राज्यसभा निवडणूक निकाल: एमआयएमच्या काठीने भाजपाने शिवसेनेचा केला 'करेक्ट कार्यक्रम'?

एमआयएमच्या काठीने भाजपाने शिवसेनेचा केला 'करेक्ट कार्यक्रम'?

फोटो स्रोत, FACEBOOK/AIMIM

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

राज्यसभेच्या तीन जागा जिंकून भारतीय जनता पार्टीने फक्त आपला एक अधिकचा खासदार संसदेत पाठवलेला नाही तर आणखी अनेक गणितं जुळवलेली आहेत. या निवडणुकीसाठी तिसरा उमेदवार भाजपाने दिल्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणात वेगाने घडामोडी घडू लागल्या.

सत्ताधारी महाविकास आघाडीला त्यातही शिवसेनेला काही निर्णय घ्यावेच लागले. आता शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार म्हणजे संजय पवार यांचा पराभव स्वीकारला असला तरी पक्षाच्या आजवरच्या एका महत्त्वाच्या भूमिकेवर त्यांना तडजोड करावी लागली आहे.

महाराष्ट्राच्या किंवा भारतातील अनेक राज्यांमध्ये एमआयएम पक्षाची ताकद वाढत आहे.

विविध नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभांमध्ये या पक्षाचे सदस्य जात आहेत. दोन खासदारही लोकसभेत आहेत. पण एमआयएम पक्षाशी थेट हातमिळवणी करण्यास इतर सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्ष कचरतात.

नाही म्हणायला अमरावतीसारखी स्थानिक हातमिळवणी केली जाते. अमरावतीमध्ये स्थायी समितीमध्ये शिवसेनेने एमआयएमला मदत केली होती. परंतु राज्याच्या किंवा राष्ट्रीय पातळीवर या पक्षाच्या खांद्यावर कोणीही थेट उघडपणे हात टाकत नाही.

हा पक्ष आपल्याबरोबर घेण्यापेक्षा तो दुसऱ्या पक्षाला कशी मदत करतोय, आपला विरोधक एमआयएमबरोबर आहे अशी टीका करण्यात सर्व राजकीय पक्ष पुढे असतात. त्याचा त्यांना लाभही होत असतो.

जो एमआयएम पक्ष भाजपाची बी टीम आहे असा प्रचार शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादीकडून होत होता तोच एमआयएम पक्ष सेनेच्या जवळ बसल्याचं चित्र दाखवण्यात भाजपाला यश मिळालं आहे.

ही तडजोड म्हणजे आजवर ज्या भूमिकेची हेटाळणी केली, आतापर्यंत ज्या लोकांना एका परिघाबाहेर ठेवलं होतं त्यांच्याशी हातमिळवणी करावी लागली.

ही हातमिळवणी दुसरी जागा निवडून येण्यासाठी करावी लागली असली तरी ती करण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं त्यांना भाग पाडल्याचं दिसतं.

इम्तियाज जलील

फोटो स्रोत, Facebook/Imtiaz jaleel

गेली अनेक वर्षं कोणाचं हिंदुत्व खरं यावर भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये बेबनाव आहे. आपलंच हिंदुत्व खरं आणि दुसऱ्याचं बेगडी हे सांगण्यात दोन्ही पक्ष सतत मग्न असतात.

त्यातच मनसेचे इंजिनही हिंदुत्वाच्या रुळावर आल्य़ामुळे शिवसेनेची कोंडी होऊ लागली.

बाबरी कोणी पाडली?

