1 कोटीच्या विम्यासाठी पतीची सुपारी देऊन हत्या, अपघाताचा बनाव फसला

पैशासाठी एखाद्या व्यक्तीची हत्या करण्याच्या अनेक बातम्या आपल्या वाचण्यात आल्या असतील. पण पत्नीनेच आपल्या पतीची सुपारी देऊन हत्या करवून घेतल्याची बातमी कदाचितच तुमच्या वाचण्यात आली असेल.

केवळ हत्याच नाही तर अपघाताचा बनाव करून पतीच्या नावे असलेली विम्याची रक्कम उकळण्याचा देखील प्रयत्न केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी या घटनेतील आरोपींना काही तासांतच बेड्या ठोकल्या आहेत.

बीड येथे राहत असलेल्या मंचक पवार यांच्या नावे 1 कोटी रुपयांचा विमा होता. जर मंचक यांचा मृत्यू झाला तर आपल्याला ही रक्कम मिळणार या हेतूने मंचक यांची पत्नी गंगाबाई पवार ( वय वर्षं 37) यांनी सुपारी दिली.

गंगाबाई यांनी श्रीकृष्ण बागलाने, सोमेश्वर गव्हाणे यांना या कामासाठी 10 लाख रुपयांची सुपारी दिली. त्यांच्यासह इतरही काही लोक होते सध्या ते फरार आहेत आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

नेमकं काय झालं?

पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पोलिसांनी हा घटनाक्रम उलगडून सांगितला आहे.

11 जून रोजी बीडच्या ग्रामीण हद्दीतील पिपरगव्हाण शिवारातील म्हसोबा फाट्याजवळ एका अज्ञात इसमाचे प्रेत सापडले. याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांना प्रेताजवळ एक बिनानंबरची स्कूटी देखील मिळाली होती.

प्रेताची ओळख पटली आणि ही व्यक्ती मंचक पवार आहे असे समजल्यावर पोलीस त्यांच्या घरी पोहोचली. तिथे गेल्यावर गंगाबाई पवार यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरं मिळू लागले. नवऱ्याचा मृत्यू झाल्यावर देखील गंगाबाईंच्या चेहऱ्यावर कुठलीच प्रतिक्रिया दिसली नाही यावरून पोलिसांचा संशय बळावला.

पोलिसांनी तपास सुरूच ठेवला, पोलिसांना एक महत्त्वाची टिप मिळाली आणि या गुन्ह्यात श्रीकृष्ण बागलाने नावाची व्यक्ती संशयित आढळून आली. तेव्हा त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली. यात बागलानेनी पोलिसांनी सर्व माहिती दिली.

विम्याच्या रकमेसाठी गंगाबाई यांनीच सुपारी दिली. ही सुपारी 10 लाख रुपयांची होती आणि दोन लाख रुपये अॅडव्हान्स देण्यात आल्याचे 27 वर्षीय बागलानेनी सांगितले.

यात इतरही लोक सामील असल्याचे बागलानेनी सांगितले.

कशी झाली हत्या?

बागलाने आणि त्याच्या साथीदारांनी मंचक पवार यांची म्हसोबा फाट्याजवळ हत्या केली. आणि हा अपघात वाटावा म्हणून त्यांच्या वाहनाला आयशरने चिरडले.

बागलाने आणि इतर साथीदार मंचक पवार ज्या वाटेने येत होते त्या वाटेवर थांबले. मंचक पवार येताच त्याच्या डोक्यावर पाठीमागच्या बाजूने व्हील पान्ह्याने हल्ला केला. दोन तीन वार केल्यावर मंचक पवार बेशुद्ध पडले.

त्यांना त्याच अवस्थेत बागलाने आणि त्यांच्या साथीदारांनी म्हसोबा फाट्याजवळील रस्त्यावर स्कुटीने नेले नंतर त्याच स्कुटीवर त्यांना बसवण्यात आले आणि आयशरने त्या स्कुटीला धडक दिली.

पोलिसांनी जेव्हा घटनास्थळाची पाहणी केली तेव्हाच त्यांच्या लक्षात आले की हा अपघाताचा बनाव आहे आणि त्याचा उद्देश काय आहे हे पोलिसांनी शोधून काढले.

जेव्हा विम्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली त्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा झाला आणि पोलिसांनी त्या दिशेनी तपास सुरू केला आणि गुन्ह्याचा छडा लावला, असं पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्याचा तपास झाला.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)