You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्याची 'ही' आहेत 5 कारणं
- Author, अवेन एमॉस
- Role, बीबीसी न्यूज
तीन वर्षांपूर्वी बोरिस जॉन्सन कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला 1987 नंतर सर्वात मोठ्या विजयासह सत्तेत घेऊन आले होते. मात्र, तीन वर्षात असं काय झालं की बोरिस जॉन्सन स्वत:च्याच खासदारांचं समर्थन गमावून बसले? आणि आता तर त्यांना पक्षाच्या नेतेपदाचाही राजीनामा देण्याची वेळ का आली?
नवीन नेता निवडीपर्यंत बोरिस जॉन्सन पंतप्रधानपदावर राहणार आहेत.
बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यामागे पाच प्रमुख कारणं मानली जातायेत. त्या कारणांबद्दल आपण या बातमीतून जाणून घेऊया.
1. क्रिस पिंचर वाद
29 जूनला कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे डेप्युटी चीफ व्हिप खासदार क्रिस पिंचर अफेयर लंडनला एका खासगी क्लबमध्ये गेले. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर, त्यांनी प्रमाणापेक्षा अधिक मद्यसेवन केलं आणि एका लाजिरवाण्या घटनेत सहभागी झाले.
त्यांच्यावर दोन पुरुषांना आक्षेपार्हरित्या स्पर्श करण्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर आरोपांची रांगच लागली. यात काही वर्षांपूर्वीच्या घटनांचाही समावेश होता. त्यानंतर अशा काही घटना घडत गेल्या की, हे सर्व बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यापर्यंत पोहोचलं.
ब्रिटन सरकारनं म्हटलं की, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी फेब्रुवारीत पिंचर यांना डेप्युटी चीफ व्हिप बनवण्याआधी त्यांना याबद्दल काहीच माहिती नव्हती. मंत्र्यांनी सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला. मात्र, ही गोष्ट चुकीची निघाली.
4 जुलैला बीबीसीने बातमी दिली होती की, जॉन्सन यांना पिंचर यांच्याबाबतच्या तक्रारीची औपचारिक माहिती होती. दुसऱ्याच दिवशी, प्रशासनातले माजी अधिकारी लॉर्ड मॅकडोनल्ड यांनी सांगितलं की, "पंतप्रधानांना वैयक्तिकरित्या या तक्रारीची माहिती दिली गेली होती."
त्यानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वीकारलं की, 2019 मध्ये याबाबत सांगितलं गेलं होतं. मग त्यांनी पिंचर यांना डेप्युटी चीफ व्हिप नियुक्त केल्याबद्दल माफी मागितली.
2. पार्टीगेट
जून 2020 मध्ये वाढदिवशी बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊनचे नियम तोडून पार्टीत सहभागी झाले. ही पार्टी डाऊनिंग स्ट्रीट गार्डनमध्ये झाली होती. यावर्षी एप्रिल महिन्यात याबद्दल त्यांना दंडही ठोठावण्यात आला होता.
पोलिसांनी डाऊनिंग स्ट्रीट आणि व्हाईटहॉलमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचा उल्लंघन केल्याबद्दल 83 लोकांवर एकूण 126 दंड ठोठावले.
त्यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सू ग्रे यांनी आपल्या अहवालात राजकीय कर्मचाऱ्यांशी संबंधित सामाजिक घटनांचा उल्लेख केला, ज्यात लॉकडाऊनचे नियम तोडले होते.
त्यांनी लिहिलं होतं की, वरिष्ठ केंद्रीय नेतृत्व, राजकीय आणि अधिकारी दोन्हींनी, याची जबाबदारी घेतली पाहिजे.
गेल्या डिसेंबर महिन्यात जॉन्सन यांनी खासदारांना सांगितलं की, पंतप्रधान कार्यालयात सर्व नियमांचं पालन केलं गेलं होतं. आता संसदीय समिती या गोष्टीची चौकशी करतेय की, जॉन्सन यांनी जाणीवपूर्वक खासदारांना खोटी माहिती दिली होती का?
