Dollar Vs Rupee: रुपया पुन्हा घसरला, रुपयाची किंमत कशी ठरते?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी प्रतिनिधी
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. आता एका डॉलरसाठी 80.28 रुपये मोजावे लागणार आहेत.
जून 1991मध्ये भारताकडे विदेशी मुद्रा भांडार पूर्णत: रसाताळाला गेला होता. एक अब्ज डॉलरपेक्षाही कमी रक्कम शिल्लक राहिली होती.
बाकी देशांशी व्यवहार करावा इतकंही विदेशी मूल्य भारताकडे बाकी राहिलं नव्हतं. भारताचं विदेशी कर्ज 72 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचलं होतं. ब्राझील आणि मेक्सिकोनंतर सर्वाधिक कर्ज भारताच्या नावावर होतं. देशाची अर्थव्यस्था आणि सरकार यांच्यावरचा नागरिकांचा विश्वास कमीत कमी झाला होता.
गुरुवारी (14 जुलै 2022) ला भारतीय रुपयाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 80 रुपयांचा नीचांक गाठला. त्यानंतर सावरून तो पुन्हा 80च्या वर आला. पण, तरीही मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर रुपयातली सगळ्यांत मोठी घसरण अलीकडे बघायला मिळतेय.

फोटो स्रोत, Getty Images
रुपया आणि चलनाचा दर या तशा किचकट गोष्टी आहेत. आणि याचा माझ्याशी काय संबंध असंही काही जणांना वाटेल. पण, रोजच्या जीवनात आपल्या खिशावर याचा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो.
देशाच्या अर्थव्यवस्थेवर तर दूरगामी परिणाम होतो.
म्हणूनच आज समजून घेऊया रुपया आणि डॉलरच्या किमती कशा ठरतात, सध्या त्या का वाढतायत आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे.
रुपयाची किंमत कशी ठरते?
रुपया घसरतो तेव्हा सरकारविरोधी राजकीय प्रतिक्रियांना ऊत येतो. पण, आपण आज या विषयाकडे राजकीय दृष्ट्या न बघता त्यातले आर्थिक पैलू समजून घेऊया.
सुरुवात करूया रुपयाचं मूल्य कसं ठरतं आणि ते नेहमी अमेरिकन डॉलरच्या तुलनेतच का पाहिलं जातं इथपासून.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकन डॉलर आणि युरोपीयन युनियनमधील देशांचं युरो ही दोन चलनं आंतरराष्ट्रीय बाजारात लोकप्रिय आहेत. एक तर ही चलनं सगळ्यात स्थिर मानली जातात. अनेक देशांमध्ये या चलनात व्यवहार होतात. म्हणूनच डॉलर आणि युरो ही दोन चलनी नाणी आहेत. त्यातही डॉलर थोडा उजवा. कारण, आंतरराष्ट्रीय बँकांमध्ये असलेल्या एकूण ठेवींपैकी 64% ठेवी अमेरिकन डॉलरमध्ये आहेत. आणि जवळ जवळ 20% ठेवी युरो चलनात आहेत.
आंतरराष्ट्रीय व्यापारात 85% व्यवहार अमेरिकन डॉलरमध्ये होतात. जगातली 40% कर्ज अमेरिकन डॉलरमध्ये दिली जातात.
आपल्याकडे गल्ली क्रिकेटमध्ये जसं 'माझी बॅट माझी बॅटिंग' असा नियम असतो, तसं चलन बाजाराचं आहे. अमेरिकन डॉलरचं वर्चस्व इतर जवळ जवळ 180 देशांनी मान्य केलेलं आहे.
रुपयाचा दर कसा ठरतो? तो कोण ठरवतो? मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर या दरावर कुणा व्यक्ती, संस्था किंवा देशाचं नियंत्रण नसतं. दर ठरवताना मागणी आणि पुरवठ्याचाच नियम लावला जातो. म्हणजे एखाद्या वस्तूला जास्त मागणी असेल तर तिचा भाव कसा वधारतो, तसंच चलनाचं आहे.
आपल्या देशात किती अमेरिकन डॉलर आले आणि देशातून किती डॉलर बाहेर गेले यावरून हा विनिमय दर ठरत असतो.
रुपया घसरतोय याचा थेट अर्थ आपली अमेरिकेतून होणारी आयात वाढलीय. त्या तुलनेत निर्यात कमी होतेय असाच आहे. पण, असं नेमकं का होतंय?
रुपया का घसरतोय?
