पंकजा मुंडेंपेक्षा गोपीनाथ मुंडे समर्थकांना भाजपकडून सतत संधी कारण...

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत भाजपने पंकजा मुंडेंना तिकीट दिललं नाही. पक्ष नेतृत्वाला वारंवार आव्हान दिल्यामुळेच पंकजांची संधी हुकली असं काही राजकीय विश्लेषकांच मत आहे.

दुसरीकडे, पूर्वाश्रमीचे 2 गोपीनाथ मुंडेंचे समर्थक राम शिंदे आणि उमा खापरे यांना मात्र भाजपने विधानपरिषदेच्या रिंगणात उतरवलंय.

गेल्याकाही वर्षांत भाजपने पंकजा मुंडेंना डावलून भागवत कराड, रमेश कराड, सुरश धस यांसारख्या कट्टर मुंडे समर्थकांना राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात संधी दिलीये.

मग प्रश्न असा उपस्थित होतो की, पंकजांना डावलून भाजप मुंडे समर्थकांना ही संधी का देत आहे? यामागे भाजपची खास रणनिती आहे? राजकीय विश्लेशकांकडून आम्ही याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

पंकजांना धक्का पण मुंडे समर्थकांना मोठी पदं

2019च्या विधानसभा निवडणुकीत भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजा पराभूत झाल्या. राजकीय विश्लेषक सांगतात, तेव्हापासूनच बीड जिल्हा आणि परळी मतदारसंघात पंकजा मुंडेंचं राजकीय वजन डळमळीत होणं सुरू झालं.

पक्षाकडून विधानपरिषदेवर संधी देण्यात येईल अशी आशा पंकजा मुंडेंना होती. त्यांनी ही अपेक्षा जाहीर नाही, पण अप्रत्यक्षरित्या अनेकवेळा बोलूनही दाखवली. पण, सलग दोन वेळा पक्षाकडून त्यांचं नाव विधानपरिषदेसाठी विचारात घेण्यात आलं नाही. याउलट गोपिनाथ मुंडेंच्या कट्टर समर्थकांना मात्र भाजपने राज्याच्या राजकारणात काम करण्याची मोठी संधी दिली.

विधानपरिषदेचं ताजं उदाहरण द्यायचं झालं तर पहिलं नाव आहे राम शिंदे यांचं. कर्जत-जामखेडचे माजी आमदार राम शिंदे गोपिनाथ मुंडेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. आता ते देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. 2019 मध्ये रोहित पवारांकडून त्यांच्या पराभव झाला. पण, त्यानंतरही आता भाजपने त्यांना विधानपरिषदेची संधी दिलीये.

राम शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री होते. त्यानंतर त्यांचं प्रमोशन करून कॅबिनेट मंत्री बनवण्यात आलं. एवढंच नाही, 2017 मध्ये पंकजा मुंडेंकडील जलसंधारण खातं काढून राम शिंदेंना देण्यात आलं होतं.

मुंडे समर्थकांना मोठं पद मिळाल्यामध्ये दुसरं नाव आहे भागवत कराड यांचं. राज्यसभा खासदार भागवत कराडांना नरेंद्र मोदींनी थेट केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थराज्यमंत्री पदाची जबाबदारी दिली.

पंकजा मुंडेंची लहान बहिण आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलून कराड यांना मंत्रिपद देण्यात आल्याचं बोललं गेलं. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज झाल्या होत्या. पण, पक्षाकडून त्यांच्या नाराजीची फारशी दखल घेण्यात आली नाही. जनआशिर्वाद यात्रे दरम्यान भागवत कराड गोपिनाथ गडावर आले असताना मुंडे समर्थकांनी कराड यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली होती.

"ताईंशी भेट घेतली. मन मोकळं झालं. मुंडे साहेबांची आठवण आवर्जून झाली. मी मंत्री झालो. मुंडेसाहेब माझे नेते होते आणि आज ताई आहेत," अशी प्रतिक्रिया त्यावेळी भागवत कराड यांनी दिली होती.

