विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीचा एकच फॉर्म्युला, 'जो जिता वही सिकंदर'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
येत्या 20 जूनला महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. एकूण 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधानपरिषदेची निवडणूक अटीतटीची होणार असंच चित्र आहे.
या निवडणुकीतही अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत हा सामना महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा होता.
पण विधानपरिषदेच्या या निवडणुकीत आमदारांची मतं मिळवण्यासाठी महाविकास आघाडीतच चढाओढ असल्याचं दिसून येत आहे.
विधानपरिषदेत आमदार गुप्त पद्धतीने मतदान प्रक्रिया होते. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक आव्हानात्मक आहे.
आमदारांचं संख्याबळ मिळवण्याच्या स्पर्धेत महाराष्ट्रात राजकीय भूकंप तर येणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आमदारांची जुळवाजुळव
राज्यसभेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. यात सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत पार पडली.
महाविकास आघाडीने आपल्यासोबत 12 अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा आहे असा दावा केला होता. परंतु मतांच्या आकडेवारीनुसार शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा भाजपला छोट्या पक्षातील आमदारांची साथ मिळाली.
आता विधानपरिषद निवडणुकीतही हाच मुद्दा महत्त्वाचा आहे. पण यावेळी महाविकास आघाडीतल्या पक्षांमध्येच आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी स्पर्धा सुरू झालीय.
विधानपरिषदेत भाजपने पाच तर महाविकास आघाडीने सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
शिवसेनेकडून माजी राज्यमंत्री सचिन अहिर आणि नंदुरबारचे स्थानिक शिवसेनेचे नेते आमशा पाडवी यांना संधी देण्यात आलीय. तर काँग्रेसने काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे यांची उमेदवारी जाहीर केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना संधी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
भाजपने प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड आणि उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे.
आपापल्या पक्षातली मतं ग्राह्य धरली तरीही छोट्या पक्षांचे 16 आमदार आणि 13 अपक्ष आमदार कुणाला मतदान करतात यावर विधानपरिषदेचा निकाल अवलंबून असणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनाही वेग आलाय.
बहुजन विकास आघाडीच्या तीन मतांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे.
काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि उमेदवार भाई जगताप हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे निंबाळकर यांनीही त्यांची भेट घेतली.
भाजपने मनीषा चौधरी यांनाही हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी पाठवलं होतं.

फोटो स्रोत, BJP/SOCIAL MEDIA
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, "विधानपरिषदेची मतदान प्रक्रिया गुप्त असते. त्यामुळे पक्षाचे आमदार फुटण्याची दाट शक्यता असते. अशावेळी प्रत्येकच पक्ष खबरदारी घेत असतो. राज्यसभेच्या वेळेला राष्ट्रवादीकडे अतिरिक्त मतं होती आणि म्हणून ते शिवसेनेला मदत करू शकले. पण विधानपरिषदेला प्रत्येकाचे दोन उमेदवार आहेत आणि मित्र पक्षाला मदत करण्यासाठी अतिरिक्त मतं नाहीत. शिवाय, पक्षातले आमदार फुटले तर अधिकच्या आमदारांचे नियोजन करण्यासाठी इतर पक्षातल्या आमदारांनाही संपर्क केला जातो."
विधानपरिषदेचं गणित
दहा जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीत 27 मतांची आवश्यक आहे.
शिवसेनेचे 55 आमदार आहेत आणि दोन उमेदवार आहेत. त्यामुळे शिवसेनेला अतिरिक्त आमदारांच्या मतांशी आवश्यकता नाही. पण आमदार फुटणार नाहीत याची काळजी शिवसेनेलाही घ्यावी लागणार आहे आणि आमदार फुटले तर अधिकच्या आमदारांची सोय पक्षाला करावी लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे 53 आमदार आहेत. पण राष्ट्रवादीचे दोन नेते अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक तुरुंगात आहेत आणि त्यांची मतदानासाठीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे दोन उमेदवारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला तीन मतांची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळ असलेल्या आमदारांचं समर्थन पक्षाला मिळेल असं अपेक्षित आहे. पण राज्यसभेच्या मतांचा अनुभव पाहता अपक्ष आमदार कोणाच्या पारड्यात मतं टाकणार हा प्रश्नच आहे.

