धनंजय मुंडे म्हणतात, 'पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल'

राज्याचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल असं राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

सातारा येथे आयोजित सार्वजनिक सभेत शनिवारी बोलताना मुंडे म्हणाले, "शिवसेनेच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्याय विभाग माझ्या प्रयत्नांमुळे महत्त्वपूर्ण खातं झालं आहे."

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार धनंजय मुंडे म्हणाले, "भविष्यात असा प्रश्न निर्माण झाली की सामाजिक न्याय विभाग खात्याची जबाबदारी कोणला द्यावी? राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार? तर मुख्यमंत्री आमच्याच पक्षाचा असेल. सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेसकडेच असावा असं मुख्यमंत्री म्हणतील. या खात्याने लोकांचा आदर कमावला आहे."

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख घटक पक्ष आहे. गेल्या महिन्यात या आघाडीने अडीच वर्षं कार्यकाळ पूर्ण केला. विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता म्हणून महत्त्वपूर्ण काम केलं होतं.

महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी आहेत. वित्त आणि गृह खात्याची जबाबदारी अजित पवारांकडे आहे.

"राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी माझ्यावर विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता म्हणून जबाबदारी दिली. सरकार कोणाचं आहे, कोणाची किती ताकद आहे याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. मी सभागृह दणाणून सोडलं," असं मुंडे म्हणाले.

आज (रविवारी) बीडमध्ये पुन्हा त्यांनी या गोष्टीचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, "पक्षविस्तार होईल आणि जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल तेव्हा त्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल," असं त्यांनी स्पष्ट केलं.

त्यांच्या या वक्तव्यावर अद्याप महाविकास आघाडीतील त्यांच्या मित्रपक्षांच्या नेत्यांची प्रतिक्रिया आली नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)