या लिस्टमध्ये तिसरं नाव आहे उमा खापरे यांचं. उमा खापरे गोपिनाथ मुंडेंच्या अत्यंत जवळच्या मानल्या जायच्या. भाजपने यंदा विधानपरिषदेवर उमा खापरे यांना संधी दिलीये. तीन वेळा पिंपरी-चिंचवडच्या नगरसेवक राहिलेल्या उमा खापरे भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत. राज्याच्या राजकारणात त्यांना फारसं कोणीच ओळखत नाही. असं असूनही त्यांना संधी देण्यात आलीये.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री सुरेश धस यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर भाजपने बीड-उस्मानाबाद-लातूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांना विधानपरिषदेवर निवडून आणलं. तर, 2020 मध्ये रमेश कराड यांनादेखील विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. सुरेश धस आणि रमेश कराड दोघंही एकेकाळी गोपिनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते.

पंकजांना डावलून भाजप मुंडे समर्थकांना संधी का देत आहे?

याबाबत बीडचे स्थानिक पत्रकार उद्धव मोरे सांगतात, "मुंडे समर्थकांना मोठं करून भाजपने पंकजा मुंडेंचे पंख छाटलेत. त्यामुळे त्यांचं राजकीय वजन कमी झालंय."

राजकीय विश्लेषक याची तीन प्रमुख कारण सांगतात,

  • पंकजा मुंडे यांची बहिण प्रीतम मुंडे केंद्रात खासदार आहेत. मुंडे घरात एक मोठं पद आहे.
  • देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय कटूता
  • पंकजा यांनी भाजपच्या नेतृत्वाला दिलेलं आव्हान

"मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री" असं म्हणत काही वर्षांपूर्वी पंकजा मुंडे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं होतं. तेव्हापासून या दोघांमध्ये कटुता निर्माण झाली.

पंकजा मुंडेंचं राजकारण जवळून पाहणारे औरंगाबादचे वरिष्ठ राजकीय विश्लेषक धनंजय लांबे सांगतात, "पंकजांना डावलून आणि मुंडे समर्थकांना मोठी पदं देऊन भाजपने त्यांना एक मेसेज दिलाय. पक्ष नेतृत्वाला आव्हान दिलेलं भाजपत चालत नाही."

काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे ओबीसी नेत्यांच्या व्यासपीठावर गेल्या होत्या.

याबाबत धनंजय लांबे पुढे म्हणाले, "पंकजा मुंडेंनी भाजपचा ओबीसी चेहरा बनावं असं भाजपला वाटतंय. पण तसं होताना दिसत नाहीये. त्या पूर्ण ओबीसी समाजाचा नेता बनणं बहुदा भाजपला पटलेलं नाही. त्यामुळे त्यांचे पंख छाटण्याचं काम सुरू आहे."

वरिष्ठ पत्रकार राही भिडे सांगतात, "मुंडे समर्थकांना पद आणि संधी देऊन भाजपने पंकजांना मेसेज दिलाय. राजकारण पक्षाच्या शिस्तीत आणि चौकटीत राहूनच करायला हवं. एकट्याचा मोठेपणा चालत नाही."

विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडेंकडे राज्यातील राजकारणात फारसं महत्त्वाचं पद नाही. राज्याच्या राजकारणात त्या फार सक्रिय दिसून येत नाहीत. तर, देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील अंतर्गत वाद सर्वश्रृत आहे.

लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक नंदकुमार पाटील बीबीसीशी बोलताना सांगतात, "पंकजा मुंडे यांना भाजपच्या मुख्यधारेतून बाजूला ठेवलं जातंय. हे खरंय की त्यांचे समर्थक असलेल्यांना संधी दिली जातेय. असं करून त्यांचं नेतृत्व खूजं केलं जातंय."

ते पुढे म्हणाले "पंकजा लोकनेत्या आहेत. परळी मतदारसंघात धनंजय मुंडेंसारखं आव्हान आहे. अशा परिस्थितीत त्यांनी मैदानात उतरून लढावं असा विचार भाजपने केला असावा. त्यामुळेही त्यांना संधी देण्यात आली नसावी."

काही दिवसांपूर्वी गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथी कार्यक्रमात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान दिसून आले. पण देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील दिसले नाहीत. यावरूनही पंकजा आणि राज्यातील नेत्यांमध्ये सर्वकाही आलबेल आहे असं दिसून येत नाही.

नंदकुमार पाटील पुढे म्हणाले, "राज्यसभा, विधानपरिषद यादीवर देवेंद्र फडणवीसांची छाप आहे. त्यामुळे पंकजांच्या आजूबाजूच्या नेत्यांना मोठं करून त्यांचं नेतृत्व कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)