'आमदार सोडून जाताना त्यांना का थांबवलं नाही?' उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं?

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीच्या दुस-या भागात ते सुरुवात करतांना ते अधिक राष्ट्रीय प्रश्नांबाबत बोलतात. देशातल्या लोकशाही व्यवस्थेविषयी चिंता व्यक्त करतात. विरोधकांनी सध्या काय केलं पाहिजे यावरही बोलतात. ज्या भाजपासोबत त्यांचा संघर्ष सुरू आहे त्यांच्याकडून शुचितेची अपेक्षाही बोलून दाखवतात. पण शेवटी त्या विषयांतूनही बंडखोरीवर पोहोचतात. जाणवतं की ती किती जिव्हारी लागली आहे.

त्यामुळेच या मुलाखतीच्या पहिल्या भागातली दोरी पकडून या भागातही ते शिंदे आणि गटावर टीका करतात. ती टोकेरी आहे. अगदी 'शेपट्या घालून बसला होता का' इथपासून ते 'तुम्ही घाणेरड्या पद्धतीनं मुख्यमंत्रिपद मिळवलं' असंही ते शिंदेंना ऐकवतात. उद्धव ठाकरेंचा उद्देश स्पष्ट आहे. त्यांना या बंडखोरीमागे 'सत्तेची लालसा'च असल्याचं ठसवायचं आहे आणि ते तसं स्पष्ट बोलूनही दाखवतात.

या मुलाखतीतला सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे ठाकरे याबद्दल सांगतात जेव्हा बंडखोर आमदार त्यांना सांगत होते की आपण भाजपासोबत जायला हवं. उद्धव विस्तारानं बोलतात. बंडाची सांगितली जात असलेली कारणं खोडून टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यात ते यशस्वी झाले की नाही हे निवडणुकांमध्ये दिसू शकणा-या परिणामांवरून समजू शकेल.

पण तरीही संपूर्ण मुलाखत अनेक प्रश्न तसेच ठेवून संपते. संजय राऊतांनीच ती घेतल्यामुळे असेल. त्यामुळे ठाकरेंना जेवढं सांगायचंय तेवढंच यात सांगितलं गेलंय. बाकीचे प्रश्न अवघड आहेत म्हणून घेतले नाहीत की अजूनही शक्यतांकडे नजर ठेवून उघड्या ठेवलेल्या त्या खिडक्या आहेत, असा विचार केला जाईल.

उद्धव ठाकरेंनी आमदारांना का थांबवलं नाही?

संजय राऊत उद्धव यांना थेट प्रश्न विचारतात. आमदार जेव्हा सुरतेला गेले तेव्हा उद्धव त्यांना परत आणायला गेले असते तर बंड तिथंच शमलं असतं का?

पण उद्धव प्रतिप्रश्न विचारतात की मी का जायला हवं? ते अशी शक्यता वा असं करायला पाहिजे होतं हे नाकारतात. शिवाय जेव्हा हे आमदार जेव्हा आपण भाजपाकडे जाऊ असं म्हणायला लागले तेव्हा तसं करायचं तर काही प्रश्नांवर स्पष्टता उद्धव यांनी त्यांच्याकडे मागितली असं स्वत: सांगतात.

इथं हा प्रश्न उद्धव यांच्यासाठी किती वैयक्तिक बनला आहे हे दिसतं. ठाकरेंवर, 'मातोश्री'वर काहीही बोललं जात असतांना तुम्ही शेपट्या का घालून बसला होता असा सरळ प्रश्न ते विचारतात.

भाजपा सन्मान कसा देणार हे त्यांना विचारतात. एकंदरीत, भाजपासोबत जाण्याचा निर्णय या सेनेच्या अस्तित्वासोबतच स्वत: उद्धव यांच्यासाठीही कसा वैयक्तिक अभिमानाचाही बनला आहे हे अधिक स्पष्ट होतं.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Facebook

पण आमदार, मंत्री उद्धव यांना भेटत होते आणि मग सुरतमार्गे गुवाहाटीला जात होते तरी पक्ष वाचवण्यासाठी उद्धव यांनी त्यांना थांबवलं का नाही, हा अगदी सगळ्यांच्या मनात असलेल्या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट मिळत नाही. एक थिअरी वा शंका ही सुद्धा अनेकांनी या काळात मांडली की उद्धवनाच हे बंड मान्य आहे आणि ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची क्लुप्ती आहे.

