एकनाथ शिंदेंचं बंड : 5 अनुत्तरित प्रश्न आणि त्यांची उत्तरं

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Getty Images

एकनाथ शिंदे यांचं बंड अजूनही शमलेलं नाही. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर सुरतला गेले होते. तरीही तोडगा निघालेला नाही. या प्रकरणाशी निगडीत पाच प्रश्नांची उत्तरं बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित आणि बीबीसी मराठी प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे.

1. हे सरकार टिकणार की जाणार?

हे सरकार टिकण्याची शक्यता खूप कमी दिसतेय. याचं साधं कारण म्हणजे साधारण 30 आमदारांसोबत एकनाथ शिंदेंचा एक गट शिवसेनेतून वेगळा झालेला दिसतोय. जर हे 30 आमदार एकत्र मागणी करत आहेत की आपण सगळे मिळून भाजपसोबत जाऊ आणि तुम्ही आला नाहीत तर आम्ही भाजपसोबत जाऊ, अशा परिस्थितीत हे सरकार राहील याची शक्यता खूपच कमी आहे.

पुढचे काही तास खूप महत्त्वाचे आहेत. कारण पुढच्या काही तासातच उद्धव ठाकरे आपल्या आमदारांची मनधरणी करतात का, शरद पवार काही करतात का, हे सगळं पाहायला मिळले. महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे. सध्याच्या स्वरुपात हे सरकार टिकेल याची शक्यता फार कमी आहे.

कारण समजा एकटे एकनाथ शिंदे नाराज असते उदाहरणार्थ आमच्या आमदारांना निधी नाही मिळाला किंवा माझा अपमान झाला, असं काही एकनाथ शिंदेंना वाटत असतं आणि ती शिवसेनेतील अंतर्गत नाराजी असती तर एकनाथ शिंदे महाराष्ट्रात एखाद्या ठिकाणी जाऊन नाराज होऊ शकले असते.

महाराष्ट्राने याआधी कित्येकांची नाराजी पाहिली आहे. यापूर्वी अजित पवार नाराज होऊन साखर कारखान्यात जाऊन बसले होते. त्यामुळे जर एखाद्याला वाटत असेल की आपला रुसवा दूर केला जाईल आणि आपण पुन्हा त्याच पक्षात सक्रिय होऊ तर ते जवळपासच कुठेतरी जातात. मात्र, एकनाथ शिंदे यांनी सीमा ओलांडली आणि ते सुरतेत गेले.

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Eknath Shinde/BBC

दुसरं म्हणजे महाराष्ट्र विकास आघाडीतील सर्व महत्त्वाचे नेते मुंबईत आलेले आहेत.

2. एकनाथ शिंदेंच्या ट्वीटचा अर्थ काय?

एकनाथ शिंदेच्या ट्वीटवरून असं लक्षात येतं की शिवसेना सोडण्याचे संकेत त्यांनी दिलेले नाहीत. त्यामुळे ते शिवसेनेतच राहून अंतर्गत दबावगट तयार करतील, अशी शक्यता आहे. उद्धव ठाकरेंना सांगून ते आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. आता या मागण्या काय असतील, हेही महत्त्वाचं आहे. कदाचित त्यातली एक मागणी शिवसेनेने भाजपसोबत जावं, अशीही असू शकते.

सत्तेसाठी प्रतारणा करणार नाही, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. याचे अनेक अर्थ निघू शकतात. एक म्हणजे मी जे काही करतोय ते सत्तेसाठी करत नाहीय. सकाळपासून मराठी न्यूज चॅनल्सवर जी चर्चा सुरू आहे त्यात असं म्हटलं जातंय की कदाचित एकनाथ शिंदे भाजप सोबत जाऊन सरकार स्थापन करतील.

काही ठिकाणी येत होतं की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद हवंय. तर काही ठिकाणी येत होतं की त्यांना उपमुख्यमंत्रिपद हवंय. मला वाटतं की त्या सर्व चर्चांवर त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय की मी सत्तेसाठी प्रतारणा करत नाही. पण, माझ्या आतापर्यंतच्या पत्रकारितेचा अनुभव असा सांगतो की राजकारणी कायम एखाद्या गोष्टीचा निवडणुकीत काय फायदा होईल, याचा विचार करत असतात. अर्थात त्यात काही गैर नाही.

