कोरोनाची लक्षणं 24 आठवडे तशीच राहिली तर?

    • Author, स्टेफानी हेगार्टी
    • Role, पॉप्युलेशन करस्पॉडंट

मोनिक जॅक्सन यांना कोरोनाच्या सुरुवातीच्या काळातच हा आजार झाला. सहा महिन्यांनंतरही या आजारातून त्या पूर्णपणे बऱ्या झालेल्या नाहीत. काही हजार लोकांना या आजाराने घातलेला विळखा अद्याप सुटलेला नाही. मोनिक त्यापैकीच एक आहेत. आपल्याला काय काय होतंय आणि उपचारांसाठीचे वृथा प्रयत्न याचं वर्णन मोनिक डायरीत लिहून ठेवतात.

वर्षभरापूर्वी मोनिक यांनी मशरुमसंदर्भात एक टेड टॉक पाहिला. फंगी नावाच्या व्याख्यात्याने मशरुमच्या नेटवर्कविषयी सांगितलं. मशरुम हे खऱ्या अर्थाने वर्ल्ड वाईड वेब आहेत. जंगलाखाली त्यांचं स्वत:चं असं नेटवर्क असतं. झाडांना अडचण जाणवली तर ती एकमेकांना मदत करतात.

मोनिक यांना कोरोना होऊन आता 24 आठवडे उलटले आहेत. कोरोनाविरुद्धचा त्यांचा लढा अजूनही सुरूच आहे. मागे वळून आठवताना, मशरुमबाबतचा टेड टॉक त्यांना आठवतो.

मोनिक यांना प्रदीर्घ मुक्कामी राहणाऱ्या या विषाणूने ग्रासलं आहे. त्यांच्या केस स्टडीचा डॉक्टर अभ्यास करत आहेत. त्या मार्चमध्ये आजारी पडल्या. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. पण ही लक्षणं त्यांच्या शरीरातून कधीच गेली नाहीत. पाच महिन्यांनंतरही आपल्या शरीरात काय होतंय हे त्यांना अद्याप समजू शकलं नाही.

मोनिक मोकळ्याढाकळ्या स्वभावाच्या आहेत. हायपरअॅक्टिव्ह असल्याचं त्या सांगतात. थाई बॉक्सिंग आणि जिऊ जित्सू हे त्या शिकलेल्या आहेत. सेंट्रल लंडनमधल्या आर्ट गॅलरीतल्या नोकरीसाठी दररोज 12 मैल सायकल चालवत जातात आणि येतात. मात्र गेल्या काही आठवड्यात त्यांचं आयुष्य पूर्णत: बदलून गेलं आहे. आता त्यांच्या बेडरुममधल्या भिंतीवर फ्रेश राहाण्यासाठी काय करायचं हे लिहून ठेवलं आहे.

मी आळशी नाही असं त्या सांगतात. काही दिवशी त्या जिना उतरून खाली जातात. त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही. त्यांच्या मनातली अस्वस्थता बाहेर काढायला त्यांना इन्स्टाग्रामचा आधार वाटतो. तिथे त्या कोरोनाची लक्षणं इलस्ट्रेशन फॉर्ममध्ये नोंदवून ठेवतात. डायरीच्या माध्यमातून त्या लोकांना आपल्याबद्दल सांगतात. आपल्याप्रमाणेच कोरोना ज्यांच्या शरीरात ठाण मांडून बसला आहे त्यांच्याशी कनेक्ट होण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

कोरोना विषाणूचा अभ्यास जगभर सुरू आहे. परंतु काहींच्या शरीरात मुक्कामी आलेल्या विषाणूने डॉक्टरांनाही पेचात टाकलं आहे. सौम्य लक्षणं आढळलेल्या लोकांच्या शरीरातला हा विषाणू औषधांनी जात का नाही?

मोनिक आणि त्यांची मैत्रीण साधारण एकाच वेळेस आजारी पडल्या. त्या दोघींनी एकत्र ट्रेन प्रवास केला होता. सुरुवातीला त्यांचा एकमेकींशी संपर्क असे. त्यांची लक्षणंही साधारण सारखीच होती. पण नंतर त्यांचा एकमेकींशी संपर्क तुटला. आमचं बोलणं बंदच झालं.

