PUBG ला FAU-Gची टक्कर, पण हा नवा गेम आहे तरी काय?

केंद्र सरकारनं टिकटॉक, हॅलो अॅपनंतर चीनमधील कंपन्यांच्या मालकीचे आणखी काही अॅप्स बंद केले, त्यात PUBG चाही समावेश आहे. PUBG च्या चाहत्यांमध्ये नाराजी दिसून येत असतानाच अभिनेता अक्षय कुमारसोबत मिळून एका भारतीय कंपनीनं 'फौजी' (FAU-G) गेम आणलंय.

PUBG वरील बंदीनंतर या गेममुळे निर्माण झालेली बाजारातील जागा रिकामी झालीय. मात्र, तातडीनं अक्षय कुमार आणि बंगळुरूस्थित 'एन-कोर गेम्स' नावाच्या कंपनीनं FAU-G गेमची घोषणा केली.

विजयादशमीच्या दिवशी (25 ऑक्टोबर) अक्षर कुमारनं या गेमविषयीचं एक ट्वीट केलं.

त्यात ते म्हणाले, "फौजीचा टीझर लाँच करण्यासाठी आजच्यासारखा दुसरा दिवस असू शकत नाही, कारण या दिवशी सत्याचा असत्यावर विजय होतो."

यापूर्वी ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत हा गेम बाजारात दाखल होईल. अभिनेता अक्षय कुमारनं ट्विटरवर फोटो शेअर करून 'कमिंग सून' म्हटलं होतं.

'एन-कोर गेम्स' कंपनीचे सहसंस्थापक विशाल गोंडल यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, फिअरलेस अँड यूनायटेड गार्ड्स असं या गेमचं पूर्ण नाव असून, गेल्या काही महिन्यांपासून या गेमवर काम सुरू होतं. गेमची पहिली लेव्हल गलवान खोऱ्यावर आधारलेली आहे.

गलवान खोऱ्यातच भारत आणि चिनी सैन्यात जूनमध्ये हिंसक झटापट झाली आणि यात 20 भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता. वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) अजूनही दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती आहे.

या झटापटीनंतरच भारत सरकारने पबजीसह 118 अॅप्सवर बंदी आणली. यापूर्वी टिकटॉक, हॅलो अॅपवरही बंदी आणण्यात आलीय.

पबजी म्हणजे प्लेयर अननोन्स बॅटलग्राऊंड गेल्या काही वर्षांमध्ये भारतात प्रचंड लोकप्रिय गेम बनलाय. तरुणांमध्ये या गेमची मोठ्या प्रमाणात पसंती दिसून येते. त्यामुळेच ज्यावेळी पबजीवर बंदीची बातमी धडकली, त्यावेळी सोशल मीडियावरून नाराजीही व्यक्त करण्यात आली.

टीकाकारांच्या मते, FAU-G गेमच्या माध्यमातून एन-कोर गेम्स कंपनी भारतीयांच्या देशभक्तीच्या भावनेचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतेय.

एन-कोर गेम्सचे सहसंस्थापक विशाल गोंडल यांनी घोषणेत म्हटलंय की, "या गेममधून मिळणाऱ्या उत्पन्नातून 20 टक्के निधी भारतासाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबांना दिला जाईल."

अभिनेता अक्षय कुमार या एन-कोर गेम्सच्या या कथित मोहिमेला पाठिंबा देत असल्याचे म्हटले जात आहे. कंपनीच्या मते, या गेमला FAU-G असं नाव देण्याची कल्पना अक्षय कुमारचीच होती.

अक्षय कुमारनेही ट्वीट करून या गेमची माहिती दिली. त्यानं ट्विटरवर म्हटलंय, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेला पाठिंबा देताना हा अॅक्शन गेम Fearless And United-Guards FAU-G सादर करताना मला गर्व वाटत आहे.

मनोरंजनाबरोबरच हा खेळ खेळणाऱ्यांना आपल्या सैनिकांच्या बलिदानाचीही माहिती यात मिळेल. या गेममधून मिळणाऱ्या पैशातील 20 टक्के रक्कम 'भारत के वीर' ट्रस्टला दान देण्यात येतील."

गेम लाँच झाल्यावर काही दिवसांमध्येच 20 कोटी मोबाईलधारक हा गेम डाऊनलोड करतील अशी कंपनीला अपेक्षा आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब,वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)