पब्जी खेळू न देणाऱ्या आईची गोळ्या झाडून हत्या, दोन दिवस प्रेत घरातच

पब्जी हा ऑनलाइन गेम खेळू न देणाऱ्या आईवर तिच्या 16 वर्षांच्या मुलानेच गोळ्या झाडल्या आहेत. ही घटना लखनौच्या पीजीआय पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या यमुनापूर कॉलनीमधील आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. अतिरिक्त पोलीस उपायुक्त कासिम आबिदी म्हणाले, "लखनौ पीजीआय पोलीस ठाण्याच्या अंतर्गत यमुनापुरम कॉलनीमध्ये एक महिला दोन मुलांसह राहात होती. तिचे पती ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर होते आणि ते पश्चिम बंगालमध्ये कार्यरत आहेत."

पोलिसांच्या माहितीनुसार, "16 वर्षांच्या या मुलाला पब्जी ऑनलाइन गेम खेळण्याचं व्यसन आहे. हा खेळ खेळू नये म्हणून त्याची आई प्रयत्न करत असे. त्यामुळे त्याने आपल्याच वडिलांच्या लायसन्स पिस्तुलातून गोळी झाडून तिची हत्या केली. शनिवारी रात्री ही हत्या करण्यात आली आहे."

या हत्येसाठी वापरलेले पिस्तुल हस्तगत करण्यात आले आहे. मंगळवारी या महिलेचे शव ताब्यात घेतले असून शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे. या मुलालाही ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

दोन दिवस प्रेत बंद खोलीत

पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार पोलीस म्हणाले की या मुलाने आईची हत्या करुन तिचं प्रेत एका बंद खोलीत ठेवलं. हत्या करत असताना त्याची 9 वर्षांची बहीणही तेथे उपस्थित होती.

याबद्दल कोणालाही सांगितल्यास परिणाम वाईट होतील असं तिला धमकावल्याचं या बहिणीने सांगितलं आहे. प्रेताचा वास येऊ नये म्हणून मुलाने रुम फ्रेशनरही वापरला होता.

आबिदी सांगतात, "मंगळवारी प्रेताची दुर्गंधी येऊ लागल्यावर त्या मुलाने या घटनेची वडिलांना माहिती दिली. वडिलांनी फोन करुन शेजाऱ्यांना कळवले. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले."

आबिदी म्हणाले, "सुरुवातील या मुलाने घटनेसंदर्भात खोट्या कहाण्या रचून सांगायला सुरुवात केली. घरात आलेल्या एका इलेक्ट्रिशियनने हे केलंय असं त्यांनं सांगितलं. त्या इलेक्ट्रिशियनकडे चौकशी करता तो खोटं बोलत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर फार वेळ तो पोलिसांची दिशाभूल करू शकला नाही. त्यानंतर त्यानं सत्य परिस्थिती सांगितली."

पब्जीविषयी तुम्हाला किती माहिती आहे?

पब्जी (PlayerUnknown's Battlegrounds) हा जगभरात मोबाईलवर खेळला जाणारा लोकप्रिय असा खेळ आहे. भारतातही या खेळाचे अनेक चाहते आहेत.

एक जपानी चित्रपट 'बॅटल रोयाल' पासून प्रेरणा घेऊन हा गेम बनवण्यात आला आहे. या चित्रपटात सरकार विद्यार्थ्यांच्या एका ग्रूपला बळजबरी करून मृत्यूशी लढायला पाठवतं.

पब्जीमध्ये जवळपास 100 खेळाडू एखाद्या टेकडीवर पॅराशूटच्या मदतीनं उडी घेतात, शस्त्रं शोधतात आणि एकमेकांना तोपर्यंत मारतात जोपर्यंत त्यांच्यातील केवळ एक जण जिवंत राहत नाही.

हा गेम दक्षिण कोरियाची व्हीडिओ गेम कंपनी ब्लूहोलनं विकसित केला आहे. या कंपनीनं या गेमचं डेस्कटॉप व्हर्जन तयार केलं होतं. पण, चीनची कंपनी टेनसेंटनं काही बदल करून या गेमचं मोबाईल व्हर्जन बाजारात घेऊन आली.

पब्जी गेम 100 जण एकत्रपणे खेळू शकतात. यामध्ये नवनवीन शस्त्रं खरेदी करण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागू शकतात, तसंच कुपनही खरेदी करावे लागू शकतात. हा गेम अशापद्धतीनं बनवण्यात आला आहे की, जितकं जास्त तुम्ही तो खेळाल तितका जास्त तुम्हाला आनंद मिळेल, तितकी जास्त शस्त्रं खरेदी तुम्ही कराल, कुपन खरेदी कराल. यामुळे तुमचा खेळ अजून चांगला होईल. यामध्ये फ्री-रूम नावाचा प्रकार असतो, ज्यात वेगवेगळ्या स्तरावर हा गेम खेळता येतो. वेगवेगळ्या ठिकाणी राहणारी माणसंही एकाचवेळी हा खेळ खेळू शकतात.

जगभरात 2019मध्ये गेमिंगभारतातील गेमिंग स्ट्रीमिंग साईट, रूटर्सचे सीईओ पीयूष कुमार यांच्या मते, "केवळ पब्जीचा विचार केला तर भारतात हा गेम 175 दशलक्ष लोकांनी डाऊनलोड केला आहे. यापैकी 75 दशलक्ष सक्रीय वापरकर्ते आहेत. चीनहून अधिक भारतातील लोक पब्जी खेळतात. पण, कमाईचं म्हणाल तर ती भारतातून कमी होते. याचं कारण पैसे खर्चून गेम खेळणाऱ्यांची भारतातील संख्या कमी आहे."

याचा अर्थ भारत सरकारच्या या कथित 'डिजिटल स्ट्राईक'चा चीनवर काहीच परिणाम होणार नाही, असा होतो का?

पीयूष यांच्या मते, "असं म्हणणं चुकीचं ठरेल. भारतात गेम खेळणाऱ्यांची संख्या दुसऱ्या देशांच्या तुलनेत जास्त आहे, त्यामुळे भविष्यात गेमिंग हब म्हणून भारताकडे पाहिलं जात आहे. एखाद्या कंपनीला भारतातून बाहेर पडावं लागत असेल, तर त्यामुळे कंपनीच्या यूझर बेसवर नक्कीच परिणाम होईल."

यूझर बेसचा विचार केला तर भारतात वयाच्या 14 वर्षांपासून ते 24 वर्षांपर्यंतचे तरुण ऑनलाईन गेम सर्वाधिक खेळतात. पण, पैसे खर्च करण्याचा विचार केला तर 25 ते 35 वयोगटातील माणसं ऑनलाईन गेमिंगवर अधिक खर्च करतात. गेमिंगचं मार्केट 16.9 अब्ज डॉलर इतकं होतं. यामध्ये 4.2 अब्ज डॉलर इतक्या भागीदारीसोबत चीन सगळ्यांत पुढे आहे. दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका, तिसरा क्रमांक जपान आणि त्यानंतर ब्रिटन आणि दक्षिण कोरियाचा नंबर लागतो.

हे आकडे statista.comचे आहेत. भारतातही गेमिंग इंडस्ट्रीचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत आहे, पण सध्या तो एक अब्ज डॉलरहून कमी आहे. महसूलाच्या बाबतीत भारताचा जगातल्या टॉप-5 देशांमध्ये समावेश होत नाही. असं असलं तरी इतर देशांसाठी भारत म्हणजे मार्केटचा विस्तार वेगानं होणारा देश आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)