पहिल्या दोन आठवड्यांमध्ये त्यांना खूपच अशक्त वाटत असे. त्यांना एवढं बरं वाटत नसे की अंथरुणातून उठायचीही ताकद नसे. लंडनमध्ये बऱ्यापैकी थंड वातावरण होतं. तरीही त्या जेमतेम कपड्यात असत. शरीर थंड ठेवण्याकरता बर्फ कपाळाला चोळत असत. थर्मामीटर मिळेनासे झाले पण मला ताप असावा असं त्या सांगतात.

मला वाटतं हे म्हणणंही खूप विचित्र आहे. खूप काही वाटत राहतं. पण ते चूक की बरोबर ते समजत नाही.

दुसऱ्या आठवड्यात त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स आली. त्यांच्या शरीरातली ऑक्सिजनची पातळी ठीक म्हणता येईल एवढीच होती. लक्षणांबरोबरीने मला पॅनिक अटॅक आला असावा असं त्यांनी सांगितलं. त्यांची कोरोना चाचणी झाली नाही. कारण त्यावेळी युकेमध्ये त्यावेळी टेस्टिंगचं प्रमाण अतिगंभीर केसेसपुरतं मर्यादित ठेवण्यात आलं होतं.

बरं होण्यासाठी त्यांनी घरगुती उपचार सुरू केले. लसूण आणि मिरपूड खाताना काहीच चव जाणवली नाही. ठसकासुद्धा लागला नाही. एकदम थकल्यासारखं वाटत होतं. दिवसातून दोन लोकांना मेसेज करणंही त्रासदायक वाटे अशी अवस्था होती.

दोन आठवड्यांनंतर काही लक्षणं कमी झाली परंतु त्यांची जागा नव्या लक्षणांनी घेतली. माझ्या छातीत दुखू लागलं. त्या वेदना असह्य होत. छातीत डाव्या बाजूला आगीचा लोळ उठावा तसं दुखत असे. हार्ट अटॅक आल्यासारखं वाटत असे.

त्यांनी 111 नंबरवर कॉल केला, त्यांनी पॅरासिटॅमॉल घ्यायचा सल्ला दिला. वेदना दूर व्हाव्यात यासाठी ही गोळी देण्यात येते. मोनिक यांचंही छातीत दुखणं थांबलं पण आता पोटात दुखू लागलं. त्याचवेळी काहीही खाल्यानंतर त्यांच्या घशात आग होऊ लागली. डॉक्टरांना अल्सरची शंका वाटली. पोटाचा म्हणजे जठराच्या आजार असल्याचं कळलं.

सहा आठवड्यांनंतर मोनिक यांना लघवी करताना जळजळ होऊ लागली. त्यांच्या पाठीतही दुखू लागलं. डॉक्टरांनी त्यांना तीन वेगवेगळ्या अँटीबायोटिक्स लिहून दिल्या. हे बॅक्टेरिअल इन्फेक्शन नाही हे डॉक्टरांच्या लक्षात आलं. फक्त वेदना होत्या आणि त्या वाढतच गेल्या.

त्यांनी सोशल मीडिया वापरणं बंद केलं. पॉडकास्ट ऐकणंही नकोसं व्हायचं कारण कोरोना किंवा कोव्हिडचा उल्लेख होताच त्यांना अस्वस्थ वाटत असे. त्यामुळे त्यांच्या श्वसनावरही परिणाम होत असे. न्यूज जंकी म्हणजे सातत्याने बातम्या वाचणं-पाहणं त्यांना आवडत असे पण त्यांनी तेही सोडून दिलं.

सोशल मीडियावर गेल्यानंतर कोरोनामुळे गेलेल्यांचे मृतदेह पाहिले तर काय होईल अशी भीती त्यांना वाटत असे. ऑनलाईन शॉपिंग करताना त्यांना थोडं बरं वाटू लागलं. मात्र ड्रेसचा साईज टाकताना आपला आजार किती बळावला आहे याची त्यांना जाणीव होत असे. मला गुगलवर जायलाच भीती वाटू लागली असं त्या सांगतात.

