तोतयाचे बंडः नाना फडणवीसांनी जेव्हा महाराष्ट्रातलं 'तोतयाचं बंड' मोडून काढलं होतं...

    • Author, ओंकार करंबेळकर,
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

राजकीय बंड, राज्य करणाऱ्यांना सत्ताच्युत करुन स्वतः सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हा काही प्रकार सध्या सुरू झालेला नाही.

जगभरात, भारतात आणि महाराष्ट्रातही असे प्रकार आजवर झालेले आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात असे प्रकार झालेले दिसून येतात.

अशाच एका बंडाची गोष्ट आपण येथे पाहाणार आहोत.

राजकीय बंडांमध्ये आम्ही जास्त बलवान आहोत सत्ता आम्हीच सांभाळू शकतो असं सांगून सत्ता मिळवण्याचे प्रकार होतात. परंतु मी राजासारखा दिसतो, मीच खरा आहे असं सांगून कोणी बंड करत असेल तर किती गोंधळ उडाला असेल? तसेच या तोतया व्यक्तीवर विश्वास ठेवून किंवा सध्याच्या सत्ताधाऱ्याला विरोध करण्यासाठी त्याला राज्यातलेच लोक मदत करत असतील तर किती संशयाचं वातावरण निर्माण झालं असेल? ही अशीच स्थिती महाराष्ट्रात तयार झाली होती.

पानिपतच्या युद्धामुळे तयार झालेला कोलाहल

1761 साली पानिपतच्या युद्धात पराभव झाल्यावर महाराष्ट्रावर दुःखाची काजळी तयार झाली.

पानपतावर फौजेचं, संपत्तीचं नुकसान झालंच त्याहून अनेक वीर कामी आले होते. याचा नानासाहेबांना मोठा धक्का बसला. त्यांचा मोठा मुलगा विश्वासराव यांचेही रणक्षेत्रावर प्राण गेले.

नानासाहेबांसारख्या मुत्सद्दी आणि धडाडीच्या पेशव्यांना पानिपतच्या युद्धाने जबर धक्का दिला.

त्याच वर्षी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. त्यांच्यानंतर माधवराव पेशव्यांकडे पेशवेपद आलं.

माधवराव पेशव्यांना पेशवेपद मिळालं खरं पण त्यांना चहुबाजूंनी संकटांचा सामना करावा लागला.

एकीकडे निजामाच्या आक्रमणांना तोंड द्यायचं, पानिपतावर झालेली हानी भरुन काढायची, दुसरीकडे घरातल्या तंट्यांचा सामना त्यांना करायचा होता.

राघोबादादांनी पेशवेपदासाठी हालचाली सुरू होत्या. माधवराव एरव्ही शांत सहनशील स्वभावाचे मानले जात असले तरी राघोबादादांना त्यांनी एकदा जबरदस्त धडा शिकवला.

सतत राज्यात वाटा मागणाऱ्या राघोबांना माधवरावांनी आधी घोडपच्या किल्ल्यावर आणि नंतर शनिवारवाड्यात ठेवले. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम नाना फडणवीसांना दिलं होतं. इतका कडक बंदोबस्त असला तरी राघोबांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.

तेव्हा माधवरावांनी पुन्हा कडक बंदोबस्तात त्यांना ठेवलं. त्यांना पळून जायला मदत करणाऱ्यांना कडक शासन केलं होतं. त्यांचा पत्रव्यवहारही जप्त केला होता.

या घरात सतत होणाऱ्या बंडाबरोबर त्यांना एका मोठ्या बंडाचा सामना करावा लागला. हे बंड म्हणजेच महाराष्ट्रात गाजलेलं 'तोतयाचं बंड'.

हे बंड मोडून काढण्यासाठी नाना फडणवीसांनी अथक प्रयत्न केले होते.

साम्राज्याला निर्माण झालेली डोकेदुखी त्यांनी कधी बुद्धीचातुर्यावर, कधी फौजेच्या ताकदीवर तर कधी कुशल राजकारणाच्या जोरावर त्यांनी दूर केली होती.

तोतयाचं बंड

माधवरावांच्या काळात सदाशिवराव भाऊंसारखा दिसणारा एक माणूस पुण्यात उगवला. मीच सदाशिवरावभाऊ असल्याची आवई त्यानं उठवली. त्यावर काही लोकांचा विश्वासही बसला.

