You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्रकांत पंडित आता शाहरुख खानच्या केकेआरचे प्रशिक्षक
देशातल्या अव्वल प्रशिक्षकांमध्ये गणना होणाऱ्या चंद्रकांत पंडित यांची इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेश संघाने बलाढ्य मुंबई संघाला नमवत रणजी करंडक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं होतं. पंडित मध्य प्रदेश संघाचे प्रशिक्षक होते.
रणजी करंडक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरण्याची मध्य प्रदेशची ही पहिलीच वेळ होती.
कोलकाता नाईट रायडर्स संघाचं प्रशिक्षकपद ब्रेंडन मॅक्युलम यांच्याकडे होतं. आक्रमक पवित्र्याने खेळण्यासाठी खेळाडूंना प्रेरित करणारे प्रशिक्षक अशी मॅक्युलम यांची ओळख होती. मॅक्युलम यांनी इंग्लंडच्या कसोटी संघाचं प्रशिक्षकपद स्वीकारल्याने त्यांनी कोलकाता संघाचं प्रशिक्षकपद सोडलं.
मॅक्युलम यांच्यानंतर कोलकाता संघाच्या प्रशिक्षकपदासाठी डेव्हिड हसी, अभिषेक नायर, सायमन कॅटिच यांची नावं चर्चेत होती. पण कोलकाता संघव्यवस्थापनाने पंडित यांच्या मार्गदर्शनावर विश्वास त्यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली.
"कोलकाता नाईट रायडर्स संघाचं प्रशिक्षकपद हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघ एक कुटुंब आहे. कुटुंबात असेलली मूल्यं जपली जातात असं मी ऐकलं आहे. कोलकाता हा आयपीएल स्पर्धेतील सातत्याने यशस्वी संघांपैकी एक आहे. सपोर्ट स्टाफमधील सहकारी आणि खेळाडूंच्या बरोबरीने काम करण्यासाठी मी उत्सुक आहे", असं पंडित यांनी म्हटलं आहे.
आयपीएल स्पर्धेत अनिल कुंबळे (पंजाब किंग्ज), संजय बांगर (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू), आशिष नेहरा (गुजरात टायटन्स) या भारतीय प्रशिक्षकांच्या यादीत आता पंडित यांचं नाव समाविष्ट झालं आहे.
रणजी करंडक स्पर्धेच्या 87व्या हंगामात मध्य प्रदेशने बलाढ्य मुंबईला 6 गडी राखून नमवत जेतेपदावर कब्जा केला. मुंबईने आतापर्यंत 41 वेळा रणजी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. मुंबईचा पराभव करून मध्ये प्रदेशने आपलं पहिलं विजेतेपद संपादित केल्याने हा विजय खास मानला जात आहे.
मध्य प्रदेशच्या या विजयाचे शिल्पकार ठरले मुंबईकर प्रशिक्षक चंद्रकांत पंडित. पंडित सरांनी संघाचं प्रशिक्षकपद स्वीकारलं की त्यांच्या मिडास स्पर्शाने तो संघ जेतेपद पटकावतो अशी अद्भुत कामगिरी त्यांच्या नावावर आहे.
मध्य प्रदेशचा संघ अनेक दशकं रणजी करंडक स्पर्धेत खेळत आहे. पण यंदा पहिल्यांदा त्यांनी जेतेपदावर नाव पक्कं केलं. भारतासाठी 5 टेस्ट आणि 36 वनडे खेळलेल्या पंडित यांचं नाव देशातल्या सर्वोत्तम प्रशिक्षकांमध्ये घेतलं जातं.
खेळाडू म्हणून मैदानातून निवृत्त झाल्यानंतर पंडित यांनी प्रशिक्षणात अढळ स्थान निर्माण केलं आहे. लष्करी खाक्याच्या शिस्तीसाठी ओळखले जाणाऱ्या चंदू सरांनी पुन्हा एकदा संघाला जेतेपद मिळवून दिलं आहे. मुंबई क्रिकेटमधील ज्येष्ठ प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे शिष्य असलेल्या पंडित सरांनी प्रशिक्षणाची पताका फडकावत ठेवली आहे.
2002-03 हंगामात पंडित मुंबईचे प्रशिक्षक झाले. मुंबईने पारस म्हांब्रेच्या नेतृत्वात जेतेपद पटकावलं. 2003-04 हंगामातही मुंबईने जेतेपदावर नाव कोरलं, तेव्हाही पंडित प्रशिक्षक होते.
राजस्थानने सलग दोनदा रणजी करंडक स्पर्धेचं जेतेपद जिंकलं. दुसऱ्या वर्षी पंडित राजस्थानचे डिरेक्टर ऑफ क्रिकेट होते. त्यांनी केरळ संघालाही मार्गदर्शन केलं. केरळ संघाने रणजी स्पर्धेच्या सेमी फायनलपर्यंत मजल मारली.
