विधान परिषद निवडणूक: अॅम्ब्युलन्स ते मतदान केंद्र, भाजपचे 'हे' आमदार तुम्हाला माहिती आहेत का?

लक्ष्मण जगताप

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC

फोटो कॅप्शन, लक्ष्मण जगताप

राज्यसभा निवडणुकीत सहावी जागा भाजपनं जिंकल्यानंतर पहिल्याच प्रतिक्रियेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी हा विजय आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित केला.

जगताप आणि टिळक यांनी आजारी असतानाही, रुग्णवाहिकेतून येऊन आपलं मत भाजप उमेदवाराच्या पारड्यात टाकलं होतं.

महाराष्ट्रात आज (20 जून) विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे आणि हे दोन्ही आमदार पुन्हा मत देण्यास येणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

या दोन्ही आमदारांबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ.

यातले पहिले आमदार आहेत लक्ष्मण जगताप.

पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप

पुण्यातल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघावर ज्यांची मजबूत पकड आहे, असे लक्ष्मण जगताप हे सध्या भाजपचे आमदार आहेत.

पुण्यातील औंधच्या श्री. शिवाजी विद्यामंदिरातून दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या लक्ष्मण जगतापांचा शेती आणि व्यवसाय हे दोन मिळकतीचे मार्ग आहेत. विधिमंडळ सदस्य म्हणून मिळणारा पगार आणि भत्ताही मिळकतीचे मार्ग आहेत, असं त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय.

साई कन्स्ट्रक्शन, चंद्ररंग डेव्हलपर्स अँड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड यामध्ये ते भागीदार आहेत.

लक्ष्मण जगताप

फोटो स्रोत, Facebook/Laxman Jagtap

फोटो कॅप्शन, लक्ष्मण जगताप

2019 सालच्या निवडणुकीसाठी त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची जंगम मालमत्ता 3 कोटी 5 लाख 38 हजार 554 रुपये आहे, तर स्थावर मालमत्ता 5 कोटी 46 लाख 74 हजार 400 रुपये आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. 1986 साली ते काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आले. नंतर1999 साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केल्यानंतर, जगतापांनी काँग्रेसला राम राम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

पिंपरी चिंचवडच्या स्थायी समिती अध्यक्षपदी एकदा, तर महापौरपदी दोनवेळा त्यांची वर्णी लागली. त्यानंतर 2004 साली ते विधानपरिषदेचे सदस्य झाले. या काळात ते राष्ट्रवादीतच होते.

मात्र, 2009 साली त्यांनी राष्ट्रवादीलाही राम राम ठोकला आणि अपक्ष म्हणून पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते जिंकले. अपक्ष म्हणून काम करत असतानाच, शेतकरी कामगार पक्षाकडून 2014 साली लोकसभा लढले. त्यावेळी त्यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी पराभव केला.

लोकसभेतील पराभवानंतर जगतापांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2014 ची विधानसभा त्यांनी भाजपमधून लढवली. 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळा ते भाजपचे आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाले आहेत.

कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक

मुक्ता टिळक या कर्करोगाशी झुंज देत आहेत. राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी त्या रुग्णवाहिकेतून आल्या होत्या. त्यावेळचे त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि अनेकांनी त्यांच्या पक्षनिष्ठेला सलाम केला. तसंच, त्यांच्या तब्येतीबाबत काळजीही व्यक्त केली.

मुक्ता टिळक या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या आमदार आहेत.

मुक्ता टिळक या 'भारताच्या असंतोषाचे जनक' लोकमान्य टिळक यांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी आहेत.

मुक्ता टिळक

फोटो स्रोत, Facebook/Mukta Tilak

फोटो कॅप्शन, मुक्ता टिळक

पुण्यातील भावे स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलेल्या मुक्ता टिळकांनी फर्ग्युसन महाविद्यालयतून पुढील शिक्षण घेतलं. पुणे विद्यापीठातून त्यांनी जर्मन भाषाही शिकली आहे. मार्केटिंग विषयात त्यांनी एमबीएची पदवी मिळवली आहे.

आमदार होण्यापूर्वी त्या पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. सदाशिव-नारायण पेठेतील प्रभाग क्रमांक 15 च्या त्या नगरसेविका म्हणून नेतृत्त्व करत होत्या. त्या सलग चारवेळा नगरसेविका म्हणून विजयी झाल्या होत्या.

पुणे भाजपच्या महापालिकेतल्या गटनेत्या, स्थायी समितीच्या सदस्या अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्यानंतर 2017 साली त्या महापौरपदी विराजमान झाल्या.

त्या महापौर असतानाच 2019 साली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या भाजपच्या आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाल्या.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)