या ट्वीटमध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी ट्वीटमध्ये उद्धव ठाकरेंचा उल्लेख केलेला नाहीय. ट्वीटमध्ये त्यांनी तीन वेळा बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख केलाय तर एकदा आनंद दिघे यांच्या नावाचा उल्लेख केलाय. पण, उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला सुप्त संघर्ष या ट्वीटमध्येही दिसतोय. त्यामुळे रीडिंग बिटविन द लाईन्स करायचं झालं तर नाराजी उद्धव ठाकरेंविरोधात आहे, असं म्हणता येईल.

3. या सर्व घडामोडींमागे भाजप आहे का?

शिवसेनेत जे काही घडतंय ती शिवसेनेची अंतर्गत बाब आहे, असं भाजपचे नेते सांगत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जे सरकार पडण्याच्या तारखा देत होते ते आता सरकार अल्पमतात आहे का, यावरही स्पष्ट उत्तर न देता तो त्यांचा अंतर्गत मामला आहे, असं सावध उत्तर देत आहेत. भाजप नेते संजय कुटे सूरतेला जाऊन एकनाथ शिंदे यांना भेटलेत.

या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणालेत की ते चांगले मित्र आहेत आणि ते पक्षातर्फे भेटायला गेले नव्हते. ती त्यांची सदिच्छा भेट होती. पण, राज्यात राजकीय भूकंप घडत असताना देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले संजय कुटे थेट सूरतमध्ये जाऊन एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट घेतील का, याचं उत्तर अगदी सोपं आहे आणि ते म्हणजे नाही.

अमित शाह

फोटो स्रोत, Facebook

आपण इतरही काही संकेतांकडे पाहूया. शिवसेनेचे आमदार गुजरातमध्ये गेले आहेत जिथे भाजपची सत्ता आहे. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं ते गृहराज्य आहे. याचा राजकीय अर्थ काय, हे एकनाथ शिंदे यांना चांगलं ठावूक आहे. दुसरं असं की गुजरातमध्ये गेल्यावर गुजरात पोलिसांनी त्यांना लगेच सुरक्षा पुरवली. याचा अर्थ महाराष्ट्रातून एवढ्या मोठ्या संख्येने आमदार सुरतमध्ये येणार आहेत, याची त्यांना पूर्ण कल्पना होती. ही अचानक घडलेली गोष्ट नाही.

आणखी एक मुद्दा म्हणजे ज्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न केला त्या विधान परिषदेच्य़ा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे राजकीय नाट्य घडलेलं आहे. हे सगळं बघता शिवसेनेत जे काही घडतंय त्यामागे भाजपचा हात अजिबात नाही, असं म्हणता येणार नाही. यावेळी भाजप अत्यंत सावधगिरीने पावलं उचलत असल्याचं दिसतं.

4. राज्यात ऑपरेशन लोटस राबवलं जाईल का?

भाजपने कर्नाटक, मध्य प्रदेश अशा राज्यांमध्ये अॅक्टिव्हली विरोधी पक्षांचे आमदार फोडून त्यांना आपल्याकडे घेऊन भाजपच्या तिकिटावर पुन्हा निवडून आणतं सरकार स्थापन केल. भाजपतर्फे खेळल्या गेलेल्या या राजकीय खेळीला मीडियाने ऑपरेशन लोटस म्हटलं.

महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता नव्हती. मध्य प्रदेशात सत्ता नव्हती. पण, त्या राज्यांमध्ये भाजपला सत्ता स्थापनेसाठी केवळ 10-12 आमदारांची गरज होती. महाराष्ट्रात ही स्थिती नाही. इथे त्यांना खूप जास्त आमदारांची गरज आहे. हा महत्त्वाचा फरक आहे. त्यामुळे त्या दोन राज्यांमध्ये ज्या पद्धतीने ऑपरेशन लोटस राबवलं गेलं तसं काही महाराष्ट्रात होईल, अशी शक्यता वाटत नाही.

असं असलं तरी भाजप वेगळं काहीतरी ऑपरेशन राबवू शकते. त्यासंबंधीच्या काही महत्त्वाच्या घडामोडी दिल्लीत सुरू आहेत. भाजपचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत आणि तिथे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या या सगळ्या घडामोडीत उडी मारायची की नाही, हे भाजप ठरवत आहे, असं सध्या तरी चित्र दिसतंय.

