवसेना संपवत असल्याची टीका करतात. खरंतर यावेळी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंड मोडून काढण्यासाठी त्यांच्याबरोबर गेलेले काही आमदार परत कसे येतील याचे प्रयत्न शिवसेनेकडून व्हायला हवे होते. उद्धव ठाकरेंनी तसे प्रयत्न सुरू ठेवले. मात्र त्याचवेळी संजय राऊत यांची भाषा आमदारांना दुखावणारीच होती. उद्धव ठाकरेंच्या भावनिक आवाहनाचा फायदा होऊन काही आमदारांचे मत बदलण्याची शक्यता असेल तर ती शक्यता संजय राऊत यांच्या भाषेमुळे मावळली असं म्हणायला जागा आहे," असं भातुसे पुढे म्हणतात.
आमदारांचा राग शेवटी एवढा वाढला की दीपक केसरकरांनी शेवटी ज्या आमदारांच्या मतावर राऊत निवडून राज्यसभेत गेले, त्या जागेचा राजीनामा देण्याचं आव्हान त्यांना दिलं.
...की राऊत केवळ स्केपगोट?
पण या स्थितीत एका बाजूनं केवळ राऊतांना दोष देता येईल का? केवळ त्यांनाच निमित्त करता येईल का? की दोष देण्यासाठी केवळ त्यांचं नाव कारण म्हणून पुढे केलं जातं आहे. या बाजूचं मतही व्यक्त होत आहे. राऊतांची भाषा केवळ सांगण्याचं कारण होतं आणि आमदारांनी त्यांचा निर्णय कधीच घेतला होता, असं राजकीय पत्रकार आणि लेखक सुधीर सूर्यवंशी यांचं म्हणणं आहे.
"संजय राऊत जरी बोलत असले तरीही मला वाटतं ती एक रणनीती होती की या लोकांना आपल्याकडे कसं परत आणायचं. जेव्हा अजित पवारांनी बंड केलं होतं तेव्हा तुम्हाला आठवत असेल की त्यांच्याविरुद्धही अशा प्रकारची वक्तव्यं झाली होती. पण पवारांनी बंड मोडून काढलं. संजय राऊत माझ्या मते तेव्हा उद्विग्नतेतून आलेल्या भावना बोलून दाखवत होते. त्यांना कदाचित हे कळून चुकलं होतं की हे गेलेले लोक काही परत येणार नाहीत,' सूर्यवंशी म्हणतात.
एक गोष्ट नोंद घेण्यासारखी, म्हणजे जर आमदारांना परत आणण्यावर परिणाम होतो आहे असं असतं तर उद्धव ठाकरेंनी राऊतांना थांबायला सांगितलं असतं. ते पक्षप्रमुख आहे आणि त्यांच्याच आदेशानं राऊत पक्षाची भूमिका मांडत असतात. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर मेळाव्यांमध्ये कठोर टीका करत असतांना उद्धव समजूतीची भाषा करत होते. ही शिवसेनेची रणनीति होती का?
"आता जर आपण पाहिलं की उद्धव ठाकरेंनीही एकनाथ शिंदेंना पक्षाच्या नेतेपदावरुन काढलं आहे. त्यामुळं पक्षांतर्गत भावनेनुसार संजय राऊतांनी घेतली ती भूमिका योग्यच होती. शिंदेंचं काय करायचं ते ठरलंच असणार. पण त्यावेळेस एक काही तरी कारण लागतं दाखवायला म्हणून त्यांचा गट संजय राऊतांकडे बोट दाखवत राहिला. पण राऊत असं बोलले म्हणून ते आले नाहीत हे म्हणणं काही योग्य ठरणार नाही," असं सुधीर सूर्यवंशी म्हणातात.

दुसरी गोष्ट हीसुद्धा लक्षात घ्यायला हवी की शिवसेना ही आक्रमक संघटना आहे. 'गद्दार' या शब्दाला सेनेच्या डिक्शनरीमध्ये वेगळा अर्थ आहे. बाळासाहेबांच्या काळात झालेली बंडं सेनेनं आक्रमकतेनं मोडून काढली होती. छगन भुजबळांच्या बंडावेळेस, नारायण राणेंच्या बंडावेळेस बाळासाहेबांनी अशीच कठोर टीका केली होती. त्यानं शिवसैनिकही आक्रमक झाले होते. नेत्यांमध्ये फूट पडली पण सैनिक सोबत राहिले.
बाळासाहेब नसतांना शिवसेनेतलं हे पहिलं मोठं बंड होतं. त्यामुळे त्यांच्याच भाषेत आणि पद्धतीनं बंडखोरांवर टीका करुन शिवसैनिकांना आक्रमक ठेवण्याची शिवसेनेची रणनीती होती का? ती जबाबदारी संजय राऊतांवर होती का? अशा वेळेस पक्ष अधिक विखरू नये यासाठी नेतृत्वाकडून आक्रमकता दाखवली जाते. पण मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना त्याबाबत मर्यादा होत्या, म्हणून राऊतांनी ती जबाबदारी घेतली होती का?
अशा बाजूनंही ही वक्तव्यं पाहता येईल. मेळाव्यामध्ये त्यांच्या भाषणाला समोरच्या कार्यकर्त्यांकडून येणा-या प्रतिसादावरुन ते ठरवता येईल. शिवाय त्यानं शिवसैनिक आक्रमक झाले, आमदारांवर दबाव वाढला तर ते परत येण्याचा विचार करु शकतात हीसुद्धा एक रणनिती असू शकते.
अर्थात, दोन्ही बाजूंनी संजय राऊतांची विधानं पाहता येऊ शकतात. आता ज्या सरकारसाठी ते आग्रही होते ते पडलं आहे, त्यामुळे त्या विधानांच्या परिणामकारकतेची चिकित्सा करता येऊ शकते. पण ते तेवढ्यावरच थांबेल की आता महाराष्ट्रात परतणारे हे बंडखोर आमदार आणि संजय राऊत यांचा 'सामना' नव्यानं पुन्हा सुरू होईल याकडे सगळेच कुतूहलानं पाहत असतील.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








