You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा पक्ष नेतेपदाचा राजीनामा, काळजीवाहू म्हणून काम करणार
युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. नव्या पंतप्रधानांची नेमणूक करण्यात येईपर्यंत काही काळ आपण काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहू, असं बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा देताना म्हटलं आहे.
जॉन्सन हे आजच हुजूर पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती बीबीसीला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आजच नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
आपल्या पदाचा राजीनामा देण्यापूर्वी जॉन्सन यांनी राष्ट्राला संबोधित केलं. ते म्हणाले, "नवा नेता निवडण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात यावी. याचं वेळापत्रक पुढच्या आठवड्यात सुरू होईल. नवीन नेते येईपर्यंत मी पदावर राहीन."
ते पुढे म्हणाले, "आपल्याला ब्रिटनच्या प्रत्येक भागाच्या क्षमतेचा विकास करण्याची तसंच प्रोत्साहित करण्याची आवश्यकता आहे. हे साध्य केल्यास ब्रिटन संपूर्ण युरोपात सर्वात समृद्ध देश असेल."
नवनियुक्त नेत्याला आपलं नेहमीच सहकार्य राहील, असंही जॉन्सन यावेळी म्हणाले.
राजीनाम्यासाठी होता दबाव
जॉन्सन यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत चालला होता. नवनिर्वाचित अर्थमंत्री नादिम झाहवी यांनीही त्यांना राजीनामा देण्याची गळ घातली होती.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावरचं संकट क्षणोक्षणी गडद झाल्याचं पहायाला मिळालं. बोरिस यांनी गृहनिर्माण मंत्री मायकेल गोव्ह यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं आणि जॉन्सन यांच्यावर राजीनामा देण्यासाठीचा दबाव दिवसेंदिवस वाढत होता.
बुधवारी (6 जुलै) गृहसचिव प्रीती पटेल यांनीसुद्धा पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना राजीनामा देण्याची विनंती केली. त्यानंतर या घडामोडी झाल्या. अखेर, बोरिस जॉन्सन यांनी आपल्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा आणि पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.
वेल्सचे परराष्ट्र मंत्री सिमन हार्ट हेसुद्धा या शिष्टमंडळात होते आणि त्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला
अॅटर्नी जनरल सुएला ब्रेवरमन आणि माजी मंत्री मॅट हॅनॉक यांनीही पंतप्रधान जॉन्सन यांना राजीनामा देण्यास सांगितलं. ब्रेवरमन यांनी आपण नेतेपदाच्या स्पर्धेत राहण्यास उत्सुक असल्याचं सांगितलं.
ते कारण ज्यामुळे मंत्र्यांनी सोडली जॉन्स यांची साथ
साजिद जावेद आणि ऋषी सुनक यांनी राजीनामा दिल्यावर आतापर्यंत मंत्री आणि इतर अधिकारी अशा एकूण 44 जणांनी राजीनामा दिला आहे.
ख्रिस पिंचर यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यामुळे सर्व मंत्री जॉन्सन यांच्यावर नाराज आहेत. त्यातूनच हा वाद उफाळून आला आहे.
नाधीम झाहवी यांना काल अर्थमंत्री म्हणून कार्यभार सांभाळण्यात सांगितलं आहे. आपण पंतप्रधानांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत असं त्यांनी सांगितलं. झाहवी यांनीही जॉन्सन यांना राजीनामा देण्याची विनंती केली होती अशा बातम्या आल्या होत्या. नंतर या बातम्यात तथ्य नसल्याचं झाहवी यांनी सांगितलं.
हे संपूर्ण प्रकरण ख्रिस पिंचर यांना उपमुख्य व्हीप पदावर नेमल्यानंतर सुरू झालं. पंतप्रधान जॉन्सन यांनी पिंचर यांना सरकारी पद दिल्या प्रकरणी माफीही मागितली. पण त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि खासदारांनी ते स्वीकारलं नाही.
ख्रिस पिंचर हे इंग्लंडमधील वादग्रस्त व्यक्तिमत्व होतं. 30 जूनला ब्रिटनच्या द सन वृत्तपत्राने त्यांच्याविषयी एक बातमी छापली होती. पिंचर यांनी लंडनच्या एका खासगी क्लबमध्ये दोन पुरुषांना आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केला होता, असा दावा या बातमीत करण्यात आला होता.