त्यानंतर पंडित पुन्हा मुंबईत परतले. प्रशिक्षकपदाच्या बरोबरीने ते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी इथल्या इन्डोअर अकादमीचे प्रमुखही होते. अशी दुहेरी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. 2015-16 मध्ये मुंबईने रणजीच्या जेतेपदावर नाव कोरलं. 2016-17 हंगामात पंडित यांच्या मार्गदर्शनात मुंबईने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.
त्यानंतर 2017-18 आणि 2018-19 या दोन हंगामात पंडित विदर्भ संघाचे प्रशिक्षक झाले. गुणवान पण दुर्लक्षित अशा विदर्भ संघाने सलग दोनदा रणजी स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं ते पंडित यांच्या मार्गदर्शनात.
2020 मध्ये पंडित यांनी मध्य प्रदेश संघाची सूत्रं स्वीकारली. मध्य प्रदेश संघाने रणजी करंडक स्पर्धेची अंतिम फेरी 1999-2000 साली खेळली होती. तेव्हा पंडित मध्य प्रदेशचे कर्णधार होते. त्या सामन्यात मध्य प्रदेशचा निसटता पराभव झाला.
मध्य प्रदेश आणि पंडित यांची पार्टनरशिप
मध्य प्रदेश आणि चंद्रकांत पंडित यांच्या पार्टनरशिपला आलेलं यश झटपट मिळालेलं नाही. मध्य प्रदेशचा संघ सातत्याने गेली अनेक दशकं डोमेस्टिक क्रिकेटचा भाग आहे. त्यांच्याकडे गुणवान खेळाडूही आहेत.
पंडित सरांनी हे हेरलं. 2020मध्ये मध्य प्रदेशचं प्रशिक्षकपद हाती घेतलेल्या पंडित सरांनी चारशेपेक्षा जास्त कॅम्प आयोजित करून राज्य पिंजून काढलं. या कॅम्पमधून त्यांनी होतकरू चांगल्या खेळाडूंची फौज टिपली. विविध वयोगटातल्या खेळाडूंचा या कॅम्पमध्ये समावेश होता. एकावेळी दीडशे खेळाडू पंडित सरांच्या मार्गदर्शनाखाली खेळत होते. प्रचंड मेहनत आणि शिस्त यावर त्यांनी भर दिला.
न्यू इंडियन एक्स्प्रेसने पंडित यांच्या अनोख्या प्रशिक्षण शैलीविषयी सविस्तर लिहिलं आहे. ऑन द स्पॉट कोचिंग, मायक्रोफोनच्या माध्यमातून खेळाडूला मार्गदर्शन यासारख्या क्लृप्त्या त्यांनी वापरल्या. कृत्रिम प्रकाशात खेळण्याची सवय व्हावी यासाठी खेळाडूंना सूचना न देता रात्री सरावासाठी बोलावलं. रात्रीच्या वेळी त्यांचं शरीर कसा प्रतिसाद देतं ते बघितलं. शिस्त अंगी बाणण्यासाठी त्यांनी भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांचं सत्र आयोजित केलं. प्रत्येक खेळाडू, त्याची शक्तिस्थळं, कच्चेदुवे असा आराखडा तयार केला.
मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनने पंडित सरांना सर्वतोपरी मदत देऊ केली. त्यांनी जिमचं नूतनीकरण केलं. इन्डोअर अकादमीमध्ये आवश्यक बदल केले. पंडित सरांना संघाची मोट बांधता यावी यासाठी संघटनेने कंबर कसली.
असंख्य खेळाडूंना घडवल्यामुळे पंडित सरांना खेळाडू नक्की काय करू शकतो हे लगेचच लक्षात येतं. यंदाच्या हंगामापूर्वी त्यांनी यश दुबेला या बॅट्समनला सलामीला पाठवण्याचा प्रयोग केला. यश याआधी कधीच सलामीला आला नव्हता.
मध्य प्रदेशकडे सलामीवीर होते पण त्यांच्या कामगिरीवर पंडित सर समाधानी नव्हते. नवीन चेंडूचा चांगल्या पद्धतीने सामना करू शकण्याची यशची क्षमता त्यांनी हेरली. यशला सलामीला पाठवण्याचा पंडित सरांचा निर्णय मध्य प्रदेशसाठी फलदायी ठरला.
अशोक मंकड यांच्याकडून प्रशिक्षणातील अनेक गोष्टी शिकलो असं पंडित सर सांगतात. "23 वर्षांपूर्वी मध्य प्रदेशचा संघ इतिहास रचण्याच्या अगदी समीप होता पण आम्ही पराभूत झालो. हा विजय माझ्यासाठी एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखा आशीर्वाद आहे. हे जेतेपद खास आणि भावुक करणारं आहे. एक अधुरं स्वप्न पूर्ण करणारा विजय आहे. माझ्याकडे आणखीही काही प्रस्ताव होते पण मी मध्य प्रदेश संघटनेने दिलेला प्रस्ताव स्वीकारला. मध्य प्रदेशकडे गुणवान खेळाडू होते, आहेत. ही गुणवत्ता योग्य पद्धतीने विकसित करणं आवश्यक आहे", असं त्यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)