You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना महाविकास आघाडीत येण्याची ऑफर दिली का?
"आमचं बहिण-भावाचं राजकीय वैर जगाला माहीत आहे. पण काही व्यक्तींसमोर आमचं वैर काहीही नाही. ती व्यक्ती त्यावेळी आमच्यासाठी महत्त्वाची असते. त्यामुळे कदाचित पंकजा ताईंनी लेन्सेस बदलल्या आणि महाविकास आघाडीच्या लावल्या तर बरं राहील."
हे उद्गार आहेत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे. त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना महाविकास आघाडीत येण्याची ऑफर तर दिली नाही ना अशा चर्चांना उधाण आले आहे.
निमित्त होतं डॉ. तात्याराव लहाने यांच्या मुंबईतील रघुनाथ रुग्णालयाच्या लोकार्पणाचं.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे, अमित देशमुख ही महाविकास आघाडीतील नेते मंडळी उपस्थित होती.
तर माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यासुद्धा या कार्यक्रमास उपस्थित होत्या.
दिग्गजांची उपस्थिती असल्याने या कार्यक्रमाने लक्ष वेधून घेतलंच. पण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भाऊ-बहिणीच्या जोडीने एकमेकांबद्दल केलेली वक्तव्ये आणि शाब्दिक कोट्यांमुळे कार्यक्रमात रंगत आणल्याचं दिसून आलं.
या कार्यक्रमातच धनंजय मुंडेंनी पंकजा यांना उद्देशून केलेलं वक्तव्य म्हणजे त्यांना महाविकास आघाडीत येण्याची ऑफर असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
कार्यक्रमात सुरुवातीला पंकजा मुंडे यांचं भाषण झालं. शरद पवार यांच्याकडे राजकीय लेन्सेस आहेत आणि आमचे बंधू त्यांच्या लेन्सेसमधून बघत आहेत, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणादरम्यान केलं.
नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या नेत्र रुग्णालयाचा कार्यक्रम असल्याचं निमित्त साधत पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात चष्मे आणि लेन्सेस यांचा उल्लेख अतिशय हुशारीने केला.
भाषणादरम्यान सुरुवातीला सर्वांच्या नावाचा उल्लेख करताना शरद पवारांबाबत त्या म्हणाल्या, "ज्यांच्या अनुभवाच्या राजकीय दृष्टीच्या लेन्सेस आज कोणाकडेही नसतील असे शरद पवार."
"सगळ्यांशी मवाळ आणि चांगलं वागणारे, ज्यांच्या लेन्सेस सगळ्यांना सूट करतील असे बाळासाहेब थोरात. नवीन दृष्टी देण्याची अपेक्षा असणारे, ज्यांच्या लेन्सेसकडे युवक आज बघत आहेत असे आदित्य ठाकरे, असा त्यांचा पंकजा मुंडेंनी उल्लेख केला.
भाऊ धनंजय मुंडेंबाबत बोलताना त्यांनी वडील गोपीनाथ मुंडे आणि भाजप नेते प्रमोद महाजन यांची आठवण काढली.
"मुंडे-महाजनांच्या लेन्सेसमधून स्वत: ला मोठं करत करत आज पवारसाहेबांच्या लेन्सेसमधून बघण्याचं भाग्य खूप कमी लोकांना लाभलं, त्यापैकी एक आमचे बंधू धनंजय मुंडे," असं पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्याबाबत म्हणाल्या.
यावेळी पंकजा मुंडेंनी रघुनाथ मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात लढवलेल्या निवडणुकीची आठवण सांगितली. राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक प्रेम होतं, अशा पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
या कार्यक्रमात भाषणासाठी जात असताना धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या डोक्यावर हलकेच टपली मारली.
पंकजा मुंडे यांनीही ती चुकवण्याचा प्रयत्न केला. हे पाहून सर्व उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
भाषणादरम्यान ते म्हणाले, "1978 ला विधानसभेची निवडणूक झाली. ही निवडणूक रघुनाथरावजी मुंडे विरुद्ध गोपीनाथराव मुंडे अशी झाली. या निवडणुकीत गोपीनाथ मुंडेंचा पराभव झाला. त्याच वर्षी जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. ती जिल्हा परिषदेची निवडणूक गोपीनाथ मुंडेंनी जिंकली. पण त्यावेळी रघुनाथराव मुंडे यांच्यासारखा मोठ्या दृष्टीचा दुसरा नेता नव्हता."
"मी आणि आदित्य ठाकरे बोलत बसलो होतो. ते म्हणाले, कदाचित पंकजाताईंनी लेन्सेस बदलल्या आणि महाविकास आघाडीच्या लावल्या तर बरं राहील, असं ते म्हणाले, मी नाही. मजेचा भाग सोडून द्या. एक व्यक्ती आहे. भलेही बहिण भावाचे राजकीय वैर जगाला माहित आहे. पण काही व्यक्तींचं मोठेपण इतकं आहे, की त्यांच्यासमोर आमचं वैर काही नाही. ती व्यक्ती आमच्यासाठी महत्वाची आहे. तात्याराव लहाने यांचा आम्हाला अभिमान आहे," असं धनंजय मुंडे म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)