संजय कुटे कोण आहेत? जे एकनाथ शिंदेंना मिलिंद नार्वेकरांच्या आधी भेटायला पोहोचले होते...

संजय कुटे

फोटो स्रोत, Facebook/Sanjay Kute

    • Author, नामदेव काटकर
    • Role, बीबीसी मराठी

शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला.

विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे गुजरातमधील सुरतस्थित ली मेरिडियन हॉटेलमध्ये गेले. तिथं शिवसेनेचे काही आमदारही त्यांच्यासोबत आहेत.

एकनाथ शिंदेंच्य या बंडामागे भाजप असल्याच्या चर्चा आधी भाजपचे महाराष्ट्रातील नेते फेटाळत राहिले. मात्र, या घडामोडींना वेग आल्यानंतर एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉ. संजय कुटे थेट सुरतमध्ये दाखल झाले होते.

सुरतमधील ले मेरिडियन हॉटेलमध्ये डॉ. संजय कुटे गेले होते. त्यामुळे भाजपही या सर्व घडामोडींमध्ये समाविष्ट असल्याच्या चर्चांना बळ मिळालं.

आता शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेनंतर डॉ. संजय कुटे यांनी 'मिशन सक्सेस' असं ट्वीट केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कायम आजूबाजूला दिसणारे डॉ. संजय कुटे आहेत तरी कोण, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर आपण आज या बातमीतून डॉ. संजय कुटेंबद्दल जाणून घेऊया.

डॉ. संजय कुटे हे भाजपमधील तरुण नेते आहेत.

विधिमंडळात देवेंद्र फडणवीसांच्या मागच्या बाकड्यावर बसून सत्तेत असताना विरोधकांना आणि विरोधात असताना सत्ताधाऱ्यांना आपल्या अभ्यासपूर्ण आक्रमक भाषणानं सळो की पळो करून सोडणारे नेते म्हणून डॉ. संजय कुटे यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे.

संजय कुटे राजकारणात कसे आले?

संजय कुटे राजकारणात आले ते तरुण वयातच. आणि त्यांना राजाकराणात आणलं भाऊसाहेब फुंडकरांनी.

देशोन्नती वृत्तपत्राचे बुलाडणा जिल्ह्याचे संपादक राजेंद्र काळेंनी पत्रकार म्हणून डॉ. संजय कुटेंचा राजकीय प्रवास जवळून पाहिला आहे. त्यांच्याशी बीबीसी मराठीनं बातचित केली.

राजेंद्र काळे सांगतात की, "महाराष्ट्रात ज्यावेळी भाजपचे सर्वेसर्वा गोपीनाथ मुंडे होते, त्यावेळी भाऊसाहेब फुंडकर हे मुंडेंचे निकटवर्तीय होते. भाऊसाहेब फुंडकरांनीच संजय कुटेंना राजकारणात आणलं आणि फुंडकरांच्या निधनानंतर संजय कुटे बुलडाणा जिल्ह्याचे नेते बनले आहेत.

संजय कुटे

फोटो स्रोत, Facebook/Sanjay Kute

2004 सालापासून म्हणजे गेल्या 18-19 वर्षांपासून ते बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद विधानसभा मतदारसंघातून भाजपचं प्रतिनिधित्त्व करत आहेत."

2014 साली महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हा शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारात कामगार कल्याण मंत्री आणि बुलडाण्याचं पालकमंत्री म्हणून डॉ. संजय कुटेंची निवड झाली.

यापूर्वी डॉ. संजय कुटेंनी बुलडाणा भाजपचं जिल्हाध्यक्षपद, महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष अशी पक्ष संघटनेतली पदंही भूषवली आहेत.

अमरावती विभागात भाजप म्हणजे संजय कुटे?

संजय कुटे हे भाजपमधील ओबेसी नेते आहेत. ते कुणबी समातून येतात.

इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही संजय कुटेंनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरल्याचं महाराष्ट्रानं पाहिलंय.

जळगाव-जामोद मतदारसंघात ओबीसी समाज प्रभावशाली आहे आणि संजय कुटे याच समाजातून येतात. किंबहुना, भाऊसाहेब फुंडकरांनी हीच सामाजिक गणितं पाहून त्यांना पुढे आणल्याचं राजेंद्र काळे सांगतात.

संजय कुटे

फोटो स्रोत, Facebook/Sanjay Kute

राजेंद्र काळे पुढे सांगतात की, "संजय कुटे आता केवळ बुलडाणा जिल्ह्यातील भाजपचे नेते राहिले नाहीत, ते अमरावती विभागात जेवढे जिल्हे येतात, त्या जिल्ह्यांमध्येही संजय कुटेंच्या शब्दाला वजन निर्माण झालंय."

फडणवीस सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारात संजय कुटेंना कॅबिनेट मंत्रिपद आणि बुलडाण्याचं पालकमंत्रिपद मिळालं, मात्र या काळात त्यांनी कामांचा धडाका लावला होता, असं काळे सांगतात.

तसंच, निवडणुकीचा काळ वगळता ते सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध ठेवून असतात, त्यामुळे तशी सकारात्मक नेत्याची प्रतिमाही तयार झाल्याचे राजेंद्र काळे म्हणतात.

'फडणवीसांचे विश्वासू'

देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून डॉ. संजय कुटेंकडे पाहिलं जातं. त्यामुळेच त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या फडणवीस देताना दिसून येतात.

नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीवेळी डॉ. संजय कुटेंनी पोलिंग एजंट म्हणून काम पाहिलं.

आता एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी सुरतमध्ये सर्वांत आधी संजय कुटे पोहोचल्यानंतर तर त्यांच्यावरील देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचा विश्वास किती आहे, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

संजय कुटे

फोटो स्रोत, Facebook/Sanjay Kute

राजेंद्र काळे सांगतात की, "देवेंद्र फडणवीसांचे जवळचे सहकारी अशी प्रतिमा निर्माण झाल्यानं अमरावती विभागाच्या भाजप कार्यकर्ते नि पदाधिकाऱ्यांमध्येही त्यांच्याबद्दल वेगळं वजन निर्माण झालंय. शिवाय, या विभागातल्या विकासकामांनाही वेग येईल, असा विश्वास लोकांशी बोलल्यावर जाणवू लागतं."

संजय कुटेंना सध्या बुलडाण्यात तसा मोठा विरोधक दिसत नाही. काँग्रेसच्या स्वाती वाकेकर आणि प्रसनजीत पाटील असे काही नेते त्यांच्या विरोधात दिसतात. मात्र, संजय कुटेंचा राज्यातील राजकारणातील आणि अमरावती विभागातील वावर पाहता, यापुढे त्यांना बुलडाण्यातील कुठला विजय जड जाण्याचं प्रमाणही कमी झालंय, असं काळे म्हणतात.

संजय कुटेंचा वैयक्तिक परिचय

संजय कुटेंचा जन्म बुलडाण्याच्या जळगाव-जामोदमध्ये 9 मार्च 1969 रोजी झाला.

नागपूर बोर्डाअंतर्गत येणाऱ्या जळगाव जामोदमधील द न्यू ईरा हायस्कूलमधून 1985 साली दहावी, 1988 साली बारावी आणि अमरावती विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या मोझरीतल्या श्री. गुरुकुंज आयुर्वेदक महाविद्यालयातून 1994 साली बीएएमएसचं शिक्षण पूर्ण केलं.

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दशकभरात म्हणजे 2004 साली त्यांनी थेट राज्याच्या विधिमंडळात प्रवेश केला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)