दीपक केसरकर : शरद पवारांनी नारायण राणेंसाठी जेव्हा केसरकरांची हकालपट्टी केली होती...

दीपक केसरकर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दीपक केसरकर
    • Author, हर्षल आकुडे,
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्रालय आणि मराठी भाषा विभागाची जबाबदारी देण्यात आलीय.

काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी दीपक केसरकर हेच पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून हकालपट्टी करण्यात येत असलेल्या नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुनर्नियुक्ती करत असताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाकडून शिवसेनेतील नव्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्यानुसार दीपक केसरकर यांनाच पक्षप्रवक्तेपदी कायम ठेवण्यात आलं.

एकनाथ शिंदे यांचं बंड सुरू झाल्यापासून शिंदे गटातून दीपक केसरकर यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सुरुवातीला शिंदे गटाचे आणि आता शिवसेनेचेच प्रवक्ते म्हणून त्यांची वर्णी लागली. अर्थात कायद्याच्या कसोटीवर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती टिकते किंवा नाही, तेसुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे.

ठाकरेंना राम राम करून शिंदे गटात जाणाऱ्या दीपक केसरकर यांचा राजकीय प्रवास रंजक राहिला आहे.

विशेष म्हणजे, सध्या शिवसेनेविरुद्धच्या बंडामुळे चर्चेत आलेल्या दीपक केसरकरांनी बंड करूनच राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता.

त्यावेळी नारायण राणेंच्या विरोधी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टीही केली होती. इतकंच नव्हे तर केसरकरांना 'अवदसा आठवली' अशी टीकाही त्यावेळी पवार यांनी त्यांच्यावर केली होती.

केसरकरांच्या त्या बंडाचा किस्सा काय आहे, तसंच त्यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास कसा राहिला, याचा आढावा आपण या निमित्ताने घेऊ -

राष्ट्रवादीविरोधातलं बंड, हकालपट्टी आणि आमदारकीचा राजीनामा

लोकसभा निवडणूक 2014. देशभरात मोदी लाट असून काँग्रेस बॅकफूटवर असल्याचं जाणवत होतं. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-शिवसेना अशी थेट लढत महाराष्ट्रात दिसून येत होती.

नारायण राणे त्यावेळी महाराष्ट्र सरकारमध्ये महसूल मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री होते. काँग्रेसने रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांना उमेदवारी दिली होती.

दीपक केसरकर हे त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडीचे आमदार होते. या निवडणुकीत मित्रपक्ष म्हणून केसरकर यांनी निलेश राणे यांना पाठिंबा दर्शवणं, त्यांचा प्रचार करणं आघाडी धर्मात अपेक्षित होतं. पण केसरकर यांनी या निवडणुकीत विरोधी भूमिका घेतली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राडा संस्कृती आणणाऱ्यांना त्याची किंमत लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांच्या पराभवाने चुकवावी लागेल, असा इशारा केसरकर यांनी त्यावेळी दिला.

'आता मी राणेंना पाठिंबा दिला असता, तर मे महिन्यात मला कॅबिनेट मंत्रिपद मिळाले असते. मात्र, मला ते नकोय. मला तुमच्या सर्वांच्या आयुष्यात शांतता हवी आहे,' असं म्हणत केसरकरांनी निलेश राणेंविरोधात प्रचार सुरू केला.

दीपक केसरकर

फोटो स्रोत, Getty Images

दीपक केसरकरांची ही भूमिका पाहून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव वाढला. केसरकर कोणत्याही स्थितीत आपलं ऐकायला तयार नाहीत, म्हणून पवार यांनी अखेर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.

"ऐन निवडणुकीच्‍या काळात आमच्‍या पक्षातील काही लोकांना आयत्या वेळी अवदसा आठवली. आघाडी झाली की गोष्टी मान्य केल्या पाहिजेत. एका घरात भांड्याला भांड लागतं. देशाचा प्रश्न येतो तेव्हा सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असते पण दीपक केसरकरांची ही गोष्ट मान्य नाही," असं शरद पवार म्हणाले.

वातावरण शांत करण्यासाठी पवार यांनी सिंधुदुर्गमध्‍ये संयुक्त प्रचार सभा घेऊन कोकणात आघाडीत निर्माण झालेले बिघाडीचे वातावरण शांत करण्‍याचा प्रयत्‍न केला. पण त्यातही सहभागी न होता केसरकर यांनी बंडाचं निशाण फडकावलं. तसंच त्यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा यावेळी दिला.