जगात काय चाललंय हे त्या एका मैत्रिणीकडून जाणून घेऊ लागल्या. एक गोष्ट त्यांना समजली ती म्हणजे कृष्णवर्णीय आणि अल्पसंख्याक वांशिक पार्श्वभूमी असणारी माणसं मोठ्या प्रमाणावर जीव गमावत होती. मोनिक या स्वत: मिश्र वंशाच्या होत्या. त्यामुळे त्यांना भीती वाटू लागली.

मला एखाद्या हॉरर चित्रपटाप्रमाणे वाटू लागलं. सगळी कृष्णवर्णीय माणसं मरत आहेत असं मला वाटू लागलं. एके दिवशी आंघोळ करता करता त्या पॉडकास्ट ऐकत होत्या. त्यावेळी निवेदक सहजपणे म्हणाले की आफ्रो-अमेरिकन माणसं कोरोनामुळे मृत्युमुखी पडत आहेत.

त्या तात्काळ उठून बसल्या आणि त्यांनी अमेरिकेतल्या कृष्णवर्णीय नातेवाईकांना फोन केला. गेल्या काही दिवसात विविध कामांच्या निमित्ताने त्यांचा कृष्णवर्णीय लोकांशीच संपर्क आला आहे. उबर ड्रायव्हर, हॉस्पिटलमधील कर्मचारी, कॉर्नरवरील फूड सेंटर. कोरोना काळात मी जे जे करत होते तिथे हीच माणसं होती. ते माझा कोरोनाने ग्रासलेला काळ पाहत होते. माझ्या पूर्वीच्या दैनंदिन आयुष्यात असं नव्हतं.

आठवडे उलटू लागले तसं एका लक्षणांची जागी दुसऱ्यांनी घेतली. परिस्थिती दिवसेंदिवस विचित्र आणि अतर्क्य होऊ लागली. त्यांच्या मानेत दुखू लागलं, त्याचवेळी कानातही कसंतरी होऊ लागलं. कोणाच्या तरी हातात चिप्सचं पाकीट असावं आणि चुरचुर आवाज यावा तसं कानात व्हायचं. त्यांचे हात निळू पडू लागले. गरम पाण्याच्या नळाखाली हात धरावे लागले जेणेकरून ते नीट व्हावेत. त्यांनी स्वत:चा एखादा फोटो काढला आहे का असं डॉक्टरांनी विचारलं. पण हा विचार त्यांच्या डोक्यात आलाच नाही.

नवीन लक्षणं जाणवू लागत. मानसिक आरोग्य कसं आहे? ही सगळी लक्षणं दुर्धर अशी नाहीत आणि अतीव वेदनादायी नाहीत.

त्याच्या अंगावर पुरळ उठू लागलं. पायाकडचा भाग लाल होत असे. काहीवेळेला शरीराच्या वरच्या भागात ठणका लागून त्यांना जाग येत असे. एका रात्री, मैत्रिणीशी बोलत असताना त्यांच्या लक्षात आलं की चेहऱ्याचा उजवीकडचा भाग लुळा पडत चालला आहे. त्यांनी आरशाच्या दिशेने धाव घेतली आणि पाहिलं तर चेहरा ठीक होता. त्यांना पक्षाघात झालाय की काय असं क्षणभर वाटलं. डॉक्टरांनी तसं काहीही आढळलं नाही.

त्यांना संपूर्ण शरीरात काहीतरी विचित्र जाणवत असे. कोणीतरी पाय दाबून ओढतंय असं वाटे. कोणीतरी केस चेहऱ्यासमोर ओढतंय, अगदी तोंडात केस कोंबतंय असंही वाटे. नक्की काय काय होतंय हे डॉक्टरांना सांगण्यात त्यांचा बराच वेळ जात असे. पाच किंवा दहा मिनिटांता कॉल असे. तेवढ्या वेळात जे जे होत असे ते ते सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असे.