द सन ची ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पिंचर यांना राजीनामा द्यावा लागला होता. पण त्यानंतर महिनाभर पिंचर यांच्याबाबत अशाच प्रकारच्या अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या. लैंगिक गैरवर्तवणुकीशी संबंधित या सगळ्या बातम्या होत्या.
यानंतर पिंचर यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं. त्यांनी माफी मागितली तसंच तपासात सहकार्य करणार असल्याबाबतही म्हटलं. तसंच आपल्या वर्तवणुकीबाबत आपण व्यावसायिक वैद्यकीय मदत घेत आहोत, असंही ते म्हणाले होते.
बोरिस जॉन्सन यांनी महाराणीची माफी मागावी - माजी मंत्री
पिंचर प्रकरणी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची माफी मागावी, अशी मागणी माजी मंत्र्यांनी केली आहे. जॉन्सन यांच्याच मंत्रिमंडळात मंत्री राहिलेले आणि आपल्या पदाचा राजीनामा दिलेले माजी विज्ञान मंत्री जॉर्ज फ्रिमन यांनी ही मागणी केली.
'युकेत सध्या सरकारच नाही'
सध्या जॉन्सन यांच्या सरकारमध्ये एक तृतीयांश मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे त्यामुळे सरकार खरंच अस्तित्वात आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कॅमिला कॅव्हेंडिश या युकेमधील सार्वजनिक धोरणतज्ज्ञ आहे. त्यांच्या मते सध्या युकेमध्ये सरकारच अस्तित्वात नाही. त्या बीबीसीशी बोलत होत्या.
"सध्या सरकार चालवण्यासाठी पुरेशी लोक उरलेली नाही. खासदारांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला कारण विधेयक समितीवर लोकच नाहीत आणि तोच सरकारचा कणा आहे."
"जॉन्सन यांनी येत्या काळात नवीन लोक आणण्याचा प्रयत्न करावा. जे गेलेत त्यांच्या जागी कोणीतरी येईलच मात्र सध्या जॉन्सन यांचंच काही खरं दिसत नाही." त्या पुढे म्हणाल्या.
मायकेल गोव्ह यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याच्या निर्णयावरही टीका होत आहे. मादी मंत्री मार्गोट जेम्स यांच्या मते आधीच 40 मंत्र्यांन राजीनामा दिला असताना मंत्रिमंडळातील सर्वांत सक्षम मंत्र्याला काढून टाकणं हा शुद्ध बेजबाबदारपणा आहे.
बीबीसी चे राजकीय घडामोडींचे प्रतिनिघी इयन वॅटसन या संपूर्ण घटनेचं वार्तांकन कसं चालू आहे याबद्दल माहिती देताना म्हणतात, "10 डाऊनिंग स्ट्रीट च्या बाहेर किती कॅमेरे उभे आहेत यावरून त्या घटनेची तीव्रता लक्षात येते."
"2019 मध्ये ख्रिसमसच्या वेळी ब्रेक्झिटच्यावेळी सुद्धा अशीच परिस्थिती तिथे पहायला मिळाली होती. परिवहन मंत्री ग्रांट शेप्स यांनी 10 डाऊनिंग स्ट्रीट च्या दिशेने धाव घेतली. ते पंतप्रधानांना कटू संदेश द्यायला आले आहेत असं सांगितलं.
नादिन डोरिस बोरिस यांचे समर्थक आहेत. त्या सुद्धा जॉन्सन यांच्याबाजूने उभं असल्याचं सांगायला आल्या.
पंतप्रधानांच्या निवासस्थानी एखादा मंत्री जात असेल तर त्याच्या कडे पाहून जोरात एखादा प्रश्न विचारणं ही ब्रिटिशांची परंपरा आहे.
जेव्हा नादिन पंतप्रधानांना भेटून परत निघाल्या तेव्हा त्यांचा पंतप्रधानांना पूर्ण पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. इतकंच नाही तर त्यांच्या सहकाऱ्यांचाही जॉन्सन यांना पाठिंबा आहे असं सांगितलं.
त्यामुळे जॉन्सन इतक्या लवकर राजीनामा देणार नाहीत हे स्पष्ट झालं."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)