न्यूज 18 लोकमतच्या बातमीनुसार, शरद पवार यांनी या प्रकरणी दीपक केसकर यांना पक्षांतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावल‍ी. पक्षाने घेतलेल्‍या निर्णयाविरुध्‍द भूमिका घेतल्‍याने त्‍यांना ही बजावण्यात आली.

राज्यात स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमनेसामने असतात. पण जेव्हा देशाचा प्रश्न येतो तेव्हा दोन्ही पक्ष एकत्र येतात. लोकसभा निवडणुकीत देशाचा प्रश्न असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या प्रचारात सक्रीय सहभाग घ्यावा, असं शरद पवार त्यावेळी म्हणाले होते.

कट्टर राणेविरोध आणि मंत्रिपदाची लॉटरी

लोकसभा निवडणुकीत अर्थातच मोदी लाट असल्यामुळे काँग्रेसचा देशभरात सपाटून पराभव झाला. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्येही निलेश राणे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

"राणे आणि मुलांचा दहशतवाद सिंधुदुर्गाच्या प्रगतीला धोका असल्याचा प्रचार त्यांनी केला. याचा फटका निलेश राणेंना बसला आणि ते पराभूत झाले. 2014 विधानसभा निवडणुकीत नारायण राणे पराभूत झाले. राणेंच्या विरोधातही केसरकरांनी मोठं कॅम्पेन केलं होतं. त्यानंतर राणेंच्या कार्यकर्त्यांनी केसरकरांच्या घरावर मोर्चा काढला होता," असं केळुसकर सांगतात.

देवेंद्र फडणवीस सुधीर मुनगंटीवार दीपक केसरकर

फोटो स्रोत, Getty Images

यादरम्यान, दीपक केसरकर सातत्याने राणेंचा विरोध करत असल्याने ते आता शिवसेनेत जाणार, हे स्पष्ट झालं होतं. त्यानुसार विधानसभा निवडणूक 2014 च्या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नंतर मात्र केसरकर विरुद्ध राणे वाद आणखी टोकाला गेल्याचं दिसून आलं.

खरंतर, केसरकर यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश करायचा होता, पण युतीच्या समीकरणामध्ये शिवसेनेत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पण हा निर्णय घेऊनही युती तुटल्यामुळे त्यांच्यासमोरील रिस्क मोठी होती. त्यातही त्यांनी विजय मिळवला, असं सिंधुदुर्गतील एका पत्रकाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं.

2014 च्या निवडणुकीत केसरकर यांनी विजय मिळवल्यानंतर कोकणात राणेविरोधी चेहरा म्हणून वापर करण्याचा विचार शिवसेनेने केला. त्याच डावपेचांमध्ये शिवसेनेसोबतच्या पहिल्याच टर्ममध्ये दीपक केसरकर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली.

केसरकर यांच्याकडे गृह आणि अर्थ या दोन खात्यांच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. देवेंद्र फडणवीसांच्या काळात केसरकर पूर्ण पाच वर्षे मंत्रिपदावर होते. या काळात त्यांची आणि फडणवीसांची जवळीक वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

विधानसभा निवडणूक 2019 मध्ये युतीमध्ये निवडणूक लढवूनसुद्धा मुख्यमंत्रिपदावरून भाजप-सेनेत बिनसलं. त्यानंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांनी केसरकरांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही. यावरून केसरकर नाराज असल्याची चर्चा त्यावेळी झाली होती.

बंडखोरांचे 'प्रवक्ते'

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर ते सर्वप्रथम नॉट रिचेबल झाले होते. 20 जून रोजी रात्रीपासूनच शिंदे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन सुरतला निघून गेल्याची माहिती मिळाली. नंतर 22 जून रोजी शिंदे समर्थक आमदार गुवाहाटीला निघून गेले.

दरम्यान, दीपक केसरकर हे मुंबईतच होते. यादरम्यान उद्धव ठाकरे घेत असलेल्या बैठकांना ते हजेरी लावत होते. यावेळी दीपक केसरकर हेसुद्धा जाण्याची शक्यता असल्याची चाहूल युवा सेना कार्यकर्त्यांना लागली होती.

दीपक केसरकर

फोटो स्रोत, Getty Images

त्यामुळे केसरकर यांना हॉटेल सेंट रेजिन्समधून घरी जाण्यापासून शिवसैनिकांनी रोखलं. अखेर, मुंबईवरून निसटण्यात ते यशस्वी ठरले.