तुम्हाला कोरोना झाला आहे आणि त्यावर कसे उपचार करायचे हे आम्हाला कळत नाहीये असं त्यांनी सांगितलं असतं तर चाललं असतं. त्यांना उपचारादरम्यान कशी वागणूक मिळाली या ते सांगतात. NHS स्टाफवर त्यांनी टीका केली नाही. कारण त्यांच्यापैकी अनेकांनी त्यांची काळजी घेतली होती. माझ्यासारख्या स्थितीत अडकलेल्या लोकांसाठी यंत्रणाच नाहीये.

नऊ आठवड्यांनंतर मोनिक यांची कोरोनाची चाचणी झाली. त्या काळात आपल्यामुळे हा विषाणू लोकांच्या शरीरात संक्रमित झाला असेल अशी भीती त्यांच्या मनात होती. सात दिवसांकरता किंवा लक्षणं जाईपर्यंत विलगीकरणात राहा असं सरकारचं म्हणणं होतं. परंतु लक्षणं गेलीच नाहीत तर काय अशी भीती त्यांना वाटे.

घरात एकमेकींशी संपर्क होऊ नये म्हणून फ्लॅटमेट्सनी फ्रीजवर आपापली खूण करून ठेवली. फ्रीज उघडताना प्रत्येकाने त्या विशिष्ट जागी हात लावूनच फ्रीज उघडायचा जेणेकरून अन्य ठिकाणी संपर्क व्हायला नको. अन्न बाहेर काढून, घेऊन त्या आपापल्या खोल्यांमध्ये जात असत.

एके दिवशी मोकळी हवा अनुभवण्यासाठी त्या घराजवळच्या पार्कमध्ये गेल्या. तेवढ्यात एक लहान मूल त्यांच्या दिशेने धावत आलं. मोनिक यांनी त्याच्यापासून दूर जाण्याचा कसोशीने प्रयत्न केला. आईला काहीच फरक पडला नाही. मूल तुमच्यापासून बरंच दूर आहे असंही ती आई म्हणाली. मोनिकने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. माझ्यामुळे विषाणू संक्रमित होऊ शकतो वगैरे त्यांनी सांगितलं. त्यावर आजारी माणसांनी घरातच राहावं असा सल्ला त्या लहान मुलाच्या आईने दिला.

हे असं सगळं सांभाळणं सोपं नसतं हे लोकांना माझी डायरी वाचून कळेल असं मोनिक यांना वाटतं. मित्रमैत्रिणींनी सर्वतोपरी मदत केली असं मोनिक आवर्जून सांगतात मात्र बाकीच्यांना मात्र माझा त्रास होऊ लागला होता. मला जे होतंय ते लोकांना कळतच नसे. कोव्हिड झालाय या भीतीने मला हे सगळं होतंय असं एकजण म्हणाला.

अखेर युके सरकारने कोरोनाची लक्षणं असणाऱ्या सगळ्यांसाठी टेस्टिंग सुरू केलं. आता आपली टेस्ट होणार याचं मोनिक यांना बरं वाटलं. टेस्टिंग सेंटर ड्राईव्ह इन होतं आणि त्यांच्याकडे गाडी नव्हती. माझ्या बहुतांश मित्रमैत्रिणींना गाडी चालवता देखील येत नाही. एका मित्राने लिफ्ट देऊन तो प्रश्न सोडवला. त्याने स्वत:चं आरोग्य धोक्यात घातलं.

टेस्टिंग सेंटरमध्ये डॉक्टर आणि नर्सेस धीर देतील असं मोनिक यांना वाटलं होतं. परंतु तिथे सैनिक होते. जून महिन्यातल्या एका उष्ण दुपारी खाकी वर्दीतल्या लोकांसमोर मोनिक टेस्टिंगसाठी हजर झाल्या. टेस्टिंगसाठी त्यांच्या नाकाचा स्वॅब घेण्यात आला तेव्हा ही माणसं किती तरुण आहेत याची त्यांना जाणीव झाली.

