You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पब्जी : भारतात गेमिंगचं इतकं मोठं साम्राज्य तयार तरी कसं झालं?
- Author, सरोज सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारत सरकारनं 118 मोबाईल अॅप्स बॅन केले आहेत. यामध्ये गेमिंग अॅपसोबतच डेटिंग, बिझनेस आणि इतर अॅपचाही समावेश आहे.
अस असलं तरी सध्या सगळीकडे पब्जी गेमवर आलेल्या बंदीची सर्वांत जास्त चर्चा होत आहे. पब्जीवर आलेल्या बंदीमुळे तुम्ही हा गेम मोबाईलवर खेळू शकत नसलात, तरी डेस्कटॉपवर मात्र तो अजूनही खेळता येत आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे मुलं नाराज असली, तरी त्यांच्या पालकांनी मात्र आनंद व्यक्त केला आहे. कारण मुलांच्या पब्जीच्या व्यसनामुळे पालकांना अधिक त्रास सहन करावा लागत होता.
पालक इतके वैतागले होते की, 2019मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा विद्यार्थ्यांबरोबर परीक्षेबाबत चर्चा करत होते, तेव्हा एका प्रेक्षकानं त्यांना विचारलं, "माझा मुलना इयत्ता नववीत आहे. पूर्वी तो अभ्यासात हुशार होता. पण, गेल्या काही दिवसांपासून त्याला ऑनलाईन गेमचं वेड लागलं आहे. यामुळे त्याच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. मी काय करायला हवं?"
हा प्रश्न पूर्ण होताच मोदींनी म्हटलं होतं की, "हा पब्जीवाला आहे काय?"
मोदींनी असं म्हणताच संपूर्ण मैदानात हशा पिकला. यामुळे भारतातली पब्जीची लोकप्रियता सगळ्यांना दिसून आली. प्रेक्षक असो की लहान मुलं असो की पंतप्रधान, असं कुणीही नाही ज्यानं पब्जीचं नाव ऐकलं नसेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चर्चेत म्हटलं होतं की, ही एक समस्या आहे आणि उपायही. पण, दीड वर्षांनंतर ही फक्त एक समस्या आहे, असं समजून मोदींच्या सरकारनं पब्जीवर बंदी आणली आहे.
ही बंदी लागू करण्यात आल्यानंतर पब्जीचे पोस्टर बॉय नमन माथूर यांनी यूट्यूबवर एक लाईव्ह केलं होतं. हे लाईव्ह एकाच वेळी 80 हजार लोक बघत होते. नमन यांनी ट्वीट करत म्हटलं, तुफान (संकट) आलं आहे. पब्जीवरील बंदीनंतरचा त्यांचा व्हीडिओ जवळपास 60 लाख लोकांनी पाहिला आहे.
भारत सरकारच्या या प्रयत्नांना चीनवर केलेली 'डिजिटल स्ट्राईक पार्ट-3' म्हणून संबोधलं जात आहे.
गेल्या 10 वर्षांमध्ये ऑनलाईन गेमिंग मार्केटचं जाळं इतक्या झपाट्यानं विस्तारत आहे की, आता भारताला गेमिंग क्षेत्रातील जगातलं सर्वांत वेगानं वाढणारं मार्केट म्हटलं जात आहे.
सोप्या शब्दांत गेमिंग बाजार समजण्यासाठी तुम्ही हे समजून घ्यायला हवं की, जेव्हा तुम्ही पैसे देऊन काही सामान खरेदी करता, तेव्हा तुम्ही खर्च करण्यापूर्वी पाच वेळेस विचार करता.
पण, ऑनलाईन मोबाईल गेम खेळत असाल, तर सुरुवातीच्या काळात त्यासाठी काही खर्च लागत नाही. त्यामुळे मग पैसे खर्च करायचं काम नाही, उलट मजा करता येते, असं लोकांना वाटतं. या तऱ्हेनं ऑनलाईन मोबाईल गेमचं मार्केट विस्तारत जातं. खरं तर हे गेम व्यावसायिकरित्या खेळण्यासाठी आणि अधिकाधिक वरच्या पातळीवर खेळण्याकरता पैसे खर्च करावे लागतात.
गेमिंग कंपन्या सुरुवातीला तुम्हाला या गेमचं व्यसन लावतात आणि मग त्यातून पैसे कमावतात. सोप्या भाषेत यापद्धतीनं गेमिंगच्या व्यवसायाला समजून घेता येतं.
पब्जीविषयी तुम्हाला किती माहिती आहे?