रशिया - युक्रेन युद्ध : रशिया - युक्रेन युद्धामुळे जगभरात कच्चं तेल आणि अन्नधान्य असा दोन्हीच्या पुरवठ्यावर परिणाम झालाय. त्यामुळे जगभरात वस्तूंच्या किमती वाढून महागाई वाढतेय. कच्च्या तेलाची सर्वाधिक मागणी असलेल्या देशांमध्ये चीन आणि अमेरिकेनंतर तिसरा क्रमांक भारताचा लागतो.
भारत गरजेच्या 70 टक्के तेल आयात करतो. ही आयात अमेरिकन डॉलरमध्ये होत असल्याने डॉलर जास्त खर्च होऊन रुपयाचं मूल्य तुलनेत कमी झालंय. रुपया फक्त 2022मध्ये 7 टक्क्यांहून जास्त घसरलाय.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेतील चढते व्याज दर : अमेरिकन बाजारात ठेवींवरचे व्याजदर वाढतायत. त्यामुळे तिथल्या बाँड मार्केटमध्ये भारताच्या तुलनेत गुंतवणूक जास्त होतेय. आणि
भारतीय गुंतवणूकदार संस्थाही आपले पैसे अमेरिकेत गुंतवण्याच्या मागे आहेत. तुलनेनं अमेरिकेहून भारतात होणारी गुंतवणूक नगण्य आहे. त्यामुळे रुपयाचं मूल्य कमी होतंय.
सुरक्षित गुंतवणूक : अमेरिकन बाजार हा गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानला जातो. आणि अमेरिकन डॉलर सर्वात स्थिर. त्यामुळे मूळातच गुंतवणूकदारांचा ओढा या बाजारात असतो.
त्यातच अलीकडे जागतिक बाजार आणि शेअर बाजार अस्थिर झाल्यावर लोकांचं लक्ष आता अमेरिकन बाजारांकडेच आहेत. बहुतेक देशांची गुंतवणूक अमेरिकेत एकवटलीय.
रुपया घसरल्यामुळे माझ्या खिशावर काय परिणाम होणार?
महागाई वाढेल : हा मुद्याला आपण पूर्वीही हात लावला आहे. कच्च्या तेलावर आपली अर्थव्यवस्था अवलंबून आहे. कारण, इंधनामुळे उद्योग धंदे चालतात. आणि माल वाहतूकही शक्य होते.
डाळी आणि इतर कडधान्यं, तसंच उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल यातलं बरंच आपण आयात करतो. हे सगळे व्यवहार अमेरिकन डॉलरमध्ये होणार म्हटल्यावर आपलं जास्त चलन खर्च होणार आणि अर्थातच याचा परिणाम महागाई वाढण्यात होणार.
उद्योग आणि रोजगारावर विपरित परिणाम : कोव्हिड आणि मग रशिया - युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात महागाई वाढतेय. आणि जास्त डॉलर खर्च झाल्यामुळे आपली परकीय गंगाजळी आटतेय.
2022मध्ये आपल्याकडचा डॉलरचा साठा 28 अब्ज अमेरिकन डॉलरने कमी होऊन 607 अब्ज डॉलर इतकाच उरलाय.
निर्यात वाढणार नसेल तर पैसे वाचवण्यासाठी सरकार आणि उद्योगांनाही खर्च कमी करण्यावाचून पर्याय उरणार नाही. त्यामुळे तंत्रज्ञान आणि मनुष्यबळावरही खर्च कमी होऊ शकेल. परिणामी अर्थातच नोकऱ्या कमी होणार आहेत.
परदेश प्रवास आणि शिक्षण : भारतातून पर्यटन आणि खासकरून शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्यांचं प्रमाण खूप आहे. डॉलर महागल्यावर तो खर्च वाढणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सध्याच्या परिस्थितीत फक्त रुपयाच नाही तर जगातलं प्रत्येक चलन घसरतंय. किंबहुना इतर चलनांच्या तुलनेत रुपया काहीसा स्थिर मानला जातोय. पण, हे ही तितकंच खरं की नजीकच्या काळात रुपया लगेच सुधारण्याची चिन्ह नाहीत. कारण, देशाची निर्यात एका दिवसांत वाढणार नाही.
अशावेळी रिझर्व्ह बँकेकडे रुपया स्थिर ठेवण्याचा कृत्रिम मार्ग उरतो तो आपल्याकडचे डॉलर खुल्या बाजारात विकून बाजारात अमेरिकन डॉलरची उपलब्धता वाढवण्याचा. तसं रिझर्व्ह बँकेनं केलंही आहे. पण, तो कायमस्वरुपी उपाय ठरणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यात रुपयाचा दर चढाच राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








