You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महिला आरोग्य : 'मी माझी विष्ठा पोटावर बांधलेल्या पिशवीत साठवते'
- Author, जास्मिन स्टॅसी
- Role, BBC3 च्या कॅट्रिओना व्हाईट यांच्याद्वारे निर्मित
माझं नाव जॅस्मिन आहे. माझी विष्ठा साठवायला माझ्या पोटावर पिशवी बांधलेली आहे.
असं मी तुम्हाला सांगितलं तर? एखादं संभाषण सुरू करायला ही वाक्यं नक्कीच चांगली नाहीत. पण जरा विचार करा. 25 वर्षांच्या एका मुलीला मोठं आतडंच नसेल तर तसंच गुदद्वारही कायमचं बंद करण्यात आलं असून तिला एका पिशवित विष्ठा साठवावी लागत असेल तर? संभाषणासाठी हा नक्कीच वेगळा विषय आहे.
दहाव्या वर्षापासून वेदना
मला वयाच्या दहाव्या वर्षांपासूनच क्रोह्न्स डिसिजमुळे त्रास होऊ लागला. त्यामुळे प्रचंड वेदना होत असत.
मला दिवसातून 25 वेळा बाथरुममध्ये जायला लागायचं. नंतर डायरियासारखा त्रास झाला. त्यात रक्त आणि श्लेष्मा (म्युकस) ही पडत असते. सतत रक्त गेल्यामुळे थकवाही येत असे.
कॉलेज किंवा विद्यापीठात जाणं एखाद्या भयाण स्वप्नासारखं होतं. या त्रासामुळे मला वर्षातून चारवेळा रुग्णालयात दाखल व्हावं लागत असे. शेवटी विसाव्या वर्षी मात्र त्रास सहन करण्याची माझी मर्यादा संपली.
शस्त्रक्रिया केली
आता इलिओस्टॉमी करण्याचा एकच पर्याय शिल्लक राहिला आहे, असं डॉक्टरांनी मला सांगितलं.
या शस्त्रक्रियेमुळे माझ्या लहान आतड्याला एक वेगळी वाट काढावी लागणार होती माझी विष्ठा एका पिशवीत पडणार होती. ही पिशवी मला कायमची बाळगावी लागणार होती.
ही पिशवी सांभाळण्याची कल्पनाच भयानक होती. पण मला वाचवण्यासाठी तो एकमेव उपाय शिल्लक असल्याचं डॉक्टरांनी मला सांगितलं.
सुमारे साडेअकरा तास शस्त्रक्रिया झाल्यानंतर मला आता गुदद्वार नाही. गुदद्वार नसणाऱ्या लोकांना 'बार्बी बट' म्हटलं जातं. माझे मोठे आतडे आणि गुदाशय इतके अशक्त होते की ते काढून टाकावं लागलं होतं.
बोलायचं कधी?
पण या गंभीर आजारावर लोक शक्यतो बोलत नाही. अशी पिशवी बाळगणं हा मोठा काळीमा समजला जातो.
पण या स्थितीत लैंगिक संबंधांचं काय? हा विषय कधी काढावा? पहिल्याच भेटीत हे सांगावं की थोडा काळ जाऊ द्यावा? ते मला स्वतःलाच किळसवाणं वाटत असताना इतरांनाही किळसवाणं वाटेल का? हे समजल्यावर समोरची व्यक्ती गोंधळ घालेल का? ती पिशवी खाली पडेल का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहातात.
शस्त्रक्रिया केल्यानंतर माझा स्वाभिमान अगदी रसातळाला गेला होता. मला एकटं-एकटं वाटू लागलं होतं. "मीच का?", "ते पण फक्त 20 वर्षं वयात हे सगळं का?" असे प्रश्न माझ्या मनाला भेडसावत होते. मी कधीच सेक्स करू शकणार नाही असं मला वाटायचं.
पण वर्षभरानं विचारांमध्ये बदल झाला. जर त्या पिशवीसह माझ्याबरोबर जाण्यास तुम्हाला वाईट वाटत असेल तर मलाही तुझ्यासारख्या मुलाबरोबर जाण्यास इच्छा नाही हे सांगण्याची जाणिव मला झाली. त्यानंतर मी वन नाईट स्टँड, थोडाफार रोमान्स आणि दोन वर्षांच्या एका नात्याचाही अनुभव घेतला.
काही मुलांनी पिशवीसह मला स्वीकारणं अमान्य केलं. मी जशी आहे तशी न स्वीकारणाऱ्यांना माझ्या आयुष्यात जागा नाही
सेक्स करताना...
सेक्समधील काही आसनांमध्ये या शस्त्रक्रीयेमुळे अडथळा येतो जरुर. पण शारीरिकदृष्ट्या सर्व काही ठीक आहे, अडथळा आहे तो मानसिक.
अर्थात काही गोष्टींची काळजी घ्यावीच लागते. ती पिशवी घटट् बसवलेली असते, तिथून काढणं अवघड असतं. फक्त ती पडणार नाही याची काळजी घ्यावी लागते. कारण कोणालाही त्यातून बिछान्यावर गळती झालेलं आवडणार नाही.
तसेच तुम्हाला काही बदल करावे लागतात. असे एकमेकांजवळ येऊन विशेष क्षण अनुभवण्यापूर्वी पिशवी बदलण्याची, थोडेसे अत्तर शिंपडण्याची तसेच पोट साफ होण्याची क्रिया मंदावण्याची गोळी घ्यावी लागते.
...आणि आत्मविश्वास परतला
मी माझी अंतर्वस्त्रं स्वतः डिझाइन करायला सुरुवात केली. माझ्यासारख्या व्यक्तीसाठी योग्य अंतर्वस्त्रं नव्हती.
ती मी स्वतःच केल्यामुळे माझ्या आत्मविश्वासात भर पडली. सेक्स करो वा नको मला छान दिसायचं होतं. महिला सशक्तीकरणासाठी ते डिझाइन करायचं होतं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
2015 साली मी माझी स्वतःची कंपनी सुरू केली. परिचारिकेची माझी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आता मी पूर्णवेळ हेच काम करते.
आतातरी मी सिंगल आहे. पण मी स्वतःवर प्रेम करायला, जशी आहे तशी स्वतःला स्वीकारायला शिकले आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)