टेस्टचा निकाल निगेटिव्ह आला. हा मोठाच दिलासा होता. त्यांच्यामुळे मित्रमैत्रिणी तसंच कुटुंबीयांना संक्रमित होण्याचा धोका नाही हे डॉक्टरांनीच सांगितलं. परंतु मोनिक यांना विचित्र वाटलं. आपण संसर्गजन्य नाही ही भावना मनात ठसायला वेळ लागतो. टेस्टचा निकाल निगेटिव्ह असला तरी मोनिक यांना अजूनही बरं वाटत नव्हतं.

आजारी पडल्याच्या चार महिन्यानंतर मोनिक यांनी इस्ट लंडनमधलं हाऊस शेअर सोडण्याचा निर्णय घेतला. स्वच्छतेसारख्या साध्या गोष्टी पाळणंही अवघड होतं, म्हणून त्यांना मदत करू शकेल अशा कुटुंबांबरोबर राहायचं होतं.

मोनिक यांचा श्वासोच्छवास सुधारला होता. पू्र्वी त्यांना जिना चढणंही व्हायचं नाही. पण आता एका दमात मजला पार करता येतो. मात्र खोली साफ करण्यासाठी झाडू हाती घेतल्यावर श्वास कोंडला. त्यानंतरचे तीन आठवडे त्या अंथरुणाला खिळून होत्या.

बरं कसं व्हायचं यासाठी मोनिक यांच्या डोक्यात काहीही कल्पना येत नाहीत.

खूप लोक मला सांगतात की तुला पुन्हा सायकल चालवता येईल, बॉक्सिंग करता येईल. तु माझ्या घरी ये, तुला बरं वाटेल असं बरंच काही. पण मला याच्याने काही बरं वाटत नाही.

कोरोनाची लक्षणं ज्यांच्या शरीराला चिकटून राहिली आहेत त्यांच्यावर काय उपचार करायचे हे डॉक्टरांसमोरचंही कोडंच आहे.

तुम्ही काय करू शकता आणि काय नाही हे स्वीकारायला हवं. कारण एखाद्या दिवशी तुम्हाला खूप काही करावंसं वाटतं परंतु शरीर मोडकळीला आलेलं असतं. इमेल करण्यात, डॉक्टरांशी बोलण्यात बराच वेळ जातो. त्यानंतर मित्रमैत्रिणींशी बोलते. तोवर शरीरातली ऊर्जा हरवून जाते, मी दातही घासू शकत नाही त्यानंतर.

मानसिक आरोग्य नीट राखण्यासंदर्भात मोनिक यांना थेरपी सुरू करण्यात आली आहे. मनाला बरं वाटावं यासाठी काही उपाय त्यांना देण्यात आले आहेत. NHSमध्ये नोंदणी असलेल्या प्रत्येकाला अशी मदत मिळावी यासाठी मोनिक प्रयत्नशील आहेत.

आजारपणामुळे मशरुमची आवड असणाऱ्या मंडळींची गाठभेट होईल असं मोनिक यांना वाटलं नव्हतं. मशरुम हे अँटीव्हायरल प्रॉपर्टी असल्याचं मोनिक एका पोस्टमध्ये लिहितात. मशरुम त्याहीपेक्षा आणखी एका छान गोष्टीचा भाग आहेत.

मशरुम हे जमिनीलगतच्या नेटवर्कचा भाग असतात. जवळच्या झाडाच्या मुळाशी त्यांचा संबंध असतो. झाडांना एकमेकांशी संपर्क ठेवण्यासाठी हे मदत करतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

घरी जेवण पोहोचवणाऱ्या मित्रमैत्रिणींची त्यांना आठवण झाली. आजारी पडल्यापासून अनेकांनी तिला आधार दिला आहे. रुममध्ये आयसोलेट करून घेतलं आहे असं त्यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं. आधीच्या तुलनेत मला आता लोकांशी कनेक्टेड असल्यासारखं वाटतं. मोनिक यांची डायरी फॉलो करण्यासाठी @_coronadiary या अकाउंटला भेट द्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)