एकनाथ शिंदे : 'धर्मवीर' हा चित्रपट त्यांची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न होता का?

फोटो स्रोत, facebook
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी
'साहेब फायरिंग होण्याची शक्यता आहे. हे सगळं हँडल करायला कोणीतरी येड्या खोपड्याचा लागेल.'
'येडी खोपडी काय कमी आहेत का माझ्याकडे.'
'एकनाथ कुठाय?'
मग ऐकू येते वाघाची डरकाळी…
आणि मग बुलेटवर एंट्री होते, कडक इस्त्रीचं शर्ट घातलेल्या आणि कपाळावर मोठ्ठा कुंकवाचा टिळा लावलेल्या तरुणाची.
'पुढे याच तरुणाला तुम्हाला सॅल्युट ठोकावा लागेल,' अशी भविष्यवाणी देखील करतात.
हे डायलॉग आहेत नुकताच हिट झालेल्या 'धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे' चित्रपटातला.

फोटो स्रोत, facebook
प्रसंग असतो की ठाण्यात डान्सबारचा सुळसुळाट झालेला आहे. त्यामुळे लोकांना फार त्रास सहन करावा लागतो. पण डान्स बार मालकाच्या लॉबीला भिडणारा माणूस कोण? त्यासाठी एखादा निधड्या छातीचाच माणूस हवा ना.
तर हा माणूस असतो एकनाथ.
तर हा एकनाथ म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून ज्यांनी आज महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून टाकले आहे, तेच ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडीचे आमदार एकनाथ शिंदे.
धर्मवीर चित्रपटात एकनाथ शिंदे हे तरुण वयातील दाखवले आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेबांसोबत सावलीप्रमाणे राहणारे, पडेल तो शब्द फुलासारखा झेलणारे, आपल्या गुरूला चाफा आवडतो म्हणून त्याची माळ आपल्या हातानी गुंफणारे, आणि प्रसंगी कठोर होऊन न्यायासाठी धर्मदंड उचलणारे, म्हणजे थोडक्यात एक आयडियल शिवसैनिक…जो प्रसंगी मेणाहून मऊ आणि वज्राहून कठोर असा एकनाथ या चित्रपटात पाहायला मिळतो.

फोटो स्रोत, facebook
चित्रपटाच्या सुरुवातीलाच लिहिले आहे की, काही घटनांचे हे नाटकीय रुपांतर आहे. म्हणजे जर तशी प्रतिमा दिसलीच तर ती डायरेक्टरच्या डोक्यातून आलेली आहे असं निर्मात्यांचं म्हणणं आहे पण कोणतीही कला राजकारणापासून दूर राहू शकत नाही आणि मग राजकीय विषयावरचाच चित्रपट या नियमाला कसा अपवाद ठरू शकतो हे देखील समजू शकणार नाही.
आता सध्याच्या राजकीय घडामोडींवर जर हा चित्रपट पाहिला तर एक गोष्ट मनात येते की या चित्रपटाच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंची प्रतिमा उंच करण्याचा तर प्रयत्न झाला नाही ना?
याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आपण या लेखातून प्रयत्न करणार आहोत.
दिघे आणि शिंदेंचं नातं
आनंद दिघे हे आपल्यासोबतच्या शिवसैनिकांना मुलाप्रमाणे वागवत असत, ठाण्यातील अनेक पत्रकार आणि जुने शिवसैनिक याची साक्ष देतात.
एकनाथ शिंदेच काय तर ठाण्यातील इतर नेते राजन विचारे, रवी फाटक, प्रकाश परांजपे यांना देखील त्यांनी त्याच प्रकारे वागवले असेल यावर शंका घेण्याचे काम आणि औचित्य दोन्ही नाही.

