You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
क्रिकेट श्रीलंकेचं आर्थिक संकट तारणार?
अभूतपूर्व अशा आर्थिक संकटाने वेढलेल्या श्रीलंकेत परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणजे क्रिकेटच्या माध्यमातून कोसळलेला आर्थिक डोलारा नीट करण्यासाठी आखणी केली जात आहे.
आर्थिक संकटात असतानाही ऑस्ट्रेलियाने हा दौरा रद्द केला नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ या दौऱ्यात 3 ट्वेन्टी20, 5 वनडे आणि 2 टेस्ट खेळणार आहे. सतत होणारी आंदोलनं आणि वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे या दौऱ्यातील डे-नाईट सामन्यांच्या आयोजनाबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तिकीटविक्रीच्या माध्यमातून जो पैसा उभा राहील तो सरकारला दिला जाईल जेणेकरून आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी थोडा हातभार लागेल. क्रीडामंत्री रोशन रणसिंघे यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाला यासंदर्भात विनंती केली होती.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने याआधीच 2 दशलक्ष डॉलर्स रुपयांची मदत श्रीलंका सरकारला केली आहे. कोलंबोतील रुग्णालयांना औषधं घेण्यासाठी ही रक्कम उपयोगात आणली जाणार आहे.
श्रीलंकेत निर्माण झालेल्या संकटामुळे इंधन, स्वयंपाकाचा गॅस, दूध, औषधं तसंच अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना सर्वप्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केलं. यामुळे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर रनिल विक्रमसिंघे हे नवे पंतप्रधान बनले.
मागणी घटल्यामुळे अनेक व्यवसाय बंद झाले आहेत, हजारो जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.
मार्च महिन्यापासून देशभरात हिंसाचाराच्या घटना सुरू आहेत. सरकारसमर्थक आणि आंदोलक यांच्यामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये नऊजणांचा मृत्यू झाला आहे तर तीनशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
ऑस्ट्रेलिया संघ या दौऱ्यावर येणार का याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी श्रीलंकेत जाण्यासंदर्भात विचारविनिमय केला. श्रीलंकेतील जनता महागाईने होरपळली आहे. दैनंदिन गोष्टी मिळवण्यासाठीही त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. अशा वातावरणात दौरा करावा का असा विचार ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी केला. मात्र हा दौरा श्रीलंकेसाठी वरदान ठरू शकतो हे लक्षात आल्यानंतर त्यांनी श्रीलंकेला जाण्याचा निर्णय घेतला.
कोरोना काळात नियमांमुळे रिकाम्या स्टेडियममध्ये सामने खेळवण्यात आले. परिस्थिती सुधारल्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेशाची अनुमती देण्यात आली.
शनिवारी तिकीटविक्री सुरू झाली आणि अवघ्या पाच तासात मंगळवार आणि बुधवारच्या सामन्यांच्या तिकीटं हातोहात विकली गेली.
या दौऱ्याला होकार दिल्याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियाच्या सरकारचे मनापासून आभार. श्रीलंकेत आर्थिक संकटामुळे परिस्थिती अवघड असतानाही त्यांनी दौऱ्यावर यायचं ठरवलं असं श्रीलंका क्रिकेटचे सचिव मोहन डिसिल्व्हा यांनी सांगितलं.
आमच्या दौऱ्याने श्रीलंकेच्या नागरिकांच्या हालअपेष्टा थोड्या कमी झाल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं तर आम्हाला आनंद होईल असं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने म्हटलं आहे.
"आम्ही इथे सर्वोत्तम क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहोत. 2016 नंतर पहिल्यांदाच आम्ही श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहोत. सहा वर्ष हा खूपच मोठा कालावधी आहे. श्रीलंकेत खेळणं नेहमीच खास असतं. श्रीलंकेच्या क्रिकेटप्रेमींकडून मिळणारं प्रेम, आदरातिथ्य भारावून टाकणारं असतं. खेळाप्रती त्यांचं असलेलं प्रेम अविश्वसनीय आहे", असं फिंचने सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)