3. करवाढ
2022 मध्ये महागाई वेगानं वाढली, जिचा आताच दर 9.1 टक्के आहे.
या महागाईची अनेक कारणं बोरिस जॉन्सन यांच्या नियंत्रणाच्या बाहेरची होती. युक्रेनवर रशियानं केलेल्या हल्ल्यामुळे तेलाच्या किंमती आणि खाद्यपदार्थांचा तुटवडा यात वाढ झाली.
या दरम्यान सरकारनं काही पावलं उचलली. जसं की, इंधनावर ड्युटी चार्ज 5 पेंस प्रति लीटर हटवलं. मात्र, एप्रिलमध्ये टॅक्समध्ये वाढ करण्यात आली.
नॅशनल इंश्युरन्समधील योगदानही 1.25 पेंसने वाढवण्यात आलं.
सरकारनं म्हटलं की, टॅक्समधील वाढ आरोग्य आणि सामाजिक देखभालीसाठी करण्यात आलीय आणि या आठवड्यात करण्यात आलेल्या बदलांनी अडचणी सोडवल्यात. मात्र, 34 हजार पौंडहून अधिक वार्षिक मिळकत असणाऱ्या लोकांनाही आता टॅक्स भरावा लागेल.
लेबर पार्टीचे नेते किएर स्टार्मर यांनी एप्रिल महिन्यात म्हटलं होतं की, सरकारनं नोकरदार वर्गावर करवाढ करणं हे गेल्या काही दशकांमधील नेहमीच्या जगण्यातील आव्हानांमधील सर्वात वाईट टप्पा आहे.
4. ओवेन पॅटर्सन प्रकरण
2021 च्या ऑक्टोबरमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स कमिटीने तत्कालीन कॉन्झर्व्हेटिव्ह खासदार ओवेन पॅटर्सन यांना 30 दिवसांसाठी निलंबित करण्याची शिफारस केली.
समितीने म्हटलं होतं की, त्यांनी लॉबिंगच्या नियमांना तोडलं, जेणेकरून त्या कंपन्यांना लाभ मिळेल, ज्यांनी त्यांना पैसे दिले आहेत.
मात्र, पंतप्रधानांच्या नेतृत्त्वातील कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षानं त्यांचं निलंबन रोखलं आणि चौकशी कशी केल गेली हे तपासण्यासाठी नवी समिती स्थापन केली.
मोठ्या गोंधळानंतर पॅटर्सन यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर जॉन्सन यांनी स्वत:ही मान्य केलं की, त्यांनी हे प्रकरण हाताळण्यात 'मोठी चूक' केली.
5. 'प्रामाणिकपणा, क्षमता आणि दूरदृष्टीचा अभाव'
बोरिस जॉन्सन थेरेसा मे यांच्या राजीनाम्यानंतर पदभार सांभाळला होता. ते बहुमतानं पंतप्रधानपदी विराजमान झाले होते.
मात्र, त्यांचे विरोधक सुरुवातीपासूनच म्हणत होते की, जॉन्सन यांच्याकडे फोकस आणि कल्पनांची कमतरता आहे.
बोरिस जॉन्सन यांचे सल्लागार म्हणून काम केलेले डोमिमिक कमिंग्ज, जे नंतर जॉन्सन यांचे टीकाकार बनले, त्यांनी जॉन्सन यांच्यावर 'अनियंत्रत' होण्याचा आरोप केला.
त्याशिवाय, अनेकांनी पंतप्रधान जॉन्सन यांच्या दृष्टिकोनावरही प्रश्न उपस्थित केले. त्यांना कुठला दृष्टिकोन आहे की नाही, इथवर टीका केली गेली.
जून महिन्यात कॉन्झर्व्हेटिव्ह खासदार आणि माजी मंत्री जेरेमी हंट यांनी जॉन्सन यांच्यावर आरोप केला की, जॉन्सन यांच्याकडे प्रामाणिकपणा, क्षमता आणि दूरदृष्टीचा अभाव आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)