वास्तविक सदाशिवराव भाऊंचा पानिपतच्या युद्धात मृत्यू झाल्याचा उल्लेख व्यवस्थित करण्यात आला होता. काशीराजने "… महतायासे श्रीमंत भाऊसो व श्रीमंत रावसो (विश्वासराव) यांची शवें रणांगणीहून आणून ब्राह्मण मंडळीचे सहित चंदनादि उपचारे संस्कार… येथविधी जाला." असा उल्लेख केला होता.

अखेर चौकशीअंती तो सुखलाल नावाचा कनोजी ब्राह्मण असल्याचं सिद्ध झालं होतं. नाना फडणवीसांनी त्याला उचलून थेट रत्नागिरी किल्ल्यावर डांबलं होतं.

याच तोतयानं सवाई माधवरावांच्या काळात पुन्हा तोंड वर काढलं. रत्नागिरीच्या किल्लेदार रामचंद्र नाईक परांजप्यांनी त्याची मुक्तता केली. तोतया सुखलालला पाठिंबा द्यायला स्वराज्याचे अनेक शत्रू तयार झाले. तसेच पेशव्यांचे अनेक नातेवाईक, सरदार मंडळी आणि आरमारातील लोकही सामील झाले.

शक्ती वाढवत तो पुण्याच्या दिशेने कूच करु लागला. हे पाहून त्याच्याशी लढाई करण्यात आली. त्यातून पळून जाताना आंग्र्यांनी त्याला पकडून पेशव्यांच्या स्वाधिन केलं.

पुण्यात त्याची पुन्हा चौकशी करुन त्याला देहांत प्रायश्चित्त देण्यात आलं. त्याला एकदा शिक्षा दिल्यावर मात्र नानांनी बंडात सामील असणाऱ्या सर्वांची हजेरी घेतली. सर्वांना प्रायश्चित्त दिलं. दंड केले अनेकांना अटकही केली.

सुखलालच्या देहांताचं वर्णन, "गाड्यावर घालून बाजारांत फिरविला, ज्यास ज्यास संशय राहिले होते त्यांस त्यांस दाखविले. शेवटी उंटावर बसवून फिरवला. आणि चार घटका दिवसास मेखसूने डोके फोडून मारला" असं करण्यात आलं आहे.

भाऊ अजूनही जिवंत आहेत आणि सुखलालच भाऊ आहे असं कळत-नकळतपणे समजणाऱ्या प्रत्येकाला दाखवून मगच शिक्षा देण्यात आली होती.

संशय निर्माण करणाऱ्या प्रकरणावर नाना फडणवीसांनी अशाप्रकारे कायमची फुली मारुन टाकली.

त्यामुळे पुण्यातलं वातावरणही शांत झालं आणि सुखलालला मदत करणाऱ्यांचंही तोंड बंद झालं.

या बंडामुळे थोडा काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. सदाशिवरावभाऊंच्या पत्नी पार्वतीबाई यांचाही यावर विश्वास बसला होता.

सुखलालच्या कबुलीजबाबानंतरही त्यांनी सौभाग्यचिन्हं सोडली नव्हती. नाना फडणवीसांनी भ्रमाचा पूर्ण निरास केल्यानंतर त्यांनी सौभाग्यचिन्हाचा त्याग केला.

हरियाणातले सदाशिवरावभाऊ

सदाशिवरावभाऊ पानिपतच्या युद्धानंतरही जिवंत होते असं हरियाणातल्या एका गावातल्या लोकांना वाटतं.

गावातल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, अखेर 22 जानेवारी 1761 रोजी म्हणजे पानपितपच्या युद्धानंतर आठ दिवसांनी सदाशिवराव भाऊ सांघी गावात पोहोचले. इथे त्यांना गावकऱ्यांनी आसरा दिला, असं गावातले लोक सांगतात.

या गावकऱ्यांच्या समजुतीप्रमाणे सदाशिवराव भाऊंनी 1761मध्येच नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. त्यासाठी ते कुरुक्षेत्राजवळच्या पेहोवा इथल्या श्रवणनाथ धाम इथे गेले होते. तिथे त्यांनी गुरू गरीब नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धी प्राप्त केली.

त्यानंतर ते पुन्हा सांघी गावात आले. 1764मध्ये त्यांनी रोहिला पठाणांच्या लुटीपासून गावाला वाचवण्यासाठी गावातल्या तरुण मुलांची फौजही बांधली. गावाभोवती खंदक खोदून त्यांनी या पठाणांचा बंदोबस्त केला. या पठाणांशी झालेल्या लढाईत त्यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी विजय मिळवला, असं त्यांना वाटतं.

