देवेंद्र फडणवीस बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार - संजय कुटे #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Facebook/Devendra Fadanvis
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. फडणवीस बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार - संजय कुटे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार देवेंद्र फडणवीसच आहेत, असं विधान माजी मंत्री आणि भाजपचे नेते संजय कुटेंनी केलंय. सकाळ वृत्तपत्रानं ही बातमी दिलीय.
संजय कुटे पुढे म्हणाले, "महाराष्ट्राच्या इतिहासातील हे ऐतिहासिक सत्तानाट्य होतं. यामध्ये देवेंद्र फडणवीस या सर्व यशाचे सूत्रधार होते. त्यानंतर जे घडलं त्यामुळं भाजपतले काही लोक नाराज झाले असतील पण फडणवीसांसारखा त्यागमूर्ती असलेला नेता या महाराष्ट्राला मिळाला याचं आम्ही भाग्य समजतो."
तसंच, "सत्तेसाठी आम्ही हे केलेलं नाही. ज्या विचारांवर आम्ही जगतो आहे त्याला गेल्या अडीच वर्षांत तडा जात होता. यामुळं हिंदुत्वाचे विविध विषय मागे पडत होते. सन 2019 मध्ये फडणवीसांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजपचं सरकार लोकांनी निवडून दिलं होतं, ते हिंदुत्ववादी सरकार कोणत्याही परिस्थितीत पुनर्स्थापन व्हावं आणि हा विचार पुढे जावा यासाठी फडणवीसांनी मोठा त्याग केला," असंही संजय कुटे म्हणाले.
2. उद्धव ठाकरेंना बनवाबनवी करण्यात 'नोबेल' मिळेल - सोमय्या
महाराष्ट्रातील नव्या सरकारनं आरे कारशेड प्रकल्पाला परवानगी दिलीय. यावरून आता वादाला सुरुवात झालीय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरे कारशेडवरून नव्या सरकारवर टीका केली होती.
यावर बोलताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांना बनवाबनवी करण्यात नोबेल पुरस्कार मिळू शकतो." लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Twitter/Kirit Somaiya
सोमय्या पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी केवळ आरे कारशेडचं काम बंद पाडलं नाही, तर त्यामुळे बाकीची कामं देखील ठप्प झाली. दरम्यानच्या काळात मेट्रोचे डबे बनवणाऱ्या कंपन्यांनी करार रद्द केले. शिवाय, कर्ज वितरीत करणाऱ्या संस्थांनी देखील हात आखडता घेतला."
"येत्या सहा ते सात महिन्यात आरे कारशेड प्रकल्पाचं काम पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे वर्षभरात मुंबईत मेट्रो देखील धावायला सुरुवात होईल. परिणामी मुंबईल लोकलवरील बराचसा भार कमी होईल," असंही सोमय्या म्हणाले.
3. फडणवीसांवर स्वप्नातही विश्वास ठेवू नका - अनिल गोटे
देवेंद्र फडणवीसांवर स्वप्नातही विश्वास ठेवू नका, अशा आशयाचं पत्र माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांना लिहिलंय. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.
अनिल गोटेंनी एकनाथ शिंदेंना उद्देशून पत्रात लिहिलंय की, "तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे अनुभवलेत म्हणून वडीलकीचा सल्ला देतो. मानला तर फायदाच होईल. किमान फसवणूक आणि नंतर पश्चाताप होणार नाही, ही एक लाख टक्के खात्री देतो. देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्यावर स्वप्नात देखील विश्वास ठेवू नका."
"फडणवीसांनी माझ्यासारख्या धनगर समाजातील कार्यकर्त्याचा छळ केला. मनाचा इतका क्षुद्र की आपल्याकडून अनवधानाने का होईना पण अन्याय झाला, हे कबुल करण्याचा प्रामाणिकपणा त्यांच्याकडे नाही. अशा राक्षसी वृत्तीच्या व्यक्तीपासून सावध रहावे," असा सल्ला गोटेंनी शिंदेंना दिला.
4. 'आरे'च्या मुद्द्यावर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं एकमत
आरे कारशेडविरोधात पर्यावरणवादी पुन्हा एकवटताना दिसतायेत. पर्यावरणप्रेमींनी पुन्हा आंदोलनाची हाक दिलीय. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे देखील आरे बचाव मोहमेसाठी मैदानात आले आहेत. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
अमित ठाकरेंनी म्हटलंय की, "मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुणांनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकलं होतं."

फोटो स्रोत, Instagram / Amit Thackeray
"आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊ नका. पर्यावरण उद्ध्वस्त झालं तर भविष्यात राजकारण करायला माणूस राहणार नाही," असं अमित ठाकरे म्हणाले.
विशेष म्हणजे, अमित ठाकरेंची ही भूमिका माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत होणारी आहे. त्यामुळे तिसऱ्या पिढीतल्या ठाकरे बंधूंचं एकमत होताना दिसतंय.
5. मला कुठल्याच राज्यपालांनी पेढा भरवला नाही - पवार
शिवसेना बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता सर्वच आमदारांना घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. तत्पूर्वी त्यांनी मुंबईत येऊन भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली.
यावेळी राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. तसेच, दोन्ही नेत्यांना पेढाही भरवला. लोकमतनं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Facebook/Sharad Pawar
या पेढा भरवतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
"जवळपास 1990 सालापर्यंत मी वेगवेगळ्या पदावर शपथा घेतल्या आहेत. पण आजपर्यंत मला कुठल्याही राज्यपालांनी पेढा भरवला नाही. यापूर्वी ज्यांनी शपथ घेतली, त्यांना फुलांचा गुच्छही देताना मी पाहिलं नाही. यावेळी त्यांनी दिला याचा आनंद आहे," असा टोला पवारांनी राज्यपालांना लगावला.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