फोटो स्रोत, facebook
फक्त प्रश्न पडतो की धर्मवीरमध्ये एकनाथ शिंदेंचे पात्र जे की दातेनी साकारले आहे ते साइड हिरोसारखे का वाटते?
हा चित्रपट प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न आहे का?
थिंक बँक या यूट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ पत्रकार संजय आवटेंनी धर्मवीर चित्रपटाबद्दल आपलं मत मांडलं. त्यात संजय आवटे म्हणतात, "सांस्कृतिक भुयारातून राजकारण चालतं."
"सध्या सुरू असलेल्या घडामोडी घडणार हे लक्षात घेऊनच हा चित्रपट तयार केला गेला असेल असं मला वाटतं. कारण मध्येच कुठलेच कारण नसताना धर्मवीर सिनेमा येणं, ज्या प्रकारे त्यात एकनाथ शिंदेंचा उल्लेख येतो, ज्या प्रकारे या चित्रपटाचं मार्केटिंग झालं ते याला पुरकच आहे. आता खरा धर्मवीर हा आहे. आणि मला काहीतरी वारसा आहे. मी उगाच काही फुटणारा माणूस नाही. या फुटीला नैतिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नाव धर्मवीर सेना असल्यास नवल वाटायला नको," असं संजय आवटे सांगतात.
'घटना घडल्यावर पाहायचा दृष्टिकोन बदलतो'
धर्मवीर चित्रपट टीव्हीवर दाखवला जाणं आणि नंतर एकनाथ शिंदेंचे बंड होणे हा योगायोग आहे. घटना घडल्यावर एखाद्या कलाकृतीबद्दलचे अर्थ कालांतराने बदलतात, असं मत ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केलं.
दिलीप ठाकूर सांगतात, "सुरुवातीला जेव्हा शोले आला तेव्हा गब्बरची सर्वांना भीती वाटत होती. नंतर गब्बर लोकप्रिय झाला आणि त्याचं आकर्षण वाटू लागल्यावर अमिताभ, संजीव कुमार म्हणू लागले की हा रोल आम्हाला करायचा होता, तसं देखील असू शकतं."
चित्रपटाच्या निर्मिती मूल्याबद्दल ठाकूर सांगतात की "धर्मवीर हा काही टिपिकल प्रोपगंडा चित्रपट वाटत नाही. त्यात मनोरंजनासाठी आवश्यक घटक आहेत. चित्रपटाची कथा, संवाद, गाणी, तंत्रज्ञान यावर देखील चित्रपट कुठेच कमी पडत नाही. धर्मवीरमध्ये एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे हे यांचे नाते अत्यंत जवळचे दाखवले आहे पण ते वास्तव आहे, त्यावर हरकत असण्याचे काम नाही."

फोटो स्रोत, facebook
"सिनेमाच्या प्रमोशनवेळी एकनाथ शिंदे आपल्याला दिसले. एकनाथ शिंदेंच्या पाठिंब्यावरच हा चित्रपट झळकला. या गोष्टींमुळे देखील आपल्याला वाटू शकतं की एकनाथ शिंदेंनी हे स्वतःची प्रतिमा दाखवण्यासाठी केलं आहे पण हा केवळ योगायोग असू शकतो असं मला वाटतं," असं ठाकूर सांगतात.
"चित्रपटात अनेक उत्तरं मिळत नाही. की आनंद दिघे कुठून आले. ते पात्र जो विचार करतं तसा विचार का केला जातो. त्याला एक मर्यादा आहेतच पण तरीदेखील असं सांगावंसं वाटतं की हा एखादा टिपिकल सॉफ्ट चरित्रपट नाही तर आनंद दिघे हे किती फिअर्स होते हे दाखवणारा व्यावसायिक चित्रपट आहे. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूच्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या देखील हिरोसारख्याच वाटतात," असं ठाकूर स्पष्ट करतात.
चित्रपटाच्या शेवटीला एक प्रसंग आहे. आनंद दिघे यांचे निधन होते. त्यांच्यासाठी पिंडदान सुरू असते पण काही केल्या कावळा त्या पिंडाला स्पर्श करत नाही. वर असंख्य कावळे घिरट्या मारत आहेत पण कावळा पिंडाला स्पर्श करण्यास तयार नाही.
आनंद दिघेंच्या जवळील सर्व लोक पुढे येतात आणि प्रार्थना करतात. पण कावळा काही स्पर्श करत नाही. शेवटी एकनाथ शिंदे येतात आणि ते आकाशाकडे पाहून प्रार्थना करतात आणि अनेक कावळे खाली उतरतात.
हा प्रसंग सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. या प्रसंगातून आनंद दिघेंनी आपला राजकीय वारस म्हणून एकनाथ शिंदेंनाच निवडलं असं देखील लोक म्हणत आहे तर काही लोक पुन्हा म्हणतील की 'अरे हा निव्वळ पिक्चर आहे किती सांगावं.'
मला ते पटतं पण पुन्हा एका कृष्णवर्णीय नाटककार ऑगस्ट विल्सनचं वाक्य आठवतं.
हे विल्सन अमेरिकेतील कृष्णवर्णीय समुदायातील नाटककारांपैकी आहेत आणि आपल्या निर्भिड मतासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांनी लिहिलेल्या नाटकांवर आता सध्या हॉलिवूडमध्ये असलेल्या बड्या कलाकारांनी काम केलं आहे. ते म्हणतात, 'All art is political in the sense that it serves someone's politics.'
म्हणजे 'सर्व कला या अर्थाने राजकीय असतात की त्या कुणाच्या ना कुणाच्या राजकारणाला पूरक असतात.'
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








