You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी यांनी आईचे पाय धुवून घेतला आशीर्वाद, फोटो पोस्ट करत म्हणाले...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आई हीराबेन मोदी यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त गुजरातची राजधानी गांधीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, पंतप्रधान मोदी यांची आई हीराबेन मोदी शनिवारी त्यांच्या आयुष्याच्या 100 व्या वर्षात प्रवेश करत आहेत.
या निमित्ताने मोदी यांनी आज सकाळी गुजरातमधील त्यांच्या निवासस्थानी जाऊन आपल्या आईचे पाय धुतले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.
पंतप्रधान मोदींची आई हीराबेन गांधीनगरमध्ये त्यांचा धाकटा मुलगा पंकज मोदीसोबत राहतात.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सोशल मीडियावरून आपल्या या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.
"आज मी आईचे आशिर्वाद घेतले. आज ती 100 व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे," अशी कॅप्शन मोदींनी या फोटोंना दिली आहे.
आईच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांनी एक ब्लॉगही लिहिला आहे. नरेंद्र मोदी वेबसाईटवर प्रकाशित या ब्लॉगमध्ये पंतप्रधानांनी आपल्या आईविषयी अनेक आठवणी सांगितल्या आहेत. याबरोबरच मोदींनी पहिल्यांदाच आपल्या वडिलांविषयी लिहिलं आहे.
पंतप्रधान लिहितात, "आई हा एक शब्द नाही. स्नेह, धैर्य, विश्वास अशा सगळ्या भावनांचं प्रतीक म्हणजे आई. आज मी आनंदाची बातमी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो. माझी आई, हीराबा आज 18 जून रोजी शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे".
आईच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त लिहिताना पंतप्रधान मोदींनी सार्वजनिकदृष्ट्या पहिल्यांदाच वडिलांचा उल्लेख केला आहे.
ते लिहितात, "बाबा आज असते तर तेही शंभर वर्षांचे असते. 2022 असं वर्ष आहे जेव्हा माझ्या आईचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे आणि वडिलांचं जन्मशताब्दी वर्ष पूर्ण होत आहे.
आमच्याकडे वाढदिवस साजरा करण्याची परंपरा नाही. पण कुटुंबातल्या नव्या पिढीच्या लोकांनी वडिलांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 100 झाडं लावली आहेत", असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
आईवडिलांप्रति ऋण व्यक्त करताना पंतप्रधान लिहितात, "आज माझ्या आयुष्यात जे काही चांगलं आहे, माझ्या व्यक्तिमत्वात जे काही चांगलं आहे ते आईवडिलांचं आहे. आज मी दिल्लीत बसून हे लिहित असताना अनेक आठवणी दाटल्या आहेत".
आईविषयी अनेक आठवणी
पंतप्रधान लिहितात, "आईचा जन्म मेहसाणा जिल्ह्यातल्या विसनगर इथे झाला. वडनगरपासून हे गाव जवळ आहे. हीराबेन यांच्या जन्मानंतर काही दिवसातच त्यांच्या आईचं निधन झालं. शतकापूर्वी आलेल्या साथीच्या रोगामध्ये आजी गेली. माझ्या आईचं बालपण आईविना गेलं. तिला लहानपण मिळालंच नाही. आईचं शिक्षणही झालं नाही. आईने शाळेचं तोंड देखील पाहिलेलं नाही. आईने पाहिली ती फक्त गरिबी आणि घरात प्रत्येक गोष्टीचा अभाव".
आई भावंडांमध्ये सगळ्यात मोठी. तिचं लग्न झालं तेव्हा सासरी सगळ्यात मोठी सून झाली असं पंतप्रधान लिहितात.
पंतप्रधानांनी लहानपणीच्या घराविषयी लिहिलं आहे. "वडनगरजवळ आम्ही जिथे राहत होतो ते घर अतिशय लहान होतं. घराला एकही खिडकी नव्हती. घरात स्नानगृह, शौचालय नव्हतं. मातीच्या भिंती, कौलारू छप्पराचं एक-दीड खोल्यांचा ढाचा म्हणजे आमचं घर होतं. एवढ्याशा जागेतच मी, आईबाबा, भाऊबहीण राहायचे. छोट्याशा घरात आईला जेवण बनवताना त्रास कमी व्हावा यासाठी वडिलांनी फुंकणी आणि लाकडाचा चबुतरा बनवून घेतला. तेच आमचं स्वयंपाकघर होतं. आई तिथेच उभं राहून स्वयंपाक करत असे. आम्ही सगळे तिथेच बसून जेवत असू".
पंतप्रधानांनी पहिल्यांदाच आपल्या वडिलांविषयी लिहिलं आहे. पहाटे चार वाजताच बाबा उठून कामाला लागत. आईही त्याच वेळेला उठून कामाला लागत असे.
आईने केलेल्या संघर्षाविषयी पंतप्रधान लिहितात, "घर चालवण्यासाठी चार पैसे जास्त मिळावेत याकरता आई अन्य लोकांच्या घरी धुण्याभांड्याचं काम करत असे. वेळ काढून चरखाही चालवत असे. कारण त्यातून थोडे पैसे मिळत. कापूस पिंजत असे. सूत कातत असे. हे सगळं आई करत असे. आम्हाला कापसाचे काटे टोचणार नाहीत ना याची तिला काळजी असे".
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आईच्या केलेल्या पूजनासंदर्भात सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
अवंतिका चंद्रा नावाच्या यूजरने "सुंदर फोटो, देव तुमच्या आईला सदैव निरोगी आणि आनंदी ठेवो. वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा' असं लिहीत शुभेच्छा दिल्या आहेत."
गोलू सिंग या ट्विटर अकाऊंट वरून लिहिलंय, 'पहिला मुलगा आहे जो कॅमेरा शिवाय आईच्या पाया पडत नाही'.
राहिल नावाच्या ट्विटर अकाऊंट वरून लिहिलंय, "कदाचित त्यात लिहायला विसरले की मोदीजींसोबत त्यांचे फोटोग्राफरही त्यांच्या आईला भेटले."
नीतू कुमार नावाच्या युजरने फेसबुरवरील प्रतिक्रियेत म्हटलंय, "आईच्या प्रेमाचे मोल नाही. तुम्ही भाग्यवान आहात तुमच्याजवळ आई आहे. 100 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा."
नीशा जोशी नावाच्या युजरने फेसबुक कमेंट मध्ये लिहले आहे की, "आपल्या हयातीत आपल्या मुलाला देशाचे प्रमुख म्हणून पाहणे हा त्यांच्यासाठी अभिमानाचा क्षण असावा. हा सुवर्णकाळ पाहण्यासाठी तिने शंभराव्या वर्षात प्रवेश केला. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)