आपल्या हिंदुत्वाला आव्हान देणारा एक मराठी प्रादेशिक पक्ष स्पर्धेत आला हे अस्वस्थ करणारं होतंच. त्याला जोडूनच पुढे अयोध्या दौऱ्यांचं राजकारण आणि बाबरी मशीद पाडताना नक्की कोणत्या पक्षाचे लोक उपस्थित होते हा मुद्दा पुढे आला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन नेत्यांनी आपापले पक्ष मशीद पाडण्यासाठी उपस्थित होते हे सांगितलं. मी स्वतः तेथे होतो, असं फडणवीसांनी सांगितलं तर तुम्ही असता तर तुमच्या वजनानेच मशीद पडली असती, असा टोमणाही उद्धव ठाकरे यांनी त्यांना मारला होता.

परंतु उडालेली ही सगळी ही धूळ शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उभी करणारी ठरली. सत्तेमध्ये असताना तेही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे सेक्युलर म्हटले जाणारे पक्ष बरोबर असताना शिवसेनेला एका मर्यादेपलिकडे बोलणं कठीण झालं.

आजवर घेतलेल्या प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेवर शिवसेनेनं त्याच ताकदीने बोलणं आघाडीत बेदिली माजवणारं ठरलं असतं. हिंदुत्वाच्या आजूबाजूचे असे अनेक मुद्दे या काळात आले.

  • दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरुंग सकपाळ यांनी अजान स्पर्धेचं आयोजन केलं होतं.
  • शिवशाही नावाच्या कॅलेंडरवर जनाब बाळासाहेब ठाकरे, जनाब उद्धव ठाकरे, जनाब आदित्य ठाकरे असं छापलं होतं.
  • कोरोना काळात मंदिराऐवजी मद्यालयं हा या सरकारसाठी महत्त्वाचा विषय होता अशी टीका विरोधी पक्षांनी केली.
  • राज्यपालांनीही शिवसेनेने हिंदुत्व सोडलंय का असा प्रश्न आपल्या पत्रात उपस्थित केला होता.
  • मंत्री नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध आहेत असा आऱोप भाजपा सतत करत आहेत. असा आरोप होऊन ते जेलमध्ये जाऊनही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही अशी टीका भाजपा सतत करत राहातो.

शिवसेनेच्या हिंदुत्वासंदर्भातील असे मुद्दे सतत पुढे आणले गेले.

एमआयएमची अचानक ऑफर

भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त करत एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत हातमिळवणीची तयारी दर्शवली. यामुळेही महाविकास आघाडीत त्यातही शिवसेनेत विनाकारण खळबळ उडाली. 'भाजपाला हरवण्यासाठी' असं वरवर दाखवलं जात असलं तरी हा कात्रजचा घाट असू शकतो अशी शंका शिवसेनेत निर्माण झाली.

एमआयआएमने असा न मागता अचानक पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला यावर अनेकांनी मतं व्यक्त केली. ज्येष्ठ अभ्यासक आणि पत्रकार अभय देशपांडे यांच्याशी बीबीसी मराठीने संवाद साधला होता.

तेव्हा याबद्दल ते म्हणाले होते, "औरंगाबादमध्ये एमआयएम आणि शिवसेना कायम एकमेकांचे विरोधक राहिले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीतही ते प्रमुख स्पर्धकांपैकी आहेत. शिवसेनेने धर्मनिरपेक्ष विचारधारा असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केल्यापासून विरोधकांकडून शिवसनेच्या हिंदुत्ववादावर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. त्यात एमआयएमसोबत आघाडी करण्यासाठी शिवसेना तयार आहे का अशी चर्चा घडवून जनतेमध्ये शिवसेनेच्या हिंदुत्वाबाबत संभ्रम निर्माण करायचा."

इम्तियाज जलील

फोटो स्रोत, Facebook/Imtiaz jaleel

अभय देशपांडे यांच्याप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी यांनीही यामागे हिंदू मतांमध्ये संभ्रम निर्माण करणे हे कारण असल्याची शक्यता वर्तवली होती.