पण या अशा कॉन्स्पिरसी थिअरीजनाही स्पष्ट नाकारलं जात नाही.

शरद पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसनं शिवसेना संपवली का?

बंडखोर आमदारांचा एक दावा सतत आहे की शरद पवार आणि राष्ट्र्रवादी सेना संपवण्याचा प्रयत्न करत होती. संजय राऊत ठाकरेंना हा प्रश्न थेट विचारतात. पण उद्धव केवळ त्याला एक मोघम उत्तर देतात. 'मग जे आता गावागावत दिसतं आहे ते काय आहे' असा एक उत्तरादाखल प्रतिप्रश्न ते करतात.

पण शरद पवारांवर या मुलाखतीत विस्तारानं उद्धव बोलत नाहीत. त्याचं कारण काय, ते त्यांनी टाळलं का हे समजत नाही, पण प्रश्न जरुर पडतात. शरद पवार आणि सेनेबद्दलचे अनेक दावे सेना आमदारांनी केले आहेत, पण त्याचे निराकरण उद्धव या मुलाखतीत करत नाहीत. पण 'जवळच्या लोकांनी दगा केला आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी शेवटपर्यंत सोबत राहिली' हे मात्र सांगतात.

निधी वाटपाबद्दल त्यांच्यावर करण्यात येणा-या आरोपांनाही उद्धव उत्तर देतात. मी अजित पवार, प्रशासनातले अधिकारी आणि आमदारांना घेऊन प्रश्न कसे सोडवायला सुरुवात केली होती आणि आमदारही त्याबद्दल समाधानी होते हे दावा उद्धव करतात. त्यातूनच पुढे 'सत्तेची लालसा' हीच बंडामागची कारण असल्याचं त्यांचं प्रतिपादन आहे.

पुढे काय?

उद्धव विरोधकांचं एकत्रिकरण, लोकशाहीची आवश्यकता या सगळ्यावर बोलतात, पण सेना आता राजकीयदृष्ट्या पुढे काय करणार याबद्दल मात्र सांगत नाहीत. विरोधकांनी एकजूट दाखवली पाहिजे असतांना ते स्वत: अजून 'महाविकास आघाडी'त आहेत का, 'यूपीए'मध्ये जाणार का, नवी युती-आघाडी करणार का याबद्दल स्पष्ट बोलत नाहीत. अर्थात सेनेसमोरची पक्ष वाचवण्याची लढाई आता महत्वाची आहे, पण संदिग्धता कायम राहते.

पहिल्या भागात आणि दुस-याही ते भाजपावर टीका करतात आणि सेना त्यांना संपवायची आहे असा आरोप करतात. पण एका प्रश्नाच्या उत्तरात 'देशात अजूनही हुकुमशाही आली आहे असं मी म्हणणार नाही, पण अनेक जण तिकडेच वाटचाल सुरू असल्याचं म्हणत आहेत' असं विधान करून नेमकं काय म्हणत आहेत?

देवेंद्र फडणवीसांवरही त्यांचं उपमुख्यमंत्रिपद हे 'उपरवाले की मेहरबानी' अशी शाब्दिक कोटी करतात, पण जशी शिंदेंवर टीका करतात, तशी फडणवीसांवर करत नाहीत. यामागे उद्धव ठाकरे यांचा काही उद्देश आहे का?

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

शेवटी ते म्हणतात की मी ऑगस्ट पासून महाराष्ट्र दौरा करणार आहे, पण मनात मुंबई आहे हे स्पष्ट आहे. मुंबई शिवसेना आणि मराठी माणसाच्या हातून काढून घ्यायची आहे अशा आशयाचा आरोप ते करतात. पण मुंबईच्या प्रश्नावर मुलाखतीचा शेवट करतांना ठाकरेंचा नजिकच्या भविष्यातला रोख स्पष्ट आहे.

एकंदरीत या पूर्ण मुलाखतीमधून उद्धव नवं काही समोर आणत नाहीत, मात्र बंडखोरांवरची त्यांची टीका अधिक तीव्र करतात. आपला शिवसेनेवरचा दावा अधिक अधोरेखित करतात. बंडखोरांचे दावे खोडून काढतांना त्यामागचं राजकारण आणि सेना संपवण्याची वृत्ती आपल्या शिवसैनिकांपर्यंत आणि मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. ते मुलाखतीत तरी अवस्थ दिसत नाहीत, पण भावनिक विधानं करुन त्यांच्यासमोरचा संघर्ष कसा हेदेखील मान्य करतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)