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी भाजपकडे कोणते पर्याय आहेत, याचा विचार केला तर पहिलं म्हणजे शिवसेनेतून 37 आमदार फुटले आणि त्यांनी भाजपला पाठिंबा दिला तर भाजपला सत्ता स्थापता येईल. दुसरी शक्यता म्हणजे शिवसेनेच्या बंडखोर गटात पक्षातून फुटून जाण्याइतपत संख्याबळ नसेल तर काही ठिकाणी निवडणुका घ्यावा लागतील.

अमित शाह

फोटो स्रोत, Facebook

पण, त्यात अडचण अशी असेल की भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात महाविकास आघाडीतल तीन पक्ष असतील आणि अशा वेळी भाजपसाठी ती रिस्क असेल. निवडणूक घेऊनही भाजपचे अपेक्षित आमदार निवडून आले नाही तर भाजपसाठी ती मोठी नामुष्की असेल. तिसरा पर्याय असा असू शकतो की सरकार पडत असेल तर पडू द्यावं. राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यावी आणि त्यानंतर काही काळाने पुन्हा निवडणुका घ्याव्या.

भाजपच्या एका नेत्याशी आजच सकाळी बोलत असताना ते म्हणाले की गेल्या वेळी आम्ही घाईगडबड केली. त्याचा परिणाम आमच्या प्रतिमेवरती झाला. आता मात्र आम्ही सगळं शांतपणे करणार आहोत. जोपर्यंत आमच्या बाजूने सगळी गणितं आहेत, याची खात्री होत नाही तोपर्यंत आम्ही काहीही करणार नाही. त्यामुळे पूर्वी जे काँग्रेसविषयी बोललं जायचं की ठंडा करने खाओ, असं आता भाजप करताना दिसतेय.

5. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार का?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सध्या निवांतपणा दिसतोय. विधानपरिषदेसाठीचे त्यांचे सगळे उमेदवार निवडून आलेत. त्यांना इतर पक्षांची मतंही मिळाली आहेत. अजित पवार सकाळपासून मंत्र्यांच्या बैठका घेत होते. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही चलबिचल नाही. त्याचं कारण म्हणजे सध्या आग लागली आहे ती शिवसेनेत.

असं असलं तरी शिवसेनेत बंडाळी झाली तर त्याचे थेट परिणाम सरकारवर होतील. त्यामुळे शरद पवारांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन सगळं काही आलबेल आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांना संकटमोचकही मानलं जातं. शरद पवारांनी आता पत्रकार परिषद घेणं यासाठी महत्त्वाचं होतं कारण महाराष्ट्र विकास आघाडीतील कुठलाही नेता एवढी मोठी बंडाळी झाल्यानंतर काहीही बोललेला नाही.

उद्धव ठाकरे बोलले नाही. अजित पवार बोलले नाहीत. काँग्रेसनेही बंडाळीवर बोलणं टाळलं. त्यामुळे शरद पवार जे या सरकारचे एकप्रकारे निर्माते होते, त्यांनी ही आघाडी जुळवून आणली आणि म्हणून शरद पवार यांनी आता बोलणं महत्त्वाचं होतं.

याआधी राष्ट्रवादीने दोनवेळा भाजपसोबत जवळीक केलेली आहे. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालच्या भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ केला होता. त्यानंतर 2019 मध्ये अजित पवारांचा गट सत्तेसाठी काही तासांसाठी का होईना पण भाजपसोबत गेला होता.

आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला की राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाऊ शकते का? यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की तुम्ही सेंसिबल प्रश्न विचारा. तुमचा प्रश्नच चुकीचा आहे, असं म्हणून शरद पवारांनी प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं.

काँग्रेस

विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या क्रॉस व्होटिंगविषयी बोलताना ते म्हणाले की क्रॉस व्होटिंग होऊनही सरकारं टिकली आहेत. ते म्हणाले यापूर्वीही राज्यसभा किंवा विधानपरिषदेत आमदारांनी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारासाठी मतदान केलेलं आहे. पण, त्याचा सरकारच्या टिकण्यावर किंवा न टिकण्यावर काही परिणाम होत नाही.

हा शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे आणि ते सांगत नाही तोवर मी मध्ये पडणार नाही, असंही शरद पवार म्हणाले. यावरून उद्धव ठाकरेंच्या कारभाराच्या शैलीवर नाराज शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे हा तुमचा प्रॉबलम आहे तो तुम्ही निस्तरा, असा संदेश दिलाय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)