तिकडे, 21 जूनपासून आपलं बंड जाहीर करून आमदारांनी विविध माध्यमांसमोर भूमिका मांडणं सुरू केलं होतं. बंडखोर आमदार भरत गोगावले यांना एका प्रसारमाध्यम प्रतिनिधीशी बोलताना काही प्रश्नांना उत्तरे देण्यात अडचण आल्याचं दिसून आलं. यामुळे शिंदे गटाकडून आमदारांच्या बोलण्यावर काही निर्बंध आणले गेले.

दरम्यान, केसरकर गुवाहाटीला दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलण्याची जबाबदारी पूर्णपणे त्यांच्याकडे देण्यात आली. शिंदे गटाची भूमिका इथून पुढे केसरकर हेच मांडतील, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं.

यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत केसरकर म्हणाले, "सेनेनं भाजपसोबत जायला हवी, अशी भूमिका फार पूर्वीपासून मी घेतली होती, काल मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत उशिरापर्यंत होतो. मी माझी भूमिका त्यांच्यासमोर मांडली. माझी पत्नी घरी एकटी असल्यानं मी घरी जाणार असल्याचं सांगितलं. आदित्य ठाकरेंनाही आपलं घर आपण सांभाळलं पाहिजे, असं मी सांगितलं.

आमदारांच्या मतदारसंघात दुसऱ्या स्थानावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी होती. त्यामुळं त्यांना बळ देणं आवश्यक आहे. आम्ही हे उद्धव ठाकरे यांना हे सागंत होतो. यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे अडचणी मांडल्या आणि आमदार त्यांच्यासोबत गेले. तुमच्यासोबत राहण्याची इच्छा असलेल्या आमदारावर तुम्ही ही वेळ का आणत आहात. आमच्या सारख्या नेत्यांचा शिवसेनेत मान ठेवला पाहिजे, असं दीपक केसरकर म्हणाले.

यानंतर शिंदे गटाकडून रोज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करण्याची जबाबदारी केसरकरांनी लीलया उचलली. सौम्य भाषेत संजय राऊत आणि इतरांवर टीका करताना आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याबाबत अजूनही आदर आहे, अशी भूमिका ते सातत्याने मांडताना दिसून आले.

'जिभेवर साखर, डोक्यात डावपेच'

दीपकर केसरकर हे सावंतवाडीतील गर्भश्रीमंत असलेल्या वसंत केसरकर यांचे पुत्र. त्यांना सावंतवाडीमध्ये नगरशेठ म्हणून संबोधण्यात येत असे. वडिलांचा समाजकारण जास्त सहभाग असायचा पण दीपक केसरकर मात्र अगदी तरुणपणापासून राजकारणात सक्रिय झाले.

दीपक केसरकर

फोटो स्रोत, DIPAK KESARKAR

त्याची सुरुवात काँग्रेसमधून झाली. 1996 साली ते सावंतवाडीचे नगराध्यक्ष बनले. पुढे शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर ते याठिकाणी आले.

ई-सकाळच्या बातमीनुसार, तत्कालीन राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचे ते विश्‍वासू सहकारी बनले. भोसलेंच्या जिल्ह्यातील राजकारणाची जबाबदारी त्यांच्याकडेच होती. हळूहळू केसरकरांचे राजकीय वजन वाढत गेले. याच काळात केसरकर हे प्रवीण भोसलेंचेच प्रतिस्पर्धी बनले.

2009 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यात ते यशस्वी ठरले. या निवडणुकीत या निवडणुकीत भोसलेंनी बंडखोरी करूनही केसरकर मोठ्या मताधिक्याने निवडून आले.

आमदारकी मिळाल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात टिकून राहण्यासाठी केसरकर यांनी राणेविरोधी भूमिका सातत्याने मांडली. दिनेश केळुसकर यांच्या मते, राणेविरोधी राजकारणामुळे केसरकरांना पाहिजे असलेली राजकीय स्पेस मिळाली.

'अतिशय थंड डोक्याने जिभेवर साखर पण डोक्यात डावपेच अशा पद्धतीने केसरकर राजकारण करतात, निवडणुकीत विजय मिळवायचं समीकरण त्यांना माहीत आहे,' असं सिंधुदुर्गातील एका पत्रकाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)