पब्जी (PlayerUnknown's Battlegrounds) हा जगभरात मोबाईलवर खेळला जाणारा लोकप्रिय असा खेळ आहे. भारतातही या खेळाचे अनेक चाहते आहेत.
एक जपानी चित्रपट 'बॅटल रोयाल' पासून प्रेरणा घेऊन हा गेम बनवण्यात आला आहे. या चित्रपटात सरकार विद्यार्थ्यांच्या एका ग्रूपला बळजबरी करून मृत्यूशी लढायला पाठवतं.
पब्जीमध्ये जवळपास 100 खेळाडू एखाद्या टेकडीवर पॅराशूटच्या मदतीनं उडी घेतात, शस्त्रं शोधतात आणि एकमेकांना तोपर्यंत मारतात जोपर्यंत त्यांच्यातील केवळ एक जण जिवंत राहत नाही.
हा गेम दक्षिण कोरियाची व्हीडिओ गेम कंपनी ब्लूहोलनं विकसित केला आहे. या कंपनीनं या गेमचं डेस्कटॉप व्हर्जन तयार केलं होतं. पण, चीनची कंपनी टेनसेंटनं काही बदल करून या गेमचं मोबाईल व्हर्जन बाजारात घेऊन आली.
जगभरात पब्जी खेळणाऱ्यांपैकी जवळपास 25 % लोक भारतातील आहेत. चीनमध्ये 17 % तर अमेरिकेत 6 % लोक पब्जी खेळतात.
पब्जी गेम 100 जण एकत्रपणे खेळू शकतात. यामध्ये नवनवीन शस्त्रं खरेदी करण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागू शकतात, तसंच कुपनही खरेदी करावे लागू शकतात. हा गेम अशापद्धतीनं बनवण्यात आला आहे की, जितकं जास्त तुम्ही तो खेळाल तितका जास्त तुम्हाला आनंद मिळेल, तितकी जास्त शस्त्रं खरेदी तुम्ही कराल, कुपन खरेदी कराल. यामुळे तुमचा खेळ अजून चांगला होईल. यामध्ये फ्री-रूम नावाचा प्रकार असतो, ज्यात वेगवेगळ्या स्तरावर हा गेम खेळता येतो. वेगवेगळ्या ठिकाणी राहणारी माणसंही एकाचवेळी हा खेळ खेळू शकतात.
गेमिंग मार्केट किती मोठं?
जगभरात 2019मध्ये गेमिंजचं मार्केट 16.9 अब्ज डॉलर इतकं होतं. यामध्ये 4.2 अब्ज डॉलर इतक्या भागीदारीसोबत चीन सगळ्यांत पुढे आहे. दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका, तिसरा क्रमांक जपान आणि त्यानंतर ब्रिटन आणि दक्षिण कोरियाचा नंबर लागतो.
हे आकडे statista.comचे आहेत. भारतातही गेमिंग इडस्ट्रीचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत आहे, पण सध्या तो एक अब्ज डॉलरहून कमी आहे. महसूलाच्या बाबतीत भारताचा जगातल्या टॉप-5 देशांमध्ये समावेश होत नाही. असं असलं तरी इतर देशांसाठी भारत म्हणजे मार्केटचा विस्तार वेगानं होणारा देश आहे.
भारतातील गेमिंग स्ट्रीमिंग साईट, रूटर्सचे सीईओ पीयूष कुमार यांच्या मते, "केवळ पब्जीचा विचार केला तर भारतात हा गेम 175 दशलक्ष लोकांनी डाऊनलोड केला आहे. यापैकी 75 दशलक्ष सक्रीय वापरकर्ते आहेत. चीनहून अधिक भारतातील लोक पब्जी खेळतात. पण, कमाईचं म्हणाल तर ती भारतातून कमी होते. याचं कारण पैसे खर्चून गेम खेळणाऱ्यांची भारतातील संख्या कमी आहे."
याचा अर्थ भारत सरकारच्या या कथित 'डिजिटल स्ट्राईक'चा चीनवर काहीच परिणाम होणार नाही, असा होतो का?
पीयूष यांच्या मते, "असं म्हणणं चुकीचं ठरेल. भारतात गेम खेळणाऱ्यांची संख्या दुसऱ्या देशांच्या तुलनेत जास्त आहे, त्यामुळे भविष्यात गेमिंग हब म्हणून भारताकडे पाहिलं जात आहे. एखाद्या कंपनीला भारतातून बाहेर पडावं लागत असेल, तर त्यामुळे कंपनीच्या यूझर बेसवर नक्कीच परिणाम होईल."