यदू जोशी पुढे म्हणतात, "इम्तियाज जलील हे औरंगाबादचे खासदार आहेत आणि औरंगाबादच्या महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून ते बोलत असावेत असे दिसते. शिवसेनेच्या हिंदुत्ववादी मतदारांच्या मनात शिवसेनेविषयी एक संभ्रम निर्माण करण्याची जलील यांची खेळी दिसते. ओवेसी यांची मान्यता घेऊन महाविकास आघाडीत जाण्याचा प्रस्ताव जलील यांनी दिलेला दिसत नाही. कारण स्वत: ओवेसी त्यावर काहीही बोललेले नाहीत.

"याचा अर्थ जलील यांनी औरंगाबादचे राजकारण समोर ठेवून एमआयएम महाविकास आघाडीत जाण्याबद्दलचे पिल्लू सोडून दिले. महाविकास आघाडीने जलील यांना अवास्तव महत्त्व दिले."

औरंगजेब कबरीचा मुद्दा

औरंगजेब बादशहाच्या खुलताबादेतील कबरीवर अकबरुद्दिन ओवेसी आणि एमआयएम पक्षाचे नेते भेट देऊन गेल्यावर एक नवा मुद्दा महाराष्ट्रातील हिंदुत्वाच्या राजकारणात आला.

औरंगजेबाची कबर

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc

फोटो कॅप्शन, औरंगजेबाची कबर

एमआयएमचे नेते औरंगजेब कबरीवर येऊन गेले हे शिवसेना सत्तेत असूनही घडत आहे, असं चित्र रंगवण्यात विरोधकांना यश आलं. याआधीही अशा भेटी दिल्या जात होत्या असा प्रतिवाद शिवसेनेकडून केला गेला. मात्र तोपर्यंत या मुद्द्याने चांगलाच जोर पकडला होता.

मनसेची एंट्री

शिवसेनेच्या हिंदुत्वाला आव्हान किंवा स्पर्धा ठरणारी आणखी एक घटना ठरली ते म्हणजे या मार्गात अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रवेश केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे थेट भगवी शाल घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखीच प्रतिमा प्रसिद्ध करू लागले. त्यातच त्यांनी आपल्या पक्षाचा ध्वजही भगवा केला आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा मुद्रित केली.

मनसे शिवसेनेला हिंदुत्वाच्या प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न विचारू लागली. औरंगजेब कबरीला एमआयएमच्या नेत्यांनी भेट देण्यावरुन मनसे आजही शिवसेनेला सोशल मीडियात प्रश्न विचारते. त्यातच राज ठाकरे यांनी यावर्षी मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न हाती घेतला.

मशिदीवरील भोंग्यांवर एकेकाळी शिवसेनेचे नेते, तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे काय बोलले होते याचे व्हीडिओ सोशल मीडियात प्रसारित झाले.

राज ठाकरे यांनी या भोंग्यावर विविध शहरांतील विशेषतः औरंगाबादमधील सभेत थेट भूमिका घेतली. यामुळे शिवसेनेची कोंडी होणं साहजिक होतं. शिवसेना या मुद्द्यावर मोकळेपणाने उत्तर देऊ शकली नाही. एकीकडे महाविकास आघाडीतल्या काँग्रेस-राष्ट्रवादीचं बंधन आणि दुसरीकडे आपली जुनी भूमिका अशी ती कोंडी झाली.

औरंगाबादचं गणित

महाराष्ट्राच्या राजकारणात औरंगाबाद गेल्या दोन वर्षांत पुन्हा महत्त्वाचं शहर बनलं आहे याचं कारण शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव होऊन एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी लोकसभेत केलेला प्रवेश.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

औरंगाबादची महानगरपालिका शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. या शहरातील मुस्लीम मतदारांची लक्षणीय संख्या, शहराचे पाण्यासारखे मूलभूत प्रश्न, एमआयएमचं आव्हान, हिंदू मतांमध्ये भाजपा आणि इतर पक्षांचा वाटा अशा अनेक समस्यांतून शिवसेनेला वाट काढायची आहे.