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेसला मात्र आपल्या दोन आमदारांना निवडून आणण्यासाठी 54 मतांची गरज आहे. पण काँग्रेसकडे 44 आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसला 10 अतिरिक्त मतांची आवश्यकता आहे.
भाजपचे 106 आमदार आहेत आणि पाच उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांना 29 अतिरिक्त मतं जुळवावी लागणार आहेत.
छोट्या पक्षांची आकडेवारी पाहिली तर एकूण 16 आमदार आहेत.
एमआयएम-2, समाजवादी पार्टी- 2, मनसे-1, बहुजन विकास आघाडी- 3, प्रहार - 2, माकप- 1, स्वाभिमानी संघटना- 1, रासप-1, जनसुराज्य -1, शेकाप- 1, क्रांतीकारी शेतकरी पक्ष - 1 असे मिळून या पक्षांचे 16 आमदार आहेत आणि अपक्षांची संख्या 13 आहे.
यापैकी अधिकाधिक आमदार आपल्याकडे वळावेत यासाठी चारही पक्षांकडून प्रयत्न केला जाईल.
एकनाथ खडसेंसाठी आव्हानात्मक?
भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली आहे. खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला वाद काही नवीन नाही. एकनाथ खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी देताना फडणवीसांवर उघड टीका केली होती. त्यामुळे एकनाथ खडसे यांना निवडून आणण्यासाठी आणि त्यांचा पराभव करण्यासाठीही दोन्हीकडून जोरदार प्रयत्न होण्याची शक्यता आहे.
अभय देशपांडे सांगतात, "एकनाथ खडसेसुद्धा आपल्या जुन्या संबंधांना वापरण्याचा प्रयत्न करतील. भाजपचे काही आमदार आपल्या बाजूने येतील यासाठीही प्रयत्न होईल. त्याचप्रमाणे खडसे निवडून येऊ नये यासाठी भाजपकडून लॉबिंग केलं जाऊ शकतं."
राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या दोन उमेदवारांपैकी कोणाला किती आमदारांचा कोटा देणार हे महत्त्वाचं आहे. रामराजे निंबाळकर यांना कोणत्या आमदारांची मतं निश्चित केली जातात आणि खडसेंसाठी कोणत्या आमदारांना मतदान करा हे सांगितलं जातं हे पक्ष ठरवणार असं वरिष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात.

फोटो स्रोत, TWIITER/EKNATH KHADSE
ते म्हणाले, "एकनाथ खडसे यांना समर्थनासाठी आमदार अरेंज करण्यासही सांगितलं जाऊ शकतं. रामराजे निंबाळकरांना मतं देण्यासाठी त्यांच्या कोट्यात कोणते आमदार ठरवतात हे महत्त्वाचं आहे. फुटण्याची शक्यता असलेले आमदार खडसेंच्या पारड्यात टाकले जाणार की निंबाळकरांच्या यावरही त्यांची निवडणूक अवलंबून आहे. दाम, दंड, भेद, ज्याकडे दाम नाही, दंडही नाही आणि भेद करण्याची ताकद नाही तो उमेदवार कमकुवत समजला जातो आणि तो पडण्याची शक्यता असते."
"भाजपकडूनही यासाठी प्रयत्न होणार हे निश्चित आहे. मतं खेचण्याची ताकद ज्याकडे त्याला फायदा होणार हे निश्चित," असंही प्रधान सांगतात.
महाविकास आघाडीच्या स्थैर्यावर परिणाम होईल?
विधानपरिषदेत गुप्त मतदान होणार असलं तरीही सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होईल, एवढे आमदार फुटतील अशी शक्यता नाही असं अभय देशपांडे सांगतात.
गुप्त मतदान प्रक्रिया असल्याने एखाद्या उमेदवाराचा अनपेक्षित निकाल लागू शकतो. पण सरकार पडेल एवढे आमदार आपल्या बाजून करण्यात भाजपला लगेच यश येईल असं वाटत नाही असं संदीप प्रधान सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, "गुप्त मतदान असल्याने धोका आहे. पण तो जसा महाविकास आघाडीला आहे तसा तो भाजपलाही आहे. राज्यसभा निवडणुकीत कधी फाटाफूट झाली, काय झालं हे सत्ताधारी पक्षालाही कळलं आहे. पण दुसऱ्या वेळेला बदनामी होऊ नये म्हणून यावेळी महाविकास आघाडी काळजी घेईल. अजित पवार म्हणालेच की, कोण कोणाची मतं फोडतंय ते आम्ही पाहू."
"दुसऱ्या बाजूला हेसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने 8 ते 10 मतं फोडल्याने भाजपचंही मनोबल वाढलं आहे, या सरकारमध्ये कच्चे दुवे काय आहेत हे त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे मतं फोडण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी होईल,"असं संदीप प्रधान सांगतात.
विधानपरिषदेत भाजपच्या बाजूने महाविकास आघाडीचे आमदार गेलेत असं दिसलं तरी सरकार अस्थिर करणं सोपं नाही असंही राजकीय विश्लेषक सांगतात. "महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपला अविश्वास दर्शन ठराव आणावा लागेल. यावेळी पक्षातल्या आमदारांना जाहीरपणे मत द्यावं लागतं. त्यामुळे याची शक्यता कमी आहे." असंही ते म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








