पंकजा मुंडे, चित्रा वाघ यांना विधान परिषदेचं तिकीट नाकारण्याची 'ही' कारणं?

पंकजा मुंडे

फोटो स्रोत, Pannakaj Munde Twitter

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना भाजपने उमेदवारी दिलेली नाही. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

पंकजा मुंडेंचं नाव या निवडणुकीसाठी चर्चेत होतं. त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. पण, ऐनवेळी पंकजांचं नाव वगळून पिंपरी-चिंचवडच्या माजी नगरसेविका उमा खापरे यांना संधी देण्यात आली.

पंकजा मुंडेंबाबत बोलताना भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, "पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व नेत्यांनी खूप प्रयत्न केले. पण केंद्राने काही भविष्यातील विचार केला असेल."

उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडेंकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

भाजपकडून विधानपरिषद निवडणूक रिंगणात कोण कोण?

बुधवारी (8 जून) भाजपने महाराष्ट्रात येत्या 20 जूनला होणाऱ्या 10 विधानपरिषद जागांसाठी 5 उमेदवारांची घोषणा केलीय.

यात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांना अपेक्षेप्रमाणे पुन्हा संधी देण्यात आली, तर भाजपचे महाराष्ट्र सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनादेखील निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलंय.

भाजपने माजी कॅबिनेटमंत्री राम शिंदेंनाही विधानपरिषदेचं तिकीट दिलंय. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा कर्जत-जामखेड मतदारसंघात पराभव केला होता.

राम शिंदे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत मर्जीतील मानले जातात. कर्जत-जामखेड मतदार संघातील जातीय समीकरण पहाता राम शिंदे यांचं नाव पुढे केलं असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.

भाजपने जारी केलेल्या या लिस्टमध्ये सर्वांत अनपेक्षित नाव आहे ते महिला नेत्या उमा खापरे यांचं. त्यांचं नाव विधानपरिषदेसाठी चर्चेत नव्हतं. पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना उमेदवारी दिली जाईल, अशी दाट शक्यता होती. पण या दोन्ही महिला नेत्यांना मागे टाकत उमा खापरे यांनी अनपेक्षितपणे बाजी मारली.

पंकजा मुंडे यांना का वगळलं?

2019 च्या निवडणुकीत भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर पंकजांना राज्याच्या राजकारणात पक्षाकडून फारशी संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पक्षावर त्या नाराज असल्याची चर्चा कायम सुरू असते.

राज्यातील भाजप नेत्यांविरोधातील नाराजी पंकजा मुंडे यांनी स्पष्ट कधीच बोलून दाखवली नाही. पण, आपल्या भाषणातून अनेकवेळा त्यांची नाराजी दिसून आली आहे.

पंकजा मुंडे यांना उमेदवारी का देण्यात आली नाही? याबाबत भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, "तिकीट कोणाला द्यायचं याबाबतचे निर्णय संघटना आणि केंद्राकडून घेण्यात येतात. केंद्राचा निर्णय पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मानायचा असतो. उमेदवारी मागणं आणि त्यानंतर नाराजी व्यक्त करणं यात काहीच चुकीचं नाही."

राज्याच्या राजकारणात फारशी जबाबदारी नसलेल्या पंकजा मुंडे सद्यस्थितीत भाजपच्या केंद्रीय सचिव आहेत. त्याचसोबत मध्यप्रदेशच्या सहप्रभारी आहेत. पंकजा ओबीसी समाजाच्या नेत्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या जातीय समीकरणात त्यांना यावेळी संधी मिळेल चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

पंकजा मुंडे

फोटो स्रोत, PANKAJA MUNDE TWITTER

गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीच्या भगवान गडावरील कार्यक्रमात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आले होते. पण त्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांसारखे राज्यातले नेते दिसून आले नाहीत. यावरूनही पंकजा आणि राज्यातील नेत्यांमध्ये सर्वकाही आलबेल नाही अशी चर्चा रंगू लागली होती.

पंकजा मुंडे यांना का डावलण्यात आलं हे आम्ही वरिष्ठ राजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांना विचारलं.

त्यांनी सांगितलं, "पंकजा अनेकवेळा काही विधानं करतात. त्यांचे वेगळे अर्थ राजकारणात काढले जाऊ शकतात. बहुधा केंद्रीय नेतृत्वाला वाटत असावं की पंकजा राज्यातील भाजप नेत्यांना बरोबर घेऊन चालत नाहीयेत."

पंकजांचा पराभव झाल्यामुळे त्यांचं राजकीय स्थान डळमळीत झालंय. तर मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं त्यांनी केलेलं वक्तव्य भाजप नेत्यांना अजिबात रूचलं नव्हतं.