या चकमकीनंतर भाऊ नाथ यांनी या ठिकाणीच समाधी घेतली. तेव्हापासून त्यांचे शिष्य या मठाची देखभाल करत आहेत. ही शिष्य परंपरा अजूनही सुरू आहे.

पेशवाईतील इतर कुरबुरी आणि नाना फडणवीस

पानिपतच्या युद्धानंतर पेशवाईमध्ये अनेकदा गृहकलह झालेला दिसतो. राघोबादादांची पेशवेपदाची लालसा आणि नाना फडणवीसाचं मुत्सद्दीपण यात सतत लढाई झालेली दिसते.

राज्यकारभाराची सगळी घडी बसल्यानंतर आता काही हितशत्रूंनी नानांविरोधात दुसऱ्या बाजीरावाला म्हणजे राघोबादादांच्या मुलाला तयार केले. तसेच सवाई माधवरावांच्या मनातही त्याच्याबद्दल आपुलकी निर्माण होईल अशी व्यवस्था केली.

सवाई माधवराव आणि दुसरे बाजीराव यांच्यामध्ये पत्रव्यवहार सुरू झाला. पण नानांच्या तात्काळ लक्षात आल्यावर त्यांनी पेशव्यांना खडसावलं आणि बाजीरावाला कैदेत ठेवलं. ही गोष्ट पेशव्यांच्या मनाला लागली असं मानलं जातं.

ढासळललेली तब्येत आणि तापाच्या भरात त्यांनी कवाड उघडून शनिवारवाड्यातल्या कारंजावर उडी मारली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या मृत्यूलाही काही लोक नानांना जबाबदार धरतात.

दुसरे बाजीराव

सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर राघोबांच्या दुसऱ्या बाजीरावाला पेशवेपद मिळू नये यासाठी नानांनी आटोकाट प्रयत्न केले. सर्वांना एकत्र करुन दुसऱ्या बाजीरावाऐवजी पेशवेपदावर पेशव्यांच्या नातलगांमधील कोणी मुलगा दत्तक घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू केले. पण त्याला यश आले नाही.

शेवटी त्यांनी राघोबांचा दुसरा मुलगा चिमणाजीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतले. पण अनेक हिकमतीने दुसऱ्या बाजीरावाने पेशवेपद मिळवलेच. चिमणाजीचं दत्तक विधान रद्द करवलं. दुसऱ्या बाजीरावाला नानांनी नाईलाजानं परवानगी दिली. दुसऱ्या बाजीरावानं पेशवा होताच वर्षभरासाठी नाना फडणवीसांनाच नगरला कारागृहात टाकलं.

दुसऱ्या बाजीरावांच्या काळात नाना फडणवीस यांच्या कारकिर्दीचा अस्त झाला. अनेक दशकं राजकारणावर प्रभाव असणाऱ्या नानांना बाजूला करायला दुसरे बाजीराव प्रयत्न करत होते.

'कंपनी सरकार' या पुस्तकात लेखक अ. रा. कुलकर्णी लिहितात, "नाना फडणीस, पेशवा आणि शिंदे यांना इंग्रजांबरोबर भांडण उकरून काढण्याच्या त्यांच्या प्रयत्नापासून त्यांना परावृत्त करीत होता. पण नव्या पेशव्याच्या काळात नाना कवडी किमतीचा झाला होता. त्यांना नानाचा शहाणपणाचा सल्ला नको होता, तर नानाच्या गाठी असलेला पैसा हवा होता. बाजीराव 22 वर्षांचा आणि त्याचा मित्र दौलतराव 18 वर्षांचा. दोघेही अपरिपक्व आणि राजकारणात नवखे होते. अशा परिस्थितीत ते सापडले असताना त्यांना नानाचा सल्ला नकोसा झाला होता."

नगरवरून सुटका झाल्यावर काही काळातच 13 मार्च 1800 रोजी नानांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंतिम संस्काराच्यावेळेस हजारो लोक उपस्थित होते, असं अ. रा. कुलकर्णी यांनी लिहून ठेवलं आहे. त्यांच्या मृत्यूनंतर कर्नल विल्यम पामर म्हणाला, "नाना मेले, आणि त्यांबरोबरच मराठी राष्ट्रांतील शहाणपणा व नेमस्तपणाही लयाला गेला."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)