विधान परिषद निवडणूक: 20 पेक्षा जास्त आमदार फुटले, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रिपद धोक्यात आलंय का?

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

राज्यसभेनंतर आता विधान परिषद निवडणुकीत भाजपनं महाविकास आघाडी सरकारला धोबीपछाड दिली आहे. या निवडणुकीत भाजपला 134 मतं मिळाल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

भाजपच्या 5 उमेदवारांना मिळालेली मतं पाहिली तर त्यांच्या म्हणण्यात तथ्य असल्याचं दिसून येतं. ज्यात सत्ता स्थापनोचा आकडा 145 आहे. या जादूच्या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपला आता फक्त 12 आमदारांची गरज आहे.

सध्या भाजपकडे त्यांच्या स्वतःचे 106 आमदार आहेत आणि अपक्षांच्या पाठिंब्याने हा आकडा 113 पर्यंत जातो. पण या निवडणुकीत भाजपनं 134 मतापर्यंत मजल मारली आहे. म्हणजेच त्यांच्या पारड्यात 20 अतिरिक्त मतं आली आहेत.

आता ही 20 मतं कुठून आली? आणि कुठल्या कुठल्या पक्षाचे कुठले कुठले आमदार फुटले? हे प्रश्न उपस्थित होतात. पण त्याहून सर्वांत मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे उद्धव ठाकरे सरकार आता अल्पमतात येत चाललं आहे का? त्यांचं स्थान डळमळीत झालं आहे का?

त्याला आणखी एक कारण म्हणजे काँग्रेसची फुटलेली 3 मतं आणि त्यांच्या उमेदवारांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी न मिळालेली मतं.

महाविकास आघाडी निवडणूक

फोटो स्रोत, SHAHID SHAIKH/BBC

अशात काँग्रस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी "अडीच वर्षं झाली आहेत आता सरकार म्हणून काही गोष्टींचा विचार करण्याची वेळ आली आहे. जबाबदारी मला CLP म्हणून घ्यावी लागेल. मी पक्षश्रेष्ठींना कळवेन," असं सूचक वक्तव्य केलं आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घोडेबाजार झाल्याचा आरोप केला आहे.

निकालाबाबत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "मतमोजणीची आकडेवारी हातात आल्यावर बोलू. घोडेबाजार केल्याचं समोर येईल. काँग्रेसकडे मुळातच मर्यादित मतं होती. 20 आणि 22 मतं पहिल्या पसंतीत मिळाली. 29-30 मतं ज्यांना मिळाली आहेत त्यांचा सेकंड प्रेफरन्स मोजला जातो."

कोणाचे किती आमदार फुटले?

वरिष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी सांगतात, "या निकालात काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. काँग्रेसचे 44 आमदार असताना त्यांना केवळ 41 मतं मिळाली आहे. त्यामुळे त्यांना अतिरिक्त मतं मिळवता आली नाहीच. शिवाय त्यांची 3 मतं फुटली."

शिवसेनेलाही 3 अपक्ष आमदारांची मतं मिळणं अपेक्षित होतं ती मिळाली नाहीत असंही ते सांगतात.

विधान परिषद निवडणूक

फोटो स्रोत, PRAJAKTA POL/BBC

फोटो कॅप्शन, काँग्रेसचे आमदार

राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र 51 आमदारांचं संख्याबळ असताना 57 मतं मिळवण्यात यश आलं.

भाजपच्या जुन्या मित्रांनी मतं दिली अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी विजयानंतर दिली.

सुधीर सूर्यवंशी म्हणाले, "राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेची तयारी कमी पडली आणि विधान परिषदेच्या या निवडणुकीत काँग्रेसची तयारी कमी पडली. याचा मोठा धोका आता महाविकास आघाडीला आहे."

ठाकरे सरकार कोसळ्याची शक्यता?

यासंदर्भात बोलताना सुधीर सूर्यवंशी म्हणाले, "निश्चितच महाविकास आघाडीचं सरकार धोक्यात येऊ शकतं. भाजपचा परफॉरमन्स खूप चांगला दिसला. भाजपची ही वाढलेली ताकद पाहून महाविकास आघाडीच्या आमदारांचं मनोबल खचण्याची शक्यता आहे. यामुळे सरकार अस्थिर सुद्धा होऊ शकतं."

परंतु एकनाथ खडसे यांना निवडून आणण्यापासून रोखण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं नाही हे सुद्धा स्पष्ट आहे असंही ते सांगतात.

ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानीवडेकर सांगतात, "ठाकरे सरकार धोक्यात आलंय असं म्हणणं घाईचं ठरेल. पण सरकारमधले आंतरविरोध समोर आलेत हे निश्चितपणे म्हणता येईल. नेतृत्वाला आमदार जुमानत नाहीत असंही म्हणता येईल."

विधान परिषद निवडणूक

फोटो स्रोत, PRAJAKTA POL/BBC

"भाजपने अविश्वास दर्शक ठराव आणल्यास त्यांना अधिकचे 10 आमदार आवश्यक आहेत. शिवाय अविश्वास दर्शक ठरावात गुप्त मतदान नसतं. एखादा गट फुटला तर त्याचा धोका महाविकास आघाडीला निश्चितपणे आहे," नानिवडेकर सांगतात.

काँग्रेसची भविष्यातील भूमिका महाविकास आघाडीसाठी महत्त्वाची ठरणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने आधीच स्वबळाचा नारा दिला आहे.

असा लागला निकाल

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात होते. महाविकास आघाडीचे प्रत्येकी दोन उमेदवार उभे होते आणि भाजपने पाच उमेदवारांना संधी दिली होती.

त्यात शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांचाही विजय झाला आहे.

एकनाथ खडसे

फोटो स्रोत, TWIITER/EKNATH KHADSE

फोटो कॅप्शन, एकनाथ खडसे

काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झालाय. तर भाई जगताप मात्र विजयी झाले आहेत.

भाजपचे प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे या पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे. प्रत्येक उमेदवाराला विजयी होण्यासाठी प्रत्येकी 26 मतांची गरज होती.

भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाल्याने भाजपला 130 पेक्षा जास्त मतं मिळाली हे स्पष्ट आहे.

त्यामुळे अपक्ष, छोटे पक्ष आणि महाविकास आघाडीतल्या काही आमदारांनी भाजपला साथ दिल्याचं दिसून येत आहे.

विधान परिषद निवडणूक

फोटो स्रोत, PRAJAKTA POL/BBC

फोटो कॅप्शन, उमा खापरे

काँग्रेसचे दोन उमेदवार होते. परंतु 44 आमदार असूनही काँग्रेसच्या उमेदवारांना एकूण 41 मतं मिळाली.

तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे मतदानासाठी 51 आमदारांचं संख्याबळ होतं पण त्यांना आपल्या दोन्ही उमेदवारांसाठी 57 मतांची जुळवाजुळव करण्यात यश आलं आहे.

छोट्या पक्षांची आकडेवारी पाहिली तर एकूण 16 आमदार आहेत.

एमआयएम-2, समाजवादी पार्टी- 2, मनसे-1, बहुजन विकास आघाडी- 3, प्रहार - 2, माकप- 1, स्वाभिमानी संघटना- 1, रासप-1, जनसुराज्य -1, शेकाप- 1, क्रांतीकारी शेतकरी पक्ष - 1 असे मिळून या पक्षांचे 16 आमदार आहेत आणि अपक्षांची संख्या 13 आहे. यापैकी बहुतांश मतं भाजपकडे वळल्याचं चित्र आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)