राजकीय विश्लेषक सांगतात, "भाजपच्या राजकारणात मोदींपेक्षा मोठं कोणीच नाहीये. या परिस्थितीत मुंडेंच्या नावाचे गड करणं हे केंद्राला कितपत आवडतंय हा देखील एक प्रश्न आहे."

मृणालिनी नानिवडेकर पुढे सांगतात, "पंकजा मुंडे राज्य आणि केंद्राला आव्हान देण्याचा प्रयत्न करतायत का? या मुद्यांमुळे त्यांना ही उमेदवारी मिळाली नसावी."

पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वादाला जुनी किनार आहे. राजकीय जाणकार सांगतात, मुख्यमंत्री असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांचे पंख छाटण्यास सुरूवात केली होती. जलयुक्त शिवारसारखी योजना पंकजा यांच्या खात्याकडून काढून राम शिंदे यांच्याकडे देण्यात आली होती.

वरिष्ठ राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी म्हणतात, "मुंडे आडनावाचं ग्लॅमर आणि ओबीसी असल्याने पंकजा मराठवाड्यातील 7-8 मतदारसंघात मोठा फॅक्टर आहेत. त्यांची स्वत:ची व्होट बॅंक आहे. त्या मास लिडर आहेत. त्यामुळे पंकजा याआधीही देवेंद्र फडणवीसांसाठी आव्हान होत्या आणि पुढेही असतील. यामुळेच बहुधा पंकजा यांना विधानपरिषदेचं तिकीट नाकारण्यात आलं असावं."

ते पुढे म्हणतात, विधानपरिषदेच्या या लिस्टवर देवेंद्र फडणवीस यांची पूर्ण छाप आहे. कोणताही नेता आपल्या प्रतिस्पर्ध्याला मोठं होऊ देणार नाही.

'द-हिंदू' या वृत्तपत्राचे राजकीय पत्रकार आलोक देशपांडे याबाबत सांगतात, "पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेचं तिकीट न मिळणं यात काहीच नवल नाही. राज्यात सुरू असलेल्या ओबीसी प्रश्नावरून भाजपने पंकजांना तिकीट दिलं असतं तर असं दाखवण्याचा प्रयत्न केला असता की आम्ही ओबीसींच्या जवळचे आहोत. पण ओबीसी मतं किंवा ओबीसी समाजाला आपल्यासोबत ठेवण्यासाठी भाजपला आता पंकजा मुंडेची नरज नाही हे यातून दिसून येतंय."

कोण आहेत उमा खापरे?

उमा खापरे भाजपच्या महिला मोर्चाच्या राज्य अध्यक्षा आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात गेली 25 वर्षं सातत्याने भाजपचं प्रतिनिधित्व करत आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेत उमा खापरे यांनी नगरसेविका म्हणून काम केलं होतं. 2001-2003 या काळात उमा खापरे पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षनेत्याही होत्या.

पिंपरीचे स्थानिक पत्रकार सांगतात, की उमा खापरे भाजपशी एकनिष्ट कार्यकर्त्या आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्या कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.

पण, उमा खापरे हे नाव महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने माहीत झालं ते त्यांनी शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे. दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप खापरे यांनी केला होता.

काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या, "यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपच्या नेत्यांविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरले तर तिला घरास घूसून बदडून काढू." या वक्तव्यानंतर उमा खापरे विरुद्ध दिपाली सय्यद असा शाब्दिक सामना सुरू झाला होता.

भाजप नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप महिला मोर्चाच्या सचिव, सोलापूरच्या प्रभारी, कोषाध्यक्ष अशा अनेक पदांवर उमा खापरे यांनी काम केलंय.

चित्रा वाघ यांना का मिळालं नाही विधानपरिषदेचं तिकीट?

राष्टवादी कॉंग्रेससोडून भाजपमध्ये आलेल्या चित्रा वाघ यांचंही नाव विधानपरिषदेसाठी चर्चेत होतं. त्या भाजप महाराष्ट्रच्या उपाध्यक्ष आहेत.

चित्रा वाघ

फोटो स्रोत, facebook

एक आक्रमक नेता म्हणून वाघ यांच्याकडे पाहिलं जातं. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून सातत्याने चित्रा वाघ यांनी महिला सुरक्षेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धारेवर धरलं आहे.

शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर एका महिलेच्या आत्महत्येप्रकरणी आरोप झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. यामुळे संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

राजकीय जाणकार सांगतात, मुंबई महापालिका निवडणूक समोर ठेऊन मुंबईतून प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आलीये. चित्रा वाघ दोन वर्षापूर्वीच भाजपमध्ये आल्यात. त्यामुळे वाघ यांचं नाव यंदा मागे पडलं असावं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)