एमआयएम आणि अबू आझमी

महाविकास आघाडीच्या चार उमेदवारांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या एक उमेदवाराचा राज्यसभेचा मार्ग सोपा होता मात्र सेनेच्या दुसऱ्या उमेदवारासाठी लहान पक्ष आणि अपक्षांचं दार ठोठवावं लागणार होतं. भाजपाने तिसरा उमेदवार देऊन सेनेवर ती वेळ आणलीच.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

शिवसेनेला आपल्या उमेदवारासाठी एमआयएम आणि अबू आझमींच्या समाजवादी पक्षाची मतं मागावी लागली. अबू आझमींनी आपली दोन मतं मविआ सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस दिलीच होती. परंतु आता सर्वकाही उघड करावं लागलं. भिवंडी किंवा मुंबईतील शिवाजीनगर मतदारसंघात शिवसेना- अबू आझमी युतीचे परिणाम दिसण्याची भीतीही आहे. त्यातच अबू आझमींनी आपली मतं 'सशर्त' दिल्याचंही सांगितलं जातं.

शिवसेनेचा दुसरा उमेदवार जिंकून येवो अगर पराभूत होवो शिवसेनेने एमआय़एमची मतं घेतली ही ओरड करायला विरोधक आता कायमचे मोकळे झाले. त्यातच संजय पवार पराभूत झाल्यामुळे पराभवाच्या दुःखाबरोबर एमआयएमशी केलेल्या संगाची निशाणी कायमची वागवावी लागणार आहे.

याबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर सांगतात, "एमआयएमनं थेट शिवसेनेला मतं दिली नाहीत ती इम्रान प्रतापगढींना देत आहोत असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु एमआयएमची मदत घ्यावी लागली हे चित्र निर्माण करण्यात भाजपाला यश आलं. राज्यसभा निवडणुकीसाठी एमआयएम आणि अबू आझमींची मदत घेतली, याचा भाजपा आता सतत उल्लेख करत राहील. टीका करत राहील. यामुळे एक मोठं कोलीत भाजपाच्या हाती दिलं आहे."

इतरांचं काय?

तिसरा उमेदवार निवडणुकीत आणून भाजपाने शिवसेनेला एमआयएमबरोबर मैत्री जुलमानं करायला लावलीच. त्याहून अपक्षांमधली खदखद बाहेर काढली. विश्वासदर्शक ठरावानंतर आतापर्यंत अपक्षांना फारसं विचारलं गेलं नव्हतं. त्यात दोन वर्षं कोरोनाची असल्याने राज्याचं राजकारण मुख्य चार पक्षांभोवतीच फिरत राहिलं होतं.

आता मात्र या निवडणुकीमुळे अपक्ष आणि लहान पक्ष यांना कमालीचं महत्त्व आलं. बहुजन विकास आघाडीसारखे पक्ष शिवसेनेच्या 'रिच'पासून अगदीच लांब असल्याचं ठळक झालं. पराभव झाल्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे देवेंद्र भुयारांसारखे महाविकास आघाडीचे समर्थक अपक्षही नाराज झाले.

कम्युनिस्ट आमदार विनोद निकोले यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस तटस्थ राहाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याकडेही मत मागण्याची वेळ शिवसेनेवर आली.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उघडपणे भाजपाला मतदान करण्याचा निर्णय जाहीर केला तसेच सेनेवर खोचक टीका करणारे ट्वीटही केले.

"औरंग्याच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांसमोर त्यांच्या दोन मतांसाठी गुडघे टेकून काय मिळवले? सेनाप्रमुखांच्या विचारांना दफन करून कट्टर सैनिकाचा बळी पण दिला.सेना लढाईतही हरली व तहात पण हरली," असं ट्वीट त्यांनी केलं.

आता या निवडणुकीमुळे झालेल्या राजकीय घडामोडींचा परिणाम कसा होतो हे येत्या काळात दिसेलच.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)