यूझर बेसचा विचार केला तर भारतात वयाच्या 14 वर्षापासून ते 24 वर्षांपर्यंतचे तरुण ऑनलाईन गेम सर्वाधिक खेळतात. पण, पैसे खर्च करण्याचा विचार केला तर 25 ते 35 वयोगटातील माणसं ऑनलाईन गेमिंगवर अधिक खर्च करतात.
गेमिंग कमाईचं साधन?
ऑनलाईन गेमिंगमध्ये अनेक पद्धतीची कमाई होते. याविषयी अधिक जाणून घेण्याकरता आम्ही ज्येष्ठ पत्रकार आशु सिन्हा यांच्याशी चर्चा केली.
त्यांच्या मते, "गेमिंगमधून पैसे कमावण्याचं एक मॉडेल म्हणजे फ्रीमियम आहे. यात आधी फ्री म्हणजेच मोफतमध्ये सेवा दिली जाते आणि मग नंतर प्रीमियम म्हणजेच हप्त्यांमध्ये खर्च करण्यास सांगितलं जातं. दुसऱ्या प्रकारचं मॉडेल असतं व्यापाराचं. यात गेमशी संबंधित कॅरक्टर, टी-शर्ट, कप, प्लेट, कपडे यांची मुलांना विशेष आवड असते. गेमचा परिणाम असा होतो की मुलांमध्ये याप्रकारच्या गोष्टी खरेदी करण्याची ओढ लागते आणि मग यातून कंपन्या कमाई करतात."
गेमिंगशी संबंधित जाहिरात आणि चित्रपट बनवूनही पैसा कमावला जातो. अनेकदा चित्रपटांवर आधारित गेम्स येतात. चित्रपटाची लोकप्रियता गेमच्या प्रचार-प्रसारासाठी मदत करते, तर कधी गेमची लोकप्रियता चित्रपटाच्या प्रचार-प्रसारासाठी मदत करते.
जी माणसं हा गेम व्यावसायिकरित्या खेळतात, त्यांना सरकारच्या या निर्णयामुळे नुकसान सोसावं लागू शकतं. यातील अनेक जण यूट्यूबवर प्रसिद्ध आहेत. यापद्धतीचे गेम आयोजित करणाऱ्यांनाही मोठं नुकसान सोसावं लागू शकतं. पण, टिकटॉकवरील बंदीनंतर पब्जीवर बंदी घालण्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे अनेकांनी दुसरे गेम खेळायला सुरुवात केली होती.
इतर पर्याय कोणते आहेत?
पीयूष यांच्या मते, "सध्यातरी भारतात ऑनलाईन गेमचं मोठं फॅड नाही. भारतीय विकसक यात अजून खूप मागे आहेत. आता पब्जीवरील बंदीनंतर देशातील अनेक उद्योजक गेमिंगमध्ये यायचा विचार करतील. कारण आतापर्यंत त्यांना पब्जीच्या लोकप्रियतेची अधिक भीती वाटत होती."
रूटर्सची चर्चा केली तर त्यांच्याजवळ 'फ्री फायर' आणि 'कॉल ऑफ ड्यूटी' खेळणाऱ्यांची संख्या जास्त आहे. 'फ्री फायर' सिंगापूरच्या कंपनीनं बनवलं आहे आणि भारतात ते खेळणाऱ्यांची संख्या 5 कोटींच्या आसपास आहे. तसंच 'कॉल ऑफ ड्यूटी'चे जवळपास दीड कोटी यूझर्स आहेत.
भारतात वेगवेगळ्या पद्धतीचे मोबाईल आणि ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांची किंवा पाहणाऱ्यांची संख्या जवळपास 30 कोटी आहे. लॉकडाऊनमध्ये ही संख्या वाढत चालली आहे. यात बबल शूटर, मिनीजॉय लाईट, गार्डन स्केप, कॅँडी क्रश या अशा भारतीय गेम्सचा समावेश आहे.
गेल्या चार ते पाच महिन्यांपासून लोक घराबाहेर पडत नसल्यामुळे गेमिंजचं मार्केट आपोआप वाढत चाललं आहे.
विकास जयस्वाल गेमशन टेक्नॉलॉजीचे संस्थापक आहेत. बीबीसीला त्यांनी सांगितलं, "लॉकडाऊन पूर्वी त्यांचे सक्रिय यूझर्स 13 ते 15 दशलक्ष होते. जे आता लॉकडाऊनमध्ये 50 दशलक्ष झाले आहेत. त्यांच्या कमाईत पाच टक्के वाढ झाली आहे. असं असलं तरी गेमिंग इंडस्ट्रीचा पीक यायला अजून वेळ असल्याचं त्यांचं म्हणणं आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)